गणपती गेले गावाला...

गौरी आणि गणपतीची गडबड संपली. आज आधी सकाळी बागेत गेले. मैत्रिणी आल्याच होत्या. त्यांच्याबरोबर बाकावर बसले. गप्पा सुरू झाल्या..इतक्यात राधा आली आणि म्हणाली
 ‘ए.. सारखं गोड खाणं चाललंय आधी चार चार चकरा मारा मग गप्पा.....' तशा सगळ्या म्हणाल्या..
‘आम्ही नाही येणार..अग दमलो ग आम्ही... आज गप्पा मारायलाच आलो आहोत. तुझी तु जा बाई..'
‘ए अस काय ग ...एक तरी चक्कर मारूया की..पण आज कोणी उठलं नाही. बरं बाई मी एकटीच जाते.' असं म्हणत ती गेली.
‘काय कसा झाला सण?' आपटे ताईंनी विचारलं.
सुजाता म्हणाली, ‘आधी माझ्या मोदकाची गंमत सांगते ती ऐका...आमच्या सुनबाई मला प्रेमानी म्हणाल्या आई तुम्ही युट्युबवर मधुराज रेसिपी बघताना... तीनी  उकडीचे मोदक छान सांगितले आहेत... तर तिला गोड आवाजात म्हटलं....असं का.... ते बघून मग तूच कर बाई या वेळेस... तीची अशी तंतरली...'
‘मग काय झाल?'
म्हणाली..‘नको नको आई ते काय दिसायला चांगले दिसतात चव कशी कळणार? तुम्ही नेहमी करता तसे करा.... तुमचेच छान होतात....' सगळ्या हसत सुटल्या...
करूणा वहिनी  म्हणाल्या, ‘आम्ही दोघी सासू सुना एकमेकींना चांगल्या ओळखून आहोत. आम्ही घरी करायच्या भानगडीत पडत नाही सरळ आधीच मोदकांची ऑर्डर देऊन येतो.....'
जोशी काकू म्हणाल्या, ‘आमच्या देशस्थानचं बरं आहे... आम्हाला ते ऊकडीचे मोदक आवडत नाहीत. आदल्या दिवशी डबाभर तळणीचे मोदक केले की झालं काम...'
कानडे आजी भाऊक मऊ आवाजात म्हणाल्या..‘खरंतर दरवर्षी  माझे ऊकडीचे मोदक छान होतात .. यावर्षी काय झालं कळलच नाही. बरेच मोदक हसले ..उघडेच झाले ...तसाच गणपतीला नैवेद्य दाखवला...'
तांबे आजी म्हणाल्या... ‘अगं ते हसले नाही काही.. कसे झाले आहेत ते बघण्यासाठी बाप्पानी चव घेऊन बघितली तुझ्या मोदकांची...म्हणूनच ते उघडले...असं असेल?'
‘अगं नाही तर काय.. तू इतकी सुगरण.. कधी असं झालं होतं का? ऊलट प्रचिती दाखवली ग तुला ....'
कानडे आजींना हे ऐकून बरे वाटले. त्यांनी श्रद्धेनी हात जोडले..
मला हे फारच आवडलं...
मोदक बिघडले तरी त्याला  भावनिक टच  देऊन आजींनी सहजपणे त्यांची समजूत काढली होती. हे मी खरंच लक्षात ठेवीन..
असं बरच काही शिकण्यासाठी तर मी इथे येते....सहज गप्पातून मोलाचं असं काहीतरी गवसतं...
‘ए... खाण्याच्याच काय गप्पा चालल्या आहेत? अथर्वशीर्षाची किती आवर्तनं केली? कुठल्या आरत्या म्हटल्या? ब्रह्मणस्पती सूक्तम्‌ एकदा तरी म्हटलं का?'  सुमतीनी विचारलं..
‘ए आता आमची परीक्षा नको घेऊस बाई ..केली आम्ही सेवा जमेल तेवढी...' नंदा म्हणाली,
  ‘अग माझ्या घरी सासू-सासरे, त्यात  नातवाला सांभाळायचं ....मग मी आदल्या दिवशीच गणपतीला सांगितलं ...बाबा रे... उद्या मला काही जमणार नाही मी आजच आवर्तन करते...'
 ‘असू दे केलीस ना.... दुसऱ्या दिवशी सगळेच म्हणणार ...उलट शांतपणे गणोबानी तुझी ऐकली असतील..' तांबे आजी असं म्हणाल्यावर नंदा मनापासून हसली..
सुरेखा म्हणाली, ‘ए गप्पा किती वेळ चालल्या आहेत?..आज काय घरी कामं नाहीत का? निघूया गं...'
ऊठल्या सगळ्या... तांबे आजी म्हणाल्या, ‘जरा थांबा गं.. उभ्या राहा... हात जोडा.. आज निघताना अथर्वशीर्ष म्हणूया.'
आत्ता म्हणायचं ?...असा प्रत्येकीचा चेहरा...
 ‘गणपतीचं विसर्जन झालंय... पण त्याचं कधी विसर्जन  होतं का ? तो अनादी.. अनंत..आहे. तो असतोच गं ...आपल्या आसपास. आताही आहेच..आज त्या परम तत्वासाठी म्हणूया..'
ऊभं राहुन सगळ्यांनी हात जोडले आणि म्हणायला सुरुवात केली...
हरिः ओम्‌नमस्ते गणपतये
त्वमेव  प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलम्‌कत्राासि.....
डोळे मिटून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणताना  आज बाप्पा समोर दिसत होता.....
‘असाच तुझा वरदहस्त डोक्यावर असू दे रे...
आहे त्यात आम्ही समाधानी आहोत .
तुझ्याकडे आता  काही मागणं नाही बघ...'
-नीता चंद्रकांत कुलकर्णी 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मंडपांनी सजलेली हंपी येथील धर्मस्थळे