दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
महान शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ, आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन' म्हणून ओळखला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले. त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेजमधून पदवीत्तर शिक्षण घेतले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधारण आहे, हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही. ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा असते, तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.
आई ही मुलाच्या आयुष्यातील पहिली गुरू असते जी आपल्याला या जगाची जाणीव करून देते. दुसरीकडे, शिक्षक आपल्याला सांसारिक जीवनाची समज देतात, ज्याप्रकारे कुंभार मातीच्या भांड्याला आकार देतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. गुरू आपल्याला दगडाप्रमाणे कोरून एक आकर्षक रूप देऊन जगात नवीन जन्म देतात. उंच आणि उंच ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपल्याला एक चांगला नागरिक, एक चांगला माणूस, एक चांगला मुलगा, एक चांगला भाऊ, एक चांगला पती आणि एक चांगला पिता बनवतात. त्यांचे ऋणातून मुक्त होणे कठीण आहे.
शिक्षक हे आपले मार्गदर्शक आहेत, जे आपले भविष्य घडवीत असतात, योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मूल्ये आवश्यक असतात, आणि आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात. शिक्षकांचा प्रत्येक माणसाच्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पडलेला दिसत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाची नौका अथांग ज्ञानसागरातून पार होत असते. पण त्याला आपल्या कठोर परिश्रम सचोटी आणि चिकाटीची आवश्यकता आहे. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असेही म्हटले आहे की ‘संपूर्ण जग ही एक शाळा आहे, जिथे आपण काही नवीन शिकतो. आपले शिक्षक आपल्याला केवळ शिकवत नाहीत तर आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक देखील समजावून देतात.' त्यांचे शब्द आपल्याला सांगतात की आपल्या जीवनात शिक्षक असणे किती महत्त्वाचे आहे. आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपण आपल्या शिक्षकांकडून खूप काही शिकलो, अजूनही शिकत आहोत. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, त्यामुळेच आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होत असतो.
शिक्षण क्षेत्रात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे फार मोठे योगदान दिले आहे. शिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि शिक्षकांबद्दलचा आदर पाहून त्यांचा वाढदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आपले पालक आपल्याला जन्म देतात आणि शिक्षक योग्य मार्गदर्शनाने आपले भविष्य उज्ज्वल करतात. त्यामुळेच आपल्या पालकांपेक्षा शिक्षकांचे स्थान वरचे असते, असे म्हणतात. कारण शिक्षणाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी शिक्षणाची गरज असते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. आज आपण शिक्षक दिन साजरा करताना काही गोष्टी प्रकर्षाने दिसतात, त्या म्हणजे शासनाने आणि शिक्षण विभागाने शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त बोजा दिलेला दिसतो. शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार आहे. रोज नवनवीन परिपत्रक शिक्षकांना पाठवलं जातं, आताच्या आता माहिती पाठवा, फोटो पाठवा. आज शिकवणं कमी झालं आहे, फोटो पाठवणं महत्त्वाचे झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत शिकवण्याचं काम हे शिक्षक करीत आहेत. शिक्षकांचा योग्य सन्मानही होणे गरजेचे आहे. - प्रा. जयवंत पाटील