दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
एकमेकांत ‘इंटरेस्ट' असल्याने एकत्र येणाऱ्या व कायद्याने सज्ञान असणाऱ्या स्त्री-पुरुषांना रोखावे कसे? तर ते जवळपास अशक्यच भासणारे काम आहे. कायद्याने तुम्ही आम्ही अशा प्रकारे एकमेकांचा सहवास घेऊ पाहणाऱ्या स्त्री-पुरुषांना अडवू शकत नाही, असा निर्णय अनेक प्रकरणांत न्यायालयानेही दिला आहे. ज्याची त्याची शिकवण, संस्कार, नैतिकता, संयम या गोष्टी अशा प्रसंगी मोलाच्या ठरतात किंवा ठरत नाहीत.
केवळ ‘संधी' हाती न लागल्यानेच आपल्यातले अनेकजण ‘चारित्र्यवान' म्हणून वावरत असतात; त्यांना ‘योग्य ती संधी' मिळाली असती तर तिचा त्यांनीही ‘लाभ' घेतलाच असता, अशा आशयाचं एक विधान मी आचार्य प्र.के.अत्रे यांच्या साहित्यात वाचलं आहे. अत्रे म्हणजे ‘बडा खिलाडी माणूस' अशी ‘ख्याती' त्यांची त्याही काळात होती. ‘श्यामची आई' चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीशी अत्रे यांचे मधुर संबंध होते, हे जाहीर आहेच. असं म्हणतात की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू झाला आणि त्यामुळे अत्रे यांना दुसरे लग्न करता आले नसावे. अर्थात ते त्यांचे खासगी जीवन झाले; पण वाचक, चाहते, रसिक, अनुयायी, फॅन्स, साहित्यप्रेमी यांच्यासाठी तो विषय तसा खासगी राहात नाही. सार्वजनिक जीवनात प्रभावी व्यवितमत्व म्हणून वावरणाऱ्या सर्वांचेच खासगी जीवनही लोक तेवढ्याच आस्थेने जाणून घेण्यास उत्सुक असतात.
हा विषय भिन्नलिंगी आकर्षण व त्यातून जुळणाऱ्या संबंधांचा आहे. रीतसर बघून, घरच्यांची संमती घेऊन, समाजासमोर जाऊन सार्वजनिकरित्या व कायदेशीररित्या एकमेकांचा पति/पत्नी म्हणून स्विकार केल्यानंतरही अनेकदा आपल्याला पाहायला मिळते की यांच्यात काहीतरी वेगळे घडतेय. दोघांमधले एक किंवा दोघेही पुन्हा कुणामध्ये तरी ‘गुंतलेले' आहेत, कुणाशी तरी ‘मधुर संबंधां'त आहेत.‘लिव्ह इन रिलेशनशिप' हा शब्दप्रयोग खूपच अलिकडचा आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून हे घडत असल्याचे इतिहास सांगतो. ठरवून लग्न केलेल्यांच्या बाबतीत तर हे घडतेच; पण एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले व ‘चांद तारे तोडुन' आणण्याच्या बाता मारलेले संधी येताच दुसरे, तिसरे अकाऊंट उघडायला मागे-पुढे पाहात नाही असेही घडत आहे. का असे होत असावे? निती, सत्व, संस्कार, सामाजिक संकेत कमी पडताहेत? की भिन्नलिंगी शारीरीक आकर्षण या साऱ्यांना झाकोळून टाकते? आपल्याला शवयतोवर राजकारणी, चित्रपट तारे-तारका, गायक-गायिका, नामांकित खेळाडू, उद्योजक आदि सुप्रसिध्द व्यवितमत्वांच्या खासगी, वैवाहिक जीवनाबद्दल अधिक माहिती असते. कारण काही प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे अशा बाबी लगेच चव्हाट्यावर आणण्यात वाकबगार असतात. अभिनेता धर्मेंद्र याचा रीतसर विवाह प्रकाश यांच्यासोबत होऊन त्यांना मुले-बाळे असतानाही धरमसिंग देओल हेमा मालिनीच्या ‘प्रेमात' पडला. द्विभार्या प्रतिबंधक कायदा आडवा येतो म्हणून त्याने नावापुरता का होईना धर्म बदलला व तो दिलावर खान म्हणून मुसलमान बनला आणि हेमामालिनीशी त्याने लग्न केले. तरी या लग्नानंतरही म्हणे त्याचे अनिता राज हिच्याशी ‘सूत' जुळले होते. भारताचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याचा रीतसर विवाह डिंपल कपाडिया हिच्यासोबत त्यांच्या वयात पुष्कळ अंतर असतानाही झाला होता. पण कुठेतरी माशी शिंकली. मुले झाल्यावर त्यांचे जमेनासे झाले. राजेश खन्नाची आधीची मैत्रीण अंजु महेंद्रु होतीच. त्यात भर पडली टीना मुनीमची. ‘आम्ही एकाच टूथब्रशने दात घासतो' असे मुलाखतींमधून सांगण्यापर्यंत राजेश-टीनाने मजल मारली होती. पण पुन्हा काहीतरी घडले आणि टीनाने उद्योगपति अनिल अंबानीशी लग्न केले. दरम्यात डिंपल आणि सनी देओल यांच्यातील मधुर संबंधांच्या चर्चा रंगल्या.
वैवाहिक जीवनात एकमेकांशी न पटणे, जोडीदाराचे अकाली निधन होणे, त्याला/तिला असाध्य रोगाने ग्रासणे, त्याने/तिने स्वतःचा वेगळा मार्ग निवडणे अशा प्रसंगी दुसऱ्या जोडीदाराने अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. मानसिक आधार, शारीरीक गरज, कुटुंबाची सोय म्हणून दुसरे लग्न, लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय यावर हल्ली निवडले जाण्याचा काळ आला आहे. पण यातले काही असताना किंवा नसतानाही बहुपत्नीकत्व किंवा अनेकींशी/अनेकांशी संबंध ठेवणे, न जमल्यास लगेच घटस्फोट देणे हे प्रकारही गेली अनेक वर्षे होत आहेत. गुलशनकुमार या टी सिरीजच्या निर्मात्याचा खून करण्यात आला. त्याच्याशी मधुर संबंध असल्याबद्दल त्यावेळी विवाहिता असणाऱ्या एका मराठी गायिकेचे नाव सातत्याने घेतले जात असते. आशा भोसले यांचा प्रथम विवाह गणपतराव भोसले यांच्याशी झाला होता. नंतरचा विवाह पंचम अर्थात आर डी बर्मन यांच्याशी झाला होता. भानुरेखा गणेशन अर्थात रेखा या अभिनेत्रीनेही अनेक विवाह केले; पण कोणताच विवाह टिकू शकला नाही. पन्नाशीतही ‘जलवे दिखानेवाली' अभिनेत्री नृत्यांगना मलाईका अरोरा हिचा अरबाझ खानसोबत निकाह झाला. मुले झाल्यावर घटस्फोटही झाला. तिचे आणि अर्जुन कपूरचे मधुर संबंध असल्याचे विविध रील्स समाजमाध्यमांवर अधूनमधून प्रसारित केले जात असतात. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा विवाह दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत झाला होता. पण कालांतराने ते विभक्त झाले. रेणुका शहाणेचा प्रथम विवाह विजय केंकरे या रंगकर्मीसोबत झाला होता. तेही विभवत झाले, मग तिने आशुतोष राणासोबत दुसरा विवाह केला. बडे लोग, बडी बाते. मोठ्यांचे काहीही पचून जाते असे म्हणतात. सुप्रसिध्द व्यक्तीमत्वांनी कसेही वागले तरीही चालते; तर पार निम्नवर्गीय गटात निती, संस्कार, मूल्ये, सत्व, तत्व यांची रुजवण नीटशी न झाल्याने तिथेही सारे काही चालून जाते म्हणे ! सामाजिक बंधने, नितीमूल्यांच्या चौकटी, समाजमान्यता व तत्संबंधी संकेत वगैरे पाळायचे असतात ते तुम्ही-आम्ही मध्यमवर्गीयांनी. त्यांनी वेगळे वागता कामा नये, तसे झाल्यास लगेच त्यांना बोल लावले जातात, त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते, त्यांना बेजार केले जाते असा सर्वसाधारण अनुभव आहे.
आगरा येथील ताजमहाल म्हणे शाहजहान आणि मुमताझच्या गाढ, अमर्त्य, चिरकाल प्रेमाचे प्रतिक आहे. प्रत्यक्षात इतिहास तपासल्यास असे समजते की पाचवा मुगल सम्राट शाहजहान याचा त्या काळाला अनुसरुन जनानखाना मोठा होताच; पण त्यालाही आठ बायका होत्या म्हणे! त्यातल्या मुमताझशी त्याने १६१२ साली निकाह केला व १६३१ साली तिचा मृत्यू होईपर्यंत या जोडप्याला १४ मुले झाली होती. मुमताझवर ‘नितांत प्रेम' असणाऱ्या शाहजहानने तिच्या मृत्युनंतरही विवाह केलेच! आता बोला! जगाला भरपूर हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिन या विनोदसम्राटाचीही तीच गोष्ट. पण त्यांच्याकडे दुसरी पत्नी करताना आधीच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा प्रघात आहे. चार्लीने त्याच्या पूर्ण जीवनभरात ४ वेळा विवाह केले. त्याचा शेवटचा विवाह उना ओनिल हिच्याशी झाला, तेंव्हा तो ५३ वर्षांचा होता व उना १८ वर्षांची होती. त्यांना ८ मुले झाली.
असा सारा हा वैवाहिकता, विवाहबाह्य संबंध, बहुवैवाहिकता, वैवाहिक जीवन, लैंगिक संबंध यांचा हा देशी-विदेशी मामला आहे. हे सारे देशकालपरिस्थिती सापेक्ष आहे. एखाद्या ठिकाणी, एखाद्या देशात जे निषिध्द, त्याज्य, कायदाबाह्य, अनैतिक, सामाजिक संकेतांच्या विरोधात मानले जाते, ते दुसऱ्या देशात, दुसऱ्या ठिकाणी स्विकारार्ह असते. त्याला कायद्याची मान्यताही असते. प्रामुख्याने कायदाप्रेमी, कुटुंबवत्सल, चाकोरीत जगणाऱ्या मध्यमवर्गीय परिवारांतून येणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेत बऱ्याचदा यातले काही बसत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना त्यांच्याकडून भानगडी, लफडे, लिंगपिसाटपणा, म्हातारचळ, चाळे अशी नावे ठेवली जाण्याचा संभव असतो. पण त्या प्रकारे वागणाऱ्यांना त्यांच्याशी काही देणेघेणे नसते. खरे तर स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडेही पंच्याहत्तरीच्या म्हाताऱ्याचे लग्न तेरा-पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लावण्यात येत असे. (जरठ-कुमारी विवाह!) आणि या विवाहानंतर काही वर्षांतच तो म्हातारा गचकत असे आणि त्या मुलीला त्या म्हाताऱ्याची विधवा म्हणून आख्खे आयुष्य घालवण्याची किंवा नात्यातल्याच कुणातरी अन्य पुरुषांच्या वासनेची शिकार होण्याची वेळ येत असे. परपुरुषाच्या वासनेची शिकार होऊन गरोदर राहण्याची शिक्षा भोगणाऱ्या महिलांना महात्मा जोतिबा फुले यांनी आसरा दिला व मोठे पाऊल उचलले. अन्यथा आत्महत्या करणे किंवा वेश्याव्यवसायात ढकलले जाणे हेच मार्ग अशा अभागी महिलांच्या वाट्याला येत असत. महात्मा जोतिबा फुले यांनी विधवा विवाहाचाही पुरस्कार केला. मात्र त्यांच्या अशा प्रकारच्या कामांना मिळायला हवी तशी लोकमान्यता त्या काळी मिळाली नाही. पण त्यांनी दूरदृष्टी बाळगून घेतलेले निर्णय कसे योग्य होते, याचा पडताळा आजमितीस येत आहे.
या सगळ्यात राहिला प्रश्न लफडे, भानगडी करणाऱ्या तसेच आपला लग्नाचा जोडीदार सोडून अन्य व्यक्तींशी शरीरसंबंध जोडण्यापर्यंत मजल मारणाऱ्यांचा. ‘कामातुराणां ना भयं ना लज्जा' असे फार फार वर्षांपूर्वी आपल्या समाजधुरीणांनी सांगून ठेवले आहे. ते ‘सार्वकालिक' असल्याचे सिध्द झाल्याचेच आपण पाहात आहोत. मग अशी लफडी करणाऱ्यांना रोखावे कसे? तर ते जवळपास अशक्यच भासणारे काम आहे. कायद्याने तुम्ही आम्ही अशा प्रकारे एकत्र येणाऱ्या, कायद्याने सज्ञान स्त्री-पुरुषांना अडवू शकत नाही, असा निर्णय अनेक प्रकरणांत न्यायालयानेही दिला आहे. ज्याची त्याची शिकवण, संस्कार, नैतिकता, संयम या गोष्टी अशा प्रसंगी मोलाच्या ठरतात किंवा ठरत नाहीत. म्हणून म्हटले हा विषय तसा ‘नाजुकच...!'
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर