दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
आपलेच दात...
आपलेच दात आणि आपलेच ओठ, असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या दातांनी आपल्या ओठांना जखमी केलं, रुतून दुःख दिले, तरी आपण दात तोडू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. ना ओठ तक्रार करू शकतात, ना दाताचा सूड घेऊ शकतात. माणसाची जवळची नाती अशीच असतात. जी माणसाला त्रास देतात. असं सगळ्यात जवळचं नातं म्हणजे आई मुलाचं नातं!
बाळ जन्माला आल्यावर बाळ रडल्यावर आईला बाळ जिवंत आहे याची खूण जाणून आई खुश होते पण त्यानंतर आयुष्यभर बाळासोबत की रडत असते. नाळ कापल्यापासून थकलेली आई झोपेल म्हटलं की बरोबर बाळ रडलंच पाहिजे. आई जेवायला बसली की बाळाच्या शी-शु ची वेळ होते. त्यामुळे तो आईचा जेवणाचा आनंदही नष्ट होऊन जातो. सहलीला बाकी सगळे मोकळे ठोकळे चालत असताना, या मुलाला आईच्याच कडेवर बसायचं असते. बाबांच्यापण कडेवर बसायला तयार नसतात. आयुष्यभर ओझं वाहिलेली आई व त्या बाळालादेखील उचलते. हातात खाऊची पाण्याच्या पिशवी आली. त्या वाढत्या वयाच्या आणि वाढत्या वजनाच्या बाळाला सहलीच्या ठिकाणीपण फिरवते. कारण रडकं मुल आईचं असतं. वर सहलीहून घरी आल्यावर सगळे हॉलमध्ये तंगड्या पसरून बसतात आणि आई स्वयंपाक खोलीतसुद्धा राबते. आजारी मुलाला मांडीवर घेऊन, आईला बसावं लागतं आणि लोक मात्र उपदेश करायला येतात, तू ना त्याची काळजी घेतली नाही, म्हणून ते बाळ आजारी पडते.
तुम्ही मदतीला या हे कोणालापण आई बोलू शकत नाही. चांगले नोकर फक्त हिंदी चित्रपटातच असतात. कारण की ते पण नमक हराम होतात. दात आपले, चावे आपल्यातलेच असतात. ते दात घाव घालून तोडून टाकावे अशातले नसतात. जे अणकुचीदार टोकांनी आपल्याला टोचत असतात. चावे घेत असतात. आयुष्य चाव्यांनी भरलेलं असतं. चावी म्हणजे कुलूप उघडणारी चावी नाही, चावणाऱ्यांचे चावे त्यांनी भरलेली असतात. चावणारी माणसं आपली असतात म्हणून सोसायचे. ती बाहेरची असली तर काहीतरी करता येतं, टाळता येतं. अर्थात खूप असह्य झालं की जवळची नातीपण माणूस तोडून टाकत असतो आणि दात आणि ओठ अलग करून टाकतो. पण ते सोप्पं नसतं.
आई, तेच तेच सारखे सांगते. तेच तेच सारखं बरळते. उपदेश सांगते म्हणून मुलं आईवर रागावतात. पण ती पुन्हा पुन्हा सांगते, तरी तुम्ही ऐकत नाही, हे पण महत्त्वाचं आहे ना ! ती आईच्या अनमोल सल्ल्याची संपत्ती, अति परिचयात अवज्ञा होऊन जाते. खूप छान इंटेरियर केलं तरी काही दिवसांनी कंटाळा येतो. तसेही बघा सारे चांगले असले तरी नंतर नंतर त्याचा कंटाळा येतो. माझी एक मैत्रीण सांगत होती की आमच्या घरापासून दोन पलॅट पलीकडे तिची मुलगी स्वतंत्र पलॅट घेऊन राहते. लग्न केलं नाहीये, एकटीच राहते. पण तिला आई-वडिलांबरोबर राहायचं नसतं. लग्न झाल्यावर कुटुंबाला अडचण होते म्हणून आई-वडिलांपासून दूर राहणारी मुल, स्वतंत्र घर घेवून नवं घरटं बांधणारी कुटुंब भरपूर असतात .पण अनेक मुली आणि मुलं,कुटुंब नसताना, हल्ली परदेशातल्याआधुनिक पद्धतीप्रमाणे स्वतंत्र खोली, स्वतंत्र घर घेऊन, आई-वडिलांपासून दूर राहतात. नातेसंबंधात घर्षण हे होतंच असतं. वाद विवाद होत असतात. सांभाळून घेणं अजिबात सोप्पं नसतं. मी तुम्हाला उपदेश करते पण मलासुद्धा पटते की ते सांभाळून घेणे सोप्पं नसतं.
नव वृद्ध, वृद्ध अन् अती वृद्ध या तीन पिढ्यांच्या संघर्षात जीवन चालू राहते.
न बुढापेने हार मानी है,
ना जवानी ने दम तोडा है!
ये टकराव की ही कहानी सदियों से चली आती है !
असा हा कडवटपणे, तीन पिढ्यांचा संघर्ष चालूच राहतो. ओळखीचा चोर घरात घरात घुसतो आणि आपल्याला बांधून मारतो. अनेक गुन्ह्यांमध्ये असच असतं. नो फोर्स फुल एन्ट्री ! तशी वेळ असते.
अपने ही गिराते है नसेमन पे बिजलिया! आपलेच दात आपल्याला चावत राहतात.
एक कालच चित्रपट बघितला जे बेबी; नाव होतं. पाच मुलांची आई, मुलं तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मेंटल हॉस्पिटल मध्ये तिला राहायचं नसतं. तिला कुटुंबात राहायचं असतं. मेंटल हॉस्पिटल मधून ती बाहेर पळून जाते. तिला हे मुलं शोधतात त्यावेळी त्या अपत्य पुत्राची, त्या मुलाची बायको गरोदर आहे म्हणून तो खूप काळजी करत असतो, की आता हीचं कसं होईल ? नंतर बाळ झालं म्हणून आनंदीत होतो.म्हणजे स्वतःच्या बायकोला मुल होणार म्हणून ही व्यक्ती आनंदीत असते, पण आईची काळजी घेते का? आईने मुलाला आनंदानेच वाढवलं होतं, पण पुढच्या पुढच्या प्रवाहात माणसाला आपली मुलं भाचे-पुतणे-नातवंडे आवडायला लागतात. आई वडील मागे पडतात. अपवाद असतात; पण एकूणच दात आणि ओठाचं नातं हे असं असतं. बालकाला आई-वडील हे नेहमीचा आऊट ऑफ डेट वाटत असतात. आई काय तरी सल्ला देते, असे वाटते. मला असं आईच्या पोटात बाळ जेव्हा लाथा घालत असते ना तेव्हापासूनच त्याला आई मूर्ख आहे असेच वाटत असेल नाही का? खरंतर आईने चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. छोट्याशा तीन पौंडी गोळ्यापासून तुम्हाला ६० किलोपर्यंत मोठे केलेलं असतं, पण आईचे सल्ले आपल्याला आवडत नाही. आपल्या तब्येतीबद्दलची पूर्ण माहिती आईला असते. आई किरकोळ किरकोळ घरगुती उपाय सांगते. ते करु नका, ईथे जाऊ नका तिथे जाऊ नका, आरोग्याची अशी काळजी घ्या, असं सांगते. कारण आईला सगळ्यात जास्त काळजी आपल्या आरोग्याची असते. आहार सांगते, आपल्याला सल्ले देत असते. पण हे आईचं सल्ला देण मुलांना टोचते. हितकारक सल्लासुद्धा नको असतो का?
वयस्कर आई तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार, ती म्हातारी होणार, तिच्या बोलण्यात फरक होणार. सगळे काही हिंदी नट्यांसारखे किंवा राजकारणांसारखे टाक धुम राहु शकत नाही. मान्य आहे की आईची लाज वाटू शकते. वृद्धाश्रमातल्या अनेक आया बघितल्यावर मला असं वाटतं या सगळ्या आयादेखील आपल्या अपत्यांपासूनच दुःखी झाल्या आहेत. त्यांच्याच दातांनी, त्यांना जखमी केलंय. पण सांगतील कोणाला ? आपलेच दात आणि आपलेच ओठ! - शुभांगी पासेबंद