दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
थांबवा यांच्या खोड्या, हातात घाला बेड्या
राजकारणात प्रशासनात, समाजकारणात सर्वच असे नाहीत, कायदा व सुव्यवस्था, नितीमत्ता बाळगणारी काही मंडळी आहेत, पण त्यांची पोच थोडी कमी पडत आहे असे दिसते. ही स्थिती सुधारण्यासाठी सरकारने काही कडक पावले उचलायला हवीत, अशा दुष्प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदे सक्षम आहेत. पण, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. सध्या तरी राजकारण्यात आणि प्रशासनात धाडसी प्रवृत्तीच्या लोकांची कमतरता भासत आहे. पण कोणीतरी अशा प्रवृत्ती विरोधात उभे राहायलाच हवे. तसे न झाल्यास या देशात अराजकता माजायला काही वेळ लागणार नाही.
नुकत्याच आलेल्या एका बातमीने संपूर्ण जगच हादरुन गेले आहे. बातमी अमेरिकेतून आली होती, त्यात म्हटले होते की, अमेारिकेचे पूर्व राष्ट्रपती ‘ट्रम्प' यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी एका २० वर्षीय तरुणाने पिस्तूलातून गोळी मारली, त्यात ट्रम्प बालंबाल वाचले. ट्रम्प यांच्या अंगरक्षकांनी वेळीच त्या तरुणाचा जाग्यावरच खात्मा केला. बातमी तशी वरकरणी, साधी वाटत असली तरी, ही बाब सर्वांच्याच दृष्टीने गंभीर आहे. याच गोष्टीचा धसका घेत, भारत सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सुरक्षा वाढवली आहे.
आजी-माजी पंतप्रधानांवर अनेक देशात असे हमले झालेले आहेत. त्यातून भारतही सुटलेला नाही. माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी, कै. राजीव गांधी हेही हमल्यातून सुटलेले नाहीत. एवढच कशाला, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती; मात्र हत्या करणारा किशोरवयीन किंवा फार तरुण नव्हता.. तर शिकला सवरलेला वयस्कर व जाणता होता. तसे पाहता जगात व देशात सत्ता आणि पैसा, तोही कमी मेहनतीत मिळवण्यासाठी अनेकजण गुन्हेगारी क्षेत्रात उतरुन, सत्ता व पैशाच्या जोरावर आपल्याजवळ गुन्हेगारांचा कळप बनवून ठेवतात. तथाकथित मोठ्या डॉन म्हणवणाऱ्याकडे असे गुन्हेगारांचे थवेच्या थवे असायचे व आहेतही, ते सोने-चांदी, इलेवट्रॉनिक वस्तूंसह अंमली पदार्थांची तस्करी करुन कमाई करुन आपला दबदबा जनसामान्यासह, राजकारणी व पोलिस यंत्रणेवर निर्माण करुन आपला कार्यभाग साधायचे व आताही साधत आहेत.
सराईत गुन्हेगारांना पोलिस यंत्रणेने चाप लावताच तथा-कथित डॉन लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात किशोरवयीन मुला-मुलींना सामावून घेऊन आपल्या कारभार सुरळीत करण्याचा प्रयत्न करुन पाहिला, त्यात ते काही प्रमाणात सफलही झाले. पण, त्याचा दुसरा असा परिणाम झाला की, या नवतरुण मंडळींनी काही कालावधीत आपल्या स्वतःच्या टोळ्या तयार केल्या. त्यातूनच हे टोळीयुध्दही सुरु झाले. त्याचा समाजमनावर गंभीर परिणाम झाला. काही तरुणांना या गुंडगिरीच्या माध्यमातून मिळणाऱ्या तथाकथित मानाचा, त्यातून मिळणाऱ्या पैशातून करायला मिळणाऱ्या चैन व ऐशोआरामाचे आकर्षण वाढले व जास्तीत जास्त तरुण-तरुणी यात उतरले. गुंडाना ‘दादा' ही पदवी मिळू लागली तर दबंग पोरींना ‘ताई' या नावाने संबोधण्यात येऊ लागले आहे.
सध्या प्रत्येक क्षेत्रात ‘स्पेशलायझेशन' झाले आहे. तसेच गुंडगिरीच्या क्षेत्रातही ‘स्पेशलायझेशन' आल्याचे दिसून येत आहे. जसे, राजकारण, समाजकारण, धार्मिकीकरण, विद्यार्थी चळवळ असो की, समाजसेवा, या क्षेत्रातही काही आपला दबदबा निर्माण करत आहेत. आजची धगधगती समस्या त्यातूनच निर्माण झाली आहे. पूर्वी फवत अंमली पदार्थांच्या तस्करीतील वाहतुकीत अल्पवयीन मुलांचा वापर व्हायचा, किंवा केला जायचा, त्यामध्ये गरीब व अनाथ मुलांचा भरणा अधिक असायचा, आता परिस्थिती थोडी बदलली आहे. आजच्या काळात अनेकांकडे या ना त्या मार्गाने जमवलेली संपत्ती अधिक असल्याने ही मंडळी आपल्या मुलां-मुलींना अमाप सूट देतात. त्यांच्या पाल्याकडे सतत पैसा खुळखुळत असल्याने ते व्यसनाच्या आहारी जातात. व्यसनात खर्च कमी पडू लागताच, ही मंंडळी गुन्हेगारीच्या क्षेत्रात प्रवेश करतात. त्याला समाजतील अनेक व्यवस्था जबाबदार आहेत, जसे की ‘चित्रपट' आजचा ‘टीव्ही' सिरित आणि ‘सोशल मिडिया' तसेच कौटुंबिक संबंध, केबल कल्चर व आज दूर होत होणारे कौटुंबिक संबंध, कमी होत जाणारी मूल्यनिष्ठा. संपत्तीलाच संस्कृतीचा मानदंड समजण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती. देशाच्या शासकांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी माजवलेला भ्रष्टाचार हे ही घटक या गोष्टीला तितकेच जबाबदार आहेत. आज एक प्रश्न चिंताजनक झाला आहे तो म्हणजे संपन्न आणि शिक्षित आई-बापाची मुलेही अपराधाच्या जगात का पडत आहेत? मंत्र्याची, राजकारण्यांची, उच्च पदावरील अधिकाऱ्यांची मुलेही यापासून दूर नाहीत.
काही दिवसापूर्वी राजधानी दिल्लीत एका १६ वर्षीय युवकाने बिर्याणी खाण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी एका अनोळखी व्यवतीवर ६० वार करुन त्याला ठार केले. अशा अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडताना दिसत आहेत. काही चित्रपटातून, सिरियल्समधून, जाहिरातीच्या माध्यमातून अनेक बिभत्स प्रकार दाखविले जातात. त्याचाही मुलां-मुलींवर पगडा बसून, ते स्वतःलाही या क्षेत्रात ढकलून देतात व गुन्हेगारीत सामील होतात. गत काही दिवसात ‘हिट ॲन्ड रन' चे प्रकार घडले त्यात अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी आई-बापासह आजोबाही उतरल्याचे दिसून आले, जर घरातील मंडळीच आपल्या तरुण-तरुणींना असे प्रोत्साहन देत असतील तर दोष कोणाला द्यायचा? या बाबतच्या गुन्ह्याची यादी दरवर्षी पोलिस प्रशासनाकडून जाहीर केली जाते. ती आकडेवारी कोणालाही आश्चर्यचकीत केल्याशिवाय सोडणार नाही. २०२१ मध्ये ३७४४४ केसेस मध्ये ३१,७५६ मुले आपल्या आई-वडिलांबरोबर राहात होती, तर ३४९६ बालके आपल्या इतर पालकांबरोबर राहात होती. फवत २१९१ बालके बेघर होती.
२०१६ च्या अहवालात ड्रग्ज आणि नशेमुळे अल्पवयीन हिंसक बनल्याचे म्हटले होते. खेड्यातील किंवा ग्रामीण भागातील मुलांपेक्षा शहरी भागातील किंवा मेट्रोसिटीसारख्या भागात राहणाऱ्या मुलांचे अपराधिक प्रमाण जास्त आढळून आले. त्यातही बाईक, चारचाकी गाड्या चोरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गुन्हेगारी क्षेत्राबरोबरच आता शिक्षण क्षेत्रातही गुन्हेगारी वाढत आहे. पूर्वी शिक्षण क्षेत्र हे पवित्र मानले जायचे. या क्षेत्रात फार कमी प्रमाणात गुन्हेगारी होती. त्यात आता कमालीची वाढ झाली आहे. तीही वेगवेगळ्या प्रकाराने पूर्वी फवत परिक्षा काळात एखाद दुसरी ‘कॉपी' केस व्हायची. आता तर परिक्षा पेपरच ‘लिक केला जातो. त्यातून ‘लिकर'चा फार मोठा आर्थिक लाभ होतो
गेल्या काही वर्षात ‘पेपर लिक'चे प्रमाण खूप वाढले असून वर्षा-दोन वर्षात पेपरलिकचे प्रकार ७० च्या वर पोहोचले आहे. सध्या ‘नीट'च्या लिकचे प्रकरण चर्चेत आहे. त्यातच आता भर घातलीय ती ‘यु.पी.एस.सी.'च्या प्रकरणाने. ‘यु.पी.एस.सी.', ‘एम.पी.एस.सी.' या केंद्राच्या व राज्यांच्या सर्वोच्च संस्थाकडून परिक्षा घेतल्या जातात. या परिक्षा घेणाऱ्या संस्था अति प्रामाणिक व कडक शिस्तीच्या मानल्या जातात. यात लाखो विद्यार्थी भाग घेतात. पण काही शेकड्यातच विद्यार्थी पास होतात. त्यातून काहींचीच निवड होऊन त्यांना सेवेत सामावले जाते. पण यातही आता, गुन्हेगारी, धोकाधडी व वशीलेबाजीने प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात अडकली आहे ती ‘पूजा खेडकर' या मुलीमध्ये एवढा दबंगपणा आला कसा? प्रथमतः या मुलीने खोटे जात प्रमाणपत्र जोडून स्वतःला ‘ओबीसी' बनवले. नंतर विविध लोकांच्या सहाय्याने ‘विकलांग' प्रमाणपत्र देऊन स्वतःला ‘आय ए एस' बनवून घेतले व ‘प्रोबेशन' काळात कलेवटरच्या सवलती मिळवून घेतल्या. एवढच कशाला तिने ‘रेग्यूलर' पद नसताना, पदाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. नशीब प्रमाणपत्रे पडताळणीत हे उघड झाल्याने तिला परत बोलावण्यात आले. आता तिच्या बाजूने काही लोक मैदानात उतरले आहेत, किंवा उतरवण्यात आले आहेत.
तिच्या या धाडसामागे कोण-कोण आहेत याची चौकशी सुरु आहे. त्यासाठी एक समिती गठीत केली गेली. समितीचा अहवाल, राज्याच्या मुख्य सचिव महिलेने केंद्राकडे पाठवला आहे. त्यावर काय कारवाई होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशा लोकांमुळे खऱ्या व मेहनतीने अभ्यास करणाऱ्या होतकरु लोकांना आपला आत्मविश्वास गमवावा लागत आहे, व अन्याय सहन करावा लागत आहे. सध्या राजकारणात व प्रशासनात अशा गुन्हेगार प्रवृत्तीचा मोठा प्रभाव असल्याने, सध्याची तरुणपिढी हवालदिल झाली आहे. ते स्वतःवर झालेले चांगले संस्कारही विसरु पहात आहे. व जीवन जगण्यासाठी ‘करो वा मरो' च्या स्थितीत जाऊ पहात आहे. त्यासाठी लढू पहात आहे, त्यासाठी कोणताही गुन्हा करण्यास तयार आहे.
अर्थात राजकारणात प्रशासनात, समाजकारणात सर्वच असे नाहीत, कायदा व सुव्यवस्था, नितीमत्ता बाळगणारी काही मंडळी आहेत, पण त्यांची पोच थोडी कमी पडत आहे असे दिसते. ही स्थिती सुधारण्यासाठी सरकारने काही कडक पावले उचलायला हवीत, अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदे सक्षम आहेत. पण, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. सध्या तरी राजकारण्यात आणि प्रशासनात धाडसी प्रवृत्तीच्या लोकांची कमतरता भासत आहे. पण कोणीतरी अशा प्रवृत्ती विरोधात उभे राहायलाच हवे. तसे न झाल्यास या देशात अराजकता माजायला काही वेळ लागणार नाही. लोकशाही जाऊन, हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. आता तरी ‘डोळे उघडा आणि नीट पहा.' -भिमराव गांधले