चला, पर्यावरणाचा विचार करु या

आपल्यासाठी व आपल्या पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा समतोल राखणं हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. कारण पर्यावरण चांगले राहिले, तरच आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांना निरोगी, आनंदी जीवन जगता येणार आहे. नाहीतर भविष्यात बदलत्या वातावरणाशी माणसाला जुळवून घेणं अवघड होऊ शकतं व इतर प्राण्यांप्रमाणे मानवाचा अधिवासही धोक्यात येऊ शकतो. या धोक्याचा विचार माणसाने गांभीर्याने करायला हवा आहे.

 प्रत्येक सजीवाला राहण्यासाठी एक परिसंस्था आहे आणि त्या परिसंस्था पर्यावरणाचा एक भाग आहेत. पर्यावरण म्हणजे काय ?  तर आपल्या आसपास असणारे जैविक व अजैविक घटकांचा समावेश असणारी प्रणाली. सर्व प्रकारच्या वनस्पती, प्राणी किंवा सजीव यांचा समावेश जैविक घटकात येतो; तर पाणी, सूर्यप्रकाश, हवा, जमीन, तापमान, पर्जन्यमान इत्यादी गोष्टींचा समावेश अजैविक घटकांत येतो. याचाच अर्थ आपल्या आसपासच्या सगळ्या गोष्टींचा समावेश पर्यावरणात होत असतो. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करताना आपल्याला या सगळ्यांचा गोष्टींचा विचार करावा लागतो.

  आज संपूर्ण जगावर जागतिक तापमान वाढीचं व बदलत्या हवामानाचं भीषण संकट घोंघावत आहे. प्रगतीच्या नावाने होणारी पर्यावरणाची हानी, वाढती लोकसंख्या, वाढते प्रदुषण, वाढती जंगलतोड, वाढलेलं शहरीकरण अशा अनेक कारणांमुळे जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे पृथ्वीवरचं हवामान बदलतं आहे. ऋतू बदलत आहेत. पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात पावसाळा किंवा उन्हाळा असं ऋतूचक्र बदलत चाललं आहे. त्याचा परिणाम कृषी व्यवस्थेवर, सजीवांच्या जीवनावर होताना दिसतो आहे. अंटाकिर्टकावरचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे. अशा नैसर्गिक बदलांमुळे त्या त्या अधिवासातल्या सजीवांचा जीव धोक्यात आला आहे. शहरीकरणाच्या नादात आपण जंगलं, पाणथळ जमीनी नष्ट करीत आहोत. त्यामुळे तिथली जैवविविधताही धोक्यात आली आहे.

        थोडक्यात काय, तर माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनाचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं आणि तो करतो आहे. माणूस हेच विसरतो आहे की पृथ्वी ही फक्त त्याच्या एकट्याचा अधिवास नाही आहे. तर सूक्ष्मातल्या सूक्ष्म जीवालाही त्याच्या अधिवासात सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. पृथ्वीवरची जंगलं, नद्या, समुद्र, पाणथळ जमीनी अशा प्रत्येक ठिकाणच्या परिसंस्था महत्त्वाच्या आहेत. त्यांतले सगळे जीव जगणे आवश्यक आहेत. कारण हे सगळे जीव, सगळ्या परिसंस्था एकमेकांशी अन्नसाखळीने जोडलेल्या आहेत. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी प्रत्येक परिसंस्था संतुलित राहिली पाहिजेत. यासाठीच आज जगभर जैवविविधता टिकवण्यासाठी, जागतिक तापमान वाढ थांबवण्यासाठी लोक प्रयत्न करीत आहेत. पण हे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत. अजूनही लोकांना पर्यावरण ऱ्हासाचं गांभार्य समजत नाही आहे. हे समजण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणं हे फक्त शासनाचं किंवा सामाजिक संस्थांच काम नाही, तर ते प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनीही संयुक्त राष्ट्र संघटनेने बनवलेली शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये समजून घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे. शेतकऱ्यांनी शाश्वत शेती संकल्पना समजून घेत सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरूवात करायला हवी आहे. ऊस, कापूस यांसारखी बागायती पिकं घेण्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, मका अशा भरड धान्यांची पारंपरिक पिकं घ्यायला पुन्हा जोमाने सुरूवात करायला हवी आहे, जेणेकरून शेतातली जैवविविधता टिकवण्यास मदत होईल.

     नुसत्या घोषणा देऊन किंवा सोशल मिडियावर गोष्टी दाखवून पर्यावरण वाचवता येत नाही. यासाठी ठोस कृती आराखडे बनवणे गरजे आहे. सामान्य माणूस या चळवळीत सहभागी झाला पाहिजे. दैनंदिन जीवन जगताना सामान्य माणसांनी पर्यावरणाला घातक नाही तर पूरक कृती करायला हव्या आहेत. जसं आपला परिसर स्वच्छ ठेवणं, कार्बन उत्सर्जन कमी करणं, वृक्ष संवर्धन करणं, कचऱ्याचं सुनियोजित व्यवस्थापन करणं, आपल्या परिसरातील जैवविविधता जपणं अशा अनेक पर्यावरण पूरक गोष्टी करून सामान्य माणूस पर्यावरणाचं संवर्धन करू शकतो.

   शाळा, महाविद्यालयांमध्ये पर्यावरण विषय मुलांना पर्यावरणांसंबंधी जागृकता आणण्यासाठीचं लावला आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी गुण किंवा श्रेणी मिळविण्याच्या पलिकडे या विषयाचा विचार करायला हवा, मिळणाऱ्या ज्ञानाचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग व्हायला हवा.

   आपल्यासाठी व आपल्या पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा समतोल राखणं हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. कारण पर्यावरण चांगले राहिले, तरच आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांना निरोगी, आनंदी जीवन जगता येणार आहे. नाहीतर भविष्यात बदलत्या वातावरणाशी माणसाला जुळवून घेणं अवघड होऊ शकतं व इतर प्राण्यांप्रमाणे मानवाचा अधिवासही धोक्यात येऊ शकतो. या धोक्याचा विचार माणसाने गांभीर्याने करायला हवा आहे. तेंव्हा पर्यावरणाचा विचार आपण फक्त पर्यावरण दिनाला करून चालणार नाही, तर तो आपल्याला आता सतत करावा लागणार आहे.  
म्हणून मित्रहो, चला, पर्यावरणाचा विचार करूया
                   जैवविविधतेला जपूया
                   झाडे लावूनि निसर्ग फुलवूया
                   बदलत्या हवामानाला
                   पुन्हा एकदा सुरळीत करूया
                  चला, लोकहो पर्यावरणाचा विचार करूया...
       -मंगल कातकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाढते तापमान... पर्यावरणासाठी आव्हान