ऐन लढाईच्या वेळी फडकावले पांढरे निशाण

नवी मुंबई-: मनपाच्या वतीने ३५१ कोटी खर्च करून वाशी येथील महात्मा फुले भवन ते कोपरी पर्यंत उड्डाण पूल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पात ३९० झाडांचा बळी जाणार असल्याने राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटले होते.प्रचंड गाजलेल्या या वृक्षतोडी विरोधात  सुमारे  १००९ हरकती आल्या असून त्यात नवी मुंबई शहरातील दिग्गज नेत्यांनी देखील हरकती नोंदवल्या होत्या. विशेष म्हणजे या नेत्यांनी या वृक्ष तोडायला केलेल्या विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग देखील घेतला होता. मात्र ऐन सुनावणीकडेच या  दिग्गजांनी  पाठ फिरवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. झाडे तोडायला विरोध दर्शविणाऱ्या या नेत्यांनी यासाठी होणाऱ्या सुनावणीकडे पाठ फिरविण्यामागे काही "अर्थ"पूर्ण संदेश दडल्याचे आता दबक्या सुरात बोलले जात आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने कोपरी वाशी अशा ३५१ कोटी खर्च करून उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. महासभा अस्तित्वात नसताना प्रशासक राजवटीत या पुलाच्या कामाला मंजुरी दिल्याने आधीच हा पुल वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यात या पुलासाठी ३९० झाडे. बाधीत होत असल्याने नवी मुंबईतील राजकीय नेत्यांनी यास कडाडून विरोध केला होता. उद्यान विभागाने या नियोजित व उड्डाणपूलासाठी ३९० पैकी ३८६ झाडे प्रत्यारोपण व ४ झाडे तोडण्याची परवानगी प्रक्रिया राबवली होती. आणि त्याबाबत हरकती साठी आधी सात दिवस मुदत दिली होती. मात्र या प्रकियेला आमदार गणेश नाईक व माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर उद्यान विभागाने एक महिन्याची वाढीव मुदत दिली होती. मात्र  ही झाडे वाचावी म्हणून राजकीय नेते ठाम होते. त्यासाठी मोठे जन आंदोलन केले होते. या झाडांसाठी विरोध करायला काही जणांनी गल्लीबोळातून हरकतदार उभे करण्याची खेळी रचून प्रशासनावर दबाव निर्माण केला होता.  कारण, ज्या १००९ हरकती आल्या होत्या त्यातील ४१९ हरकतदारांचा कुठलाच सुगावा लागला नाही. तर काही हरकती खुद्द नेत्यांनीच मांडल्या होत्या. यात माजी नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश आहेआणि या हरकतींवर ९ नोव्हेंबर पासून तुर्भे विभागात सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र काही नेत्यांनी प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याचे टाळले आहे. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडुन समजते.

त्यामुळे जो लढा रस्त्यावर दिला त्याच लढाईला कायदेशीर अंतिम स्वरूप देण्याच्या वेळी प्रत्यक्षात लढण्याच्या प्रसंगी या दिग्गजांनी तलवार म्यान करून पांढर निशाण फडकावले आहे. त्यामुळे हे पांढरे निशाण फडकवणाऱ्या या नेत्यांच्या हेतूविषयी आता संशयाचा धूर निघत आहे. लढाईत जिंकण्याची संधी आली असताना तहात मात्र या नेत्यांनी नामुष्की पत्करली असल्याचा सूर आता उमटत आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महिला सुरक्षेला शिंदे-फडणवीस सरकारचे प्राधान्य -चित्रा वाघ