किनारा

निसर्गाचा नियम असा आहे की भरतीला किनारा आणि ओहोटीला खोल समुद्रात...असा हा लाटांचा एकुण प्रवास २४ तासांत २ वेळा अविरत सुरु असतो. ओहोटीमुळे लाटांशी खेळ घातक ठरू शकतो...म्हणून जवळ जा पण खोलवर जाऊ नका.

कोकणात अनेक समुद्र किनारे आहेत. समुद्र तोच, किनारे वेगवेगळे!  त्या त्या किनाऱ्यावर पर्यटकांची ये-जा कायम सुरू असते. काहीं शासनमान्य तर काहींना घरगुती व्यवसाय म्हणून काम मिळालंय. पर्यायाने दैनंदिन आर्थिक गरजांची पूर्तता होऊ लागलीय, हे मात्र खरे आहे.

पण, तरीही पर्यटन हा शासनमान्य व्यवसाय आहे व तो कसा चालवावा हे बहुतांश स्थानिकांना तेव्हढंसं कळलेलं नाही, हेही खरे आहे!! उदाहरणार्थ, एकदा मी स्वतः काहीं मित्रांसमवेत किनाऱ्यावर बसलो होतो. आमच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या इतक्यांत, एक तरुण जोडपं आपल्या पाल्यास कडेवर घेऊन थेट समुद्र स्पर्शास लगबगीने जातांना मज दिसले. दर्यास ओहोटी लागली होती. मीच हाक मारून त्यांना वळवले. अर्थातच अनोळखी भाव त्या दोघांच्याही मुद्रेवर स्पष्ट जाणवत होते.

निसर्गाचा नियम असा आहे की भरतीला किनारा आणि ओहोटीला खोल समुद्रात...असा हा लाटांचा एकुण प्रवास २४ तासांत २ वेळा अविरत सुरु असतो. ओहोटीमुळे लाटांशी खेळ घातक ठरू शकतो...म्हणून जवळ जा पण खोलवर जाऊ नका, ओहोटीला पाया खालील वाळूसुद्धा समुद्रात खेचली जाते. जास्त खोल पाण्यांत न जाता सनसेटचे फोटो क्लिक करा...असं त्यांना मी सुचवलं. ते १५ मिनिटांत परतले व मला त्यांनी बोलावलं. जोडपं उच्चशिक्षित होते. माझ्याविषयीं विचारू लागले व कांही अंतरावर उभ्या असलेल्या स्विपटला टेकून एका व्हिलचेअर वर बसलेल्या व्यक्तीपर्यँत येण्यास विनंती केली. वयोमान आणि शारीरिक व्याधींमुळे त्याचे वडील थकलेले दिसले. त्या व्यक्तीनेसुद्धा आर्कटिेक्ट म्हणून काम करून अपंगत्वामुळे निवृत्ती स्वीकारली असे त्यांनी सांगितले. समुद्र हा कायम आकर्षणाचा विषय त्यांचा. त्या तरुण जोडप्याने कसलाही संकोच न दाखवता आपल्या वृद्ध पित्यास कोकणची सैर करवण्यास सोबत आणलं. खरंच अशी कांही उदाहरण मिळताच जगण्याची इछा वाढते. व्हीलचेअरला फोल्ड करून जोडप्याने आपल्या पित्यास गाडीत बसविले. छोटा नातूसुद्धा आजोबा शेजारी जाऊन बसला. माझा सेल नंबर सेव्ह केला त्यांनी व स्विपट निघून गेली.

असेच एकदां...रत्नागिरीच्या गणपतीपुळे किनार्यावर घडलेली दुःखद घटना त्यावेळी मज आठवली. देशावरून (नक्की ठिकाण आठवत नाही) तीन शिक्षिका गणपतीपुळे किनाऱ्यावर पोहायला गेल्या. में महिना असल्याने पर्यटकांची वर्दळ नेहमींपेक्षा जास्त होती. अशीच वेळ होती...दर्या ओहोटीची वेळ. सूर्यास्त होणार...आणि बघता बघता त्या तीनही शिक्षिका भर समुद्रात खेचल्या गेल्या., ओहोटीमुळे पाण्याला करंट जास्त होता...त्या तीन्ही शिक्षिका दुर्दैवाने वाहून गेल्या!!त्यावेळी अनेक नेते मंडळी तसेच जागृत पत्रकारांनी पर्यटकास निवेदनातुन विनंती केली की डायव्हर्सशिवाय समुद्रात लाटांवर पोहायला जाऊ नये. तत्सबंधीचा एक लेख पुण्यनगरी दैनिकात प्रकाशित झाला होता.

बहुतांशी पर्यटकांना कोंकणची हिरवळ भुलवत असते तर काही आंबटशौकिन नको तो व्यसनी बार सोबत आणुन मदिरा झिंग स्वीकारतात. हे ठीक नव्हे. काहींना कळतं तर काहींना वळत नाहीं. तो विषय अलाहिदा. नंतर नशिबास दोष का द्यावा? पंचनदी/कोळथरं ही जुळीं भावंडं आहेत. हिरवळ तिकडे असेल तर हिरवळ इकडेसुध्दा तेव्हढीच आहे. समुद्र किनारा दोन्ही गावांना लाभलाय; पण कोळथरच्या किनारी निसर्गाने स्वछ पुळण पसरवलेली आहे.  पंचनदी (लकडतर) हा खडकाळ किनारा! निसर्ग तोच त्याची रूपं वेगवेगळी!! तिकडे वाळू नाही; तर अलीकडे पुळणच पुळण!

कोळथर म्हणजे नारळी सुपारीच्या उंच पुऱ्या हिरव्यागार बागा!! आणि तरीने (होडीने) पैलतीरी उतरून पायीं गटागटाने चालत खडकाळ भाग चालून गेल्यावर सुमारे मैलभरावर एक मोठी गुफा आहे, ज्यास स्थानिक ‘घलई' असं म्हणतात. ती गुफा म्हणजे समुद्राच्या लाटांचा मार सहन करून तयार झालेले नैसर्गिक भुयार होय जे वरून उघडे असते (ओपन टू स्काय). त्या घलईत आपण उच्चारलेला एक शब्द इको बनून पुन्हां-पुन्हां ऐकू येतो. अशा ठिकाणी तरुणाईल्या ३०-३५ वयोगटाच्याच तरुणांनी भटकंती अनुभव घ्यावा. सोबतच पाणी तसेंच आवडीचा खाद्य पदार्थ जरूर घ्यावा. ट्रेकिंग केल्यानें थोडी भूक लागते. इकडे खडक आणि तिकडे लाटांचा जल्लोष...अशा वातावरणात मदिरा प्राशन करू नये, प्राणघातक ठरेल. असे फक्त सुचवू इच्छितो.

अशा आडगांवी पर्यटन करतेवेळी ज्येष्ठ नागरिकांनी तसेंच पाल्यासाठी पालकांनी पुरेसा औषधी डबा सोबत आणावा. कारण ३० किमी शिवाय वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीं!!  कांही अंशी प्रशासकीय घोळ नाही असे म्हणता येणार नाहीं. पण अर्थातच पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने त्यांचाही नाईलाज म्हणावा. साधी क्रॉसिन टॅब मिळणे दुर्लभ!

कोकण खरंच छान आहे पर्यटकांना भुरळ पडेल असे अनेक स्पॉट्‌स आहेत जे अजूनही उघड व्हायचे आहेत. इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या एकूण आरामाची जागा म्हणून ज्याची निवड केली त्याचं नांव आहे  दापोली.

आणखीन एक आकर्षणाचा विषय तो म्हणजे मासे!! होय, कोकणी खेकडा वृत्तीने महशुर असला तरी दाभोळ, बुराेंडी आणि हर्णै या तीन किनारी मान्सून सोडल्यास दर रोज मासे विक्री होते. त्याला लिलाव उठवणें असं म्हणतात. एकदां माझ्या मच्छीमार मित्रासोबत हर्णै बंदरात गेलो होतो. शेकडो होड्या नांगर टाकून मच्छी होडक्यात टाकत होते, तेथून मच्छी किनाऱ्यावरील टणक ओलसर वाळूत पसरवली जाते. ज्यामध्यें रावस, सुरमय, पापलेट, लेम्बुर, सर्गा, टायगर झिंगा अशी नामवंत चवदार मच्छी तर असतेच; शिवाय बाट, ढोमा, लेप, बगी, टायनी कोळंबी, हाईद, बोयरा, समुद्री रंगीत खेकडे, म्हाकळ, चडु, चेवण, बिरजा ही आणि अशी अनेक जातीची मच्छी बघायला मिळते. विशेष म्हणजे म्हाकळ जातीतला एक वेगळाच मासा अधूनमधून दिसतो तो म्हणजे हा चांदीगत चमकणारा मासा विविध तऱ्हेने शिजविला जातो. याशिवाय कर्ली, पेडवा, पाला, असें काटेरी मासेसुद्धा खवय्यांना भावतात. स्वप्नात दिसणारे मासे प्रत्यक्ष जर कोठे पहायचे असतील तर दापोली तालुक्यातील एकमेव ठिकाण म्हणजे हर्णै बंदर होय.

आता आगोट सरल्याने मच्छी व्यावसायिकांनी आपापल्या बोटी सुरक्षित ठिकाणी पार्क करून ठेवण्याचे दिवस आले आहेत. १५ ऑगस्टनंतर होड्या पुन्हा समुद्रात लोटल्या जातील. समुद्र आणि मच्छीमार हे एक अतूट नाते आहे, ज्यावर एक वेगळा लेख होऊ शकतो. तोपर्यंत थांबतो. -इक्बाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चकचकीत काचेची बंदी शाळा....