दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
लोकांचा व प्रसिध्दीमाध्यमांचा दबाव वाढल्यानंतर बेलापूर येथील पिडीतेचा पति, सासू, नणंद यांच्यावर विलंबाने गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे, पिडीतेच्या माहेरचे लोक तिच्या सासरच्या लोकांवरच या साऱ्या प्रकारचा रोख असल्याचे आधीपासूनच सांगत असतानाही तो गुन्हा आधी का नाही दाखल झाला? काय साजिश होती या साऱ्यामागे? मूलभूत गुन्हेगार कोण? पिडीतेला घर सोडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करणारे; की तिला एकटी पाहुन तिच्यावर भर देवालयात अत्याचार करणारे? विंचू देव्हाऱ्याशी आला..देव पूजा ना आवडे त्याला ..तेथे पैजाराचे काम अधमाशी ते अधम... त्यांना कोण ठेचणार?
पाऊस जसा वाढत आहे तसतशा ठाणे जिल्ह्यात, नवी मुंबईत गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनाही वाढत आहेत आणि विशेष म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, नुकताच ज्या जिल्ह्याने ज्या सरकारी पक्षाच्या झोळीत भरभरुन मतांचे दान टाकले त्या सत्ताधाऱ्यांकडून मात्र या जिल्ह्यातील जनतेला मात्र काही विशेष तर सोडाच साधी, सर्वसामान्य, दक्ष वागणूक मिळते काय? तर तेही नाही. या ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बाराही महिने जर्जर. या जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई उपनगरी गाड्यांना कायम भरभरुन गर्दी. गाडीतून पडून मरणारे व कायम-अंशतः अपंगत्व आलेल्यांची संख्या सतत वाढती. कल्याणच्या पुढे तर रेल्वेप्रवाशांचे हाल तर कुत्राही खात नाही अशी स्थिती. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवेचीही खस्ता हालत. एस टी महामंडळाच्या बसगाड्यांपेक्षा खासगी बस वाहतूकदारांना हेतूपुरस्सर मोकळे करुन दिलेले रान. जिकडे तिकडे महामार्ग, अंतर्गत रस्त्यांना खेटून बांगलादेशी व अन्य परके घुसखोर, पठाणी, इराणी लोकांच्या अतिक्रमणांचे, भंगार सामान, गॅरेजच्या नावाखाली उभारलेले इमले, अमली पदार्थांचे वाढते व्यापार आणि या प्रश्नांवर मात्र काही लोकनियुक्त प्रतिनिधींनी रीतसर बाळगलेले मौन! हे सारे येथील मतदार, रहिवासी, सामान्यजनांची चिंता वाढवणारे आहे.
ताज्या घटनेत नवी मुंबईतील कोपरखैरणे हे माहेर असलेली बेलापूर गावामधील एक ३० वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक वादामुळे घरातून निघून शिळ-डायघर येथील डोंगरावरील गणेश मंदिरात जाऊन थांबली असता तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत त्या मंदिरातील सेवक श्यामकुमार शर्मा, संतोषकुमार पांडे आणि राजकुमार पांडे या तिघा नराधमांनी तिला दिलेल्या चहात भांगेच्या गोळ्या मिसळल्या. तिची शुध्द हरपल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला शुध्द आल्यावर तिने आरडाओरडा केला म्हणून तिचे डोके आपटले, जबर मारहाण करून तिची हत्या केली व मृतदेह खड्डयात टाकून दिला होता. एका व्यवतीने तो मृतदेह पाहिल्यावर पोलीसांना कळवले आणि मग सारी चक्रे फिरली व पोलीसांनी या तिघांपैकी दोन नराधमांना त्याच देवळाच्या परिसरात अटक केली तर तिसऱ्याला मुंबईतील ट्रॅाम्बे भागातून जेरबंद केले. शर्मा आणि पांडे अशा तथाकथित संस्कृतीरक्षक उच्चवर्णिय समाजात जन्म घेतलेल्या या तिघा नीच पूजाऱ्यांनी हे कुकर्म केल्यावर त्याचे पुरावे सापडू नयेत म्हणून त्या मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस करुन ठेवली होती असे पोलीस सांगत असल्याचे वृत्त प्रसिध्दीमाध्यमांतून आले आहे.
या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही महिला बेलापूरमधून तिच्या सासरच्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर तशी तक्रार येथील एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, त्याच वेळी शिळ-डायघर पोलीसांनीही तितवयाच तत्परतेने शोध मोहिम राबवली असती तर कदाचित या महिलेची अब्रू आणि जीव वाचला असता. नंतर लाख शोधाशोध करुन गुन्हेगार पकडले, ते आता सरकारी पाहुणचार घेत आहेत, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिलेली असली तरी या प्रकारचे खटले कसे चालतात, त्यात किती कालापव्यय होतो आणि ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड'चा पडताळा वेळोवेळी पिडीतांच्या कुटुंबांना कसा येत असतो हे या देशातील जनतेला अजिबात नवे नाही. एवढा गंभीर गुन्हा केलेले लोक तेथून आपल्या उत्तर प्रदेश व राजस्थान या मूळ गावी किंवा अन्यत्र लांब पळून जातील..की तेथेच थांबतील?
याबद्दलचे वृत्त ठाणे जिल्ह्यातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी तात्काळ प्रसिध्दीत आणले. समाजमाध्यमांवरुन त्या महिलेच्या छायाचित्रासह सामान्यजनांच्या कडवट प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी ‘त्या नराधमांना आमच्या ताब्यात द्या; त्या आम्ही त्यांचा समाचार घेतो' असेही नमूद करायला मागेपुढे पाहिले नाही. मला या घटनेनंतर ठाणे जिल्ह्याला खेटून असलेल्या पालघर जिल्ह्यात करोना काळात दोन साधूंना चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने दगड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला करुन कसे मारले याची तीव्रतेेने आठवण झाली. त्या दोन साधूंनी न केलेल्या कृत्याबद्दल जमावाकरवी आपले प्राण गमावले... आणि इथे या तीन भोंदूंनी देवालयाच्या आश्रयाला आलेल्या एकाकी महिलेला तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करीत जिवानिशी मारले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर त्यावर उलटसुलट चर्चेबद्दल आपण सारे अवगत आहोत. पण मुख्यमंत्र्यांकडे कोणतीच आर्थिक मदत न मागणाऱ्या अनेक बहीणी आहेत. भाऊ म्हणून मुख्यमंत्री त्या महिलांच्या न्याय्य हवकांचे संरक्षण करणार आहेत की नाही?
६ जुलै ते ९ जुलै दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेनंतर तुलनेने उशिराच या सगळ्याचे गांभीर्य अनेकांच्या लक्षात आले. २० ऑवटोबर १९९४ रोजी जन्मलेली ही विवाहित पिडिता वाशीमधील आयसीएल मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालयातून बी कॉम, बीबीआय असे शिक्षण घेतलेली होती. तिला सात्विक नावाचा तीन वर्षाचा मुलगाही आहे. १६ जुलै रोजी मी तिच्या माहेरी जाऊन पिता व बहिणीची भेट घेतली. तोवर विविध प्रसारमाध्यमांनी या साऱ्या मामल्यात तिच्या सासरचे लोकही कसे दोषी आहेत यावरही प्रकाशझोत टाकला होता. तिचा सासरी मानसिक छळ होत होता, त्यावरुन ती मागे काही महिने माहेरीही निघून आली होती, तिच्या पतीला तिच्या वडीलांनी दहा लाखाचे कर्जही काढून दिले होते हेही आता समोर आले आहे. पिडीता घरातून निघून गेल्याचे तिच्या सासरी अजिबातच कुणी गांभीर्याने घेतले नव्हते, ते लोक त्यांच्या नेहमीच्या जीवनात व्यस्त होते, पोलीस यंत्रणांचेही ज्या प्रकारे या साऱ्या प्रकरणात पिडीतेच्या कुटुंबाला सहकार्य असायला हवे होते तसे मिळाले नाही असे तिची धाकटी बहीण विविध प्रसारमाध्यमांसमोर सांगत आहे. आता लोकांचा व प्रसिध्दीमाध्यमांचा दबाव वाढल्यानंतर पिडीतेचा पति, सासू, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटकही झाली आहे, पिडीतेच्या माहेरचे लोक तिच्या सासरच्या लोकांवरच या साऱ्या प्रकारचा रोख असल्याचे आधीपासूनच सांगत असतानाही हे आधी का नाही झाले असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. काय साजिश होती या साऱ्या मागे? मूलभूत गुन्हेगार कोण? पिडीतेला घर सोडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करणारे; की तिला एकटी पाहुन तिच्यावर भर देवालयात अत्याचार करणारे?
या प्रकरणावर पार रायगड जिल्ह्यापासून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, भिवंडी, पालघर, इगतपुरीपर्यंत एकजिनसी वास्तव्य असणाऱ्या आगरी समाजात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी दिसलेला एकोपा पुन्हा येथेही दिसून येत आहे. भिवंडी, कल्याण परिसरातील ‘पंचमहाभूते' नावाने परिचित युवकांची संघटना, नवी मुंबईतील आगरी कोळी युथ फोरम तसेच स्थानिकांच्या अन्य संस्था, संघटना, दुःखी परिवार आणि समाजबांधव यांनी संघटनात्मकरित्या या प्रकरणाचा पाठपुरावा करणे, भर पावसात निषेध सभा, आक्रोश आंदोलन, कँडल मार्च, हॅँशटॅश जस्टीस फॉर अक्षता यांतून आपला संताप दाखवून दिला आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सर्व मंदिरांतील सेवकवर्गाची चारित्र्य पडताळणी व्हावी यासाठी पत्र लिहिलं आहे. राज्यात महिलांच्या बाबतीत कुठेही खुट्ट जरी झाले तरी वर्तमानपत्रांकडे प्रसिध्दी पत्रकांची भेंडोळीच्या भेंडोळी पाठवणाऱ्या, इमेलवरुन निषेधपत्रे धाडणाऱ्या स्त्रीवादी संस्था मात्र या प्रकारावर हव्या त्या प्रकारे व्यक्त झालेल्या दिसल्या नाहीत. सुषमा अंधारे, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, रुपाली चाकणकर, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, आदिती तटकरे, प्रणोती शिंदे, नवनीत राणा या व अशा महिला नेतेमंडळींकडून ज्या गांभीर्याने व तातडीने या हत्येबद्दल तीव्र निषेधाचा सूर उमटायला हवा होता तो उमटलेला दिसत नाही. ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजातील ही महिला होती, मग त्यांचे नेते, आमदार, खासदार, सामाजिक संस्था त्याबद्दल काय ते बोलतील आणि बघून घेतील असे तर या बाकीच्यांनी ठरवले नसावे ना? सीबीडी-बेलापूर स्थानकात रेल्वे डब्यात चढताना पडल्याने रेल्वेखाली येऊन पाय तुटलेल्या रोहीणी बोटे यांच्याबद्दल याच लेखमालेतून मागील आठवड्यात मी लिहिले होते. तिला येथील शिवसेना पुढाऱ्याने पाच लाखाची मदत केली, स्थानिक आमदारांकडूनही विधानसभेत तिच्यावरील उपचारांच्या खर्चाबाबत सकारात्मक पाऊल उचलून मुद्दा मांडला गेला. हे समाजाच्या जागरुकतेचे, संवेदनशीलतेचे प्रतिक म्हटले पाहिजे. इथे तर एक विवाहित तरुणी जिवानिशी गेली आहे. तिच्या माहेरच्या लोकांना कोणत्याही आर्थिक मदतीची गरज नाही आणि अपेक्षाही नाही. तिच्या तीन वर्षांच्या मुलालाही त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले असून त्याचे योग्य ते पालनपोषण ते करतील. पण एक संवेदनशील, सहृदयी समाजबंधू-भगिनी म्हणून साऱ्यांनी या परिवाराच्या मागे ठामपणे उभे राहणे आणि पिडीतेच्या खुनास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे म्हणून आग्रही असणे ही या कठीण प्रसंगाची मागणी आहे. या मागणीच्या कसोटीवर किती जण उतरतील? क्रूरकर्म्यांच्या अत्याचारामुळे प्राण गमावलेल्या आमच्या या भूमीकन्येला भावपूर्ण श्रध्दासुमनांजली!! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर