पाणी बचतीची सवय लावूया!

यापूर्वी कधीही न अनुभवलेला उकाडा यंदा राज्यासह देशभरातील नागरिकांना भोगावा लागत आहे. उष्माघाताने आजवर ४०० हुन अधिकांचा जीव घेतला आहे. पशु पक्ष्यांची तर मोजदादाच नाही. प्रचंड उकाड्यामुळे एकीकडे पाण्याचा वापर वाढला आहे, तर दुसरीकडे धरण, नद्या, तळी आणि विहिरींतील  पाणीसाठा कमी झाला आहे. परिणामी यंदा राज्यात भयंकर पाणीबाणी निर्माण झाली आहे.

मुंबईसारख्या प्रगत शहरात कधी नव्हे, ती यंदा मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी लागली आहे. राज्य तसेच जिल्हा प्रशासनाकडून पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगामी काळात जगायचे असेल, तर आज पाण्याची बचत करणे अनिवार्य झाले आहे. बऱ्याचदा शेजारीपाजारी अन्य कोणी पाण्याची बचत करताना दिसत नाहीत,  मग मीच का पाणी वाचवावे, असे विचार मनात येतातः मात्र शेजारची व्यक्ती पैशाची उधळपट्टी करते म्हणून त्याचे पाहून आपण ती करत नाही, कारण पैशाचे महत्व, पैसे वाचवण्याचे महत्व, पैसे कमावण्यासाठी लागणारी मेहेनत याबाबतची आपल्या प्रत्येकाला आहे. आज पाणी सहज उपलब्ध होत आहे याचा अर्थ भविष्यातही ते सहज उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे पाण्याच्या बचतीचे महत्वही आपण लक्षात घ्यायला हवे.

आपल्या लहान सहान कृतीतून पाण्याची बचत आपल्याला करता येते. पाणी वाचवणे म्हणजे अस्वछ राहणे असे मुळीच नव्हे,आपल्या दैनंदिन स्वच्छतेसाठी उदा. आंघोळ, तोंड धुणे, हात धुणे आणि अन्य स्वच्छतेसाठी किती पाणी आपण व्यय करतो हें प्रत्येकाला ज्ञात असते. त्यामध्येही उन्हाळ्यात जर आपण शॉवरचा वापर करत असू तर बादलीचा वापर करून कित्येक लिटर पाणी आपण वाचवू शकतो, हात धुताना हाताला हँडवॉश अथवा साबण लावेपर्यंत आपण नळ चालूच ठेवत असू तर तो बंद करायला हवा. कपडे आणि भांडी धुतांनाही हाच नियम पाळूया. भांड्यांना साबण लावताना नळ बंद ठेवूया. पिण्यासाठी आवश्यक तेव्हढेच पाणी घेऊया, जेणेकरून पाणी पिऊन झाल्यानंतर पेल्यात उरलेले पाणी अन्यत्र टाकावे लागणार नाही.  कपडे धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी शक्य असल्यास काही दिवस यंत्राचा वापर न करता हाताने धुण्याचा प्रयत्न करूया. घरातील एखादा नळ बिघाड झाल्याने त्यातून पाणी गळत असेल, तर तो तत्परतेने दुरुस्त करून घेऊया. झाडांना आवश्यक तेव्हढेच पाणी देऊया. एखाद्या ठिकाणी पाईपलाईनमधून पाण्याची गळती होत असेल तर त्वरित पाणी खात्याला कळवून त्या ठिकाणी दुरुस्ती करून घेऊया. पाणी वाचवण्याचे महत्व आपल्या घरातील लहानग्यांनाही सांगुया. आपण जर सोसायटीत राहत असू तर सोसायटीची मिटिंग घेऊन पाणी वाचवण्याचे प्रयत्न सामूहिकपणे करण्याचा प्रयत्न करूया !

पाण्याला जीवन असे म्हटले जाते. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महागडे जेवण जेवल्यानंतरही ते पचण्यासाठी जेवणांनंतर किमान ग्लासभर पाणी तरी आपल्याला हवेच असते. पाण्याविना जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही. काही देशांमध्ये पाणीटंचाईमुळे इंधनाच्या दरात पाणी विकले जात असल्याच्या बातम्या आजवर आपण वाचल्या आहेत. आज आपण पाणी नाही वाचवले तर भविष्यात भारतातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पाणी वाचवण्याची सवय आतापासून अंगवळणी पाडूया ! काही दिवसांनी पावसाळा सुरु होईल. यंदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गतवर्षीही पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते; मात्र शेवटच्या टप्यात पाऊस अंतर्धान पावल्याने पाणीपुरवठा करणारी अनेक धरणे पूर्णपणे भरली नव्हती. यंदाही अशी स्थिती निर्माण झाल्यास पुढच्या वर्षी उन्हाळ्यात पुन्हा एकदा पाणी संकटाला तोंड देण्याची परिस्थिती ओढवू शकते. पाणी बचतीची सवय स्वतःला लावून घेतली असेल तर भविष्यात या संकटाचा सामना आपल्याला समर्थपणे करता येईल ! - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 या वर्षी वातावरणातील बदलाची  सर्वाधिक झळ