दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
वाढते तापमान... पर्यावरणासाठी आव्हान
यावर्षी उष्णतेने सर्वत्र कहर माजवला आहे. अनेक लोक उष्माघाताने दगावत आहेत. वर्षागणिक जर हे असेच होत राहिले तर आपले भवितव्य काय असा प्रश्न पडतो. पण या भवितव्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत हेही तितकेच खरे ! आजकालच्या सुधारित जगामध्ये आपण फक्त प्रगतीच्या मागे धावत आहोत. सुधारणेच्या नावाखाली निसर्गाचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत. अपरिमित वृक्षतोड करून आपण हिरवळ शोधत फिरत आहोत.
मनुष्यप्राणी हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. तोच स्वतःचे नुकसान करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे. दिवसोंदिवस ढासळत चाललेला निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात आहोत आणि त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जात आहोत. पर्यावरणासाठी एक हानिकारक गोष्ट म्हणजे वाढते तापमान. भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या जगाचं सरासरी तापमान हे १५ डिग्री आहे. भूशास्त्रीय पुरावे असं सांगतात की भूतकाळातलं तापमानाचं स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळं होतं. काही ठिकाणी जास्त तापमान तर काही ठिकाणी अगदी कमी असं ते होतं. पण सध्या जी तापमानवाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचं दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमानवाढीचं प्रमाण हे मानवनिर्मित घटनातून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जास्त झालं आहे. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना चिंताजनक वाटते. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असं त्यांना वाटतं.
‘हरितगृह परिणाम' किंवा ग्रीनहाऊस इफेक्ट
हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात.वातावरणाच्या थरांवर सूर्याकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्याकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्याकिरणं हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापतं. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचं तापमान तीस अंशांनी कमी असलं असतं आणि जीवसृष्टीसाठी ते घातक ठरलं असतं.या नैसर्गिक ग्रीनहाऊस परिणामाबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून उत्पन्न होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन होत असतं. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल म्हणतात.
ग्रीनहाऊस गॅसेसमुळे होणाऱ्या तापमानवाढीत सव्रााधिक वाटा हा पाण्याच्या वाफेचा असतो. पण हा परिणाम काही दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. पण त्याच तुलनेत कार्बन डायऑक्साईड गॅसेस वातावरणात जास्त दिवस टिकतात. हा परिणाम पूर्णतः जाण्यासाठी किंवा औद्योगिक क्रांतिपूर्व अवस्था येण्यासाठी काही शतकं लागू शकतील. त्यात भर म्हणजे हा कार्बनडायऑक्साईड समुद्र शोषून घेतो आणि याचा परिणाम समुद्री जीवसृष्टीवर होतो. इंधनाच्या ज्वलनातून आणि जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बोन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. तसेच मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात.
पर्यावरण म्हणजे आपल्या आसपासचे वातावरण ज्यात आपण राहतो. हवा, पाणी, वनस्पती पशु, पक्षी कीटक, माणूस हे सर्व मिळून पर्यावरण बनते. निसर्गामध्ये या सर्वांची रचना अशी केलेली असते कि पृथ्वीवर एक संतुलित जीवन चालू राहील.
पर्यावरणातील मुख्य घटक :- पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे सूर्य, पाणी, हवा, जमीन आणि यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व सजीव सृष्टी. आता आपण पर्यावरणातील घटकांबद्दल माहिती घेऊ तसेच या घटकांचा समतोल बिघडला किंवा माणसाने बिघडवला तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे पाहू.
हवा :- हवा ही सजीव सृष्टीच्या दृष्टीने अत्यावश्यक घटक आहे. त्याच्याशिवाय सजीव जिवंतच राहू शकत नाही. वायुमंडळात जो प्राणवायूचा साठा असतो. त्यामुळेच सजीव जिवंत राहू शकतात. या हवेत आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या प्राणवायूबरोबरच नायट्रोजन, कार्बनडाय ऑक्साइड, निऑन, हिलीयम, हायड्रोजन, ओझोन, व धुलीकण, बाष्प, असे अनेक घटक मिसळलेले असतात. त्यांचे नैसर्गिक प्रमाणे निसर्गचक्राला संतुलित ठेवण्याचे महत्वाचे कार्य करीत असते. या घटकाच्या प्रमाणात बदल झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते.
वायू प्रदूषण :- पक्षी, प्राणी, माणूस यांसारखे सजीव प्राणवायू घेतात आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात. आज आपण वाहनांचे प्रमाण अतिशय वाढलेले बघतो. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे शहरांमध्ये वायुप्रदूषण झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली माणसाने अपरिमित वृक्षतोड केली आहे. वनस्पती हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात आणि हवेत ऑक्सिजन सोडतात. परंतु अपरिमित वृक्षतोडीमुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन माणसांचे आयुष्य धोक्यात आले आहे. तसेच वाढते उद्योगीकरण, कंपन्यांमधून सोडला जाणारे विषारी वायू, आपण वापरात असलेली अत्याधुनिक उपकरणे यामुळे दिवसोंदिवस वायुप्रदूषण वाढतच आहे.
पाणी :- पर्यावरणातील दुसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे पाणी. आपल्या पृथ्वीचा ७१ % भाग हा पाण्यानी व्यापला आहे. हे पाणी विविध स्त्रोतांमधून आपल्याला मिळते. जसे नदीचे गोडे पाणी, समुद्राचे खारे पाणी, पावसापासून मिळणारे पाणी, जमिनीतील झऱ्यांपासून मिळणारे पाणी. जसे हवेशिवाय आपण जगू शकत नाही. तसेच पाण्याशिवायही आपण जगू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. पाण्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कारणांसाठी करत असतो. त्यातूनच पाण्याचा गैरवापरही होत असतो. वाढती लोकसंख्या, शहरात कामानिमित्त जाणाऱ्या लोकांचे लोंढे, उद्योगीकरण यामुळे पाण्याचा वापर दिवसोंदिवस वाढतच आहे. परंतु पाण्याचे साठे मात्र वाढत नाहीत, ते मय्राादितच असल्यामुळे काही ठिकाणी लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.
जल प्रदूषण, पाणी टंचाई :- आधुनिकीकरणामुळे माणसाने जरी गगनभरारी घेतली असली तरी त्याच आधुनिकीकरणामुळे आपल्याला जल प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. अनेक कंपन्या दूषित पाणी सर्रास त्या त्या ठिकाणच्या नद्यांमध्ये सोडत असतात, तसेच अनेक शहरांमध्ये सांडपाणी नद्या किंवा समुद्रात सोडण्यात येते, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे, तसेच नद्यांमधील जलचरांचे आयुष्य धोक्यात येत आहे.
जमीन :- जमीन हा पृथ्वीचा असा एक भाग आहे की, त्यावर आपण जीवजंतू पशूपक्षी, वनस्पती, वास्तव्य करीत असतात. भूमीच्या आत अनेकविध खनिज पदार्थ, वायू, पाणी यांचा अनंत साठा असतो. हा भूभाग माती, खडक, आणि विरघळून पुन्हा थंड घन झालेल्या विविध घटकांपासून बनलेला आहे.जमीन ही असा घटक आहे की, हा घटक जर सुरक्षित राहिला तरच पुढच्या सर्व गोष्टी सुरळीत होऊ शक्तील निवास व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, पाणी संकलन वृक्षसंपदा, पर्यावरण संतुलन या सगळयांचा मूलभूत आधार जमीन आहे.
भूप्रदूषण :- जमिनीचा निवासव्यवस्था, अन्नधान्य उत्पादन किंवा पाणी साठविण्यासाठी प्रचंड प्रमाणात दुरुपयोग केला जात असल्याने आज सारे जग अनेक तर्हेच्या दुष्परिणामांना तोंड देत आहे. याला एक कारण म्हणजे मानवाने केलेली अपरिमित वृक्षतोड हेही आहे. जमिनीचा वरचा थर हा अतिशय सुपीक असतो व तो निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. परंतु पुरामुळे अशा सुपीक मातीचा थर वाहून जातो.जमिनीची झीज होते जर वृक्ष लावले तर ते जमिनीची झीज होण्यापासून नक्कीच रोखू शकतात. आजकाल समुद्र, जलाशय बुजवून ती जागा माणसाने राहण्यायोग्य बनवली आहे. परंतु काही ठिकाणची जमीन खचून अपरिमित जीवहानी होण्याची शक्यताही असते. तसेच अनेक मोठे मोठे पूल बांधण्यासाठी, खाणकामासाठी अनेक ठिकाणी जमीन खोदली जाते. त्यामुळे आसपासची जमीन खचत आहे. अनेक ठिकाणी डोंगर फोडून बोगदे केले जातात, त्याने मानवाची खूप मोठी सोय होते. परंतु रस्ते बनवण्यासाठी झालेल्या वृक्षतोडीमुळे अनेक पक्षी, प्राणी त्यांच्या निवाऱ्याना मुकत आहेत. तसेच वृक्षांचा अडसर नसल्यामुळे डोंगर खचून दरडी कोसळून अपघातांचे प्रमाण वाढत आहे आता आपण पर्यावरणाचे मुख्य घटक पहिले. या सर्वांमध्ये पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी एक गोष्ट म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषण हे दिवसोंदिवस वाढतच आहे. दिवसरात्र चालणाऱ्या गाड्यांचे हॉर्न, लाऊडस्पीकर अशा अनेक मध्यमांतून ध्वनिप्रदूषण पसरत आहे. त्यामुळे लोकांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होत आहे.
पर्यावरणाला हानिकारक असे अनेक घटक आपण आपल्या दैनंदिन जीवनात सर्रास वापरत असतो. जसे हवाबंद अन्न ,पेट्रोल, डिझेल वर चालणारी वाहने, प्लास्टिक ई. प्लास्टिक हा घटक पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक आहे. आपल्या सरकारनी १८ मार्च २०१८ गुढीपाडव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे. सरकारने यापूर्वीही असे अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु ते अयशस्वी ठरले आहेत. याला कारण आपणच आहोत. कारण अजूनही अनेक दुकानदार छुप्या पद्धतींनी प्लास्टिक चा वापर करतच आहेत.२६ जुलै २०१५ च्या मुंबईत आलेल्या महाप्रलयाला या प्लास्टिक पिशव्याच जबाबदार आहेत. कचऱ्यात टाकलेल्या हजाराेंच्या संख्येने पिशव्यांमुळे गटारे, नाले तुंबून रस्त्यावर आले त्यामुळे खूप मोठा प्रलय आला, फार मोठ्या प्रमाणात जीवित हानी व वित्त हानी मुंबईने अनुभवली. प्लास्टिक नष्ट होत नाही. वर्षानुवर्षे ते तसेच राहते. ते पोटात गेल्यामुळे अनेक गाई-गुरे व इतरही प्राणी जीवाला मुक्त आहेत. ते जाळल्यास निर्माण होणार विषारी वायू समस्त जीवसृष्टीसाठी धोकादायक आहे. असे अगणित दुष्परिणाम या प्लास्टिकमुळे आपल्या जीवनावर होत आहेत.
याशिवाय एक मोठी समस्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड. जशी शहरे वाढतात तसाच कचराही वाढत आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड च्या समस्या वाढत आहेत. तो कचरा पसरणाऱ्या धुरामुळे जाळल्यास आसपासच्या कितीतरी किलोमीटर परसिरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. काही लोक असं म्हणतात की जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल असं काही नसतं. पण ती गोष्ट आहे याचे पुरावे वैज्ञानिकांनी दिले आहेत. गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचं सरासरी तापमान ०.८ डिग्रीनं वाढलं आहे आणि यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकातच ०.६ डिग्रीनं तापमान वाढलं आहे.सॅटेलाइटचा डेटा असं दाखवतो की अलीकडच्या दशकात सागरी पातळीत ३स्स् ची वाढ झाली आहे. उष्णतेमुळे पाण्याचं प्रसरण होतं त्यातून ही पातळी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. जसं वातावरण वाढतं तसं आधी एकमेकांजवळ असणारे रेणू हे दूर जातात त्यामुळे पाण्याची पातळी वाढते. त्याचबरोबर हिमनग वितळणं आणि हिमखंड वितळणं हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अंटार्टिकातला तसेच जगातल्या इतर भागातला बर्फ वितळत आहे. १९७९ पासून आर्टिक महासागरातली हिमक्षेत्र सातत्यानं कमी होत आहे. हिमक्षेत्र वर्षाला सरासरी चार टक्क्यांनी कमी होत आहे.
२०१२ मध्ये समुद्रातलं हिमक्षेत्राचं प्रमाण विक्रमी पातळीवर घसरलं होतं. १९७९ ते २००० या काळातील सरासरीच्या तुलनेत ते ५० टक्के कमी होतं. गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधल्या हिमखंड झपाट्याने वितळले जात आहेत. जर २.८ दशलक्ष क्युबिक किमीचे हिमखंड वितळले तर समुद्राची पातळी सहा मीटरनं वाढेल.या हिमखंडांचं वस्तुमान घसरत असल्याचंही डेटा सांगतो. याआधी पूर्व अंटाकिर्टकातील बर्फाच्या तापमानात चढउतार होताना दिसत नव्हती पण आता तिथं देखील हे बदल घडत आहेत. काही ठिकाणी वस्तुमान वाढणं हे देखील धोक्याचं लक्षण मानलं जातं.
हवामान बदलाचा फरक वनस्पती आणि वन्य प्राण्यांवर पडताना दिसतो. याचा परिणाम असा दिसत आहे की काही वनस्पतींना फुलं लवकर लागत आहे आणि फळंही लवकर येताना दिसत आहेत आणि प्राण्याच्या हद्दीत फरक दिसत आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून देखील जागतिक तापमानवाढ झाली नसल्याचं काही वैज्ञानिक म्हणत आहेत. या स्थितीला पॉज' असं म्हणतात. ही गोष्ट वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगितली आहे.
सौरऊर्जेत होणारे बदल :- वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणात घसरण, महासागरातल्या उष्णतेच्या साठ्यातील एकूण वाढ
पण नेमकं पॉजची प्रक्रिया काय हे गूढ अद्याप उकललेलं नाही. पण ही प्रक्रिया थांबेल अशा दृष्टीने बदल होताना दिसत आहे. पॉजची प्रक्रिया जेव्हा सातत्याने होते तेव्हा त्याला हायाटस म्हणतात. २०१४, २०१५, २०१६ ही तीन वर्षं सव्रााधिक उष्ण वर्षं होती. सायन्स जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार जून २०१५ मध्ये तापमानाचा अभाव होता हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. २०१३ साली प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजनं कम्प्युटर मॉडलिंगच्या आधारावर काही भाकितं केली आहेत. त्यापैकी काही सिद्धांत असं सांगत आहेत की १८५० च्या तुलनेत २१ व्या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात १.५ डिग्रीने वाढ होईल.
जागतिक तापमानवाढीची मर्यादा २ डिग्रीच्या खाली ठेवावी हे उद्दिष्ट ठेवणं देखील आता धोक्याचं ठरू शकतं. जागतिक तापमानवाढीचं उद्दिष्ट १.५ डिग्री ठेवणं हे सुरक्षित असल्याचं काही वैज्ञानिक म्हणत आहेत.आपण ऊर्जेचा वापर कसा करतो, आपण जमीन कशी वापरतो आणि आपली वाहतूक व्यवस्था कशी असावी, याबाबत आपल्याला अमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील, असं एका 20१८च्या अहवालात म्हटलं आहे. जर आपण आपल्या ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनात कमालीची घट केली तरी वातावरणावर हे परिणाम होताना दिसत राहतील. बर्फ आणि पाण्याच्या मोठ्या साठ्यांवर झालेला सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी अनेक वर्षं लागतील. तसेच वातावरणातून हे वायू पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी दशकं लागतील.
तापमान बदलामुळे आपल्यावर काय परिणाम होतील?
यामुळे काय बदल होतील हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही असं वैज्ञानिक म्हणतात. पण त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. अन्नधान्य निर्मितीच्या प्रक्रियेत बदल होईल. नैसर्गिक आपत्ती जसं की पूर, वादळं, दुष्काळ उष्ण वाऱ्याच्या लहरीत होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढेल. तापमान बदलामुळे निसर्ग बेभरवशाचा होईल इतकंच आता सांगता येईल जे आपण सध्या अनुभवतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मानवा ! आजही निसर्ग तुझा मित्र आहे. तुझ्या वागण्यामुळे तो तुझा शत्रू कधी होईल ते सांगता येत नाही. निसर्ग मानवासोबत जी तडजोड करतो त्याचा अतिरेक होऊ नये हीच इच्छा आहे. या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने इतकंच सांगावेसे वाटते
निसर्गाची तडजोड
मानवा नको दुर्लक्ष करू
शिकवेल तो धडा मोठा
घट तुझ्या पापाचे लागले भरू !!!
-सौ. संपदा राजेश देशपांडे