आग्रा भेटीनंतर सूर्याजी मालुसरे आणि मोरोपंत पिंगळे यांनी गाजवलेली तलवार!

छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे जे वेड होते ते त्यांनी कधी वेढा घालून तर कधी पेढा भरवून, कधी मधाचे बोट चाटवून तर कधी मधले बोटं शत्रूंचे छाटून, तर कधी थेट भेटून तर कधी खेटून पूर्ण केले आहे. संयम आणि परिपूर्ण असे एक नियोजन करून पुढील काळात असणारे नियोजन करणारे महाराज मानसिकदृष्ट्या किती परिपक्व असावेत, यांचा अंदाज आपणास त्यांच्या चाल, ढाल आणि घोड्यांच्या नालींवरून लक्षात आल्याशिवाय रहात नाही.

महाराज यांनी आर्ग्याहून आल्यानंतर, खरंंतर ही देखील आर्ग्याहुन सुटका महाराज यांनी स्वतः करून घेतली आहे, कोणी ती केली अगर झाली असेही नाही, आग्रा सुटका हा महाराज यांच्या जीवनातील एक आगळा वेगळा न भूतो न भविष्यति, असा पराक्रम आहे. महाराज आणि जिजाऊ साहेब हे सहज एके दिवशी सोंगट्या खेळणे चालू असता, आई साहेब यांनी पुढील चालीत कोंढाणा किल्ला मागितला आणि महाराज यांनी, सारीपाट खेळ खेळत असता देखील मातोश्री यांच्या मनात स्वराज्य कसे आहे, यांचा अनुभव आला. महाराज यांनी क्षणाचा विचार न करता, त्या कामगिरीसाठी हिरा शोधला.

    अर्थात, तानाजी मालुसरे यांनी घरातील लग्न कार्य थांबवले आणि आपल्या भावासोबत म्हणजेच सूर्याजी मालुसरे यांच्या समोर आपले बलिदान, कोंढाणा किल्यावर देऊन, महाराज यांना हा अभेद्य किल्ला जिंकून दिला. महाराज यांनी पुढे तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे हा किल्ला प्राप्त झाला म्हणून, कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरे यांनी सर केला म्हणून, त्याचा सिंहगड केला. तानाजी मालुसरे यांच्या घरातील रायबा यांचे लग्न कार्य झाल्यावर सिंहगड किल्यांची संपूर्ण जबाबदारी सूर्याजी मालुसरे यांच्याकडे  महाराज यांनी दिली. अर्थात राजे जयसिंग यांच्या बळकट अशा राजपुतांचे संरक्षण असलेले हे किल्ले घ्ोणे क्रमप्राप्त होते; मात्र सहज तितके सोपे नव्हते. आता महाराज यांना संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्यावर नजर आणि गजर ठेवण्यासाठी, जसा हाती कोंढाणा आला होता, तसेच पुरंदर आणि माहुली गडदेखील जिंकणे क्रमप्राप्त होते. अर्थात, कोंढाणा सर केल्यावर एका महिन्यातच स्वतः सूर्याजी मालुसरे यांच्या तलवारीच्या टोकावर पुरंदर किल्ला महाराज यांनी जिंकला. येथेदेखील राजपूत सैन्य, लोकं भरपूर होते, मात्र कोंढाणा किल्ल्यावरील उदयभानु धूळधाण त्यांच्या लक्षात आल्याने, राजपूत सैन्यानं इतका काही मोठा प्रतिकार केला नाही, मात्र सूर्याजी मालुसरे यांचे चढाई आणि लढाई नियोजन हे आपल्या ज्येष्ठ भावाच्या पराक्रमाची साक्ष द्यावी इतकेच उतुंग होते, हा किल्ला हातात आला नाही तोच काही दिवसांनी, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी चांदोर शहरांवर चालून जाऊन तेथील ४० हजार रुपये असलेला बादशहा खजिना ऐवज, एक हत्ती व बारा घोडे हस्तगत करून ते शहर लुटून घेतले.

  आता महाराज यांचे पुढील स्वप्न होते ते म्हणजे, माहुली किल्ला जिंकून घेणे, त्यासाठी त्यांनी आपले, स्वराज्य पेशवा मोरोपंत यांना ती कामगिरी सांगितली. अर्थात हा किल्ला घेतांना, वेढा घालून जी चाल केली, त्या झटापटीत, त्यात जवळपास १ हजार मराठी मावळा कामी आला. मोरोपंत पेशव्यांना हा मोठा धक्का होता. मात्र नंतर पुन्हा, दे धक्का हे तंत्र वापरून त्यांनी हा गड मोठ्या हिरीरीने ताब्यात घेतला. नंतर महाराज यांनी कर्नाळा किल्ला जिंकून घेतला, १६७० पर्यंत जवळपास, महाराज यांनी सारा कोकण आपल्या टाचेखाली घेतला.

      महाराज यांच्याबाबत एकाहून एक सरस आणि साहस पूर्ण शोर्य लिहत असता, होता होईल तितके जे खरे वीर आहेत, ज्यांचा उल्लेख इतिहासात कमी येतो, जरी ते कामी आले तरी,त्यांना शिव पराक्रमात आणणे गरजेचे असते आणि तो प्रयत्न आपण करत आहोत. म्हणजे आजपर्यत आपणास कोंढाणा सर करणारे तानाजी मालुसरे माहीतच आहेत; मात्र पुरंदर किल्ला जिंकून दिला ते सूर्याजी मालुसरे देखील, तसेच जरी एक हजार मराठी मावळा माहुली किल्ला जिंकत असता, कामी आला तरी, दुसऱ्या प्रयत्नात तो माहुली किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात देणारे मोरोपंत पिंगळेदेखील फार महत्वाचे ठरतात.

    एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टी आणि अभिमान वाटावा असा जो, राष्ट्र प्रेम जागृत करणारा इतिहास आहे तो सांगितलं जावा, तो अभ्यासक्रमात यावा, मग इतर गोष्टींचा विचार करावा, अन्यथा तो व्याभिचार ठरेल. - प्रा रवींद्र पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर