करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक ! (१६ एप्रिलःसम्राट अशोक जयंती)

सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासातही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट' असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट.' आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळपर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत, असा चक्रवर्ती सम्राट अशोक जगाच्या पाठीवर कोणीही होऊ शकला नाही. विश्वविजेता सम्राट अशोक ज्याला ‘चक्रवर्ती संबोधलं जातं ते भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी सम्राट  होते व त्यांनी अखंड भारताचा नव्हे, तर भारतासह बहुतांश भाग काबीज केला होता. भारतीय इतिहासात मौर्य साम्राज्याचे महत्व अनन्यसाधरण आहे. मौर्य वंशातील सम्राट चंद्रगुप्तांपासुन ते सम्राट अशोकांपर्यंत प्रत्येक राजाने राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वत्र क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या राजाच्या परंपरेतील सम्राट अशोकाची इतिहासातील भुमिका अनेकार्थाने महत्वाची ठरली आहे. सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते.  सम्राट अशोकाचा जेवढा साम्राज्यविस्तार होता तेवढा हा पूर्ण भारत देशपण नाही आणि जेवढे वर्षे मोर्य शासकांनी या देशावर राज्य केले तेवढे इतर कोणीही करु शकले नाही. त्यांच्या आधीही नाही आणि नंतरही नाही.

सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणाली यांचे थोर पुरस्कर्ते होते; म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख सन्‌ १८३७ मध्ये वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्ममी, खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे. अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला ‘देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची तत्त्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय.

धम्मचक्र परिवर्तन करणारा अशोक हा प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक ठरला आहे. इतिहासाला युगानुयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल. मानवी कल्याणासाठी अथक प्रयत्न करणारा प्रजा हीच दक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी अशोकाच्या कार्याचा गौरव केलेला आहे. हा बौध्द सम्राट म्हणून अशोकाचा असा विश्वास होता की, बौध्द धर्म ह सर्व मानव तसेच प्राणी व वनस्पतीसाठी फायदेशीर आहे. म्हणून त्यांनी अनेक स्तूप, सांघाराम, विहार, चैत्य आणि दक्षिण आशियातील बौध्द भिक्कुंचे विहार, मठ बांधले. अशोकवादानुसार त्यांनी बुध्दांच्या अवशेषांवर ८४ हजार स्तुप बांधण्यास आज्ञा दिली आणि ते तयार झालेत, याला इतिहास साक्षीदार आहे. ही काहीशी अतिशयोक्ति असली तरी भारतात बऱ्याच ठिकाणी सम्राट अशोकाच्या कालखंडात स्तुप उभारले गेलेत, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यांच्या कार्याचा पुरावा ९० च्या दशकात सन्नतीच्या बौध्द स्थळाचा शोध. जे स्थळ कर्नाटकातील कलबुर्गी जिल्हयात भीमा नदीच्या काठावर. या स्थळाच्या पुनरुज्जीवनाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.

माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक' मध्ये म्हणतात की, ‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा सम्राट अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा; तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरादा बद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.'

अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेली आहे. तत्कालीन अशोकाचे शिलालेख याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण दस्तावेज आहेत.

अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमू लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली.

भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात. कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यवसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, ती कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इ.स. पूर्व २६५ च्या सुमारास सुरू झाले. सुसीमच्या एक भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने हे कारण मानले व कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले.

कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले. अग्नेय अशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू  पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोई निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती अनेक नवे रस्ते बांधले, प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, नव्या धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या, अशा प्रकारे त्याने अनेक लोकापयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचे कामही अशोकाने केले.

१९७१ साली सम्राट अशोकाचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारीया (प्रत्यक्षात नक्तितालाई) या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हॅरी फाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झाले आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत (नक्तितालाई) येथे सहलीला आला होता असे या शिलालेखात लिहिलले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षु संघाचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे आजही येथे पहायला मिळतात.

अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संतांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचारतत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.

अवघ्या जगाने गौरवलेला हा सम्राट अशोक मात्र दुर्दैवाने काही काळ भारताच्या विस्मृतीत गेला. -प्रविण बागडे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

रिल्सच्या आभासी दुनियेत तरुणाईचा ऱ्हास !