नवी मुंबई शहरात दोन आंदोलने करण्याचा अजब फतवा ; भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ

नवी मुंबई शहरात दोन आंदोलनाच्या आदेशाचा दावा ?

वाशी ः ‘महाराष्ट्र विधान परिषद'चे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. नवी मुंबई शहरात ‘भाजप'ने देखील अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, नवी मुंबई शहरात दोन आंदोलने करण्याचा अजब फतवा निघाल्याची माहिती पेरली जात असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली असल्याची चर्चा आहे.

नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथे अजित पवार यांच्या विरोधात ३ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले. मात्र, रामचंद्र घरत यांनी वाशी येथे आंदोलन करण्याचे टाळल्याने भाजप मधील पदाधिकारी-कार्यकर्ते नाराज असल्याची कुजबुज आहे. तर अनेकांना आंदोलनाची माहितीच नसल्याने संभ्रम होता. मात्र, वाशी येथे आमदारांच्या मार्फत आंदोलन करण्यात येणार होते. यामुळे रामचंद्र घरत यांनी तुर्भे येथे आंदोलन केल्याची माहिती उच्चपदस्थ भाजप पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. प्रत्यक्षात मात्र आमदारांकडून आंदोलनाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने आता आंदोलनाच्या निमित्ताने भाजप मधील गटबाजी आणि अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. बेलापूर मधील वैद्यकीय महाविद्यालय भूखंड प्रकरणी भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि आमदार गणेश नाईक या दोन आमदारांमध्ये थेट सामना रंगला होता. नवी मुंबई शहरात सध्या तीन भाजप आमदार आहेत.  ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आ. गणेश नाईक तर बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आ. सौ. मंदाताई म्हात्रे या करीत आहेत. तसेच विधान परिषद सदस्य रमेश पाटील देखील नवी मुंबई शहरात वास्तव्यास आहेत.यातील नेमके कोणते आमदार वाशी येथे आंदोलन करणार होते, असा संभ्रम कायम आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार, आ. बाळाराम पाटील यांचा निवडणूक अर्ज दाखल