मुशाफिरी

अंत्यविधी नंतर एक उपचार म्हणून रुपेशबाबत सहानुभुती वाटणारे काही लोक त्याच्या घरी त्याच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेले. तर घरी वातावरण एकदम वेगळे होते. रुपेशची बायको, मुलगी, मुलगा या तिघांच्याही चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. रुपेशच्या निधनाला काही दिवस झाले नाही तोच त्या घरातले सारे मजेत वावरत होते. म्हणून प्रश्नार्थक झालेले त्या लोकांचे चेहरे पाहुन शिल्पाच मग म्हणाली, ‘अहो..त्यांचं अस्तित्वच आमच्यासाठी केवळ बोजा होता. तोच बोजा गेला आता. आमच्या जीवनाचे त्यांनी जीवंतपणीच पार पोस्टमार्टेम करुन ठेवले होते. मग आता आम्ही दुःख कशाबाबत करत बसू?'

 ‘फेडता येत नसतील तर मागतो कशाला रे?

‘दारु प्यायला बरे पैसे जमवता येतात?'

‘माझ्या उधारीचे पैसे मिळाले तर उद्या घरातून तुझा पलंग नि भांडी घेऊन जातो की नाही तेच बघ.'

  सकाळी सकाळी रुपेशच्या घरासमोर कालवा चालला होता. दुधवाला, दुकानदार, मित्र म्हणून मदत करणारे, ज्यांच्याकडून अडी-अडचणीला पैसे मागितले होते ते शेजारी, कामातले सहकारी असे सारेजण रुपेशच्या दारात येऊन भांडत होते. त्याला कारणच तसे होते. रुपेश हा पालिका इस्पितळात शवागार विभागात कामाला होता. प्रेतांचे पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉवटरांच्या हाताखाली तो काम करीत असे.  अन्य डॉवटर, नर्स, दवाखान्यातील इतर वॉर्डबॉय, झाडू खात्यातील बाया, पुरुष अशा विविध प्रकारच्या लोकांशी रुपेशचा संबंध येत असे.  पोस्टमार्टेम आधी शवागारात ठेवलेली प्रेते म्हणजे अनेकांसाठी किळस उत्पन्न करणारा मामला. त्यात ते पालिकेचे. पालिकेच्या अजस्त्र आणि पाण्यात बसलेल्या म्हशीसारखा कारभार असलेल्या यंत्रणेत रुपेशसारखे अनेक जिवाणू, किटाणू पोट भरत असत. रुपेशचा दुरुन सासरा असणाऱ्या इसमाकडे पालिकेचे कंत्राट होते. त्यात त्याने अनुकंपा म्हणून या फुकट गेलेल्या जावयास कंत्राटी नोकरी दिली होती.

   ‘शवागारासाठी काम करणे म्हणजे दारु प्याल्याशिवाय जमतच नाही' असा अपसमज अनेकांनी रुढ करुन ठेवला होता. त्या विभागात कामाला लागण्याआधी रुपेश झाडू खात्यात होता. त्यानंतर घंटागाडीवरही त्याने काम केले होते. शवागारात तसे नेहमी काम नसे. परदेशी मुले असणाऱ्यांचे निधन झाले की मुले भारतात यायला कधी कधी दोन-तीन दिवस लागत. श्रीमंतांच्या डेड बॉड्या अशा वेळी शवागारात ठेवल्या जात. त्या परत घ्यायला त्यांचे वारसदार आले की रुपेश सारखे काही लोचट याचक पैशांसाठी हात पुढे करीत असत. आणि त्या पैशाने पुन्हा दारु पित असत. ‘दारु प्याल्यावर त्या कुजायला लागलेल्या प्रेतांचा घाण वास येत नाही. फार काळ शवागारात ठेवलेल्या काही प्रेतांचे नाक, डोळे, हातापायांची बोटे तेथील उंदीर, घुशी कुरतडत असत, गायब करीत असत. ते सगळे पाहायला, सोसायला म्हणे दारुसारखा जालिम इलाज नाही;'  असे म्हणत रुपेश व त्याचे सोबती या दारुच्या आहारी गेले होते. रुपेश सुधारावा म्हणून त्याला अनेकांनी जडीबुटी, आयुर्वेदीक, अल्कोहोलिक अनॅनिमस अशा प्रकारचे उपाय करुन पाहिले. पण त्याने दाद दिली नाही. रुपेशला पगार पुरत नसे. मग दुधवाल्याकडे, वाण्याकडे उधारी, इस्पितळातल्या इतर डॉवटर, नर्स, वॉर्डबॉयकडे उसनवारी, शेजार-पाजारच्यांंकडे पैसे मागणे हे नित्याचेच होते. पण ते पैसे परत करायचे नाव तो घेत नसे. म्हणून ते सारे एकत्र येऊन रुपेशच्या दारात तमाशा करत होते.

   ते पाहुन रुपेशच्या पत्नीला-शिल्पाला मेल्याहुन मेल्यासारखे झाले. त्याची शाळेत शिकणारी मुले सूरज व राधिका पार ओशाळून गेली. पण आपल्याच माणसाने शेण खाल्ले आहे, हे ते जाणून असल्याने  त्यांचाही काही इलाज नव्हता. ते आपल्या परीने त्या लोकांना समजावून सांगत होते की ‘लवकरच तुमचे पैसे आम्ही परत करु म्हणून..' पण त्या म्हणण्यात काही दम नव्हता. कारण रुपेशचा पगार घरापर्यंत नीट पोहचतच नसे. म्हणून शिल्पा जवळच्याच इंडस्ट्रीयल एरियातील एका युनिटमध्ये टिकली पॅकिंगच्या कामासाठी जाई. तर मुलगी राधिका एका डॉवटरच्या दवाखान्यात संध्याकाळी रिसेप्शनिस्ट म्हणून कामास जाई. पण त्यांच्यावर आभाळच फाटले होते. त्या दोघींची कमाई अगदीच तुटपुंजी होती. त्यामुळे महिन्याची टोके जुळवताना त्यांची पार दमछाक होऊन जाई. तशात रुपेशच्या अतिमद्यपानाला जुगार, सिगरेट, तंबाखू यांचीही जोड होतीच; त्यामुळे त्यातून येणारा जो आजार कॅन्सर..त्याने रुपेशला पोखरायला सुरुवात केली होती. त्याला दम लागे. धाप लागे, चक्कर येऊन त्यामुळे तो कुठेही पडत असे. लिव्हर डॅमेज झाले होते. रस्त्यात कुठेही दारु पिऊन पडल्यामुळे काही ओळखीचे लोक घरी घेऊन येत. तर काही बदमाष त्याच्या खिशातला उरलासुरला पैसा-अडका घेऊन पोबारा करीत असत. दोन तीन वेळा तर त्याचा मोबाईलसुध्दा भुरट्यांनी पळवला होता.

   या साऱ्याचा शिल्पाच्या मानसिकतेवर आणि प्रकृतीवर वाईट परिणाम व्हायला सुरुवात झाली. एकेकाळी नीटस असलेली शिल्पा हळुहळू खंगू लागली. नवऱ्याकडून आर्थिक सुख नव्हतेच; पण ऐन चाळीशीतच ती वैवाहिक सुखालाही पारखी झाली. रुपेशचा मुलगा सूरज सातवीत शिकत होता. त्याला दुसरे काही नाही, पण आपले वडील दारुडे आहेत आणि त्यामुळे शेजारपाजारचे लोक आपल्याला हीन-दीन नजरेने पाहतात एवढे समजत होते. त्यामुळे तो अबोल बनत गेला, कुढत गेला. त्याचे अभ्यासाकडे लक्ष नसे. शाळेतली मुलेही त्याला ‘दारुड्याचा मुलगा' म्हणून चिडवीत असत. एकदा यामुळे तो चिडून त्या मुलांच्या अंगावर धावून गेला होता. तर सर्वांनी मिळून त्याला धोपटून काढले होते. ‘तुझ्या बापाने आमच्या घरी येऊन कोणकोणती कारणे सांगून कसे पैसे नेले आहेत आणि बुडवले आहेत' हे त्या पोरांनी जोराने ओरडत सर्वांसमोर सांगितले होते. त्यामुळे सूरजला मेल्याहुन मेल्यासारखे झाले होते.

   आता तर रुपेशचे पिणे आणखी वाढले होते. दारु पिण्यासाठी पैसे मागायला तो कसलीही थाप मारीत असे. खरे तर त्याचे आई-वडील या जगातून गेलेल्या सात-आठ वर्षे होऊन गेली होती. तरीही नव्याने ओळख झालेल्यांकडे तो ‘वडील किंवा आई  आजारी आहे, त्यांच्यावर ट्रीटमेन्टला पैसे हवे आहेत, त्यांचे ऑपरेशन आहे, गावची आजी वारली, पत्नीचा अपघात झाला, मुलगा झाडावरुन पडून जखमी झाला' असले कोणतेही कारण सांगून पैसे मागत असे. त्याची सवय माहित असलेले लोक त्याला तोंडावर नकार देत असत आणि हाकलून लावीत. त्याच्या तक्रारी इस्पितळाच्या सुपरिंटेडेन्ट कडेही करण्यात आल्या होत्या. पण  कामावरुन काढून टाकले तर याची बायकापोरे उपाशी मरतील म्हणून अनुकंपेच्या भावनेतून सुपरिंटेडन्ट रुपेशच्या विरोधात कडक भूमिका घेत नसत. शिवाय कंत्राटदारही रुपेशचा दुरुन सासरा लागत असल्याने तोही थोडे नरमाईनेच घेऊ पाही. त्याचा एक खलप्रवृत्ती आणि धूर्त, कावेबाज सुपरवायजर मात्र रुपेशला वेळोवेळी पैसे देत असे आणि त्याला दारु प्यायला नेत असे. कारण त्याची वाईट नजर रुपेशच्या बायकोवर आणि जवान होत चाललेल्या मुलीवर होती. रुपेश सदान्‌कदा दारुच्या नशेत असल्याने तो पत्नीचे समाधान करीत नसणार हे त्याचा तो बेरकी सूपरवायजर जाणून होता. त्यामुळे रुपेशला तो वेळोवेळी पतपुरवठा करीत असे. अधूनमधून रुपेशच्या अपरोक्ष त्याच्या घरी जात त्याने शिल्पाशी संधान बांधले होते. तिला महागड्या भेटी देणे त्याने सुरु केले. तिच्या टिकली पॅकिंग कंपनीच्या गेटवर जाऊन तो तिला भेटत असे आणि तिचा हात हातात घेऊन ‘काही लागलं तर सांगा' म्हणून दिलासा देत असे. आणि एका गाफील क्षणी शिल्पा त्या सुपरवायजरच्या जाळ्यात अडकली आणि तिने स्वतःचे शरीर त्याच्या हवाली केले.  

   अशा अस्थिर वातावरणातील मुला-मुलींची मनेही स्थिर राहणे, संयमी असणे कठीण असते. रुपेशची मुलगी राधिका ज्या दवाखान्यात संध्याकाळी रिसेप्शनिस्ट म्हणून जात असे तिला येता-जाता त्याच भागातील तरुणाने हेरले होते. तपासायचे कारण सांगत तो त्या दवाखान्यात जाई आणि राधिकाशी ओळख वाढवू पाही. शेवटी व्हायचे तेच झाले. त्या तरुणाने राधिकाला गटवले आणि काम संपल्यावर ती व तो तरुण फिरायला जाऊ लागले. त्यांचे एकत्र येणे वाढले. निसर्ग आपले काम करीत होताच! आपल्या आईच्या-शिल्पाच्या वागणूकीची कुणकुण राधिकाला होतीच; त्यामुळे मुलीच्या उशिरा येण्यावरुन शिल्पाने तिला जाब विचारताच, ‘तू काय वेगळे करते आहेस?' म्हणून उलट सवाल करीत राधिकाने तिचे तोंड बंद केले. या सगळ्याची भनक रुपेशच्या शेजारपाजारच्या लोकांना होतीच. त्यांची आधी हलवया आवाजात होणारी कुजबुज आता मोठ्या आवाजात होऊ लागली व त्यांनीच दुधवाला, वाणी आणि बाकीच्यांना भडकावले व रुपेशच्या दारात तमाशा करायला पाठवले होते.  

   दारातच असा तमाशा झाल्याने रुपेश आणखीच हवालदिल झाला व त्या दिवशी कामावर दारु पिऊन झिंगत गेल्यामुळे एका  महिला डॉक्टरच्या अंगावर धडकला. इस्पितळात त्याच वेळी ‘सरप्राईज व्हिजिट' साठी आलेल्या  पालिकेच्या उच्चाधिकाऱ्याची नजर रुपेशच्या या अवस्थेवर गेली आणि त्यांनी सुपरिन्टेन्डेण्टला रुपेशला कामावरुन तात्काळ काढून टाकायला सांगितले.  या साऱ्या मानसिक ताणाखाली कामावरुन घरी येताना रस्ता ओलांडत असता रुपेशला एका ट्रकने उडवले. त्याच्या अंगावरुन चाक गेल्याने शरीराचा पार चेंदामेंदा झाला होता. पोलीस केस झाल्याने रुपेशचा चेंदामेंदा झालेला देह त्याच पालिका इस्पितळात आला होता. पोस्टमार्टेम करण्यासाठीही काही उरले नव्हते. अंत्यविधी नंतर आठ-दहा दिवसांनी एक उपचार म्हणून रुपेशबाबत सहानुभुती वाटणारे काही लोक त्याच्या घरी त्याच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेले. तर घरी वातावरण एकदम वेगळे होते. रुपेशची बायको नखशिखांत नटली होती. सोन्याचे भरपूर दागिने तिच्या अंगावर होते. तिच्यासह रुपेशची  मुलगी, मुलगा या तिघांच्याही चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. म्हणून प्रश्नार्थक झालेले त्या लोकांचे चेहरे पाहुन शिल्पाच मग म्हणाली, ‘अहो..त्यांचं अस्तित्वच आमच्यासाठी केवळ बोजा होता. तोच बोजा गेला आता. आमच्या जीवनाचे त्यांनी जीवंतपणीच पार पोस्टमार्टेम करुन ठेवले होते. मग आता आम्ही दुःख कशाबाबत करत बसू? आमच्या सुखी जीवनाला आतापासून सुरुवात झाली आहे.' - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक: दैनिक आपलं नवे शहर.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 कुठे सोन्याने तुला करणारे राजे, कुठे ते सारे मुघल, बिगल!