मुशाफिरी

 का आवडतो आपल्याला सिनेमा? जे आपण प्रत्यक्षात करु शकत नाही ते दुसरं कुणीतरी करतंय आणि त्या जागी आपण स्वतःला कल्पून अनेकदा सिनेमा आस्वादत असतो. शत्रुपक्षाला एका फायटीत लोळवावं, हेलिकॉप्टरला लटकून गाणं म्हणत समोरच्यांना प्रभावित करावं, चालत्या रेल्वेगाडीच्या टपावरुन उड्या मारत निघून जावं, पाण्याखाली खोलवर जाऊन जलचरांना भेटावं, स्वित्झर्लंडच्या नयनरम्य बगीच्यांमधील नितांतसुंदर फुलांच्या रांगांमधून धावावं असं बरंचसं आपल्यापैकी अनेकांच्या वाटूनही सर्वांनाच ते प्रत्यक्षात उतरवता येत नसतं, ते सारं सिनेमातले हिरो, हिरॉईन करतात. आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्या साऱ्यांचा आनंद लुटतो.

   काही दिवसांपूर्वी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करीत होतो. वरच्या बर्थवर आडवा झालेला एक मुलगा मोबाईल आडवा धरुन काही बघत होता. मध्येच हसत होता. मध्येच डोळ्यात आलेले पाणी पुसत होता. दोन अडीच तासांनंतर तो खाली उतरल्यावर मी त्याला याचे कारण विचारले. तर तो म्हणाला की एक सुंदर चित्रपट मी युट्युबवर बघत होतो. विनोदी दृश्ये आली की भरपूर हसायला येत असे. पण शेवटी हा सिनेमा रडवणारा ठरला. मी विचारले की कोणता सिनेमा ? तर तो मुलगा म्हणाला.. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव, जॉनी वाकर, ललिता पवार यांनी सुरेख कामे केलेला ‘आनंद'!  तरुण पिढीलाही पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचे सिनेमे आवडतात हे ऐकून मला बरे वाटले. ‘त्या' काळी कुणी कुणाला सांगितले असते की काही वर्षांनंतर चालता, बोलता, उठता, बसता, जेवता, गाडी चालवता चालवता, रेल्वेने प्रवास करता करता कंपास पेटीपेक्षाही कमी आकाराचे आयताकृती यंत्र हातात घेऊन आख्खा सिनेमा बघता येईल...तर तसे सांगणाऱ्याला सर्वांनी वेड्यात काढले असते. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी ब्लॅक ॲण्ड व्हाईट स्वरुपात बनवण्यात आलेल्या सिनेमांनाही आता  रंगांचा साज चढवला जात आहे. जे कलावंत आज या जगात नाहीत त्यांनाही कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स'च्या माध्यमातून अभिनय करताना दाखवण्यापर्यंत तंत्रज्ञानाने मजल मारली आहे. या सिनेमाने तुमच्या आमच्या मनावर लहानपणापासूनच गारुड केलेलं असतं. बेधडक, बिनधास्त, स्मार्टली जगावं असं बरंचसं आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं; पण सर्वांनाच ते प्रत्यक्षात उतरवता येत नसतं, ते सारं सिनेमातले हिरो, हिरॉईन करतात. आपण स्वतःला त्यांच्याजागी ठेवून त्या साऱ्यांचा आनंद लुटतो. म्हणून पडद्यावरचा सिनेमा गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांना आपला, जवळचा वाटत आला आहे. चित्रपटाचे कथालेखक, पटकथाकार,  गीतकार, संगीतकार, गायक, निर्माते, दिग्दर्शक, कॅमेरामन, फाईट मास्टर, संकलक यांनी हे खूप आधीपासून ओळखलं आहे. या साऱ्यात नट आणि नटी, खलनायक, चरित्र अभिनेते, डमी, सहकलाकार यांचा समावेश तुलनेने शेवटच्या टप्प्यात होतो. पण आधी सांगितलेल्या साऱ्यांपेक्षा हेच लोक जास्त भाव खाऊन जातात अशी ही उलटी गंगा आहे.  

  कुठल्याच प्रकारचा सिनेमा कधीच बघितला नाही, सिनेमा आवडतच नाही अशी व्यक्ती शोधून सापडणे अवघड. सापडलीच तर तिला खुशाल अरसिक म्हणायला काहीच हरकत नाही. काही दशकांपूर्वी बाळंतीणीची खोली अंधारी असे. नवजात बालकांच्या डोळ्यांवर थेट प्रखर सुर्यप्रकाश पडू नये हा त्या मागचा हेतू. आता जन्माला आलेली नवजात अर्भकेही आईच्या हातातील मोबाईलवर तिच्या साक्षीने आणि मदतीने दवाखान्यातच सिनेमे, मालिका, शॉर्ट फिल्मस्‌, रील्स बघत असतात. आधीच्या पिढीतील अनेकांना सिनेमा पाहण्यासाठी पार थिएटरपर्यंत जावे लागे. हल्ली घरालाच ‘होम थिएटर' म्हणायचा प्रघात आहे म्हणे! माझा जन्म मुंबईच्या जे जे हॉस्पिटलचा! वास्तव्य त्या वेळी डोंगरी, मुंबई ९ येथे. आमच्या घरापासून जवळच ‘डर्बी' नावाचे सिनेमागृह होते. नाव लक्षात राहिल असा सिनेमा मला आईसोबत जाऊन पाहता आला तो मीनाकुमारी, राजकुमार, राजेंद्रकुमार अभिनित ‘दिल एक मंदिर' हा होय. इयत्ता तिसरीपासून पुढे मी एम ए होईपर्यंतचे आमचे वास्तव्य कल्याण येथे होते. पण डोंगरीला जाणेही वारंवार होत असे. त्या काळी रस्त्यावर ३५ एमएम पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांचे फॅड होते. गणेशोत्सव काळात हे सिनेमे दाखवले जात. आमच्या एका आत्याचे वास्तव्य कल्याण येथील टाटा कॅम्प येथे असे. १९७० ते १९७५ चा तो काळ. दर शनिवार-रविवारी तेथे मराठी/हिंदी सिनेमे तेथील गार्डनमधील प़डद्यावर दाखवले जात व ते पाहायला तेथील उच्च अधिकाऱ्यांसह त्यांचे परिवार, सर्व कर्मचारी, त्यांचे परिवार व आमच्यासारखे काही नातेवाईक हमखास जमत असत. तेंव्हा भरपूर सिनेमे पाहता आले, बऱ्याचदा सिनेमे बघता बघता मी आत्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपत असे व ती मला सिनेमा संपल्यावर उठवून घरी नेत असे. नट-नट्या कशा ओळखायच्या, चांगली गाणी लक्षात ठेवायची, चांगल्या सिनेमांच्या आस्वाद कसा घ्यायचा याबद्दल आत्याच्या मुलांमध्ये चर्चा होत असे. मी खूपच लहान असल्याने त्यातले फारसे कळत नसे. पण हळुहळु समज येत गेली. दिलीप कुमार, देव आनंद, सुनिल दत्त, राजकुमार, राजेंद्र कुमार, बलराज सहानी, संजय खान, परिक्षित सहानी, नवीन निश्चल, राजेश खन्ना, धर्मेंद्र अशा अभिनेत्यांचे अनेक चित्रपट मी त्या काळी कल्याणच्या त्या टाटा कॅम्पमध्ये पाहिले. माझ्या आतेबहिणी तेंव्हा लोकप्रभा या साप्ताहिकात चित्रपटांबद्दल चालवल्या जाणाऱ्या सदरांना उत्तरादाखल पत्र लिहायच्या. सैरंध्रीचा सल्ला (सौंदर्यप्रसाधन विषयक सदर) यातून त्यांची पत्रं प्रसिध्द होत असत. त्याच लोकप्रभासह, चित्रलेखा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुण्यनगरी, गावकरी अशा वर्तमानपत्रांतूनही मला पुढे जाऊन भरपूर लिहिता येईल किंवा अनेक कलावंतांच्या मुलाखती मला घेता येतील असे त्यावेळी कुणी सांगितले असते तर आजपासून पन्नास वर्षांपूर्वी माझाही त्यावर विश्वास बसला नसता.

   कल्याणला कृष्णा, न्यू प्रकाश, पौर्णीमा, ऑल्विन, छाया, जोकर, भानू, सागर अशी चित्रपटगृहे होती; तर जिथे माझे महाविद्यालयीन शिक्षण झाले त्या उल्हासनगरमधील आर के तलरेजा कॉलेजच्या अवतीभवती पॅरामाऊण्ट, रिजण्ट, सपना, अमन, अशोक, अनिल.. तर काही अंतरावर श्रीराम, प्रभात अशी चित्रपटगृहे होती. कॉलेजची लेवचर्स बंक करुन तसेच एरवीही तिथे अनेक सिनेमे पाहिले. तेंव्हा दूरदर्शनवर नवे सिनेमे येत नसत. मालिकांचा उदय व्हायचा होता आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या हे शब्दही प्रचलित नव्हते. तेंव्हा ‘थेटर' हाच परवलीचा शब्द! ‘फर्स्ट डे फर्स्ट शो' चेही शौकिन असत. हे तर काहीच नाही; कोणता सिनेमा कितीवेळा पाहिला असाही प्रकार असे. आज मराठी वर्तमानपत्रांतून नाटकांच्या जशा जाहिराती दिसतात तशा पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी हिंदी सिनेमे लागलेल्या मुंबई ते उल्हासनगर, अंबरनाथपर्यंतच्या  चित्रपटगृहांच्या यादीसह जाहिराती प्रसिध्द केल्या जात. मेट्रो, न्यु एवसलसियर, मिनर्व्हा, इरॉस, लिबर्टी, गंगा, जमुना, रुपम, इंपिरियल, मराठा मंदिर, प्लाझा, कोहिनूर, चित्रा, शारदा, भारतमाता अशा अनेक चित्रपटगृहांतून मी सिनेमे पाहिले. ‘शोले'च्या वेळी सेवंटी एम एम व स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीमचे कोण ते आकर्षण! ..आणि अखेरच्या भागात अमिताभ शेवटचा श्वास घेताना त्याच्या खिशातून ते ‘छापा काटा'चे नाणे बाहेर पडते व धर्मेंद्र ते समोर भिरकावून देतो.. त्यावेळी म्हणे ते नाणे आपल्याच अंगावर पडल्यासारखे वाटते, त्याचा आवाजाच्या खणखणीतपणासह अनुभव घ्यावा तो म्हणे ‘मिनर्व्हा'मध्येच! तेथे मी ‘शोले' सिनेमा नऊ वेळा पाहिला आहे. १९७८ साली एस एस सीला मराठीच्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या ‘तुम्हाला आवडलेला चित्रपट' या विषयावर जेंव्हा निबंध लिहायची वेळ आली तेंव्हा मी ‘शोले' वरच निबंध लिहिला होता. त्या काळी मनोरंजनाची अन्य साधने जसे चांगले बगीचे, अम्युझमेन्ट पार्क, एस्सेलवर्ल्ड-ॲडलॅब इमॅजिका, टिकुजिनी वाडी, वॉटर पार्क्स अशा गोष्टी विकसित न झाल्याने सिनेमानेच मनोरंजनाची सारी जबाबदारी सांभाळली होती. हे इतके लोकप्रिय माध्यम होते की दुप्पट तिप्पट भाव देऊन लोक ‘ब्लॅक'ने तिकीट दामदुपटीत खरेदून सिनेमा पाहात असत. एखाद्या आवडलेल्या मुलीला हल्ली चारचौघात कुणी थेटरमध्ये घेऊन जाईलच असे नाही, तो त्याऐवजी पुरेसा एकान्त देणाऱ्या बगीच्याची, रेस्टॉरंटची निवड करील. पण त्या काळी एखादीला सिनेमाला सोबत घेऊन जाण्याची प्रचंड क्रेझ होती. यावरुन ती दोघं ‘एकमेकांसाठी बुक' झाली आहेत असाही संदेश बघ्यांमध्ये आपसूकच पसरत असे. १ रुपया ०५ पैसे, २ रुपये २० पैसे, ३ रुपये ३० पैसे असे थिएटरच्या तिकीटांचे दर असत. ‘शोले' आल्यावर ते दर ४ रुपये ४० पैसे., ५ रु.५० पैसे असे झाले होते.

   ॲॅडव्हान्स बुकींग केली नसल्यास करंटला नव्या चलनी हिराेंच्या सिनेमाचे तिकीट थेटरांच्या तिकिट खिडकीवर जाऊन काढणे म्हणजे युध्दाचा प्रसंग असे. एकदा मी व माझा एक मित्र धर्मेंद्र, विनोद खन्ना, हेमा मालिनी, अजित अभिनित ‘पत्थर और पायल' सिनेमाला गेलो असता मित्र तिकीट काढायला खिडकीवर गेला. तिथे इतकी झुंबड झाली की येताना तो अंगावरचा शर्ट गायब झालेल्या अवस्थेत नुसत्या बनियान आणि पाटलोणीनिशीच परतला. पण शर्ट फाटून गेल्याचे दुःख त्याला नव्हते, तिकीटे आणताना जग जिंकल्याचा अविर्भाव बाळगत तो आला होता. देव आनंद, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ अभिनित ‘जॉनी मेरा नाम' या सिनेमाच्या सुरत येथील प्रदर्शनाच्या वेळी तेथील थेटरच्या तिकीट खिडकीवरील प्रचंड गर्दीमुळे म्हणे खून पडले होते. असे हे थेटरातले चित्रपट आणि अशी त्यांची अलोट लोकप्रियता व असे ते चित्ररसिक. टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, सोशल मिडिया आला आणि थेटरांचे महत्व पार ओसरले. मल्टीप्लेक्स आले..पण त्यात "ती" मजा नाही. आता अनेक थेटरांच्या जागी मॉल्स, व्यापारी संकुले उभी राहात आहेत. आणि इकडे चित्र तारे-तारका, निर्माते, दिग्दर्शक मंडळी ‘आमचे सिनेमे सिनेमागृहात जाऊनच बघा' असे आर्जव करताना दिसत आहेत. गेले ते रम्य दिवस..राहिल्या फक्त त्या थेटरांच्या व्याकुळ करणाऱ्या आठवणी.. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

खासगी शिक्षण संस्थांकडून होणारी लूट थांबणार केव्हा?