महिला सुरक्षेला शिंदे-फडणवीस सरकारचे प्राधान्य -चित्रा वाघ

नवी मुंबई ः राज्यातील महिलांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारचे प्राधान्यअसल्याचे प्रतिपादन ‘भाजपा महिला मोर्चा'च्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे. विद्यमान राज्य सरकार लोकांनी लोकांसाठी बसवलेले सरकार असून ‘महा विकास आघाडी सरकार'च्या काळात महिलांवर अत्याचार झाल्याचा घणाघात त्यांनी केला.

‘भाजपा नवी मुंबई' वतीने २८ नोव्हेंबर रोजी वाशीतील सिडको एविझबिशन सेंटर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सौ. चित्राताई वाघ आणि आ. गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, ‘भाजपा'च्या प्रदेश पदाधिकारी प्रा. वर्षा भोसले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ‘महिला मोर्चा'च्या जिल्हाध्यक्ष दुर्गा ढोक, आयटी सेलचे सतीश निकम, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एविझबिशन सेंटरचे सभागृह महिला कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते.

 ‘महाविकास आघाडी सरकार'च्या काळात महिला असुरक्षित होत्या. मात्र, महिलांवर अत्याचार झाल्यास दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे  निलंबन शिंदे-फडणवीस सरकारकडून तात्काळ  केले जाते. कुणाची हयगय करणार नाही, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

सीवुडस्‌ येथील वादग्रस्त आश्रमशाळेत चित्रा वाघ जाऊन आल्या असता तो आश्रम आजही सुरु असल्याचे त्यांना निदर्शनास आले. ज्या आश्रमात मुलावर अत्याचार झाले. संबंधित आश्रम चालक तुरुंगात गेला असून आश्रम आजही कोणत्या महापालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने  सुरु आहे ? असा सवाल करुन चित्रा वाघ यांनी या प्रकरणी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेत कारवाई करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्यात जेवढे पण बेकायदा आश्रम आहेत त्यांची चौकशी करून ते बंद करावेत, अशी मागणी चित्रा
वाघ यांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदी यांनी जणकल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या असून, त्याचा लाभ सर्वांना मिळाला आहे. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आणि महिलांवर अन्याय होत असताना त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांना केले. जिल्हाध्यक्ष घरत यांनी गणेश नाईक यांनी ‘भाजपा'त प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत भाजपा नंबर एकचा पक्ष झाल्याचे नमूद केले. माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी आपल्या प्रास्ताविकातून नवी मुंबईत ‘भाजपा'मध्ये संधी देताना नेत्यांकडून कधीही महिला आणि पुरुष भेद केला नसल्याचे नमूद केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजप अनेक ठिकाणी स्व बळावर तर काही ठिकाणी युती करून लढणार