‘नमुंमपा'चे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेह संमेलन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकामार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी सेवा-सुविधांची, प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांमार्फत होत असून नागरिकांच्याही अडी-अडचणी, सूचना यादेखील प्रशासनापर्यंत प्रसारमाध्यमांमार्फत पोहचत असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमे नागरिक आणि महापालिका यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा असून देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने माध्यम प्रतिनिधींशी संवाद व्हावा आणि विचारांचे, शुभेच्छांचे आदान-प्रदान व्हावे याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेनुसार दिवाळी स्नेहसंमेलनासारखा उपक्रम नवी मुंबई महापालिका मुख्यालयात राबविण्यात आला. यावेळी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या नावलौकिकात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. इतर शहरांपेक्षा आपले नवी मुंबई शहर वेगळे असून स्वच्छतेप्रमाणेच आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात नवी मुंबई महापालिकेच्या सुरु असलेल्या उल्लेखनीय कामांबद्दल माहिती देत आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या सुविधा कामांचीही त्यांनी माहिती दिली. नवी मुंबई पर्यटनदृष्ट्या लोकप्रिय शहर व्हावे याकरिता केल्या जात असलेल्या नियोजनाचीही माहिती दिली. यावेळी आयुक्त शिंदे यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, डॉ. अजय गडदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा.आयुक्त अलका महापुरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या वतीने दिवाळी फराळासह स्नेहसंमेलनाचे आयोजन करुन एक चांगला संवाद माध्यम प्रतिनिधींशी साधल्याबद्दल या संकल्पनेची प्रशंसा करण्यात आली. यावेळी काही माध्यम प्रतिनिधींसह उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी कविता सादर केली. सर्वांच्या एकत्रित सहयोगातून प्रशासन आणि पत्रकार यामधील दिवाळी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कीर्तनातून विमानतळ नामकरणाचा गजर