दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
पुरुषप्रधान मानसिकतेच्या शिकार कमला सोहोनी
कमला सोहोनींचे वडील आणि काका दोघेही रसायन शास्त्रज्ञ. त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून रसायन शास्त्रातूनच पदवी पूर्ण केली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ह्या संस्थेत संशोधन फेलोशिपसाठी अर्ज केला. त्यावेळी त्या इन्स्टिट्यूटचे संचालक होते नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण. महिला ह्या संशोधनासाठी पुरेशा सक्षम नसतात, हे कारण देत त्यांनी सोहोनी यांचा अर्ज चक्क फेटाळला. यामुळे कमला ह्या व्यथित होऊन त्यांचा स्वाभिमानही दुखावला. गांधीजीच्या विचारांचा पगडा असलेल्या सोहोनी यांनी रमण यांच्या कार्यालयाबाहेरच सत्याग्रह केला.
मेरी क्युरी ही नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिला महिला ठरली. १९०३ ला तिला पदार्थ विज्ञानमध्ये नोबेल मिळालं. त्यानंतर १९११ मध्ये रसायनशास्त्रात दुसरं नोबेल मिळवेपर्यंत नोबेल मिळवणारी ती एकमेव महिला शास्त्रज्ञ होती. पण असं असलं तरी दुसरीकडे ती पुरुषप्रधान संस्कृतीची बळीही ठरली. दोन नोबेल मिळवूनही तिला अनेक जागतिक संशोधन संस्थांमध्ये साधं सदस्यत्वही मिळू शकलं नाही. अनेक पुरुष शास्त्रज्ञांनी तिच्या संशोधन वृत्तीवर शंका घेतली आणि तिला जागतिक संशोधन संस्थांचं सदस्यत्व नाकारलं.
त्या काळातल्या तथाकथित पाश्चिमात्य आणि पुढारलेल्या देशात महिला शास्त्रज्ञांची ही तऱ्हा असेल तर त्यांच्या मानानं मागासलेल्या पौर्वात्य देशांमध्ये वेगळी परिस्थिती कशी असेल? पहिल्या महिला शास्त्रज्ञ म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो त्या डॉ. कमला सोहोनी यांच्या वाट्याला ही पुरुषप्रधान संस्कृतीची अवहेलना वाट्याला आली; आणि तीही चक्क एका नोबेल विजेत्या भारतीय शास्त्रज्ञाकडून. कमला सोहोनी ह्या मूळच्या इंदूरच्या. वडील आणि काका दोघेही रसायन शास्त्रज्ञ. कमला यांनी ही विद्वत्तापूर्ण परंपरा जपली. त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून रसायन शास्त्रातूनच पदवी पूर्ण केली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ह्या संस्थेत संशोधन फेलोशिपसाठी अर्ज केला. त्यावेळी त्या इन्स्टिट्यूटचे संचालक होते नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण. त्यांनी सोहोनी यांचा अर्ज चक्क फेटाळला. महिला ह्या संशोधनासाठी पुरेशा सक्षम नसतात, हे कारण देत त्यांनी अर्ज फेटाळला. कमला ह्या व्यथित झाल्या आणि त्याचवेळी त्यांचा स्वाभिमानही दुखावला गेला. गांधीजीच्या विचारांचा पगडा असलेल्या सोहोनी यांनी रमण यांच्या कार्यालयाबाहेरच सत्याग्रह केला. शेवटी रमण यांनी त्यांना फेलोशिपसाठी मान्यता दिली पण काही अटी घालून. त्यांना नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला जाणार नाही, त्या वर्षभर प्रोबेशन काळातच रहातील, रमण हे स्वतः त्यांच्या गुणवत्तेवर समाधानी होत नाहीत तोपर्यंत त्यांचे संशोधन अधिकृत धरले जाणार नाही, पुरुष सहकारी विचलित होतील असे वर्तन त्यांच्याकडून होणार नाही, ह्या अटी घालून त्यांना प्रवेश दिला गेला. ह्या अटी म्हणजे अपमान असूनही केवळ संशोधन करून फेलोशिप मिळवावी ह्यासाठी सोहोनी यांनी त्या मान्य केल्या. पण पुढे रमण यांच्याबाबत त्यांचे मत कायम कलुषितच राहिलं.
रमण हे महान शास्त्रज्ञ असले तरी ते संकुचित मनोवृत्तीचे आणि मागासलेल्या विचारांचे होते असं त्या म्हणत असत. पण त्याच बरोबर हेही खरं की कमला यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे पुढे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये अनेक स्त्रियांना प्रवेश मिळवता आला. कमला यांनी श्रीनिवासन ह्या त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दूध, कडधान्य, प्रथिनं यांच्यावर संशोधन केलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून एम एससी पूर्ण केल्यावर त्या केंब्रिज विद्यापीठात गेल्या. तिथे त्यांनी त्यांचे संशोधन आणि प्रबंध अवघ्या चौदा महिन्यात पूर्ण केला आणि बायोलॉजिकल सायन्सेसमधून डॉक्टरेट मिळवली. डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या. बटाट्यावर संशोधन करत त्यांनी सायटोक्रोम सीची निर्मिती केली. हे एंझाइम प्राणी आणि वनस्पती यांच्या पेशींमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन वाहतूक साखळी कार्यरत ठेवण्यात महत्वाचे काम करते. भारतात आल्यावर त्यांनी जीवनसत्वांवर संशोधन केलं. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये बायोकेमिस्ट्री विभागात त्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. कून्नूर इथल्या संशोधन प्रयोगशाळेत त्या सहाय्यक संचालक होत्या. पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना नीरा ह्या पेयावर संशोधन करण्यास विनंती केली. त्यानुसार त्यांनी संशोधनाला प्रारंभ केला. नीरेत त्यांना व्हिटॅमिन ए आणि सी आणि लोहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर सापडलं. कुपोषित मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा असल्यास ती त्यांच्या आरोग्यास लाभदायक असल्याचं कमला यांनी सिद्ध केलं. त्यांच्या ह्या संशोधनाबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. एकेकाळी ज्यांच्या संशोधन क्षमतेवर शंका घेण्यात आली त्या डॉ कमला सोहोनी ह्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टरेट मिळवणाऱ्या राष्ट्रपती पदक विजेत्या शास्त्रज्ञ ठरल्या. - अमित पंडित