दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
तंबाखूच्या विषामध्ये अमूल्य जीवाची हानी (३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष)
व्यसन प्राणघातक असते, ज्यामुळे असाध्य रोग, अपंगत्व, वेदना आणि अकाली मृत्यू होतो, सोबतच आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊन घरगुती वाद, मानसिक त्रास होतो. जगात खाण्यासाठी हजारो स्वादिष्ट आरोग्यदायी पदार्थ आहेत, तरीही लोक नशेसाठी आपले मौल्यवान जीवन वाया घालवतात. तंबाखू हे असे विष आहे जे देशात अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध आहे, ज्याचे सेवन समाजातील सर्व वयोगटातील लोक करताना दिसतात. मागास ग्रामीण भागात किंवा शहरी झोपडपट्ट्यांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला, जिथे पालक मुलांकडे लक्ष देत नाहीत अशा ठिकाणी ५ वर्षांची लहान मुलेही तंबाखूचे सेवन करताना दिसतात.
नेहमी घरातील वयोवृद्ध मंडळी किंवा पालक मुलांसमोर तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना दिसतात, ज्याचा थेट वाईट परिणाम मुलांवर होतो. तंबाखूची नशा शरीरात मंद विषासारखी काम करते, जे शरीराला घातक रोगांची लागण करून मारते. तंबाखूबाबत जनजागृती आणि व्यसनमुक्ती लाखो लोकांचे प्राण वाचवू शकते आणि कोट्यवधी डॉलर्ससुद्धा जे रोगांवर उपचार करण्यासाठी खर्च केले जातात. तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी जगभरात ”जागतिक तंबाखू विरोधी दिन” साजरा केला जातो. ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण' ही यावर्षीची थीम आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार २०१७ मध्ये धूम्रपानामुळे ८० लाख मृत्यू झाले. जागतिक स्तरावर, ५ पैकी १ प्रौढ व्यक्ती धूम्रपान करते आणि ८० टक्के तंबाखू वापरकर्ते हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत. जागतिक मृत्यूंपैकी १५ टक्के मृत्यू धूम्रपानामुळे होतात. १.६ कोटी अमेरिकन धूम्रपान संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत, अमेरिकेत दरवर्षी ४.८ लाखांपेक्षा जास्त लोक तंबाखूमुळे मरतात. तंबाखूमध्ये असलेले विषारी घटक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात, त्यामुळे आजारी पडून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. आर्सेनिक, शिसे, टार हे तंबाखूच्या धुरात ७००० पेक्षा जास्त घातक रसायनांपैकी काही आहेत. कर्करोग, फुपफुसाचे आजार, हृदयरोग आणि पक्षाघात यासह अनेक जीवघेण्या आजारांसाठी तंबाखूचा वापर हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. असा अंदाज आहे की जागरूकता सेवांच्या अभावामुळे २०५० पर्यंत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये जागतिक स्तरावर १६ कोटी अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात.
भारतात तंबाखूच्या वापराचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू आणि तंबाखूसह खैनी, गुटखा, सुपारी आणि जर्दा हे सामान्यतः वापरले जातात. बिडी, सिगारेट आणि हुक्का हे धूम्रपानाचे प्रकार आहेत. तंबाखूमुळे देशात दरवर्षी सुमारे १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. धूरविरहित तंबाखूच्या जागतिक ओझ्यापैकी ७० टक्के भारताचा वाटा आहे, ज्यामुळे दरवर्षी २.३ लाखाहून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. भारतात, २७ टक्के कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात आणि जवळपास ९० टक्के तोंडाचा कर्करोग धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे होतो. बिडी आणि सिगारेट ओढणारे इतरांपेक्षा ६ ते १० वर्षे आधी मरतात.
ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया २०१६-१७ नुसार, भारतात सुमारे २६.७ कोटी प्रौढ (१५ वर्षे आणि त्यावरील) म्हणजे २९ टक्के प्रौढ लोक तंबाखूचे सेवन करणारे आहेत, ज्यामध्ये ४२ टक्क्यांहून अधिक पुरुष आणि १४ टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे. किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण १९ टक्के आणि मुलींमध्ये ८ टक्के आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखू उत्पादक आणि ग्राहक देश आहे, जे ७६१३३५ टन तंबाखूचे उत्पादन करते. २०१७-१८ मध्ये, भारतात ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी एकूण आर्थिक खर्च १७७३४१ कोटी रुपये होता.
दरवर्षी लाखो भारतीयांचा मृत्यू सेकंडहँड स्मोकमुळे होतो. धूम्रपान न करणाऱ्या लोकसंख्येला धूम्रपान करणाऱ्याच्या चुकीची किंमत मरून चुकवावी लागते, तरीही लोक तंबाखूचे व्यसन सोडत नाहीत. सेकंडहँड स्मोकिंग म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट/बिडी ओढते आणि त्यातून विषारी धूर आसपासच्या वातावरणात सोडते आणि त्या धुराच्या संपर्कात येणारी व्यक्ती किंवा मुले हा विषारी धूर त्यांच्या शरीरात श्वासाद्वारे घेतात, तेव्हा त्याला सेकंडहँड स्मोक म्हणतात. कामाच्या ठिकाणी ३०.२ टक्के प्रौढ, रेस्टॉरंटमध्ये ७.४ टक्के आणि १३.३ टक्के सार्वजनिक वाहतुकीत धुराच्या संपर्कात आहेत. २१ टक्के किशोरवयीन (१३-१५ वर्षे वयोगटातील) सार्वजनिक ठिकाणी आणि ११ टक्के घरी धुराच्या संपर्कात आहेत.
२०१९ मध्ये भारतीय शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूच्या वापरावर आईआईपीएसने केलेल्या ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हेनुसार, २३ टक्क्यांहून अधिक हायस्कूल विद्यार्थी घरामध्ये धूम्रपान करणे पसंत करतात. शिवाय, सुमारे २० टक्के विद्यार्थी शाळेच्या कॅम्पसमध्ये धूम्रपान करण्यास प्राधान्य देतात. हायस्कूलच्या नऊ टक्के विद्यार्थ्यांनी वारंवार तंबाखूजन्य पदार्थ वापरल्याचे नोंदवले. तंबाखू उत्पादनासाठी कीटकनाशके आणि खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने पाणी प्रदूषित होते आणि उत्पादनातून दरवर्षी २० लाख टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो आणि ४३ लाख हेक्टर जमीनदेखील नष्ट होते, जे जंगलतोडीला हातभार लावतात. रोग आणि पर्यावरणाची हानी रोखण्यास धूरमुक्त भविष्यासाठी जागतिक सहकार्याची आवश्यकता आहे.
पिढ्यानपिढ्या व्यसनाबद्दलचे पारंपरिक खोटेपणा देखील आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर पसरले आहे, शोधले तर हजारो बहाणे मिळतात, नशेचा काहीच फायदा नसतो, जेव्हाकी व्यसन करणाऱ्यांना समाजात कोणीही मान देत नाही. व्यसनामुळे विनाशच होतो आणि व्यसन कधीही सोडले जाऊ शकते, फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी.
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला, नशेवर आयुष्य वाया घालवू नका. दृढनिश्चय, सकारात्मक विचार, जबाबदारीची जाणीव आणि आनंदी वातावरण व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करते. व्यसनाधीनतेपासून मुक्त होण्यासाठी प्रथम व्यसनाधीन लोकांपासून दूर राहा. जर नशेची तलब वाटत असेल तर फक्त निरोगी पदार्थांचा विचार करावा. आपले आरोग्य आणि कुटुंबातील सदस्यांच्या विचार करावा. पालकांनी त्यांच्या मुलांच्या वागण्याकडे आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये व्यसन झपाट्याने वाढत आहे. आजच्या आधुनिक युगात नशेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी हुक्का पार्लरचा ट्रेंडही खूपच फोफावत आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त होऊन अकाली मरण्यापेक्षा वेळीच सावध होऊन तंबाखू सोडली पाहिजे.
सरकार, स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्रे आणि इतर सहाय्यक गट व्यसनाविरुद्धच्या लढ्यात भागीदार म्हणून नेहमी आमच्यासोबत असतात. त्वरित तंबाखू मुक्त होण्याचा संकल्प करा. तंबाखू सोडण्यात मदतीकरीता समुपदेशनासाठी नॅशनल टोबॅको क्विट लाइन १८०० ११२ ३५६ (टोल फ्री) सर्व्हिसेसशी संपर्क साधला जाऊ शकतो किंवा ०११-२२९०१७०१ वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करा जी मोफत सेवा आहे. याशिवाय, आपण www.nhp.gov.in/quit-tobacco वेबसाइटला भेट देऊन लॉग इन आणि नोंदणी करू शकता. जीवनाचे मूल्य समजून घ्या, नेहमी नशामुक्त राहा. - डॉ. प्रितम भि. गेडाम