हिमाचल देवभूमी

शिमल्याला गारांचा वर्षाव मिळाला. बोचरी थंडी मस्त अनुभवली आणि मनालीत बर्फाचा गारेगार गालिचा त्यात ते बर्फाळ प्रदेशातले पेहराव घालून बर्फात मस्त खेळलो अगदी लहान मुलांसारखे एकमेकांवर बर्फाचा वर्षाव करीत. मीच काय, माझ्याबरोबर असणारे सत्तरीचे, पंचाहत्तरीचे जोडपे वय विसरले आणि बर्फात घसरगुंडी करत आले आणि आम्ही नाचलो, बागडलो आणि लक्षात आलं इथं आल्यावर आपण आपलं वय विसरलो अगदी पुन्हा बालपणात गेलो. तीच निरागसता त्या स्वच्छंदी निसर्गात दिसली. तो अल्लडपणा त्या बर्फातून वहाणाऱ्या निर्झरातून दिसला.

‘डॅड, कंटाळा आलाय. चल ना भटकंती करू या.' एकुलत्या एक कन्या रत्नाचा मुड ऑफ असलेला चेहरा. क्षणभर मी थबकलो. कारण ती माझ्या मनातलंच बोलली होती. क्षणभर पाकिटाचा आणि बँक बॅलन्स याचा विचार केला. मनातच जुळवाजुळव केली. तीला म्हटले, ‘चल, आज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर प्रोग्राम ठरवू.' दादरच्या चितारी ट्रॅव्हल्समध्ये गेलो त्यांनी मला संपूर्ण हिमाचलचा कार्यक्रम सांगितला. घरी आलो. सौ. ना सांगितले आणि ‘चलायचं' म्हणून आदेश निघाले. ट्रेनचं बुकिंग, पुढचं सगळं बुकींग चितारी ट्रॅव्हल्सनेच पाहिलं. आमचे यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत आणि पर्यटकांना मिळणारी कौटुंबिक वागणूक विशेष म्हणजे पर्यटनाच्या वेळी स्वतः बरोबर खानसामा (किचन) बरोबर घेऊन फिरणारी कंपनी म्हणून मी त्यांचीच निवड केली. मी काही त्यांचा प्रपोगंडा करीत नाही. पण अनेक कंपन्या गंडा लावतात. हे सारे अनुभव मी ऐकले आहेत. त्यामुळे मी एक मराठी माणसांचं नातं म्हणून त्यांच्याबरोबर निघालो आणि मंडळी..माझा विश्वास रास्त ठरला अर्थातच विशाल देशमुख व हेमा खैरनार या कौतुकास नक्कीच पात्र आहेत, असो. हिमाचल पर्यटनाला मी निघालो. निघताना आता जातोय, उन्हाने उकडणार, बर्फ मिळणार नाही असे अंदाज वर्तवले; पण देवाच्या कृपेने (देवभूमी) नेमके उलट झालं. आदल्या दिवशी दिल्लीला भरपूर पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा आला होता.

 दिल्ली, चंदीगढ मुक्काम करून हिमाचल प्रदेशात घुसलो. एखादा फिरता रंगमंच फिरावा तसा निसर्गानेच आपला रंगमंच बदलला. सपाटीवरचे रस्ते सोडून आमची मिनी बस दऱ्या-खोऱ्यात बियास नदीच्या जोडीने भन्नाट गार वारे घेत चालली होती. सभोवार पसरलेली हिरवाई, सुर्चीपर्णी देवदार वृक्षांचे उंच झाडांचे डेरे चित्रपटातून पहावा असा मुक्त निसर्ग सौदर्यांची उधळण सारे मी अक्षरशः डोळ्यात आणि कॅमेऱ्यात भरभरुन घेत होतो. हळूहळू सोबत असणारी मंडळी गप्पात रमू लागली. नवी ओळख नवी नाती काही काळासाठी का होईना, पण एक कुटुंबच वाटावं इतकं. हास्यविनोद चालू झाले. समोरुन राज्य परिवहन मंडळाच्या बसेस धावत होत्या. सगळ्या बसेसवर हिमाचल प्रदेश देवभूमी असा उल्लेख आढळला. अगदी स्पष्ट शब्दात म्हणजे आपण खरोखराच देवभूमीत आलोय स्वर्गीय सुख नसले तरी निसर्गाने केलेली रंगाची उधळण उंच उंच हिमशिखरे पक्ष्यांचा किलबिलाट शुध्द हवा धुंदकुंद वातावरण तेथील सामाजिक जीवन सगळचं विस्मयकारक, चित्तथरारक, फुलांचा गंध वेगळा, गुलाब वेगळे, हिरवळ वेगळी, खळखळ वहाणारे निर्झर वेगळे, लुसलशीत मेढयांचे, याकचे कळप, आकाशाला भिडलेली हिमशिखरे सारंच खरंच मनाला भुरळ पाडणारं; मग क्षणभर मुंबईला आठवलं रोज धाडधाड लोकलचा प्रवास ट्रॅफीक जामचा कलकलाट माणसाचं मातीशी नातं नाहीच.  मन आणि घरं दोन्ही क्राँक्रीटकरण नाही तर मोबाईलमध्ये रमलेल. मी क्षणभर फक्त घरच्यांना आणि सगळ्यांना आम्ही मस्त मजा करतोय सुरक्षीत आहोत सगळं अगदी सुरळीत चाललं आहे इतकच सांगितले आणि पुन्हा निसर्गात रमलो. तरी मी विचार करत होतो. या प्रदेशाला देवभुमीच का म्हणतात ?

 प्रवास चालू होता पर्यटन आयोजक सुचना देत होते त्याप्रमाणे मस्त सगळं आटोपून प्रवास करत होतो. नवनवीन प्रदेश पाहत होतो. मनालीला पोहचलो आणि निसर्गाचा रंगपट, नेपथ्य पुन्हा बदलले. शिमल्याला गारांचा वर्षाव मिळाला. बोचरी थंडी मस्त अनुभवली आणि मनालीत बर्फाचा गारेगार गालिचा त्यात ते बर्फाळ प्रदेशातले पेहराव घालून बर्फात मस्त खेळलो अगदी लहान मुलांसारखे एकमेकांवर बर्फाचा वर्षाव करीत. मीच काय, माझ्याबरोबर असणारे सत्तरीचे, पंचाहत्तरीचे जोडपे वय विसरले आणि बर्फात घसरगुंडी करत आले आणि आम्ही नाचलो, बागडलो आणि लक्षात आलं इथं आल्यावर आपण आपलं वय विसरलो अगदी पुन्हा बालपणात गेलो. तीच निरागसता त्या स्वच्छंदी निसर्गात दिसली. तो अल्लडपणा त्या बर्फातून वहाणाऱ्या निर्झरातून दिसला. मन अक्षरशः गुंतले होते. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच दिव्यत्वाची अनुभूती येत असावी आजूबाजूला अनेक पर्यटक होते. सर्वच जण अक्षरशः उंडारत होते, बागडत होते, खो-खो पोट धरुन हसत होते. हळूच घसरताना त्रेधातिरपीट उडताना ते हास्य बालपणीच्या खोडकर स्वभावाची आठवण करुन देत होतं. एरवी काटकोन, चौकोनी वाटणारे चेहरे बदलले होते. हृदयात अक्षरशः आनंदाचा ऑक्सीजन भरुन घेत होतो. पर्यटन संयोजकांनी सुचना केल्या. चला मंडळी पुन्हा निघायचंय. मन निघेचना. कुठंतरी गुंतले होते, शोध घेत होते गुढ प्रेमाचा, निसर्गाने भरभरुन दिलेल्या दिव्यत्वाचा, मग कळलं की याच प्रदेशाला देवभूमी का म्हणतात - अनेकजण पर्यटन करतात. त्यांच्यापरीने ते आनंद अनुभवतात, व्यक्त करतात निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सौंदर्यांची उधळण त्या देवभुमीत कडेकपारीत भिनली आहे. देवत्वाचा अनुभव हा फक्त देवावर विश्वास असणाऱ्यांनाच येतो असे नाही. उलट तो नास्तिक म्हणा किंवा माझ्यासारख्या कमी देवभोळ्या माणसाला जास्त देवून जातो. दूषित वातावरणात नेहमीच व्यावहारिक भाषेत बोलताना मनसुध्दा व्यावहारिक होते. सतत कपटी, व्यावहारिक, संवेदनाशुन्य विचार येतात.

 मी जेव्हा भारताचं स्वित्झर्लंड म्हणजे डलहौसीचं (धर्मशाळा) हिरवंगार मैदान पहायला गेलो. मैदान कसलं? पाचुचं बेटच म्हणा. असं वाटलं की या मऊ हिरव्या गवतावर अंग झोकून द्यावे आणि लोळण घ्यावी. वाटलं कशाला ? घेतलीच ! चांगला पाचपंचवीस फुट लोळत गेलो. शरीरातले त्राणच निघून गेल्यासारखं वाटलं. संयोजकांनी त्यावर मस्त चहा बनवला. एका तेथील रहीवाश्याने सशाचं एक कुटूंबच आणलं होतं. पाच इवलीशी पिल्लं आणि आईबाबा कशासाठी? तर फोटो सेशनसाठी!  त्यावर त्याची गुजराण होत होती. वा ! मजा काही औरच, ती लुसलुशीत बाळं माझ्या अंगाखांद्यावर मस्त पहूडली फोटो काढले. मजा आया.

 मी एक आनंदयात्री आहे. आनंदाचा शोध घेत इथवर आलो आनंद हिरवळीत मिळाला गारेगार बर्फात मिळाला. उंच हिमशिखरामध्ये मिळाला. खळखळत्या निर्झरामध्ये मिळाला. दऱ्याखोऱ्यामध्ये मिळाला. माझ्यातले बालपण पुन्हा जागृत झाले. घटोत्कचाचे मंदीर पाहिले. हिडींबाचे देऊळ पाहिले. वसिष्ठ मुनींचे मंदीर पाहिले. दलाई लामाचं वास्तव्य स्थान पाहिले. गुढ गंभीरता अनुभवली आणि धिरोदत्त हिमशिखरे पाहिली. सूर्याने केलेली सोनेरी उधळण आणि खाली हिरवाईचा गार गालिचा एखाद्या शायरने गझल लिहावी, कवीने काव्य लिहावे; मात्र शब्दजंजाळ नसावे. वाक्यागणीक पूर्णाविराम नसावा. प्रश्नचिन्ह तर नकोच, हवी फक्त अनुभूती. हळुवार रेशमी सावरी कापसातले मखमाली प्रेम काव्य मला अनुभवायला मिळालं आणि मनाला म्हटलं की हाच तो देव, हीच त्याची देवभूमी फक्त त्याला वाचायला रसिकमनाची जोड असायला हवी. निरोप घेताना पापणीवर तरळलेले अश्रू बरंच काही देऊन गेले. बरंच काही घेवून आलो. मात्र एक SMS ठेऊन आलो. फिर मिलेंगे. -राजन वसंत देसाई 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन (वर्ष -२ भाग -२३)