देशाची सद्यस्थिती आणि रामराज्याचे ध्येय !

आजच्या तरुणांना लग्न करण्याआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला देऊ लागली आहेत. भारतीय संस्कृतीला न शोभणाऱ्या या फॅडमध्ये आता गुन्हेगारीचा शिरकाव होऊ लागला आहे. एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता घेतलेल्या निर्णयात फसवणूक झाल्याने काही मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. शारीरिक गरजा भागवण्यासाठी अनैतिकतेला कागदी कराराचे नैतिक लेबल लावून निर्माण झालेल्या संबंधांत नात्याचा गोडवा कुठून येणार? नैतिकतेचा आदर्श प्रभू श्रीरामांनी आपल्यासमोर ठेवला आहे तो पुनर्जीवित करण्याचे दायित्व आजच्या पिढीवर आहे.

रामनवमीचा उत्सव दरवर्षी भारतासह जगभरात ज्या ज्या ठिकाणी हिंदू बांधव वसले आहेत त्या ठिकाणी उत्साहाने साजरा केला. यंदाच्या रामनवमीचा उत्साह दरवर्षीपेक्षा दुप्पट दिसून आला. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन भारतभूमीला स्वातंत्र्य तर ७६ वर्षांपूर्वीच मिळाले; मात्र भारतभूमीचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम मात्र न्यायप्रक्रियेच्या बंधनात बंदिस्तच होते. श्री रामभक्तानी अविरतपणे दिलेला लढा. केलेला संघर्ष आणि प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून केलेले प्राणांचे बलिदान या सर्वांच्या फलस्वरूप प्रभू श्रीराम न्यायप्रक्रियेतून मुक्त झाले आणि काही काळातच श्रीरामजन्मभूमी अयोध्येत स्वर्गातील देवतांनाही हेवा वाटावा असे भव्य दिव्य श्रीराममंदिर उभे राहिले ज्यामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारे श्रीरामल्ला विराजमान झाले. त्या मंगलदिनी श्रीरामभक्तांनी अनुभवलेला आनंद अवर्णनीय होता. श्रीराममंदिराच्या प्रांगणात बसून श्रीराममंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्याचा अनुभव घेणाऱ्या प्रत्येक प्रतिष्ठितांचे डोळे त्या क्षणी पाणावले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर  भगवंतदर्शनाचा आणि कृतज्ञतेचा जो भाव दिसत होता त्याला कशाचीही तोड नाही. भारताचा इतिहास जेव्हा केव्हा मांडला जाईल तेव्हा २२ जानेवारी २०२४ हा दिवस त्यामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. येणारी पिढी आताच्या पिढीचे गोडवे गाईल. कारण आजच्या पिढीला जे भाग्य लाभले आहे, ते मागील सहा-सात पिढ्यांच्या नशीबी नव्हते.

 श्रीराम सर्वार्थाने आदर्श होते. त्याकाळी जेव्हा राजे आणि राजपुत्र एकाहून अधिक विवाह करत त्याकाळीही श्रीरामांनी एकपत्नीव्रत आचरले होते. पत्नीच्या हरणानंतर वानरांचे संघटन करून त्यांनी बलाढ्य अशा रावणाचा वध केला आणि सीतामातेची सुटका केली. अश्वमेध यज्ञाच्या वेळी यजमान म्हणून विधी करण्यासाठी पत्नीची आवश्यकता असताना त्यांना दुसरी पत्नी करण्याचा सल्ला दिला गेला; मात्र श्रीरामप्रभूंनी सीतामातेची प्रतिकृती बनवून तिला शेजारी ठेवले आणि यज्ञविधी पूर्ण केले. पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचा आदर्श यानिमित्ताने त्यांनी जगासमोर ठेवला. आजमितीला समाजात अनैतिकता बोकाळलेली पाहायला मिळते. विवाहित असताना विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. नात्याचा अडसर नको म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचा करार करण्याचे पाश्चात्यांचे स्तोम याला न्यायालयीन मान्यता मिळाल्याने भारतातही मोठ्या प्रमाणात माजू लागले आहे. देशातील सेलिब्रिटी मंडळी या कुप्रथेचे जाहीरपणे समर्थन करू लागली आहे. आजच्या तरुणांना लग्न करण्याआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला देऊ लागली आहेत. भारतीय संस्कृतीला न शोभणाऱ्या या फॅडमध्ये आता गुन्हेगारीचा शिरकाव होऊ लागला आहे. सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या छळाचे, फसवणुकीचे गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता घेतलेल्या निर्णयात फसवणूक झाल्याने काही मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. कित्येक मुलींचे जीवन यामध्ये उध्वस्त होत आहे. शारीरिक गरजा भागवण्यासाठी अनैतिकतेला कागदी कराराचे नैतिक लेबल लावून निर्माण झालेल्या संबंधांत नात्याचा गोडवा कुठून येणार ? नैतिकतेचा आदर्श प्रभू श्रीरामांनी आपल्यासमोर ठेवला आहे तो पुनर्जीवित करण्याचे दायित्व आजच्या पिढीवर आहे. वडिलांनीं सावत्र आईला दिलेल्या वचनाचा मान राखत प्रभू श्रीरामांनी १४ वर्षांचा वनवास पत्करला. एकीकडे राज्याभिषेकाची सिद्धता सुरु असताना अचानकपणे आलेला वनवास प्रभूंनी हसत हसत स्वीकारला. वनवासातून परतल्यानंतर कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता प्रभू श्रीरामांनी माता कैकयीचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. कुठे संपत्तीसाठी जन्मदात्या आईची हत्या करणारी आजची पिढी आणि कुठे वनवास देणाऱ्या सावत्र आईंशीही सख्ख्या आईच्या मायेने प्रेम करणारे प्रभू श्रीराम. रावणाचा वध केल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यास विभीषण तयार नव्हते, अशावेळी ‘मरणांती वैराणी' या वचनानुसार प्रभू श्रीरामांनी बंधुत्वाच्या नात्याने रावणाचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. संकटकाळात सुग्रीव आणि विभीषणाला साहाय्य करून प्रभू श्रीरामांनी मित्रत्वाचा आदर्श जगासमोर ठेवला. प्रभू श्रीराम एकवचनी होते. मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच असायचा. वनवासात असताना श्रीरामांनी अनेक शापित जीवांचा उद्धार करून आपले अवतारत्व सिद्ध केले होते.

भगवंताच्या कृपेने आणि श्रीरामभक्तांच्या प्रयत्नांनी ५०० वर्षांनंतर श्रीरामजन्मभूमीत राम मंदिर उभे राहिले, असेच प्रयत्न सुरु ठेवले तर रामराज्यही दूर नाही. रामराज्य म्हणजेच आदर्श राज्य. जिथे समस्त जीव गुण्यागोविंदाने नांदतील. जिथे सज्जनांचे रक्षण होईल आणि दुर्जनांचे निर्दालन केले जाईल. जिथे अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार यांना स्थान नसेल. जगाच्या पाठीवर आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याचे उदाहरण दिले जाते. राजधर्म काय असतो, राजाचे प्रजेपती काय कर्तव्य असते हे प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या आचरणातून जगाला दाखवून दिले आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. स्वार्थासाठी राजकीय पुढारी दिवसागणिक पक्ष बदलत आहेत. नेत्यांवरील प्रेमापोटी कार्यकर्ते मंडळी एकमेकांची डोकी फोडत आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी साम, दाम, दंड, भेद यांचा राजकीय पक्षांकडून सर्रासपणे वापर केला जात आहे. जनतेच्या सेवेपेक्षा देशाची सत्ता उपभोगण्याचा हव्यास पक्षांमध्ये अधिक दिसून येत आहे. जनतेला फसव्या आश्वासनांची प्रलोभने दाखवली जात आहेत. मतदारांच्या हातापाया पडले जाते आहे, निवडणूक संपल्यानंतर हीच राजकीय मंडळी मतदाराला साधी ओळखही दाखवत नाहीत. मतदार केवळ निवडणुक जवळ आली कि ‘राजा' बनतो. बाकी पुढील पाच वर्षे केवळ ‘याचक' असतो. अशा स्वार्थांध भावनेतून रामराज्य येणार आहे का ? देशात रामराज्य आणायचे असेल तर राजकीय मंडळींवर विश्वास ठेवून चालणार नाही. रामराज्याची स्थापना सर्वप्रथम आपल्या मनात करावी लागणार आहे. त्यासाठी मनातील दोषांचे निवारण आणि गुणांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न आपल्याला करावे लागतील.  ‘सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे' या समर्थांच्या वचनानुसार सामाजिक स्तरावर कार्य करताना प्रत्येक वेळी भगवंताचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रोहिडेश्वराला साक्षी ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. साक्षात आई भवानीचे त्यांना आशीर्वाद होते. समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकारामांसारख्या महान संतांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. महाराजांच्या मुखात सदैव जगदंब जगदंब हा जप असे. आई भवानीची कृपा आणि स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची साथ यांच्या बळावर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. नामस्मरणाने मनाची शुद्धी होते, सत्संगाने नामस्मरणाला चालना मिळते. अंतर्बाह्य शुद्धी होऊन अंतःकरणात रामराज्य आले की समाजात रामराज्य स्थापन होण्यास वेळ लागणार नाही. सर्वांनी संघटितपणे प्रयत्न केले तर असाध्य असे काहीच नाही. कधीकाळी असाध्य वाटणारे श्रीराम मंदिराचे ध्येय पूर्ण झाले. भारतभूमीमध्ये रामराज्याची पहाटही लवकरच पाहायला मिळावी यासाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करूया ! - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी