दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र
लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे ”गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र” या पुस्तकाचे ६ जून २०२४ शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नुकतेच प्रकाशित झाले. शीर्षकावरून चटकन कल्पना येते. गड किल्ल्यामधील इलीमेंटला बोलतं करणं या पुस्तकाचा विषय आहे. सुरुवातीची काही पाने वाचली की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्याचे जाणवते. हे पुस्तक काल्पनिक नसून गड किल्ल्यातील इलीमेंटस्वर अभ्यास, निरीक्षण, माहिती संकलन यासाठी लेखकाने गेली २० वर्षे वाहिलेली आहेत हे अगदी प्रारंभीच जाणवते.
ज्यावेळी तुम्ही गड किल्ले पहायला जातात त्यावेळी तेथील वाटाड्याने सांगितलेल्या माहितीवर किंवा आपल्याकडे असलेल्या जुजबी माहितीवर आपले विचारचक्र सुरु होते. कारण एकतर आपण त्या माहितीबद्दल अनभिज्ञ असतो किंवा ऐकलेली माहिती अपुरी असते. अशा वेळी आपण ती माहिती एखाद्या गाईडला विचारतो किंवा गुगलवर सर्च करतो. गुगलवर माहिती घेऊन आपले मत तयार करतो की जे कित्येकदा घातक ठरते. असे काय आहे या पुस्तकात? तर किल्ल्याच्या अगदी पहिल्या पायरीपासून ते टोकाच्या झेंड्यापर्यंतच्या आठवणी या पुस्तकांत आहेत. जुन्या पिढीतील बांधकामे आणि आत्ताच्या इंजिनिअरिंगला लाजवेल असे त्या काळात वापरलेले तंत्र याचा उलगडा या पुस्तकांत लेखकाने केलेला दिसतो.
”गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र” हे पुस्तक काय सांगते? का असायची गड किल्ल्या वरील तटबंदी दरवाज्याकडे जाताना उजव्याच हाताला? गड किल्ल्यातील बांधकामाचे भाग कोणते? का वापरले आपल्या पूर्वजांनी गड किल्ले बांधण्यासाठी दगडासारखे चिरस्थायी माध्यमच? कसे टिकून आहे आजही गड किल्ल्यावरील दगडी बांधकाम? का व कशी करत होते भूपरीक्षा? बांधकामात कशाचा उपयोग करत असत पूर्वी ॲड मिक्सचर म्हणून? कशी असायची कारागिरांची कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजन? का आहेत गड किल्ल्यातील मातीच्या भिंती, बुरुज आजही सुस्थितीत? गड किल्ले बांधताना कसे पेलले वास्तू निर्माण करण्याचे धनुष्य तत्कालीन अभियंत्यांनी? कसे राखले जायचे गड किल्ल्यातील पाण्याचे पावित्र्य? कसे टाळले जात होते गड किल्ल्यातील पाण्याचे बाष्पीभवन? काय उद्देश असायचे गड किल्ला बांधण्यामागे? का घेतला जात बुरुजाचा आकार चौकोनी, गोल, पाकळी, अष्टकोनी? कसा बांधला असेल त्याकाळात गवंडी, बेलदार, पाथरवट, सुतार यांनी गड? गड किल्ले बांधण्यासाठी कारागीर कुठून आणले असतील? गड किल्ले बांधकामासाठी दगड कोठून आणला असेल? गड किल्ले बांधण्यासाठी खदानीत दगड कसा फोडला असेल? गड किल्ले बांधताना एवढे अजस्त्र दगड वाहून बांधकामाच्या जागेवर कसा नेला असेल? फोडल्याफोडल्या तो दगड लगेच वापरात आणला असेल का ? दगड घडवण्यामागे काही शास्त्रीय कारण असेल का? दगड घडवण्यासाठी कुठली हत्यारे वापरत? ती हत्यारे कोण तयार करत असेल ? गड किल्ल्यावरील बांधकाम इतके अचूक असताना पायऱ्या एकसारख्या का नाहीत? गड किल्ल्यावरील मुख्य दरवाजाच्या डोक्यावर सज्जे का ठेवत? गड किल्ल्यांवर मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस पाण्याची टाकी का तयार करत ? अशा एक ना अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे आपणाला या पुस्तकांत वाचायला मिळणार आहेत.
”गडकिल्ल्याचे स्थापत्य शास्त्र” हे पुस्तक वाचतो तेव्हा काय होते?
१) ”गडकिल्ल्याचे स्थापत्य शास्त्र” हे पुस्तक वाचल्यावर गडकिल्ले कसे पहावेत, कसा पहायला हवा ते कळते. गड किल्ल्यातील अबोल एलिमेंट्सचे महत्व कळते. गड आतून बाहेरून कसा पहावा ते कळते. आपल्या पूर्वजांनी गड किल्ल्याच्या बांधकामात वापरलेले तंत्रज्ञान हळूहळू आपल्या लक्षात यायला लागते. ”गडकिल्ल्याचे स्थापत्य शास्त्र” पुस्तक वाचल्यावर आपल्यालाही काही प्रश्न पडतात त्याची उत्तरे आपण स्वतः शोधायला लागतो. किल्ल्याची संरक्षण करण्याची तत्कालीन पद्धती समजते. त्याची निगा कशी राखावी हे कळते. आपल्या पूर्वजांनी संपादन केलेल्या ज्ञानाची, त्यांनी त्याकाळी संशोधन करून केलेल्या प्रगतीची आपणास नव्याने ओळख निर्माण होते. वाचक आपल्या वास्तू संस्कृतीबद्दल पुनर्विचार करू लागल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्या पूर्वजांच्या कष्टाची किंमत कळायला लागते. आपणच आपला वारसा अभिमानाने मिरवला की, तो आपोआप जतन करण्याची प्रेरणा मिळते.
अशा कितीतरी घटकांची माहिती आणि त्यांचे त्याकाळातील महत्व या पुस्तकांत आहे. एकूण ६० प्रकरणांमधून याविषयीची माहिती लेखकाने दिली आहे. जे हजार शब्दांत सांगता येत नाही ते १ फोटो सांगून जातो. त्यामुळे फोटोंचा वापर केलेला आहे.
एखाद्या लेखकानेच तुमच्या मनातील प्रश्न, शंका ओळखून त्याची एकत्रित उत्तरे मिळावीत म्हणून एखादे पुस्तक लिहिलेले असेल तर, आणि तेही तुम्हाला समजेल अशा मातृभाषेत असेल तर, सोन्याहून पिवळे नाही का? असे हे पुस्तक आहे.
गड किल्ल्याच्या भव्य बांधकाम करण्याचं वेळापत्रक कसं जुळतं हे ही आजपर्यंत कोणीही उलगडून दाखवलेल नाही. बांधकाम स्थापत्यामध्ये असलेले बारकावे इतक्या अभ्यासू वृतीने लेखकाने पाहिले आहेत की कलाकारांची दृष्टी, तत्त्वज्ञान आश्चर्यचकित करून टाकतात. ज्यावेळी हे अजस्त्र गड किल्ले बांधले गेले असतील तेव्हां त्यांचा जो काही थाट असेल तो वेगळाच असणार. दगड, विटा, भेंडे, चुना, वापरून बांधलेले काही किल्ले आजही उत्तम प्रकारे दिमाखात उभे आहेत. असे किल्ले पहायला स्थपती, वास्तुविशारद, इतिहासकार, अभ्यासक, पर्यटक, दुर्गप्रेमी, मूर्तिकार, फोटोशूट, शुटींगसाठी लोक भेटी देत असतात. आजही चित्रपट, मालिका जुन्या गड किल्ल्याशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाहीत, हे विशेष आणि अभ्यास करण्यासारखे आहे तसेच हे पुस्तक नव्या पिढीला आयडॉल ठरेल. हे लेखकाला इथे सांगावेसे वाटते.
भविष्यात आपणाला जुन्या बांधकामाची जेंव्हा जेंव्हा आठवण येईल तेव्हां तेव्हां तो काळ काय आणि कसा होता याची साक्ष देणारे ”गड किल्ल्याचे बांधकाम शास्त्र ” हे पुस्तक आहे. लेखकाने किल्ल्यातील प्रत्येक इलीमेंटसंला बोलतं केलं आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीतून जुन्या पिढीतील बांधकामाचे विविध स्तर, पदर वाचकाला अवीट गोडीने खिळवून ठेवतात. हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टे आहे.
त्यांचा लिहण्याचा गावरान बाज, मनावर ठसणारी छायाचित्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. मूळ विषय कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचे जाणवते.
पाथरवटाने-सुताराने दगडात-लाकडात जीव ओतून काम करणे, दगड घडवत घडवत सुंदर डिझाईन घडवणं, ओबड धोबड दगडांना वेगवेगळे रूपं देण हे म्हणावे तेवढे सोपे काम नाही. पाथरवट, वडार, बेलदार आपल्या कलाकुसरीतून वर्षानुवर्षे ही कला घडवत आहेत. गड किल्ल्यासारखे वास्तू वैभव उभे केले आहे, ते कलाकारांच्या हातून घडत असलेल्या कलेमुळे. ही कादंबरी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनपर्यंत पोचावी, ते कलाकार म्हणजे स्थपती, वास्तुविशारद, वडार, बेलदार, पाथरवट, सुतार, गवंडी, बारा बलुतेदार, रंगारी, चितारी, इतिहास घडवणारे अशी हरहुन्नरी माणसे यांनीच जर हे पुस्तक वाचले नाही तर याचा खेद आहे. पुस्तक वाचून ते लोक अचंबित होतील. हे पुस्तक त्यांना विचार करायला लावेल. हेच लेखकाचे हाशील असणार आहे.
अनेक इतिहास अभ्यासक व संशोधक आपापल्या विषयासंबंधीच्या माहिती मिळविण्यासाठी ते इकडेतिकडे फिरतात. त्यासंबंधीची माहिती नसते. ती मिळविण्यासाठी ते अनेक जाणकारांकडे जातात, त्यात त्यांचा कालापव्यय होतो. माहितीही अचूक आणि समाधानकारक मिळत नाही. तेव्हा त्यांचा हिरमोड होतो, त्यांचा उत्साह मावळतो, हे टाळता यावे व अशा जिज्ञासूंना सर्व माहिती एकत्रित मिळावी म्हणून हा प्रयत्न.
पुस्तकाचे नाव : ”गड किल्ल्याचे स्थापत्य शास्त्र” लेखक : विलास भि. कोळी
प्रथमावृत्ती : ६ जून २०२४ प्रकाशक : शोपिजन
अनुवाद : प्रशांत कुलकर्णी