खेळाचे मैदान वाचवण्यासाठी ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'च्या नवी मुंबईत सह्यांची मोहीम सुरु

 बेलापूरचे मैदान वाचविण्यासाठी सह्यांची मोहीम

नवी मुंबई ः बेलापूर, सेक्टर-१५ येथील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'च्या वतीने २५ नोव्हेंबर २०२२ पासून नवी मुंबईमध्ये सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला प्रकल्पग्रस्त, स्थानिक क्रीडाप्रेमी, पर्यावरण प्रेमी आणि नवी मुंबईकरांचा उत्स्फुर्त जन पाठिंबा मिळत आहे. सानपाडा आणि नेरुळ येथे सह्यांची मोहीम यशस्वीपणे पार पडली.

बेलापूर येथील खेळाच्या मैदानावर हॉस्पिटल बांधण्याचा घाट घातला जातो आहे. त्याला प्रकल्पग्रस्त स्थानिक आणि ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'च्या सदस्यांनी जोरदार विरोध केला आहे. अलिकडेच मैदान बचाव चषक
क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सदर मैदान वाचविण्याची हाक देण्यात आली होती. बेलापूर सह नवी मुंबईतील सर्वच खेळाची मैदाने खेळण्यासाठीच राखीव राहिली पाहिजे. नवी मुंबईच्या भावी पिढ्यांसाठी खेळाची मैदाने वाचवली
पाहिजेत. या भूमिकेतून बेलापूर मधील मैदान वाचविण्याचा लढा सुरु झाला आहे. प्रकल्पग्रस्त, स्थानिक आणि खेळाडुंनी बेलापूरचे मैदान स्वःखर्चाने तयार केले आहे. मात्र, या मैदानावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल
कॉलेज बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. वास्तविक पाहता हॉस्पिटल साठी अन्यत्र ‘सिडको'कडे जागा उपलब्ध आहेत. त्या महापालिकेने मागून घ्याव्यात. मात्र, तयार आणि वापरात असलेले खेळाचे मैदान यासाठी मागू नये.
या मैदानाची मालकी महापालिका किंवा सिडको कोणाकडेही असू देत; परंतु मैदान खेळासाठीच आरक्षित ठेवले पाहिजे, या मागणीसाठी नवी मुंबईतून मोठा पाठिंबा मिळत आहेत.

नुकतेच ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या विरोधात निर्माण करण्यात आलेले संभ्रम आणि तथ्यहीन आरोप खोडून काढले आहेत. या मैदानाचा कोणताही व्यावसायिक वापर होत नाही. सदर मैदान विनामूल्य खेळासाठी उपलब्ध करुन देण्यात येते. मुंबई क्रिकेट असोसिएशनची प्रशिक्षण शिबिरे या ठिकाणी विनामूल्य भरवली जातात.


बेलापूरचे मैदान कांदळवन क्षेत्रात येते. सीआरझेड-१आणि सीआरझेड-२ क्षेत्रामध्ये नियमानुसार कोणतेही बांधकाम करता येत नाही. बेलापूरच्या या मैदानावर नवी मुंबई महापालिकेने त्यांच्या विकास आराखड्यात खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकलेले आहे. त्यामुळे बेलापूरचे मैदान वाचवण्यासाठी जन आंदोलन सुरु करण्यात आले असून जर मागणी मान्य झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन तीव्र करण्यात येईल. मैदान वाचविण्यासाठी आत्मदहन करण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'चे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, पदाधिकारी विकास मोकल, बाळाराम पाटील, दिलीप मढवी, काशिनाथ वास्कर, धर्मेंद्र पाटील, संजय ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थ,
प्रकल्पग्रस्त, स्थानिक, खेळाडुंनी सह्यांच्या मोहिमेत मोठ्या संख्येने भाग घेतला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिकेतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी