अभिजात मराठी भाषा आणि फायदे

केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोबरच्या निर्णयामुळे अकरा कोटी मराठी लोकांच्या माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठीजनांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. मागील दशकभरापासून सुरू असलेल्या सर्व मराठीप्रेमींच्या प्रयत्नाचे हे यश आहे. याबद्दल केंद्र सरकार आणि साहित्य अकादमीला मनःपूर्वक धन्यवाद ! या निर्णयामुळे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सर्व  सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपल्या साहित्यिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले याचे समाधान असून, या निर्णयाचे आपण स्वागतच करत आहोत.

माझ्या मराठीचे बोल कौतुके
परी अमृता तेही पैजा जिंके।
 ऐसी अक्षरे रसिके। मिळवीन
 अमृताशी जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल. कारण अमृतापेक्षाही माझ्या मराठी भाषेत गोडवा आणि माधुर्य अधिक आहे. असे संत ज्ञानेश्वर मराठी भाषेचा गोडवा गातात. तर माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-या खोऱ्यातील शिळा, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी  अशी कविवर्य कुसुमाग्रज तिची महती व्यक्त करतात. अशा आपल्या या मायबोली मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहेच.

आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मराठीजनांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. मागील तीन दशकभरापासून सुरू असलेल्या अभ्यासकांचे, साहित्यिकांचे आणि सर्व मराठीप्रेमींच्या प्रयत्नाचे हे यश आहे. केंद्र सरकार आणि साहित्य अकादमीला या बद्धल मनःपूर्वक धन्यवाद!

 महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षे जुने असल्याचे पुरावे असल्याचे या अहवालात म्हटले होते. अकरा कोटी लोकांची मराठी जगातली १० व्या  क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असेही या अहवालात म्हटले होते.

भाषेला अभिजात दर्जा म्हणजे काय तर भाषा अधिक समृद्ध, अधिक प्रभावी होणे आणि ती परिवर्तनशील बनणे हे होय. हा दर्जा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मंत्रिमंडळात मंजूर करून दिला जातो. अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून भरीव अनुदान दिले जाते.
भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी भाषा दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी लागते. तसेच भाषेत समृद्ध ग्रंथ साहित्य व अन्य साहित्याची प्रभावी परंपरा असावी लागते. प्राचीन व अर्वाचीन भाषेची सांगड घातलेली असावी लागते.

माननीय श्री. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून एक समिती गठीत केली होती. तिचे अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर रंगनाथ पाठारे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. हरी नरके, डॉ. रंगनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. मधुकर वाकोडे, साहित्यिक सतीश काळशेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. अनंत उबाळे परशुराम पाटील, डॉ. मैत्री देशपांडे आणि सरकारच्या भाषाविषयक संस्थांचे संचालक यांच्या समितीच्या एकूण सात बैठका झाल्या होत्या. या समितीने ५०० पानांचा अहवाल, सर्व अटी व निकष यासह सादर केला होता.

 त्यानंतर डॉ.रंगनाथ पाठारे यांच्या उपसमितीच्या १९ बैठका झाल्या. सप्टेंबर २०२४ साली राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे पुन्हा तो अहवाल सादर केला गेला व पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्या पुढाकाराने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घ्ोतला गेला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला.
                   अभिजात भाषा दर्जाचे फायदे  
 अभिजात दर्जामुळे मराठीच्या बोलीचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि साहित्य संग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळेल. महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व  ४५० विद्यापीठात मराठी भाषा शिकविण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच राज्यातील १२००० ग्रंथालयात मराठी भाषेची ग्रंथालये सशक्त होण्यासाठी मदत होईल.  

अभिजात मराठी भाषेतील अभ्यासक विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. ते आता मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तींना मिळणार आहेत.
मराठी भाषा विकासासाठी  काही संस्था उभारल्या जातील जशा इतर भाषांच्या उभारल्या गेल्या आहेत. तसेच मराठी भाषेच्या  विकासाच्या विविध प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाईल. जसे प्रत्येक भाषेसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी काही कोटी रुपये अनुदान दिले गेले होते.

 मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू करून त्या ठिकाणी भाषाविषयक संशोधनावर सव्रााधिक भर दिला जाईल. तसेच मराठी भाषेचे व्याकरण त्यामधील नवे प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून भाषेचा विकास कसा करता येईल याविषयीचा आराखडा तयार केला जाईल.

 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे अनुवादाची क्षेत्रे विस्तीर्ण होणार आहेत. त्यामध्ये मराठीमधील सर्वोत्तम अशा १०० ग्रंथांचे अन्य १४ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून घेणे आवश्यक ठरणार आहे. त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील शंभर पुस्तकांचे मराठी मध्ये अनुवाद करणे आवश्यक ठरणार आहे.

आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिजे या विषयावर सविस्तर चर्चा, संशोधन आणि अभ्यास घडणे आवश्यक ठरणार आहे. तसेच अन्य भाषा विषयक उपक्रमांना संधी मिळणे हेही यामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे होतील हे सांगितले आहे. त्यात मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे,भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे यांचा समावेश आहे .

केंद्र सरकारने  जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील. विशेषतः सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणे, तसेच भाषांमधील पुरातन साहित्याचे डिजिटायझेशन करणे यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचे प्रकाशन तसेच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

आपल्या माय मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे हे सर्वांना गौरवास्पद आहे. आपण आणि महाराष्ट्र सरकारने फक्त आनंदात मशगुल न होता. माय मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा फायदा मराठी भाषा आणि तिच्या बोली भाषांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हायला हवा. तसेच मराठी शाळाही वाचवायला हव्यात. -शिवाजी गावडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

देवीच्या मारक रूपाची उपासना : काळाची आवश्यकता !