भक्ती ...

विनाकारण एखाद्याबद्दल द्वेष भावना आणू नका. तिरस्कार करू नका. व्यसनाधीन होऊ नका. परस्त्रीचा आदर करायला शिका. तरच उपवास केल्याचे फळ मिळेल. नुसते उपाशी राहून उपवास होत नसतो तर, यासाठी वासनांचा त्याग करायचा असतो. मग ती वासना कोणत्याही प्रकारची असो. घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. त्यांना हवे नको ते बघा. लहान मुलांशी प्रेमाने वागा. नातेवाईक, शेजारचे यांच्याशी आनंदाने बोला. तीच तुम्ही केलेली भक्ती असेल. त्यासाठी उपाशी राहून उपवास करणे गरजेचे नाही.

शोधीशी मानवा, रावळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी...

 हे सुंदर असे भक्ती गीत वंदना विटणकर यांनी लिहिले असुन या भक्तीगीतामध्ये इतक्या सुंदर ओळी आहेत, ज्या आपल्या रोजच्या जीवनात सुरु असलेल्या घडामोडीवर आहे. त्यातील एक कडव जे मनात भिनतं ते म्हणजे
भेटतो देव का पूजनी अर्चनी?
पुण्य का लाभते दानधर्मातूनी?
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी?

 आपण देव हा मंदिरात शोधत बसतो. पण देव खरच मंदिरात आहे का? तासन्‌तास रांगेत उभे राहून देव मिळतो का? रांगेत उभे राहून आपण एकमेकाकडे बघत राहतो, नाहीतर एकमेकांची मापे काढत राहतो. आजच सर्वांना यायचे होते का मंदिरात? नंतर, दुसऱ्या कोणत्या दिवशी आले तर नसते का चालले? असं प्रत्येक जण विचार करतो आणि एकमेकांचा त्रागा करत राहतो. आणि देवाचे दर्शन घेतले जाते. ते पण कसे? पटकन देवाचे चरण दिसत नाही की देवाचं मुख दिसत नाही. पण, तरी एक समाधान! आणि ते समाधान घेऊन आपण मंदिराच्या बाहेर पडतो. मग हे सगळं करत असताना खरंच देवाची पूजा-अर्चना मनापासून होते का? सगळे काही जे दर्शन होते ते चिडचिड करतच होते, मग त्यावेळी देव भेटतो का? आपण आपले इप्सित सांगू शकतो का? तर नाही.

देव पुजा ही जर मनापासून घरात बसून केली तरी होते. मनापासून उपासना केली, नामस्मरण केले तरी देवाची मुर्ती आपल्या समोर उभी राहते. महत्त्व आहे ते फक्त श्रद्धेला. श्रद्धेने भक्ती भावाने मनापासून जर देवाचे नामस्मरण केले तर, का नाही देव आपल्याला भेटणार?

खरंतर देव कुठे आहे? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. याचे उत्तर आई-बाबा असे देतात की, देव हा अंतरी आहे. अंतर आत्मा हाच आपला परमेश्वर असतो. त्याला जर सुखी ठेवले तर आपण कधीच दुखी होत नाही. मग तो अंतरात्मा आपला असो व दुसऱ्या इतर कोणाचा.

आता श्रावण महिना येणार आहे श्रावण महिन्यात भक्तीला उधाण आलेले असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची उपासना, देवधर्म, दानधर्म करत असतात. का? तर काहीतरी पुण्य मिळावं म्हणून. पण पुण्य खरंच दानधर्म केल्याने मिळते का? उपवास केल्याने मिळते का? दानधर्म कशाचे करावे व उपवास कशाचा करावा याला देखील महत्त्व आहे.
देव म्हणतो का माझ्यासाठी तुम्ही उपवास करा? उपवास जर करायचाच असेल तर तो विषयांचा करा. क्रोध, लोभ, मद मत्सर, संशय, चिंता यासारख्या विषयांचा करा. ‘मी'पणाची भावना मनात आणू नका. विनाकारण एखाद्याबद्दल द्वेष भावना आणू नका. तिरस्कार करू नका. व्यसनाधीन होऊ नका. परस्त्रीचा आदर करायला शिका. तरच उपवास केल्याचे फळ मिळेल. नुसते उपाशी राहून उपवास होत नसतो तर, यासाठी वासनांचा त्याग करायचा असतो. मग ती वासना कोणत्याही प्रकारची असो. घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. त्यांना हवे नको ते बघा. लहान मुलांशी प्रेमाने वागा. नातेवाईक, शेजारचे यांच्याशी आनंदाने बोला. तीच तुम्ही केलेली भक्ती असेल. त्यासाठी उपाशी राहून उपवास करणे गरजेचे नाही. तुमच्या तब्येतीसाठी जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो नक्की करा पण, विषयांना सोडून. तसेच जर तुम्हाला काही दान द्यायचे असेल तर ती फक्त तुमची भक्ती द्या. देवाला फळे, फुले, कोणत्याही प्रकारचे दागदागिने याची काही गरज नाही किंवा आवश्यकताही नाही. देवाला नारळ, फळ-फुलं अर्पण करायची आणि स्वतः मात्र उपाशी राहायचे.

जे गरजू आहेत, निराधार आहेत, अपंग आहेत, त्यांची तुम्ही मदत करा. त्यांना केलेली मदत नक्कीच देवापर्यंत पोहोचणार आहे. देव आपण दारोदारी शोधत बसतो पण, तो आपल्या अंतरीच आहे. आपण जीवनामध्ये जगताना आंधळेपणाच नाटक करून जगत असतो. जशी मांजर डोळे बंद करून दूध पिते आणि तिला वाटते मला कोणी बघत नाही, तसे आपले झाले आहे. आपण चुकीचे कर्म करत असताना आपल्याला वाटते आपल्याला कोणीच बघत नाही. पण, आपल्या शरीरात नांदत असलेला त्या अंतरात्मा आपल्याला सतत जाणीव करून देत असतो की, आपण चुकीचं कर्म करत आहोत. पण त्याकडे आपण लक्ष न देता ते कर्म करत राहतो आणि पापाचे क्षालन करण्यासाठी दानधर्म करतो. हे योग्य नाही असे या ओळीत सांगितले आहे, आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी! अगदी मार्मिकरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आंधळा तरी वागताना चाचपडत का होईना त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. पण आपण डोळे असून मार्ग चुकून दुसऱ्या दिशेने भलतीकडे भटकत राहतो. प्रत्येकाने आपली सद्‌सद्‌विवेक बुद्धी साबूत ठेवून श्रद्धेने भक्ती करावी. अंधश्रद्धेने नाही. आपली भूमी संतांची भूमी. संतांनी जशी भक्तीभावाने पूजाअर्चा केली तशी आपण देखील करायला पाहिजे.

शोध रे दिव्यता आपल्या जीवनी! आपल्या जीवनामध्ये कितीही अडीअडचणी आल्या तर आपण आठवण काढतो ती आपल्या आई-बाबांची आणि देवाची. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला जी शक्ती मिळत असते ती आपल्या वर्तणुकीतून. म्हणजेच चांगले कर्म केले की नक्कीच चांगले फळ मिळते. मग त्यासाठी अंधाऱ्या रात्रीत दिवा घेऊन चाललो तरीदेखील लख्ख प्रकाश पडतो. पण तेच जर चुकीचं कर्म केलं आणि रोषणाईमध्ये चाललो तरी आपल्या डोळ्यासमोर लख्ख अंधार असतो. मग या भक्ती गीतात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की देव तुम्ही कुठे शोधत बसू नका. तो आपल्या अंतरीच नांदत आहे. तुम्हाला पूजाअर्चा करायची असेल, तर मनापासून करा. श्रद्धेने करा.

भक्ती करताना ती सत्विकच असावी. निष्काम असावी. भक्ती करताना दरवेळी फळाची अपेक्षा करू नये तरच ती भक्ती सार्थकी लागते. दानधर्म नक्की करा पण त्याची जाहिरात करू नका. वृक्षारोपण नक्की करा; पण लगेच स्टेटसवर ठेऊ नका किंवा समाज माध्यमांवर स्वतः चा उदो उदो करू नका.
तरच ती भक्ती आणि पूजा सुफळ संपुर्ण होईल आणि घराघरात समृध्दी नांदेल. - सौ. निवेदिता सचिन बनकर-नेवसे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना मानवंदना