७७ वर्षे बेस्ट सेलर असलेली डायरी

७० भाषांत अनुवाद, ३० दशलक्ष प्रतींची विक्री आणि सात दशकांहून अधिक काळ सर्वोत्तम विक्रीच्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक आहे. कालांतरानं डायरी लेखनाची पद्धत साहित्यात खूप लोकप्रिय झाली. अनेक कादंबऱ्या डायरी लेखनाच्या स्वरुपात लिहिल्या गेल्या आणि गाजल्याही. त्याची प्रेरणा ॲनची डायरी - डायरी ऑफ  अ यंग गर्ल - असावी.

एखादं पुस्तक आपल्याला काही वर्ष लक्षात रहातं, काही पुस्तकं वर्षानुवर्ष लक्षात राहतात. पण लेखिकेच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं, गेली ७७ वर्ष वाचकांच्या पसंतीस पडलेलं, जगभरातील सुमारे ७० भाषांमध्ये अनुवादीत झालेलं आणि ३० दशलक्ष प्रतींची जगभरात विक्री झालेलं पुस्तक क्वचितच असेल. ह्या पुस्तकाचं नाव आहे दी डायरी ऑफ अ यंग गर्ल आणि लेखिका आहे ॲन फ्रँक.

फ्रँक कुटुंब मुळात जर्मन. ॲनचा जन्म १२ जून १९२९ ला फ्रँकफर्टला झाला. ॲनचे वडील पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या सैन्यात अधिकारी होते. पण त्यानंतर १९३३ साली हिटलर जर्मनीचा चान्सेलर झाला आणि त्याच्या ज्यू द्वेषानं जर्मनीतलं वातावरण ढवळून निघालं. फ्रँक कुटुंब हे ज्यू होतं. त्यांनाही त्याचा मोठा फटका बसला. ॲनच्या वडिलांनी; ओटोफ्रँक यांना त्यांना देश सोडावा लागला आणि ते हॉलंडच्या ॲमस्टरडॅम शहरात स्थलांतरित झाले. पण १९३९ला दुसरं महायुद्ध सुरू झालं, जर्मनीनं सुरूवातीला एका पाठोपाठ एक देश जिंंकायला सुरुवात केली आणि त्यातच १९४० साली हॉलंडचाही पाडाव झाला. हिटलरच्या ज्यू द्वेषाची झळ आता हॉलंडमधेही पसरायला लागली. हिटलरचा ज्यू द्वेष इतका प्रचंड होता की त्यानं हॉलंडमधून पलायन करणाऱ्या ज्यूंनाही पकडलं. फ्रँक कुटुंबाला हॉलंड सोडणं अशक्य झालं.

त्यावर उपाय म्हणून ओटो फ्रँक यांनी चक्क घरातच एक गुप्त घर तयार केलं आणि फ्रँक कुटुंबिय तिथे राहायला गेलं. तिथेच मग ॲनचा तेरावा वाढदिवस १२ जून १९४२ ह्या दिवशी साजरा झाला. ह्या वाढदिवसाला ॲनला एक डायरी भेट मिळाली आणि त्याच डायरीनं पुढे इतिहास घडवला.ॲनला ही डायरी १२ जूनला मिळाली असली तरी तिनं त्यात लिहायला सुरुवात केली ती तारीख होती दोन दिवसांनंतरची; १४ जून. ॲनची डायरी ही सगळ्या अर्थानं वेगळी होती. सर्वसाधारणपणे डायरी लेखनाची जी पद्धत आहे तशाच पद्धतीत ॲननं डायरी लिहायला सुरुवात केली. ती डायरी म्हणजे ॲनची मनोगतं आहेत. पण त्याच वेगळेपण म्हणजे ॲननं डायरीला एक नाव दिलं; किट्टी!

 पत्रलेखनाच्या स्वरुपात लिहीलेल्या ह्या डायरीतील प्रत्येक पत्र हे प्रिय किट्टी ह्या संबोधनानं सुरू होतं. फ्रँक कुटुंब हे त्या गुप्त घरात तब्बल ४ ऑगस्ट १९४४ पर्यन्त लपून राहिलं. जून १९४२ ते ऑगस्ट १९४४ हा काळ ॲनच्या डायरी लेखनाचा राहिला. केवळ १३ वर्षांची एक मुलगी तब्बल दोन वर्ष सातत्यानं डायरी लेखन करत होती. वाढदिवसाला मिळालेली डायरी लिहून संपल्यावरही ॲननं डायरी लेखन सुरूच ठेवलं. त्यानंतर तिनं वह्यांमध्ये डायरी लिहिली.

१९४४ मध्ये जर्मनी आणि हिटरलची हार सुरू झाली. आणखी थोडे दिवस लपून राहता आलं तर आपली सुटका होईल ही आशा निर्माण झाली. पण ४ ऑगस्ट १९४४ ह्या दिवशी जर्मन गेस्टापोंना फ्रँक कुटुंबाच्या त्या गुप्त घराचा सुगावा लागला आणि सगळ्या फ्रँक सदस्यांना अटक झाली. अटक झाल्याच्या तीन दिवस आधी ॲननं शेवटची डायरी लिहिली होती. अटक झाल्यावर ॲन आणि तिची बहीण मर्गोट यांना औशविग छळ छावणीत पाठवण्यात आलं. अनन्वित छळ, प्रचंड उपासमार, टायफाईडसारखा आजार ह्यामुळे १९४५च्या फेब्रुवारी मार्चमध्ये आधी मर्गोटचा आणि नंतर ॲनचा छळ छावणीतच अंत झाला. त्यावेळी ॲनचं वय होतं अवघं १५ वर्षं. तिच्या आईचाही अंत झाला होता. फ्रँक कुटुंबातील केवळ ओटो फ्रँक हे हिटलर आणि नाझींच्या तावडीतून वाचले. सुटकेनंतर ओटो हेफ्रँकफर्टला परतले. त्यांना त्या घरात ॲनच्या डायऱ्या मिळाल्या. १९४७ साली ते हस्तलिखित Hate Achterhuis ह्या शीर्षकाखाली डच भाषेत प्रकाशित झालं. तिच्या डायरीचं पाहिलं भाषांतर जर्मन भाषेत झालं. अल्पावधीतच ते प्रचंड गाजलं आणि इंग्रजीत Diary of a Young Girl ह्या शीर्षकानं प्रसिद्ध झालं. ह्या पुस्तकाचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे.

७० भाषांत अनुवाद, ३० दशलक्ष प्रतींची विक्री आणि सात दशकांहून अधिक काळ सर्वोत्तम विक्रीच्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक आहे. कालांतरानं डायरी लेखनाची पद्धत साहित्यात खूप लोकप्रिय झाली. अनेक कादंबऱ्या डायरी लेखनाच्या स्वरुपात लिहिल्या गेल्या आणि गाजल्याही. त्याची प्रेरणा ॲनची डायरी असावी. - अमित पंडित 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वक्फ बोर्डाला आणखी किती बळकट करणार ?