नात्यात जबरदस्ती नव्हे तर स्वाभाविकता असावी

जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं. ती माणसं नोकरीत असतांना जोडा, मग ती कामावरची असो की गावातील, नात्यातील किंवा जिथे राहतो त्या सोसायटीतील त्यांना मित्र म्हणून जोडा. सेवानिवृत झाल्यावर या कोणाकडेही गेला तर ती जोडली जाणार नाहीत. कारण नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली गेली पाहिजेत.

आजकाल मुलामुलीचे लग्न शिक्षण, नोकरी पाहून केली जातात. घरातील संस्कार एकत्र कुटुंबात राहण्याची आवड आहे किंवा नाही हे पहिले जात नाही. विभक्त कुटुंबात वाढलेली मुलगी वर्षभरात नवऱ्याला आईवडीलांपासून वेगळे होण्याचा पर्याय निवडायला भाग पडते. आईवडीलच कधीकधी मुलाच्या सुखासाठी वेगळे राहण्यास नाईलाजाने संमती देतात. पण उतरत्या वयात आणि कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना त्या आईवडीलांनी कोणाकडे पहावे? आज कसे जगावे ही समस्या आहे. मृत्यू नंतर सर्वच चार आठ दिवसासाठी एकत्र येतील. सर्व धार्मिक विधी इमानेइतबरे पार पाडतील. सढळ हस्ते दानधर्म करतील; पण आजच्या समस्याचे काय? त्यामुळेच म्हटले जाते की नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात. त्यालाच मैत्रीभावना असलेली नाती म्हणतात.

 आजकालच्या सुशिक्षित मुलामुलींना संसाराची सुरवात कुठून करावी हेच समजत नाही. जसे की ऊस शेंड्याकडून खायचा की बुडाकडून खायचा हे ज्याचं त्याने ठरवावे लागते. शेंड्याकडून खाल्ला तर सुरवातीला पांचट लागेल, पण शेवट गोड होईल आणि बुडाकडून खाल्ला तर सुरुवात गोड होईल, पण शेवट पांचट होईल. प्रत्येक माणसाचे जीवनातही असंच काहीसं असते. आईवडीलांनी उमेदीच्या काळामध्ये कष्ट करून संसार उभा केला असतो. त्यांची सुरुवात त्रासदायक होती, पण आता शेवट मात्र गोड होईल असे ते स्वप्न पाहत असतात. तेव्हा मनाच्या ईवल्याश्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर रक्ताचे नातं म्हणतात. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं. म्हणूनच मुलांना शिक्षण नोकरी आणि लग्न करून देण्यात आईवडीलांचा स्वार्थ, अन्‌ दिलेलं प्रेम असते. ते उतरत्या काळात आपल्याला सुखात ठेवतील हे स्वप्न कायम उराशी बांधलेले असते. शारीरिक आजारापेक्षा मोठा मानसिक आजार खूप ठिकाणी पाहण्यास मिळतो. पण त्यावर उपाय योजना करण्यास समाज व सरकार अपयशी ठरत आहे.

  उद्याचा दिवस पाहण्यासाठी, आपण सगळेच जण छान झोपतो. पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली असेल का? तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,  जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर, मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका. जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं; पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो. परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात. त्यासाठीच स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.

   अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. तुमचा दिवस आनंदात जावो. सुख आहे सगळ्यांजवळ..पण,ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा; पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही आणि सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये एीन आहेत, पण चार शब्द बोलायला वेळ नाही. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचे असते.

म्हणूनच जूनी लोके सांगत होती की ऊस शेंड्याकडून खायचा की बुडाकडून खायचा हे ज्याचं त्यानं ठरवावे. शेंड्याकडून खाल्ला तर सुरवातीला पांचट लागेल, पण शेवट गोड होईल आणि बुडाकडून खाल्ला तर सुरुवात गोड होईल, पण शेवट पांचट होईल, आज अनेकांच्या जीवनातही असंच काहीसं झाले आहे. आज सेवानिवृत झाल्यावर हककाच्या घरात राहण्याऐवजी भाड्याच्या घरात राहावे लागते. मुलाला शिक्षणसाठी पैसा गुंतवणूक म्हणून केला होता. नोकरी लागल्यावर चांगली सुशिक्षित नोकरी असणारी छोकरी पाहिली आणि हातात असणारा पैसा लग्नात खर्च करून धुमधडाक्यात लग्न लाऊन दिले. एक महिन्यानंतर मुलगा नोकरीमुळे दुसऱ्या राज्यात गेला. इकडे सून सकाळी आठ वाजता कामावर जाते. रात्री आठला घरी येते. घरातील कामे आईवडिलांनाच करावी लागतात. सुरुवातीचे चार सहा महीने आनंदात गेले. मुलगा सून काही महीने घरात खर्चासाठी आणि घरभाडयासाठी पैसे व्यवस्थित देत होते. नंतर दोघानी कमी देणे चालू केले त्यात औषध व घर खर्च भागत होता. घरभाडे दिले जात नव्हते. यातच चार महीने घर भाडे थांबले मालकाने घर खाली करण्यास सांगितले. मुलगा बाहेर गावी आणि सून तिच्या आईवडीलाकडे राहण्यास गेली. सेवानिवृत नवरा व बायको दोघानी विचार केला मुंबई सोडून गावी अलिबागला राहण्यास गेले. ही कहाणी दोन महिन्याने कंपनीतील मित्रांना समजली. त्यांची ही ह्रदयस्पर्शी व्यथा ऐकून मी ही वाचकांसमोर मांडण्याचा नेहमीसारखा पत्रप्रपंच केला. म्हणूनच म्हणतात नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात.

    जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते. हृदयद्रावक जीवनाचा भरवसा नाही, ऑर्डर केलेले जेवण हॉटेलच्या टेबलावर आले पण मृत्यूने एक घास खायला वेळ दिला नाही, आपला पाश आवळून घास घेतला जीवनाच्या पुढील क्षणाचा भरवसा नाही, म्हणून तुच्छ सत्ता, संपत्ती, पद, ताकद, गटबाजीचा माज न करता माणसासारखे सर्वांशी प्रेमाने वागावे. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचे असते. आयुष्य थोडंसंच असावं; पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं, आयुष्य थोडंसं जगावं; पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं, प्रेम असं द्याव की घेणाऱ्यांची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की त्यात स्वार्थच नसावा. आयुष्य असं जगावं की, लोकांनी आपल्यापाठी चांगले नाव काढावे. तर खरं अहंकार त्यांनाच होतो जे संघष्रााशिवाय सर्वकाही प्राप्त करतात. ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळावलेलं असते, तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करु शकतात. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं. ती माणसं नोकरीत असतांना जोडा, मग ती कामावरची असो की गावातील, नात्यातील किंवा जिथे राहतो त्या सोसायटीतील त्यांना मित्र म्हणून जोडा. सेवानिवृत झाल्यावर या कोणाकडेही गेला तर ती जोडली जाणार नाहीत. कारण नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली गेली पाहिजेत. हे एका सेवानिवृत कर्मचाऱ्याची व्यथा मी मांडली. आपण सेवानिवृत होण्याअगोदर स्वतःत बदल घडवा. -सागर रामभाऊ तायडे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

उपेक्षित कलावंत, परिवर्तनवादी साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे