मुशाफिरी

‘गणपतीचं गाव' म्हणून सुप्रसिध्द असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमधील विविध गणपती जगभर रवाना होत असतात. पेण हे माझे आजोळ. तेथून माझ्या मावशीकडील गणपतीचे दर्शन घेऊन येत असताना असाच मला गणपती बाप्पा रस्त्यात भेटला. नाराज दिसला. यावेळी मी बाप्पाला विविध प्रश्न विचारुन घेतले व बाप्पानेही त्यांची मनमोकळी उत्तरे दिली.

   दिवस गणेशोत्सवाचे आहेत. बाहेर सावन-भादोचे उन-पावसी वातावरण आहे. पण पाऊस थांबला की चटके  देणारे उन व लगेच वाढत्या उष्म्याचे विचित्र  व यापूर्वी ववचितच अनुभवलेले तापमान याचा आपण सारेजण मुकाबला करीत आहोत. आजूबाजूलाही चटका देणाऱ्याच घटना सातत्याने घडत आहेत. विशेषकरुन मुली-महिलांवरील अन्याय, अत्याचार, क्रूरपणे त्यांच्या होणाऱ्या हत्या, विविध वयोगटातील नागरिकांच्या आत्महत्या, घाणेरडे व आधी कधीही न पाहिलेले राजकारण, कोणत्याही बाबीचे लागलीच राजकारण करुन त्याला पक्षीय रंग देण्याचा खटाटोप या सगळ्या भवतालामध्ये यंदा बाप्पाने ७ ते १७ सप्टेंबरपर्यंत आपला मुक्काम सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपात व काही घरांतून ठेवला आहे.

   गणपतीच्या या कालावधीत म्हणे रात्री आकाशात बघू नये..चोरीचा आळ येतो. मी तर म्हणतो की धकाधकीच्या नागरी जीवनात माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःकडे बघण्यास उसंत मिळत नाही तो कशाला आकाशाकडे बघतोय? आणि हल्ली जिकडे तिकडे जुने वाडे, घरे, इमारती, चाळी, अपार्टमेन्ट्‌स, सोसायट्या पाडून रि-डेव्हलपमेन्टचे पेव फुटले आहे. त्यामुळे पाडलेल्या इमारतींभोवती पत्रे आणि बांधून झालेल्या टॅावर्सभोवती काचांचे आवरण यातून आपल्याला आकाश असे दिसतेच कुठे? वरती असे वातावरण आणि पायाखाली फुटके तुटके रस्ते याच माहौलातून आपले सारे सण येत आहेत आणि जात आहेत. ‘जगातला सर्वाधिक वर्षे बांधला जात असलेला रस्ता' म्हणून ज्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विनासायास नोंद होईल तो मुंबई-गोवा रस्ताही आणखी अडीच वर्षे काही तयार होणार नाही याची जाहीर कबुलीच सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यामुळे ‘गिनिज' पेक्षाही आणखी कुठले एखादे रेकॉर्ड बुक असेल त्यातही हा विक्रम नोंदवण्यास मुंबई-गोवा हमरस्ता आता तयार असेल. याच रस्त्यावरुन ‘गणपतीचं गाव' म्हणून सुप्रसिध्द असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमधील विविध गणपती जगभर रवाना होत असतात. पेण हे माझे आजोळ. तेथून माझ्या मावशीकडील गणपतीचे दर्शन घेऊन येत असताना असाच मला गणपती बाप्पा रस्त्यात भेटला. नाराज दिसला. देशातील व एकूणच जगातील घडामोडींमुळे तो व्यथित वाटला. मला म्हणाला, ‘तू काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या मुंबईतील गिरगाव मधील केशवजी नाईक यांच्या चाळींमधील १३२ वर्षे जुन्या व मुंबईतील पहिल्याच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडीओ मुलाखत घेतली होतीस. त्यात त्यांनी आज इतवया वर्षांनंतरही किती साधेपणा जपला आहे, आगमन, विसर्जन मिरवणूक, कलावंतांचे कार्यक्रम, व्यायामाच्या-शरीरसौष्ठवाच्या विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांतील वेगळेपणा, त्यातील महिलांचा उत्साही सहभाग, मूर्तीचा आकार या विषयी पदाधिकारी व एकूणच मंडळ किती काटेकोरपणे लक्ष देते याविषयीची माहिती होती. पण असे सांस्कृतिक पावित्र्य जपणारी किती मंडळे आज उरली आहेत?'

   मी म्हटले.. ‘बाप्पा, काळाने कूस पालटली आहे. टिळकांचा जमाना वेगळा होता. त्यावेळी देश पारतंत्र्यात, इंग्रजी राजवटीच्या जोखडाखाली होता. लोकांना धर्माच्या नावाखाली का होईना..संघटित करणे ही त्या काळाची गरज होती. देशप्रेमी लोकांचे विचार, प्रबोधन, मनोरंजनासाठी सादर केलेल्या कार्यक्रमांच्या आडून भारताच्या स्वातंत्र्याचा विचार जागवणे हे सारे करण्यात आयोजकांना धन्यता वाटे. आज तसे राहिलेले नाही. जो तो स्वतंत्र झाला आहे. पैसेवाला झाला आहे. मंडळे आर्थिकदृट्या धष्टपुष्ट झाली आहेत. ते देशप्रेम, राष्ट्रभक्ती, प्रबोधन वगैरे पेपरात छापायच्या, सिरीयलींमधून, सिनेमांमधून दाखवायच्या गोष्टी झाल्या. फारच झाले तर एखाद्या वर्षी मंडपात त्याचा देखावा, सजावट करायची. असा विचार बोकाळल्यावर आणखी वेगळे काय होणार?'

   माझे बोलणे बाप्पाला पटले किंवा पटले नाही ते कळायला मार्ग नव्हता. एकतर त्याचे डोळे अतिशय शांत, धीरगंभीर. राग आल्यावर कुणाचेही डोळे आधी ती तप्त भावना समोरच्यापर्यंत पोहचवतात. तसे काही बाप्पाचे नव्हते. मग मी विषय बदलला. मी म्हटले, ‘बाप्पा..२६ जुलै रोजी ‘घरत गणपती' नावाचा मराठी सिनेमा माझे आडनाव व तुझे नाव असा जोड मारुन प्रदर्शित करण्यात आला होता. तो पाहिलास का?'  बाप्पाने दोन्ही डोळे मिटले. त्याला काय बोलायचे होते ते मला कळेना! मग बाप्पा म्हणाला, ‘होय पाहिला. कोकणातील नेत्रदीपक निसर्गसौंदर्याने नटलेल्या वस्त्या, वाड्या, शेते, बागा यांचे रम्य दर्शन घडवणारा तो सिनेमा होता. त्यात अलिकडे सगळीकडेच सगळ्याच कुटुंबांत होत गेलेल्या मानसिक फाळणीचे चित्रण केले होते. अजिंक्य देव, अश्विनी भावे, निकिता दत्ता, शुभांगी गोखले, संजय मोने अशा सर्वच कलाकारांच्या सुरेख अभिनयाने नटलेला तो सिनेमा होता. कोकणातच राहुन तिथल्या  वाड्या, घरे, बागा, शेते सांभाळणाऱ्या कुटुंबांना वाटते की मुंबईचे आपले कुटुंबदार इथे चार दिवस मजा करायला येतात. ते पैसेवाले लोक आहेत. मुंबईत फारश्या समस्या नाहीत. गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करायच्या आणि वाट्टेल तसा पैसा खर्च करायचा एवढेच काम त्यांना असते. तर कोकण हे गाव असलेल्या मुंबईतील कुटुंबदारांना वाटते की हे गावचे लोक आमच्या जीवावर आहेत. तिथे बसून शेतीवाडी, बागा, घराची डागडुजी वगैरे करायला कष्ट वा फारसा पैसा लागत नाही. गावच्या लोकांची नजर आम्हा मुंबईकरांच्या पैशांवर असते. हे असे सगळे त्या 'घरत गणपती' सिनेमात दाखवले होते आणि हे सारे गणेशोत्सवाच्या काळात घडत असल्याचे त्यात दिसते.'

   मी यावर म्हटले की ‘बाप्पा, हे केवळ कोकणातच किंवा घरतांच्या परिवारात घडते का? हा तर सार्वत्रिक अनुभव आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र काय.. किंवा देशातल्या अन्य प्रांतांत काय, थोड्याफार फरकाने असाच अनुभव येतो की! मग ‘घरत'च समोर कसे काय? त्यावर बाप्पा मोठ्याने हसला. म्हणाला..‘मला वाटलेच तू असा प्रश्न विचारणार म्हणून! शेवटी तू पत्रकार. प्रश्न विचारण्याचा तुझा अधिकार शाबूत ठेवणारच. हे बघ, साधे गणित आहे. महाराष्ट्रात अनेक आडनावे वेगवेगळ्या छटांनी युवत आहेत. काही राजकारणात, काही अन्य क्षेत्रात! तुझे आडनाव काळ्या-राखाडी-करड्या शेड्‌स नसलेले मस्त आहे.'

   मग मी विचारले...‘बाप्पा, लोकांनी आपापल्या मुलांना हाडाचे काडे करुन, कर्ज काढून, आपापल्या इच्छा-आकांक्षा मनातल्या मनात दडपून टाकत चांगले शिकवावे, त्यांना चांगल्या नोकऱ्यांची संधी मिळवून द्यावी आणि त्यांनी वेळ मिळताच अधिक शिक्षण-अधिक पगाराच्या नोकऱ्या शोधण्याच्या निमित्ताने भुर्रर्रकन परदेशी उडुन जावे; बरे जावे तर जावे.. तिकडेच आपला जीवनसाथी निवडावा आणि आपला प्राणप्रिय भारत देश, आपले जन्मदाते, आपले जीवन समृध्द करणारे नातेवाईक, मित्रपरिवार यांना सहजपणे विसरुन जात तिकडेच कायमचे स्थायिक व्हावे याला काय म्हणावे?' माझ्या या प्रश्नावर मात्र बाप्पाने आपला मंगल आणि पवित्र, शूचिर्भूत असणारा चेहरा गंभीर केला आणि म्हणाला..‘तू विचारतोयस त्यात तथ्य आहे. आधी ही किड येथील काही अभिजनांमध्ये लागली होती. पण जसजशा शिक्षणाच्या, पैसे कमावण्याच्या अधिकाधिक संधी मिळत गेल्या तसतशी याची लागण बहुजनांमधील अनेकांनाही झाल्याचे दिसून येतंय. जन्मदात्यांना, जन्मभूमीला विसरण्यासारखे घोर पातक नाही. त्यातही आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या आई-वडीलांच्या साक्षीने निवडण्याची आपली परंपरा आहे. ती डावलून अलिकडचं ही पोरं आपापली लग्नं परस्पर उरकून घेतात हे तर महापाप आहे. ते आता वाढत चालले आहे. पण त्याची सजाही या पोरांना मिळत असते. कारण शेवटी कर्मा रिटर्न्स..'

मी यावर म्हणालो, ‘अरे व्वा बाप्पा, एकदम इंग्लिश-विंग्लिश?' यावर बाप्पा हसला..म्हणाला..‘तुम्ही पत्रकार लोक जरा हेच दिसता. एकीकडे म्हणायचे की गणपती म्हणजे विद्येची देवता. मग आम्हाला इंग्रजी काय, संस्कृत काय, मराठी काय किंवा कोणतीही भाषा ही अस्खलितपणे येणारच की!'

बाप्पाच्या या उत्तरावर मी जीभ चावली आणि पुढचा प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडताच बाप्पाच म्हणाला..‘सम वन शुड नॉट स्पेंड मोअर टाईम विथ जर्नालिस्ट्‌स. बिकॉज आफ्टर सर्टन टाईम दे स्टार्ट आस्कींग एम्बरासिंग क्वेश्चन्स..' आणि इतके बोलून गणपती बाप्पा अंतर्धान पावला. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे  शहर

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

तेज गणेशाचे