देव जरी मज कधी भेटला

वर्षातून एकच मातृदिन असतो; पण वर्षाचे ३६५ दिन हे अपत्य दिन असतात. या सर्व ३६५ दिवसात आई आपल्या मुलाची काळजी करते, चिंता वाहते आणि त्याच्यासाठी वारंवार देवाची प्रार्थना करते. देवा माझ्या अपत्याचं रक्षण कर.

देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला!
म्हणेन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला!
इतकं प्रेम आई मुलावर करत असते.

परीक्षेचे रिझल्ट डिक्लेअर झाले की मार्क चांगले मिळाले नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या बातम्या वर्तमानपत्रात येतात. आई अभ्यास करण्यावरून रागावली म्हणून घर/जग सोडून जाणारी मुलं असतात. मोबाईलवर जास्त खेळू देत नाही, नवा मोबाईल घेऊन देत नाही म्हणून भांडणारी मुले पण असतात. पण मित्रांनो कधीतरी एखाद्या सुतिकागृहात जाऊन बघा, आईला मुलाला जन्म देत असताना किती यातना होत असतात. त्यामुळे आत्महत्या करणे हे कुठल्याही प्रश्नावर उत्तर नाही. त्या त्या वयात अपयश येते, स्पर्धा खूप आहे, नोकरी नाही. त्या त्या वयात राग येतो. नैराश्य येते. अपरिपक्व माणूस चुकीचे निर्णय घेतो. अगदी कधी कधी तर परिपक्व माणसाने घेतलेले निर्णय देखील चुकीचे होऊ शकतात.

 यश अपयश याच्यापलीकडे सुद्धा जीवन असतं. नापास मुलांची सुद्धा एक वेगळी यशोगाथा असते. म्हणून आज मला हे लिहावसं वाटते की आईचा विचार करा. आई रागवत असेल हिंदी चित्रपटाचे सारखी प्रेम व्यक्त करत नसेल, तुमचे कौतुक होत नसेल. आई नटून सजून वावरत नसेल. दिवसभर घामात भिजून फाटके कपडे घालून वावरत असेल. पण ती तुमची आई आहे आणि घरकाम करताना कष्ट असतात. त्यामुळे माझी आई सुंदर नाही, प्रेम करत नाही, मी लाडका नाही वगैरे विचार मनातलं काढून टाका आणि आईचं प्रेम जाणा. मी जाणते की एवढं मॅच्युरिटी यायचं हे वय नाही. पण तरी मला हे सांगावसं वाटलं म्हणून मी सांगते आहे. आईसाठी मातृत्व हा काही कुठला दागिना नाही की तो मिरवावा. मातृत्व ही एक मोठी तपश्चर्या असते. मुल वाढवणे सोप्पं नसतं. एक सुजाण संस्कारित तरुण अथवा तरुणी घडवायची असते. जीवनात आणि त्या कार्यात आईचे, वडिलांचे आयुष्य संपते. सगळे कष्ट असतात. आपल्या हाडामासापासून, रक्तापासून बनलेले ते मुल पदोपदी वेळोवेळी आपल्याला रडताना दिसते, आपल्याला रडवते. कारण समाज, अति मोठा, अतिशय कोरडा, दुष्ट आहे. घरी कुटुंबात एकमेकांना धरून राहणं आवश्यक आहे.

आतलं वर्तुळ आणि बाहेरचं वर्तुळ म्हणजे कुटुंबातील माणसं आणि बाहेरची माणसं या दोन्ही ठिकाणी भले बुरे अनुभव येऊ शकतात. ते बालकाला, माणसाला, कुटुंबाला रडवू शकतात. या दुष्ट जगात मुलाला, एकटेपण फिटायला, कुणाचा तरी आधार हवा. पण तसा आधार मिळतोच असं नाही. कोणीही असो, आजारपणात मानव अगतिक होतो, लहान बाळाला जन्मल्यावर बाळ रडते. दहाव्या दिवशी देतात, ते बी सी जीचे इंजेक्शन पासून, बाळ रडलं की आईचा जीव तळमळू लागतो. नंतर अनेक आजारपण येतात. कांजण्या, डांग्या खोकला,  गोवर व्हायरल फीवर, मलेरिया, डेंगू आणि आता करोना या सर्व आजारपणाच्या वेळी बाळ शारीरिक वेदनांनी तळमळतो. आई बाळासोबत मानसिक वेदनेने तळमळते. काही कारणाने  दूर राहून, अंतराचे कारणाने, जुळलेली नाळ तोडून, जोड संपत नसतो, ती नाळ जुळलेली राहते.

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,
गीत एक मोहरले ओठी,
म्हणून बालक तरुण होऊन लग्न करतो. वाद संवादात संसार चालु राहतो. आई फक्त काळजी करु शकते. बालकाच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी आई कायमच व्रतवैकल्ये करत असते. अकाल मृत्यूहरणासाठी, जमेल तेव्हा, देव समोर आलेत की दिवा लावते आणि उपास करते. त्या परमेश्वराची प्रार्थना करते आणि म्हणते
म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई मम बाळाला !

भिगी पलके नावाचा, स्मिता पाटील आणि राज बब्बर चा एक चित्रपट होता. त्याच्यात नाईलाजाने नोकरी करणारी आई, बाळ नोकरानीकडे देवुन नोकरीवर जाते. घरात बाळ सांभाळायला एक बाई ठेवलेली असते. ऑफिसची कामं, घर काम, नवरा अपंग यात गृहिणी, नोकरदार स्त्री व्यक्तीची खूप दमणूक होत असते. ताप असलेलं बाळ एका दिवशी ईहलोक सोडून जातं. त्या आईचा आक्रोश बघवत नाही. स्मिता पाटील पुढे त्या वेदना सहन होऊन नन, जोगीण झालेली दाखवली आहे. मोलकरीण चित्रपटात आपल्या स्वतःच्या मुलाच्या घरीच मोलकरीण म्हणून राबणारी आई दाखवली आहे. चाची ४२० चित्रपटात पती-पत्नीच्या घटस्फोटानंतर जेव्हा कस्टडी वाटून दिली जाते, तेव्हा चाची ४२० चे रूप घेऊन आपल्या मुलीच्या सहवासात रमणारे वडील दाखवले आहेत. जन्माला आलेला, एवढासा गोळा, आई वडील मोठे कष्ट करून वाढवत असतात. पण बालकांना मात्र कुटुंब घर की मुर्गी दाल बराबर  वाटत असते.काही करा, तरीही मुलं हीआई-वडिलांना फारसे जवळचे समजत नसतात. त्यांना त्यांचे मित्र आणि चमक दमक अधिक जवळची वाटत असते. अर्थात संकट काळी ही मित्रमंडळा देखील मदत करत नसतात.. पण हे उशीरा कळते. पुढे आई वडीलदेखील मुलांना कालबाह्य वाटतात आणि फारसे आदर्शवत वाटत नाहीत असे झालेले असतात.

वर्षातून एकच मातृदिन असतो; पण वर्षाचे ३६५ दिन हे अपत्य दिन असतात. या सर्व ३६५ दिवसात आई आपल्या मुलाची काळजी करते, चिंता वाहते आणि त्याच्यासाठी वारंवार देवाची प्रार्थना करते. देवा माझ्या अपत्याचं रक्षण कर.
देव जरी मज कधी भेटला,
म्हणेन प्रभू रे,सारे सुख लाभू दे,
या माझ्या चिमण्या बाळाला!
-शुभांगी पासेबंद 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जागतिक पर्यावरण दिवस २०२४