बेलापूर गांव येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई आणि राम मारुती जन्मोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर गावातील श्री गणेश मंदिर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून एकूण १०१३ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन यांच्या सहकार्याने तसेच हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल-वाशी, स्पार्कस्‌ लाईफ केयर, रामकृष्ण नेत्रालय आय हॉस्पिटल-वाशी यांच्या सहकार्याने सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये रक्तदाब, डायबेटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच मोफत औषधे, चवनप्राश आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दिनानाथ पाटील, रविंद्र म्हात्रे, बाळकृष्ण बंदरे, ज्योती पाटील, प्रमोद जोशी, शैला म्हात्रे, प्रियांका म्हात्रे, दिलीप घोसाळकर, वैभव कदम, प्रताप मुदलियार तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.

विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सदर महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा असून संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी प्रभागांमध्ये आरोग्य तपासणी शिबीरे आम्ही घेत आहोत. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा आम्ही नागरिकांना आरोग्य सेवा देत असून कोरोनानंतरचे सदर पाचवे शिबीर आहे. आज १७ डिसेंबर रोजी वाशी गांव येथे महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.

कोव्हीड काळात भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेकांचे रोजगार गेले, व्यवसायही ठप्प झाले. अशा परिस्थितीत मोफत आरोग्य शिबीर तसेच मोफत औषधे, च्यवनप्राश आणि चष्मे वाटप करणे आवश्यक होते. शिबीराला हजारो नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. -आमदार मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कुकशेत येथे आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर संपन्न