मुशाफिरी

इगो म्हणजे अहंकार, गर्विष्ठपणा, ‘मी'पणाचा खोटा अभिमान; तर ॲटिट्युड म्हणजे एखाद्याचा स्व-भाव, वृत्ती, मनःस्थिती, रीत, दृष्टीकोन, प्रवृत्ती असे अनेक अर्थ आहेत. पण अलिकडे जेंव्हा ‘एखादा किंवा एखादी ॲटिट्युड दाखवतो/दाखवते' असे म्हटले जाते तेंव्हा तिथे स्वभाव, रीत, वृत्ती, प्रवृत्ती हे सारे अर्थ बाजूला पडतात आणि ‘मिजासखोरी, घमेंड, मस्ती, माज, चरबी' अशा वेगळ्या अर्थछटा त्यात येऊन मिसळतात. हे सारे मानसिक चरबी, अहंकार, खोटा वर्चस्ववाद दाखवण्याचेच प्रकार आहेत आणि एका विशाल अर्थाने मानसिक विकार आजार, व्याधीच आहेत.

   चिंता आणि चिता या दोन शब्दांत एका टिंबाचाच काय तो फरक आहे. ‘चिता मृत्युउपरान्त जाळते; तर चिंता ही एखाद्याला जिवंतपणीच जाळत असते' हे सारेजण ऐकून असालच! शारिरीक पिडा, त्रास, कष्ट, दुखणी, जखमा, वेदना यांच्याहीपेक्षा मानसिक वलेष, टोचणी, रुखरुख, तणाव, ताण या गोष्टी अनेकांची अनेक प्रकारे दमछाक करुन त्यांचे जीणे हराम करुन ठेवत असतात. अनेकांना विविध आजार जडतात ते शरीराच्या दुखण्यांनी नव्हे, तर मानसिक विकारांनी, चिंतांनी, सतत नकारात्मक विचारक केल्यामुळे!..आणि अलिकडे हे प्रमाण तर प्रचंड वाढलेले आहे.

     ‘गर्वाचे घर खाली' ही म्हण आपल्या सुसंस्कारी मराठी घराघरांतून, शाळांमधून शिकवली जात असते ती याचसाठी की सुसंस्कारांचे रोपण लहान वयातच व्हायला हवे; तणाव हाताळायचे कौशल्य आधीपासूनच अंगी बाणवायला हवे. नाहीतर अपयशाने घोर नैराश्य तरी येते किंवा  मग मोठेपणी छोट्यामोठ्या यशाने आलेला गर्व आणखी वाढत जातो आणि मग गर्विष्ठाला कुणीही खाली, जमिनीवर आणून पायाखाली घ्यायला मागेपुढे बघत नाही. इगो, अहंकार, गर्विष्ठपणा, वर्चस्ववाद ही सारी मानसिक विकृतीची लक्षणे आहेत. मला ‘मानसशास्त्र' या विषयाचा अभ्यास करायला नेहमीच आवडते. म्हणून मी मुंबई विद्यापीठाची बी ए ची पदवी त्याच विषयात घेतली आणि आयुष्यभर माणसे ‘वाचत' राहिलो. त्यासाठी सर्वात जवळचे क्षेत्र म्हणजे पत्रकारिता..जी मी गेली एकोणतीस वर्षे करीत आहे. त्यामुळे गर्व, इगो, ताठा, चरबी, ॲटिट्युड दाखवणाऱ्या व्यक्ती कशा रसातळाला गेल्या ते मी जवळून पाहात आलो आहे.  

   जुने उदाहरण सांगतो. पद्मा चव्हाण नावाची एक मराठी अभिनेत्री होऊन गेली. तिला काही फिल्मी पत्रकार उगाचच ‘सौंदर्याचा ॲटमबाँम्ब' वगैरे बिरुदे लावीत असत. तिच्या एका मुलाखतीत मी वाचले होते की तिला म्हणे आपण ‘शहाण्णव कुळी मराठा' असल्याचा खूप अभिमान होता. खरे तर कुणी कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे कुणाच्या हातात नसते, त्यात त्याचे/तिचे काहीच कर्तृत्वही नसते. मग त्याचा अभिमान, इगो कशापायी? कोणत्याही कुळात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावणारे सत्कार्य, देशसेवा, समाजसेवा, रुग्णसेवा, दिव्यांगसेवा आपल्या हातून झाल्यास त्याचा आनंद वाटला पाहिजे. खोटा अभिमान, इगो, ॲटिट्युड दाखवून काय उपयोग? भारतात वर्णवर्चस्ववादाने या देशाचे, समाजाचे खूप मोठे नुकसान केले आहे. तुच्छतावाद, इगो, ॲटिट्युड दाखवून आपण श्रेष्ठ आणि बाकीचे हीन, दीन, दलित, कनिष्ठ, खालचे वगैरे भासवण्याच्या वर्णवर्चस्ववादामुळे देशभर मानसिक फाळण्या होत राहिल्या. आजही होत आहेत. एकेकाळी ब्राह्मण समाजातील काही दीडशहाण्यांनी अन्य समाजाच्या लोकांना अस्पृश्य, टाकाऊ, गावकुसाबाहेरचे, हीन समजून छळले. त्यात त्यांनी त्यांच्याच समाजातील स्त्रीयांनाही सोडले नाही. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. अगदी संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांनाही छळायला त्यांच्याच समाजातील काही गर्विष्ठांनी मागेपुढे पाहिले नव्हते असे आपला इतिहास सांगतो. यामुळे  या देशात इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केल्यावर आणि स्वातंत्र्योत्तर काळात अन्य समाजातील गुणवंत लोक देशात आणि परदेशात जाऊनही शिकले आणि वर्णवर्चस्ववादाला आणि वर्णवर्चस्ववाद्यांच्या इगो आणि ॲटिट्युडला त्यांनी उघडे पाडले. पण यालाही अनेक सन्माननीय अपवाद होते. पूज्य साने गुरुजी, बाबा आमटे, विनोबा भावे,  दुर्गाबाई भागवत, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, पु.ल.देशपांडे, अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर  यांसारख्या अनेक ब्राह्मण धुरीणांनी कथित वर्णवर्चस्ववादाला तिलांजली देत सर्वांसाठी  सकारात्मक भूमिका घेऊन समाजकार्य केले. पण हे केवळ अपवाद बनून राहिले. बाकीच्यांनी (छुपेपणाने!) भेदभावाचीच वर्तणूक ठेवल्यामुळे झाले काय, की देशातील बहुसंख्यांकांच्या हिंदु धर्मातील अनेकजण एकेक करुन तो धर्म सोडुन अन्य धर्मांची वाट धरत बाहेर पडले. आजही ही गळती थांबलेली नाही. याला कारणच हा काही लोकांचा इगो आणि ॲटिट्युड आहे.

   एका प्रख्यात दलित मराठी गायकाला म्हणे एक मराठी सुप्रसिध्द गायिका आपल्या घरी प्रवेश देत नव्हती आणि त्याच्यासोबत गायलाही तयार नव्हती, असे नेहमी सांगितले जात असते. एका दिवंगत प्राध्यापकाने लिहिले आहे की त्याला त्याच्या पुस्तकावर त्या सुप्रसिध्द गायिकेची स्वाक्षरी हवी होती. तर तिने त्यासाठी म्हणे पैसे मागितले. हे सारे इगो आणि ॲटिट्युडचाच भाग आहे असे आपण समजायचे का? मी एकदा त्याच गायिकेबद्दल माझ्या एका लेखात ती गायिका ब्राह्मण समाजाची आहे असा उल्लेख केला होता. मला सटासट चार पाच ब्राह्मण महिलांचे फोन आले. ‘तुम्हाला कुणी सांगितलं की त्या ब्राह्मण आहेत म्हणून?' असा रोकडा सवाल करत त्या बायांनी ती गायिका कोणत्या समाजाची आहे हे सांगत माझ्या ज्ञानात भर घातली. मी चाट पडलो. हे एवढ्यावरच थांबत नाही. काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्यात आला. तर ‘कोण ही सावित्रीबाई, तिचे शिक्षण क्षेत्रासाठी योगदान काय? शिक्षक दिनी, महिलादिनी तिच्या तस्विरी का बरे लावायच्या?' असे खासगीत पुटपुटणाऱ्या कथित उच्चवर्णिय महिला कमी नव्हत्या. हा इगो आणि ॲटिट्युड दाखवण्याचाच प्रकार नाहीतर दुसरे काय बरे? काही वर्षांपूर्वी ‘ऑल इंडिया मजलिस ए मुसलमिन इत्तेहादुल' वाल्या ओवैसीने ‘सैन्य बाजूला ठेवा पंधरा मिनिटांत देशातले हिंदू संपवू' असे वादग्रस्त विधान केले होते. हा माज, ही चरबी, हा उन्मत्तपणा म्हणजे फालतू ॲटिट्युड नाहीतर अन्य काय असेल? आता दीड दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण मोर्चांचे सत्र राज्यात सुरु होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याची चित्रफित व्हायरल झाली होती. त्यात तो मांडीवर थाप मारुन सांगत होता की ‘तीन मिनिटांत बामण संपवू म्हणून!' हा कसला इगो, हा कसला अहंकार, ही कसली सैतानी वृत्ती आणि ही कशा प्रकारची ॲटिट्युड आहे? काही दशकांपूर्वी ब्राह्मणांतले काही मुर्ख लोक इतरेजनांशी (तसेच त्यांच्यातल्याच महिलांशीही!) अत्याचार, भेदभाव, पक्षपात, दुजाभाव अशा भूमिकेतून वागत असत. इंग्रज आले, त्यांनी सर्वांसाठी शिक्षण खुले केले; स्वातंत्र्यानंतर वातावरण हळुहळु बदलत गेले जाती-धर्मभेदाच्या भिंती कोसळत गेल्या. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह वाढले. त्यामुळे आजच्या काळात सरसकट साऱ्याच ब्राह्मणांकडे त्याच नजरेने पाहणे गैर आहे. त्यांच्यामधील काहीजणांच्या गैरवर्तनाचा दोष साऱ्या समाजाला देत सरसकटीकरण करणे चुकीचे! तो समाज उच्चशिक्षित आहे, संस्कारी आहे..त्यांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण व्हायला हवे. तरीही अलिकडच्या काही कट्टरपंथी प्रचारकी संस्था ब्राह्मणांचा उल्लेख ‘युरेशियन, बाहेरचे, या देशाशी संबंध नसलेले' असा करतात तेंव्हा वैषम्य वाटल्यावाचून राहात नाही. ‘हिंदूंना संपवू, ब्राह्मणांना संपवू' असे म्हणणाऱ्यांनी ‘या भारत देशाच्या शत्रूंना संपवू, देशात राहुन पाकिस्तानशी निष्ठा ठेवणाऱ्यांना, क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव झाल्यास फटाके वाजवणाऱ्यांना संपवू, शत्रुराष्ट्राचे स्लिपर सेल म्हणून भारतात, महाराष्ट्रात वावरणाऱ्यांना संपवू' असे म्हणत तोरा दाखवला असता तर त्यांना देशप्रेमींनी डोवयावर घेतले असते. अशी ॲटिट्युड दाखवणारे कितीजण आहेत?

   अलिकडे माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला असून प्रसारमाध्यम जगतात नवनवीन साधने निर्माण झाली आहेत. अनेकांना झटपट प्रसिध्दीचे व्यसन लागले आहे. त्यासाठी आधी सिध्दी लागते याचा मात्र विचार या इंस्टंट पब्लिसिटीच्या आहारी गेलेल्यांमध्ये दिसून येत नाही. अनुभव, ज्येष्ठता, सर्वसमावेशकता, चारित्र्य, नैतिकता, गुणसंपन्नता, विविध तणाव हाताळण्यातील कौशल्य, आपल्या क्षेत्रातील नैपुण्य यांच्या बळावर अनेकांनी सिध्दीसह प्रसिध्दीही मिळवलेली असते. पण चित्रपट, मालिका, नाटके, वेब सिरीज, जाहिराती, रील्स यांच्यामुळे झटपट प्रसिध्दीला पावलेले अनेकजण अवतीभवती वावरताना दिसतात. समाजमाध्यमांवर सकाळ संध्याकाळ त्यांचा राबता असतो. त्यांच्यापैकी काहीजणांनाच वरच्या पायऱ्यांवर जाता येते. बाकीचे ‘ऑल्सो रॅन' कॅटेगिरीमध्येच हयात घालवतात. पण तरीही त्या किंचित  प्रसिध्दीचीही हवा त्यांच्या डोक्यात जाते व त्यांना इगो, ॲटिट्युडची बाधा होतेच. त्यामुळे ‘फेसबुकवर पाच हजार मित्र आणि गल्लीत विचारीना साधं कुत्रं' अशा प्रकारचे अनेकजण आढळून येतात. युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक ही समाजमाध्यमेही वापरता न येणारे व  त्याच त्या डबक्यात वर्षेनुवर्षे वळवळणारे काही जीवजंतूही या इगो आणि ॲटिट्युडच्या व्याधीला बळी पडतात आणि स्वतःचेच हसे करुन घेतात. कारण त्यांना अन्यत्र कुणीही हिंग लावून विचारीत नाही. जरा मनाशीच उजळणी करुन पाहा बरं असे किती नमुने तुमच्या आसपास आहेत ते!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक :  दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

रामजपाने तमाशा निवडणूकीचा