दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
जागतिक पर्यावरण दिवस २०२४
२०२४ म्हणजे या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिवस सौदी अरब या राष्ट्रात ५ जूनला साजरा केला जाणार आहे. आपली वसुंधरा आपले भविष्य ही मध्यवर्ती संकल्पना मानून या वर्षीचे घोषवाक्य आहे ”जमिन सुधार, वाळवंटीकरण रोखणे आणि अवर्षण व दुष्काळावर मात.”
प्रत्येक राष्ट्राला आणि राष्ट्रातील प्रांतांना या समस्येवर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे. कारण अगोदरच सगळीच राष्ट्रे आणि राष्ट्रातील जनता हवामान बदलाचे संकट, निसर्ग आणि जैवविविधता यांचा ऱ्हास आणि प्रदुषण व कचरा विल्हेवाटीचे संकट या त्रयींनी त्रस्त झाले आहेत. देशातील पर्यावरण आणि आरोग्यावर या सर्व बाबींनी घातक हल्ला केला आहे आणि याच हल्ल्याला सामोरे जाताजाता जनता त्रासली आहे. जमिनीची धूप प्रचंड प्रमाणावर झाल्याने जगातील सुमारे अर्ध्या लोकसंखेला याचा फटका बसला आहे. ग्रामिण भागातील लोक, अल्प व छोटे भूधारक तसेच अत्यंत गरीब लोक या समस्येने होरपळून निघाले आहेत. जमिनीची होणारी धूप थांबवून आणि वृक्षारोपण केल्याने स्थितीत सुधारणा घडवून आणतायेईल, लोकांना रोजगार मिळेल, गरिबी थोडीतरी कमी होईल आणि मुख्य म्हणजे लहरी/आत्यंतिक हवामानाशी दोन हात करण्याचे मानसिक बळ प्राप्त होईल.परिणामी वाळवंटीकरण, दुष्काळ ही संकटे सौम्य गतिने घडून येतील. जमिनीचा पोत सुधारला तर नापिकीचे प्रमाण कमी होईल.
पीकपाणी वाढले की साहजीकच कार्बन हिरव्या वनस्पतीत मोठ्या प्रमाणावर बंदिस्त केला जाईल. एका अभ्यासाप्रमाणे जर १५ % जमीन जर सुपीक केली तिची धूप थांबवली तर काही प्रमाणात वाळवंटीकरण थांबेल, वर्षणाचे प्रमाण वाढेल आणि सुमारे ६० % प्रजाती अस्तंगत होण्यापासून वाचतील असे हे समीकरण आहे. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होणे, वाळवंटीकरणाला चालना मिळणे आणि अवर्षण किंवा दुष्काळ या सर्वांना कारणीभूत असणा-या हवामान बदल या राक्षसाला आपण प्रथम आटोक्यात आणणे अत्यंत जरूरीचे आहे. २०२३ हे वर्ष आत्यंतिक तापमानाचे वर्ष गणले गेले. या एका वर्षात तापमानाने अनेक विक्रम मोडले. संपूर्ण जगाने वाढलेला ऊष्मा अक्षरशः याची देही याची डोळा अनुभवला. केवळ उष्णताच नव्हे तर त्यामुळे उद्भवणारे इतर परिणामही भोगले. प्रचंड प्रमाणावर वादळे आली, महापूर पाहिले आणि दुष्काळ सोसले तसेच अवर्षणाने पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही, पाण्याअभावी अनेक लोक दगावले. हवामान बदलावर परिणामकारक उपाययोजना केली गेली तरच जमिनीची धूप थांबवण्याच्या प्रयत्नाला यश येणार आहे. नाही तर ‘नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे' अशीच स्थिती होईल.
त्यामुळे सौदी अरब देशात होणा-या संयुक्त राष्ट्र पर्यावरण विभागाच्या संमेलनात जी-२०देशांनी या प्रश्नाला अग्रक्रम देवूनच परिषदेची सांगता करायला हवी असे तज्ञांचे म्हणणे आहे. तज्ञांनी जो कार्यक्रम या परिषदेसाठी आखलेला आहे तो कार्यक्रम अशी अपेक्षा दर्शवतो की जी-२० देश या प्रश्नाचा गांभिर्याने पाठपुरावा करतील.या देशांनी अगोदरच एक अब्ज हेक्टर क्षेत्रफळाची जमीन धूपमुक्त करण्याचे/अवर्षणापासून मुक्त करण्याचे तसेच वाळवंटीकरण रोखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रयत्नात यश आले तर फार मोठी उपलब्धी साध्य केल्यासारखे होईल असे जाणकार म्हणतात. या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानेआयोजित परिषदेबरोबरच या वर्षी डिसेंबर महिन्यात भरणा-या जागतिक वाळवंटीकरण विरोधी परिषदेत या दोन्ही प्रश्नावर काही तरी तोडगा सुचवला किंवा काढला जाईल असे परिषद योजनाकारांचे मत आहे. त्यामुळे सौदी अरब मधील ही परिषद आशेचा किरण दाखवेल आणि या मोहिमेला फार मोठी चालना मिळेल. विविध देशांनी ठरवून दिलेल्या कार्यक्रमाला प्राधान्याने न्याय दिल्यास जमिनीची धूप थांबवणे, वाळवंटीकरण रोखणे, आणि दुष्काळावर काही अंशी मात करता येईल हा सकारात्मक संदेश जगभरातील देश आणि जनतेचा या कार्याप्रति उत्साह वाढवेल यात तीळमात्र शंका नाही. यातूनच अब्जावधी जनतेला जीवन जगण्यासाठी लागणारा रोजगार मिळेल तसेच त्यांची अन्न सुरक्षितता बळावेल.
या परिषदेत ज्या मुद्द्यावर भर देण्यात येणार आहे त्यातले आणखी काही मुद्दे असे आहेत. हवामान बदलाशी निगडीत जे मुद्दे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचा पाठपुरावा करावा.स्वच्छ आणि पुनर्नवनिर्मीत (रिन्युएबल) ऊर्जेवर भर देवून ध्येय साद्य करण्यासाठी जोर लावावा. खनिज तेलाचे साठे आता खोदू नका, कोळसा खाणी बंद करा, नैसर्गिक वायु वापरण्याचे थांबवा एकदा वापरात येणा-या ( सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि कालांतराने त्याचा वापर पूर्णपणे बंद करा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे. आपल्या वसुंधरेचे उज्वल भविष्य मिळवण्यासाठी हवामान बदलाच्या विरोधी कार्यक्रमाला व कार्य करणा-या व्यक्तिला पाठिंबा द्या आणि लोकांत याबद्दल जागृती निर्माण करा. किनारी व सागरी पर्यावरण सुस्थितीत व संरक्षित ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या कार्यक्रमांना गति द्या जेणेकरून किनारी व सागरी जैवविविधता वाढीस लागेल, असे संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर उपयोगी अशा उपाययोजना जर विचाराधीन असतील तर त्या योजनांना प्राधान्य द्या जेणे करून स्थानिक व राष्ट्रीय पर्यावरण सुरक्षित राहील.
थोडक्यात एकमेका सहाय्य करू आणि हवामान बदलाला आटोक्यात आणू. याचसाठी सर्वांचे डोळे सौदी अरब देशात होणा-या ५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित पर्यावरण परिषदेकडे लागलेले आहेत. विकसनशील व गरीब राष्ट्रांना नवीन काहीतरी मिळेल या प्रतिक्षेत हे देश आहेत. हवामान बदलावर मात करण्यासाठी जादुई चिराग खरोखरच हाती लागेल का? अर्थात हे बोलले तितके सोपे नाहीकारण सर्वच बाबतीत आपण अजूनही चाचपडत आहोत. तरीही या परिषदेतून आपल्या वसुंधरेचे भविष्य उज्वल व्हावे या साठी ठोस पर्याय मिळतील अशा अपेक्षेत सारेच गरीब व विकसनशील देश आहेत. - डॉ किशोर कुलकर्णी