दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
चकचकीत काचेची बंदी शाळा....
चकचकीत काचेच्या इमारतीत काम करा. पण एक लक्षात ठेवा काचेच्या इमारतीला जर तडा गेला, तर अख्खी इमारत कोसळणार आणि तिथे आधार द्यायला एकमेकांना शेजारचा माणूससुद्धा येत नाही. पण घरामध्ये काही किंवा आपल्या शेजापाजारी काही झाले तर हीच लोक धावत येतात. मग चकचकीत काचेच्या बिल्डिंगलासुद्धा आपल्याला जर घर बनवायचं असेल, तर मन हे मशीन न बनवता आत्मीयतेने काम करा. जो पैसा तुम्ही आपल्या कुटुंबासाठी कमवत आहात, त्यांना जर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला नाही, तर कमावलेल्या पैशाचा काहीही उपयोग नाही.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं आपण लहानपणी शिकलो. चॉकलेटचा बंगला हे काल्पनिक. आपल्याला माहिती होतं चॉकलेटचा बंगला हा खरा नसतो तरीदेखील स्वप्नांच्या दुनियेत आपण वावरत होतो. पण मोठे मोठे होत गेलो तसतसं इच्छा होत गेली की माझासुद्धा चॉकलेटचा बंगला नसेल, पण एक छोटस स्वप्नातलं घर असेल. त्यासाठी जिद्दीने शिकलो, प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली आणि तशी नोकरीदेखील मिळवली. अर्थात जगामध्ये जगायचं असेल तर पैसा पाहिजे, पैसा पाहिजे तर चांगले शिक्षण पाहिजे. तसे चांगले शिक्षण घेतले आणि चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण घराच्या बाहेर पडला.
खरंच! प्रत्येक जण जे घराच्या बाहेर पडला ते कायमच. हो ! कायमचंच. अशी म्हणण्याची वेळ आपल्याला आपल्या नोकरीनेच आणली. वितभर पोटासाठी आपण नोकरी करू लागलो. पोटाची खळगी भरता भरता आपल्या इच्छा आकांक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्या. पाच-सहा लाखाची घर ५०-६० लाखावर गेली. आणि आता तर ५०-६० लाखाची घर करोडोमध्ये गेली. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या स्त्री किंवा पुरुष प्रत्येकाने नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. चकचकीत काचेच्या इमारतीमध्ये दरवर्षी नवीन ठिकाणी नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. सुटाबुटात आपण वावरायला लागलो. दरवर्षी किंवा दर तीन-चार वर्षांनी नोकरी बदलली की तशी पगारात वाढ होते हे प्रत्येकाचे म्हणणे आणि हे खरंच आहे. इंग्रजी भाषेत म्हणायचं झालं तर, ग्रोथ हवी असेल तर कंपनी चेंज केलीच पाहिजे, असं मी हल्लीच्या मुलांचं बोलणं ऐकते. मग ते राहत्या घराच्या ठिकाणापासून कितीही अंतरावर असो, सगळे पटकन तयार होतात. आपली जन्मभूमी सोडून, ज्ञानभूमी सोडून, कर्मभूमी शोधण्याच्या मागे लागतात आणि ते कर्मभूमीदेखील त्यांना मिळते.
मग काय खरा संसार सोडून नोकरीचे ठिकाण हेच त्यांचा संसार बनतो. हो! नोकरीचे ठिकाणच त्यांचा संसार. अशी बोलण्याची वेळ आता आली आहे. मला आठवतंय बाबांचे नोकरीचे आठ तास होते. कधीतरी ओव्हरटाईम असायचा. आठ तास संपले की मॅनेजरयेऊन बाहेर काढायचे. का? तर जास्त वेळ काम केले तर ओव्हरटाईम द्यावा लागेल. पण काळानुरूप ओव्हरटाईम ही संकल्पना संपुष्टात आली. त्याकाळी बाबांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आम्हाला वेळ द्यायचे, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे. आमची इच्छा काय असायची, तर बाबांनी आमच्यासोबत वेळ घालवायचा. जर त्यांना वेळ नसेल तर अर्थातच आईसोबत असायची. पण आता असं झालेलं आहे की, घरातून बाहेर पडण्याची वेळ ही आई-वडील दोघांवर देखील आलेली आहे. आई वडील म्हणण्यापेक्षा घरातील मुलगा किंवा मुलगी. म्हणजेच ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशी व्यक्ती. इच्छा हा शब्द असाच. कारण ती इच्छा नसून काळाची गरज आहे. काळाच्या गरजेनुसार प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार नोकरी करत आहे. पण ही नोकरी म्हणण्यापेक्षा चाकरी करण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे.
नोकरीला चाकरी हा शब्द जाणून-बुजून वापरला आहे. कारण पण तसेच आहे. आठ तासाची नोकरी १२ तासावर आली आणि बारा तासाची नोकरी आता २४ तासावर आली. म्हणजेच दिवसाचे २४ तास नाही पण वीस तास तरी पगारदार वर्गाचे बाहेर जात आहेत. कामाचे १२ तास आणि दोन्ही बाजूच्या प्रवासाचे ३ ते ४ तास. पुन्हा घरी आल्यावर काम आहेच की, रात्री अपरात्री करत बसावे लागते. मग का बोलू नाही त्यांचे दुसरं घर ते. काचेच्या चकचकीत इमारतीमध्ये टेबल, खुर्ची आणि थंड हवेसाठी एसी, अजून काय पाहिजे? असा प्रश्न उच्च पदावर असणाऱ्या सो कॉल्ड मॅनेजमेंट वर्गाचा आहे. आम्ही तुम्हाला सर्व सुखसोयी देतो. म्हणजे तुम्ही आमचे बांधिल झाला. आता बांधील कसले? समजा तुमचं कामाची वेळ सकाळी नऊची असेल तर तुम्ही नऊच्या आधी आठ वाजता हजर राहायचे. ऑफिस सुटण्याची वेळ जर सहा वाजता असेल तर मात्र तुम्ही नऊ दहा वाजता ऑफिस सोडायचं. हो, आता हे नवीन फॅड सुरू झालेले आहे. वेळेच्या आधी निघून वेळेच्या नंतर घरी पोहोचायचं. घरी कोण आहे? घरी फक्त चार भिंती आहेत. ज्या चार भिंती बांधण्यासाठी माणूस रात्रंदिवस चकचकीत काचेच्या इमारतीत काम करत आहे. घरच्या भिंती काय? सिमेंट मातीच्या. त्या चार भिंतींच्या आत राहणारी, त्यांची वाट बघणारी कुटुंब, त्यांची वाट बघत नसते, तर त्यांच्याकडनं येणाऱ्या पैशांची वाट बघत असते, असा गैरसमज चकचकीत बिल्डिंगमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या ऑफिसर्सचा.
यामध्ये सर्वच ऑफिसर्स येतील असे नाही. काहींना मन आहे; पण काही खरच मशीन झाले आहेत. हो मशीन्स. स्वतः देखील २४ तास काम करायचे आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला देखील २४ तास काम करायला लावायचे. म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जेवढा वेळ देता येईल तेवढा द्यायचा. नाही दिला तर मग इन्क्रिमेंटचा काळ असो किंवा प्रत्येक दिवस असो, टोमणे खायचे. भलेही कितीही प्रामाणिकपणे काम करूनही बोलणी ऐकून घ्यायची. म्हणजेच पूर्वीच्या काळी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, आता ही कॉपरेट ऑफिसेस आपल्या मनावर, मनावर बोलण्यापेक्षा आपल्या मेंदूवर राज्य करत आहेत. मेंदू थकतो हे देखील त्यांना समजत नाही आणि जरी समजत असेल तरी काही होत नाही, असे म्हणून प्रत्येक व्यक्तीने, मग तो मोठ्या हुद्द्यावर असो, की लहान हुद्द्यावर असो, असं बोलून एक एक दिवस पुढे ढकलायचा. साठीतले आजार चाळीशीत आले आहेत. आता तर तेल बदललं तर साठीतले आजार चाळीशीत येत नाहीत, अशी जाहिरातवाल्यांनी उत्तम जाहिरात केलेली आहे. पण खरंच वैद्यकीय सल्ला घेतला तर वैद्यांचा डॉक्टरांचा असं म्हणणं असतं प्रत्येकाची झोप सात ते आठ तास शांतपूर्ण झालीच पाहिजे. मेंदूला शांतता मिळालीच पाहिजे. पण कामाचा ताण इतका असतो, की माणूस ऑफिसमधून लॉग आऊट करून आला तरीसुद्धा घरी आल्यानंतर लॅपटॉप उघडून काम करावं लागतं. मग इकडे आपले आई-वडील आपल्याशी काय बोलत आहेत? आपली भावंडं आपल्याशी काय बोलत आहेत? आपली लहान मुलं आपल्याशी काय बोलत आहेत? त्यांच्या आपल्याकडं काय अपेक्षा आहेत? याकडे काहीही लक्ष नसते. त्यांना इतकंच उत्तर दिलं जातं की, तुम्हाला काही कमी तर पडू देत नाही ना. माझे काम मला करू द्या नाहीतर, माझं काही खरं नाही. मला उद्या सगळ्यांसमोर चपराक बसेल. त्यामुळे घरातील बिचारे शांत राहतात. त्यांना आपल्या माणसाची होणारी चिडचिड, दगदग दिसत असते. पण हतबल निराश चेहऱ्याने बघण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नसते.
बरं शनिवार, रविवार सुट्टी दिली जाते. त्या सुट्टीतपण काहींना काम दिले जातात. कंपनी एखाद्या दिवशी सहलीला नेते किंवा काही जणांना बाहेरच्या देशात देखील जाण्याची संधी मिळते. हो? पण अरे, तिथे त्यांना आपली माणसं भेटतात का? ज्या व्यक्तींसोबत तुम्ही १२-१२ तास काम करता त्यांच्यासोबतच तुम्ही अजून वेळ घालवता. पण घरातील रक्ताच्या नात्यातील माणसं, यांना किती वेळ देता तुम्ही? हे का प्रत्येकाला समजत नाही. घरातील लहान मूल किंवा आई-वडील म्हंटले की, आपल्याला बाहेर जायचंय, उत्तर येतं.. वेळ नाही, काम आहे, तुमचं तुम्ही जाऊन या. घरातील शुभ कार्य असो किंवा दुःखद घटना घडलेली असो, तरीसुद्धा वरच्या साहेबाला विचारायचे की, आमच्या घरी अशी दुःखद घटना घडली आहे तर मी जाऊ का? त्यातनं पण एखाद्याचा मूड चांगला असेल तर जा म्हणणार किंवा आत्ताच जायची गरज आहे का? नंतर परत गेले तर नाही चालणार का? असे प्रश्न विचारतात. तुमच्या अगदी जवळचे होते का? घरातील होते की दूरचे नातेवाईक? हे असे प्रश्न विचारल्यानंतर समोरची व्यक्ती, घरात एखादा चांगला प्रसंग किंवा वाईट प्रसंग घडला आपल्या बॉसला नाही विचारणार आणि गप्प निमुटपणे सहन करणार. आपण निमुटपणे सहन केव्हा करत होतो? स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, कसेही हाल करत होते, तेव्हा आपण ते सहन करत होतो. पण हे ऋतुचक्राप्रमाणे परत आपल्यावर आलेलं आहे. का? तर बाहेरच्या देशातला प्रोजेक्टवर मी काम करत आहे. मग त्या वेळेनुसार मला काम करावं लागणार. मग ठीक आहे ना; त्या वेळेनुसार काम मला काम करावं लागणार. मग ठीक आहे ना; त्या वेळेनुसार काम करा. २४ तास तिथली लोकं आपली संस्कृती वापरतात का? मग आपण का त्यांच्या संस्कृतीचा अवलंब करायचा? का आचरणात आणायचं? तेथील लोक वेळच्या वेळी जेवतात, कुटुंबाला वेळ देतात, झोप पूर्ण करतात. आपल्याकडे उलट झालेल आहे. जेवणाच्या वेळा तर कोणीच आजकाल पाळत नाही. त्यामुळे नवनवीन आजारांना आपण निमंत्रण देत आहोत. तीस पस्तीस व्या वर्षी मधुमेह/डायबिटीस बीपी/उच्च रक्तदाब असे नवनवीन आजार होऊ लागले आहेत. चष्मा तर काय? बघायलाच नको. प्रत्येकाच्या नाकावर-कानावर लटकलेला आहे.
कोणाला वाटत नाही का? हे कुठेतरी थांबावं. काम करायला हवे. पैसे कमवायला हवेत, पण जो पैसा आपण आपल्या कुटुंबासाठी कमवत आहोत. त्या कुटुंबासाठी आपण किती वेळ देतो? हा विचार प्रत्येकाने करायला हवा. भलेही चार पैसे घरी कमी कमवा, वन रूम किचनच; टू रुम-किचन नाही घेतलं तरी चालेल, पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वेळ देता आला पाहिजे. कारण वेळ ही अशी आहे की, एकदा गेली की ती परत येत नाही. मग घरातील आनंदाचा प्रसंग देखील एकदा होऊन गेला आणि त्याला आपण हजर नसू किंवा दुःखद प्रसंग होऊन गेला आणि आपण म्हणू की अरे, मी आधीच त्या व्यक्तीला वेळ द्यायला पाहिजे होता, मग तेव्हा बोलण्याशिवाय आपल्याकडे काहीही राहत नाही.
मला आठवतंय.. बाबा कामावर जायचे, तेव्हा त्यांच्या प्रत्येक कामावरच्या व्यक्तींशी, कुटुंबाशी, आमची ओळख असायची. महिन्यातून सहा महिन्यातून किंवा वर्षातून बाबा आम्हाला त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी भेटवायचे. का? तर ओळख पाहिजे. ज्यांच्यासोबत मी काम करतो त्यांच्या परिवारासोबत आपल्या परिवाराशी ओळख झाली पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात आपण हजर पाहिजे, हे बाबांचं म्हणणं असायचं. त्यामुळे कदाचित प्रत्येक कुटुंबाशी घरोबाचे संबंध निर्माण झाले आणि अडीअडचणीला प्रत्येक जण हाक न मारता हजर राहायचे. पण आता कंपनी सतत बदलत असल्यामुळे किंवा जरी बदलली नसली तरीसुद्धा ज्यांच्यासोबत काम करतात, त्यांच्या कुटुंबाशी एकमेकांचा काहीही संबंध येत नाही. कोणाच्या घरी काहीही कार्यक्रम असेल आणि त्याचं बोलावणं आलं, तर फक्त तीच व्यक्ती जाणार. आपल्या बायकोशी, मुलांशी, आई-वडिलांशी ओळख होईल म्हणून आपण त्यांना घेऊन जाऊ, ते सुद्धा घरात असतात; किंवा आपण कोणत्या व्यक्तींसोबत काम करतो, हे जर घरातल्यांना माहिती असेल, तर तेसुद्धा निश्चित राहतील, त्यामुळे तरी घेऊन जायला पाहिजे असे मनात येऊन सुद्धा घेऊन जाता येत नाही.घेऊन जाता येत नाही म्हणण्यापेक्षा, त्या व्यक्तीला तरी त्या ठिकाणी पोचता येईल की नाही, हे त्यांचं त्यांनाच माहिती नसते. बॉसने परमिशन दिली तरच कोणाच्या लग्नाला, कोणाच्या घराची पूजा असेल, किंवा कोणाच्या घरात काही वाईट दुःखद घटना घडली असेल तर जाता येते. अन्यथा खाली मान घाला आणि काम करा. काम पूर्ण झालेच पाहिजे. भले मग तिथे कोणी मरून पडो किंवा कोणाला मेडल मिळो, तुम्ही खाली मान घालून काम करायचं.
आता तर अजून एक नवीनच सुरू झालेल आहे. म्हणजे माझ्यासाठी नवीन असेल किंवा जुनंदेखील असेल. दिवाळीला एक दिवस ऑफिसमध्ये दिवाली सेलिब्रेशन करणार. मग सेलिब्रेशन करताना काहीजण खरंच मज्जा करतात आणि काही बिचारे बॉसला घाबरून काम करत असतात. मग हे काय तुमचा दीपावली सेलिब्रेशन? आपण पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी करतो. पण या कॉर्पोरेट वाल्यांच काय? मिठाईचे बॉक्स हातात द्यायचे किंवा एखादं छोटंसं गिपट द्यायचं, की झाली सर्वांची दीपावली साजरी. नशीब! महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी तरी एक दिवस सुट्टी दिली जाते. त्यामुळे का होईना, सर्वजण एकत्र आनंदाने दीपावली साजरी करतात. बाकीच्या सणांबद्दल तर विचारायची सोय नाही. कॉर्पोरेटमध्ये काम करायचे असेल तर, आमचे रुल्स रेगुलेशन फॉलो करावे लागतील असे म्हटले जाते. आता हे कुठेतरी थांबवायचे असेल, तर प्रत्येकाने स्वतःला मर्यादा घालून दिली पाहिजे. कारण प्रत्येकाच ऑफिस पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे असे नाही, दोन किंवा तीन तासावर पण आहे. म्हणजे नक्कीच प्रत्येकाला तेवढ्या वेळ आधी निघावं लागतं. म्हणजे २४ तासांपैकी आपण किती तास आपल्या कुटुंबाला देतो? हा प्रत्येकाने आढावा घेतला पाहिजे. नोकरी शोधताना देखील मला असे वाटते की, जवळपास शोधावी. कारण तुमचं पॅकेज जितकं मोठं होत जातं तितका जास्त टॅक्स देखील तुम्हाला भरावा लागतो. म्हणजेच तुम्ही करताय काय? वागताय काय?ह्याचा प्रत्येकाने आढावा घेतला पाहिजे. कदाचित हे मत मांडत असताना माझी बुद्धी कमी पडत असावी किंवा मी काही चुकीचं देखील बोलत असावी. पण माझ्या मनाला एवढंच वाटतंय की जो पैसा तुम्ही आपल्या कुटुंबासाठी कमवत आहात, त्यांना जर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला नाही, तर कमावलेल्या पैशाचा काहीही उपयोग नाही.
पैसा कमावून घेऊ आणि नंतर मज्जा करू, नंतर कुटुंबाला वेळ देऊ, असा जर कोणी विचार करत असेल तर तो चुकीचा आहे, कारण कोण काळे येईल कैसा? नाही काळाचा भरोसा. हो! आपल्याकडे उदाहरण आहे, कोरोना सारख्या महामारीमध्ये आपण बघितले, कितीही पैसा तुमच्याकडे असून तो काही कामला आला नाही. तिथे कामी आले ते आपले नाते, ओळखी. कारण त्या काळामध्ये माणुसकी महत्त्वाची होती. एकमेकांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे होतं आणि ज्या कुटुंबाने एकमेकांना मानसिक आधार दिला ती कुटुंबं आता अजूनही घरोबाने राहत आहेत. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते, असं आपण म्हणत असलो, तरीसुद्धा प्रेम, आईची माया, मुलांचं गोड हसण, हे फक्त त्यांना दिलेल्या वेळेतूनच आपल्याला मिळत असतं.
चकचकीत काचेच्या इमारतीत काम करा. पण एक लक्षात ठेवा काचेच्या इमारतीला जर तडा गेला, तर अख्खी इमारत कोसळणार आणि तिथे आधार द्यायला एकमेकांना शेजारचा माणूससुद्धा येत नाही. पण घरामध्ये काही किंवा आपल्या शेजापाजारी काही झाले तर हीच लोक धावत येतात. मग चकचकीत काचेच्या बिल्डिंगलासुद्धा आपल्याला जर घर बनवायचं असेल, तर मन हे मशीन न बनवता आत्मीयतेने काम करा. जर प्रत्येकाने आत्मीयतेने काम केले हृदय दगड बनणार नाही, माणुसकी नाहीशी होणार नाही. त्या काचेच्या इमारतीत मशीन काम नाही करत, एक सजीव प्राणी काम करत आहे, ही भावना निर्माण करण्याची गरज आत्ताच्या काळात आली आहे.त्यामुळेच या इमारतीला आपण बंदी शाळा म्हणतो. ज्याप्रमाणे माझी शाळा मला खूप आवडते, त्याचप्रमाणे माझी चकचकीत काचेची इमारत मला आवडते आणि मला काम करायला तिथे जायला आवडतं, असं जेव्हा प्रत्येक जण म्हणेल, नाईलाजाने जाणार नाही, तेव्हाच त्या चकचकीत इमारतीला आपण बंदी शाळा म्हणणार नाही. प्रत्येकाने ठरवावं की आपलं कामाचं ठिकाण हे मंदिर आहे की बंदी शाळा. - सौ. निवेदिता सचिन बनकर-नेवसे