अनेकतेत एकता काळाची गरज!    

देशात सध्या जातीय आणि धार्मिक ट्रेंड सुरु

देशात सध्या जातीय आणि धार्मिक ट्रेंड सुरु आहे. जाती-पातीचे राजकारण सुरु आहे. त्यातच राजकीय नेत्यांनी व त्यांच्या तथाकथित अनुयायांनी प्रोपोगंडा चालवला आहे की, रामलल्लाच्या अयोध्यातील मंदिरामुळे तिकडे धार्मिक पर्यटनाला चांगलाच वाव मिळेल. देशात सध्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मत नवलकारक नाही. ते म्हणतात की, जानेवारी २०२४ मध्ये राममंदिर भाविकासाठी खुले झाले की, तेथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या १० पटीने वाढेल.

काशी विश्वनाथाच्या मंदिराचे नुतनीकरण झाल्यानंतर वाराणसीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या साडेसात कोटीवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही धार्मिक पर्यटनक्षेत्रात शिर्डीमध्ये सर्वाधिक गर्दी असते. त्या खालोखाल भीमाशंकर, घृणेश्वर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, साडेतीन शवतीपीठे, अष्टविनायक तसेच गणपतीपुढे यासारख्या स्थळांना अधिक गर्दी असते. गेल्या काही वर्षात एखादा प्रसिद्ध स्थळाबरोबर तेथील खाद्यसंस्कृती, जीवनशैली उपलब्ध असलेले साहसी खेळ आणि अन्य निसर्ग सुंदर ठिकाणे यांच्या एकत्रीत अनुभव घेण्याकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे.

देशातील विविध राज्यातही अनेक धार्मिक स्थळे अशी आहेत तिकडे जाण्याचा पर्यटकांचा मोह कमी होत नाही. त्यामुळे त्या त्या राज्याला व त्यांच्या अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळत आहे. गत दोन दशकात धार्मिक स्थळांना भारतीयांचे नेहमीच प्राधान्य राहिलेले आहे. सन २००१ ते २०११ या कालावधीत धार्मिक स्थळांच्या संख्येत वेगाने म्हणजे २६% नी वाढ झाली आहे. त्या तुलनेत रुग्णालयाची वाढ १३% आणि कारखान्यांची वाढ १३% इतकी कमी दिसते.

भारतात ३० लाख धार्मिक स्थळे आहेत. त्या तुलनेत शाळा आणि महाविद्यालयाची एकत्रित मोजणी केली तर तो आकडा २१ लाख इथपर्यंतच मर्यादित आहे. याचाच अर्थ देशातील प्रत्येक ४० व्यवतीमागे एक धार्मिक स्थळ आहे. त्या तुलनेत अन्य सामाजिक निर्देशकांचा विचार केला तर शाळा, पोलिस ठाणी, रुग्णालये कमी प्रमाणात आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे तीन लाख ५४ हजार धार्मिक स्थळे आहेत. देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्यानंतर महाराष्ट्र दोन लाख ७८ हजार आणि पश्चिम बंगालमध्ये दोन लाख ५७ हजार धार्मिक स्थळे आहेत.

एका सर्वेनुसार ९७ % भारतीय म्हणतात की, त्यांची देवावर श्रध्दा आहे. त्या सर्वेक्षणात असेही दिसून आले, की बहुतेक धार्मिक गटापैकी ८०% गटांना आणि संस्थांना असे वाटते की, पृथ्वीच्या पाठीवर देवाचे अस्तित्व आहे. त्यामुळेच त्या स्थळांना वा धार्मिक संघटनांना देणगी देण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. गत दोन तीन वर्षात धार्मिक संघटनांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये १४ टववयांनी वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये संस्थांना २३ हजार ७०० कोटी रुपयाच्या देणग्या मिळाल्या होत्या. तर त्याच्या पुढील वर्षात हा आकडा सत्तावीस हजार कोटीवर पोहचला आहे.

म्हणजेच देवावर विश्वास ठेवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही एका दृष्टीने चांगली बाब वाटत असली तरी त्याचा इतर गोष्टीवर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा बाळगणारेही काही कमी नाहीत. याबाबत काही संतांनीच आपले मत व्यवत करताना म्हटले आहे की, ‘आम्ही कोणत्या जगात प्रवेश केला आहे, ज्याचा काही आता-पता नाही, ज्याला कोणतीही सीमा वा कढ नाही ना किनारा नाही ना त्याबाबत शब्दात वर्णन करण्याची सोय नाही. प्रत्येकजण देवात तल्लीन झाला आहे. आणि त्यात तो मदमस्त वावरत आहे, जसा की दारुड्याला दारुची नशा चढल्यावर त्याचे वागणे असते तसे. जेव्हा दारु ची नशा उतरते तेव्हा त्याच्यात परमात्म्याची नशा चढते आणि जेव्हा परमात्म्याची नशा चढते तेव्हा ती उतरण्याचे नाव घेत नाही. ज्यांनी धार्मिकतेची दारु प्यायली तो पवित्रतम मानला जात आहे. त्यांच्या डगमगण्याने नवीन रस्ते किंवा मार्ग तयार होत आहेत.

दारुबाज दारुच्या नशेत स्वतःला तिसमारखाँ समजतो, , ताकदवान समजतो, स्वतःलाच सर्वात जास्त पवित्र व साफसुथरा असल्याचे भासवतो. त्याच्या मते त्याने विस्तवाला शिवले तरी त्याचे फुले होतील, नरकाच्या आगीला हात लावला तरी तेथे वसंत बहरल्याची अनुभूती त्यांना होत आहे. त्याची प्रचिती सध्या येत आहे. लोकसभेत, लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेत राज्यसभा अध्यक्षांना आपल्या सत्तेची व खुर्चीची एवढी नशा चढली आहे की, त्यांना नितिनियमाचे भान राहिलेले नाही, विरोधकांनी कोणत्याही विषयावर चर्चेची मागणी केली, की त्यांना कामात बाधा आणण्याचे कारण देत, विरोधकांना निलंबित करण्यात येत आहे. इतिहासात प्रथमच असे घडत आहे की, विरोधकांना आपली बाजू मांडू न देताच एकतर्फी निर्णय देत, निलंबनाची तलवार त्यांच्यावर चालवली जात आहे. परिणाम स्वप एका दिवसात चौदा खासदारांना निलंबित केले गेले आहे. खरंतर ही लोकशाहीची प्रतारणा आहे.

अशा प्रकारच्या परम अवस्थेत व मस्तीत कोण लक्षात ठेवील की, कोण आहेत गणेशजी, कोण आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश आणि भारतात तर तेहतीस कोटी देवी देवता आहेत. अशा स्थितीत पंचायतीत कोण पडणार? झगड्यांत कोण पडणार? ज्यांनी देवाचा अनुभव घेतला, त्यांच्यासाठी सर्व देवी देवता मिळाले किंवा त्यांच्यात विलीन आहेत. हा सारा देवी-देवताचा प्रसार आमच्या विक्षिप्तपणाचा पसारा आहे. या जगात इतर धर्म आहेत, ज्याची गणती केली जाऊ शकत नाही.

खरं तर विज्ञान एक आहे तर, धर्मसुद्धा एकच असू शकतो. किंवा सत्य एकच असले तर धर्मसुद्धा एकच असू शकतो. त्यात कसले हिंदू, कसले मुसलमान, कसले जैन, कसले बौद्ध? हा त्यांची भाषा वेगळी असू शकते. सांगण्याचे माध्यम वेगळे असू शकते. अभिव्यंजनता अभिव्यवित, स्वभाव वेगळे असू शकतात. स्वभावतः बुध्द पाली भाषेत बोलतील, महावीर प्राकृतमध्ये तर मुहमद अरबीमध्ये, जीजस अरेमैक आणि लाओत्सू, चीनी भाषेत आपली मते व्यवत करतील. सगळ्यांची प्रतिके वेगळी असतील. काव्य वेगळे असेल, सगळ्यांची बोटे वेगळी असतील; पण जगात चंद्र तर एकच आहे. जिकडे बोटे दाखवली जातील तिथे एवढेच म्हटले जाईल तुम्ही चंद्राला बघा. बोटे चावत बसू नका. पण लोक आहेत की, ते बोटे चावत आहेत. तिथे बोटांचीच पूजा सुरु आहे. हे तर मुलांचे खेळणे झाले. ते मुलांसाठी उपयोगाचे आहे.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा शाळेतील पूस्तकात ‘ग' म्हणजे गणेशजी म्हणजे गणपती बाप्पा मुलाना ‘ग' समजण्यासाठी गणपतीपेक्षा चांगला पर्याय कोणता? मुलांना तर गणपती बाप्पा चांगला लक्षात राहतो.

मुले गणपती बाप्पाला पाहून खळखळतात, एकदम खुश होतात. गणेशाची सोंड हाथीची, एका हातात मोतीचूर लाडू आणि उंदरावरची स्वारी, जेव्हा की, तो उंदीर एक इंचही चालला नसेल, असे म्हणावे वाटते की, भविष्यातील पेट्रोल, डिझेल वा इंधनतेलाच्या कमतरतेची ती आधीची ती तरतूद असावी. मुले खुश झाली असतील आता ती गोष्ट राहिलेली नाही. आता गणेशजीचा ‘ग' राहिलेला नाही. ‘ग' गाढवांचा झाला आहे. कारण गाढव सेवयूलर आहे. गणेशजी मध्ये थोडा धर्माचा वास आहे आणि भारतीय संविधान तर धर्मनिरपेक्ष आहे.
मुलांना किंवा तथाकथित लोकांना समजवावे लागेल की, ‘ग' तर कोणाला ना कोणाला बनवावेच लागेल. मग ते गणपतीचा असो की गाढवाचा असो. पण त्यासाठी कोणते ना कोणते प्रतिक वापरावेच लागेल. असेच धर्म जगतात आम्ही सगळे बालके आहोत. तिथे प्रतिकांची गरज आहे. म्हणूनच देशात जी तेहतीस कोटी देवी-देवता आहेत ती सर्व प्रतिके आहेत. बहाणे आहेत.

त्या परमात्म्याला तुम्ही समजू शकत नाहीत. तेवढी उंची आपल्यात नाही किंवा त्याला पाहण्याची आपल्या डोळ्यात ताकद नाही. तेवढी धमकही आपल्यात नाही. तेवढी तुमची प्रौढता नाही व परिपववताही नाही, तर चला छोटा-मोठा संकेतही सही. सुर्य मिळाला नाही तर किरणही सही, आणि किरणेही नसतील तर दिव्याची किरणेही चांगली. कारण दिव्यांची किरणे पण सुर्याच्या किरणाची कामे करतात तीही सुर्य प्रकाशाचाच अंश आहे.

पण आपली समज चुकीची होत चालली आहे, आपला सर्व धर्म समभाव लोप होत चालला आहे आणि सर्वजण आपापली खुराडीच आपले जगत समजत चाललो आहोत. त्यातूनच नव नवीन समस्या निर्माण होत आहेत. एकीकडे आपण सगळं जग आपलं घर समजत आहोत, ‘वसुधैव कुटूंबम' म्हणत आपण आपली वैचारिक विशालता कमी करत चाललो आहोत. अशात आपण जगतगुरु कसे होणार?

जागतिक महामारीच्या काळात सर्व देवी-देवताही आपापल्या मंदिरात गपगुमान विराजमान होती. मरत होती ती जनता. विज्ञानाने महामारीवर मात  केली. आणि आपण टाळ्या वाजवल्या, थाळ्या पिटल्या, ‘गो करोना गो' म्हणालो पण कामी आला तो वैज्ञानिक एकतेचा मंत्र. आपला देशही अनेकतेत एकतेचा आहे. तेव्हा एकतेलाच  कवटाळण्याची गरज आहे.
-भिमराव गांधले. 

 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ट्रिपल इंजिनची ट्रिपल वसुली...!