संकेत मनाचे
शुक्रवारी रात्री दहा वाजता मी घरी पोहोचलो. लॅचने घर उघडलं, बेडरूममध्ये अंजली गाढ झोपली होती. तिला दुसऱ्या दिवशी बंँकेत जायचं असत, मला शनिवार रविवार सुट्टी. मी कपडे बदलले, हातपाय धुतले आणि फ्रीझमधून बाटली काढली. ग्लास, सोडा, काजुगर सर्व तयारीनीशी मी प्यायला बसलो. एका दमात लार्ज पेग संपवला... दुसरा पेग भरला आणि रोलिंग चेअरवर डुलत बसलो. अंजली झोपली हे बरेच झाले नाहीतर माझ्या ड्रिंकवरुन चिडली असती आणि एक मोठे लेक्चर दिले असते तिने. माझेपण पिणे फार वाढले हे खरेच. अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या पेयाचा आधार घेतोय मी.
शांतता आहे कुठे मनाला? मोठे होण्यासाठी धावतोय..दुसरा कुणी पुढे जाण्याआधी माझा वेग वाढवतोय....यात माझी दमछाक होतेय...तरी धावतोय.. धावतोय. मला या वेळी माझ्या आईबाबांची आठवण येते आहे, कोकणातील धामापूरसारख्या खेड्यात रहाणारे, रोज धामापूरहुन मालवणला चालत शाळेत जाऊन शिक्षकांची नोकरी करणारे माझे बाबा, सकाळी पाचला उठून कमरेवर कळशी घेऊन पाणी भरणारी आणि आम्हा तीन भावंडांना संस्कार देणारी माझी माता..दोनशे रुपये पगारात महिना चालवत होते. समाधानी होते.. त्यात सतत आलं गेलं होतं. सण आनंदाने साजरे होतं होते..शाळेत जाताना आम्हा भावंडाच्या पायात चप्पल नसायचं तरी काटा सहजासहजी घुसायचा नाही. पायात कारण पाय घट्ट होते. त्या काळात नव्हते ताण? काळज्या? पुढे जायची घाई? थोडीपार होतीच... पण असं दारू पिऊन डोकं शांत करायचं किंवा झोपेची गोळी घेऊन झोपायचं, कुणाच्या मनात यायचं नाही, पण आत्ता या काळात?
माझ्या डोक्यात विचारांचा पिंगा घुमत होता.. त्याच वेळी नवीन प्रोजेक्ट पुढील आठवड्यात पूर्ण करायची डेडलाईन पण आठवत होती. कसा प्रोजेक्ट पुरा होईल? नवीन इंजिनिअर भरलेत त्यांच्या कामाची गती किती धिमी? सर्व ठिकाणी मलाच मरावं लागतं. नवीन मुलांच्या चुका दुरुस्त करण्यात दिवस संपतो, मग प्रोजेक्ट कसा पुरा होईल? विचार करता करता माझा पाय लागला आणि टेबलावरचा ग्लास खाली पडला आणि खळकन आवाज झाला, त्याने अंजलीला जाग आली आणि ती बाहेर आली. झोप मोडल्यामुळे अंजली आधी चिडली होतीच त्यात मी हॉलमध्ये बाटली, ग्लास यासह बसलेला पाहून तिचा पारा चढला ”घर आहे का गुत्ता? किती दारू पितोस? काही लाज.”
”अग नाही, आत्ताच सुरु केलंय.”
”तुला काय वाटलं, मी झोपले म्हणजे ठार मेले काय, मला जाग होती दार उघडलंस त्याची? दोन पेग तरी झाले असतील... कशाला प्यायची?”
”अग टेन्शन कंपनीत.. मनातून भीती जात नाही.. प्रोजेक्ट पुरा नाही झाला तर लाथ मारतील म्हणून... इथे तुमच्या बँंकेसारखी यूनियन वगैरे काही नसतं..”
”म्हणून दारू?
”मग काय करू? कसं विसरू दिवसभराचा त्रास?”
”त्या करिता दारू हा पर्याय नाही अजित..”
”मग? कसला पर्याय आहे का?”
”आहे, माझ्या मैत्रिणीचा दीर आहे मानसोपचारतज्ञ, डॉ नाडकर्णी.”
”म्हणजे मी वेडा झालो की काय?”
”वेडा झाल्यावरच मानसोपचारतज्ञाची मदत घयायची असते, असं वाटतं का तुला? याकरिता वाचन हवं.. मनाचं आरोग्य महत्वाचं, आपण भारतात त्याकडेच दुर्लक्ष करतो. ताण तणाव याकरिता परदेशात कौन्सीलिंग करतात.. त्याचा खूपच फायदा होतो.”
”मग मी उद्या डॉ नाडकर्णीना भेटायचं?”
”होय... मी पण सोबत येतेच आहे.. मी सकाळी मैत्रिणीला सांगून उद्याची अपॉइंटमेंट मिळवतेच, बघ ते किती तूझ्या मनात शिरतील.. तुझे प्रॉब्लेम्स कमी होतील.. आता पिणे पुरे.. झोप.” मी गुपचूप ग्लासाचे तुकडे भरले आणि झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी अंजलीने आपल्या मैत्रिणीला सांगून डॉ नाडकर्णी यांची रात्री आठची भेट ठरवली.
आम्ही दोघे मरीनलाईन्स स्टेशनजवळ असलेल्या डॉ नाडकर्णी यांच्या कन्सलटिंगरूम मध्ये भेटायला गेलो. बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी डॉक्टरनी आत घ्ोतलं.
डॉ - बोला सामंतसाहेब.. अगदी मनातलं बोला.. कसलाही आडपडदा न ठेवता बोला.
एव्हडयात अंजली बोलायला लागली.. ”डॉ, माझे मिस्टर एका मल्टिनॅशनल कंपनीत जबाबदारीच्या पोस्टवर आहेत, त्याच्या डोवयावर सतत जबाबदारी असते.. मोठे मोठे प्रोजेक्ट्स पुरे करायचे असतात.. यांचे म्हणणे त्याच्या टीममधील नवीन मुलं बेजबाबदार वागतात, प्रोजेक्ट यशस्वी करण्याचे दडपण सतत राहते.. त्यामुळे.
डॉ - त्यामुळे काय?
अंजली - त्यामुळे यांची झोप उडाली आहे.. झोपेसाठी पिल्स घयायची सवय झाली आहे आणि..
डॉ - आणि दारू पिण्याची सिगरेट्स ओढायची गरज निर्माण झाली आहे, बरोबर.
अजित - होय डॉक्टर, त्याशिवाय मन शांत होतं नाही, सतत डोक्यात तेच विषय रहातात.. अस्वस्थ वाटतं.
डॉ - दारू पिल्यानंतर सर्व टेन्शन नाहीस होतं काय?
अजित - काही काळ सर्वांचा विसर पडतो पण..
डॉ - पण काय? दुसऱ्या दिवशी पुन्हा मन अस्वस्थ होतंच ना? आणि शरीरावर हँग ओव्हर रहातो त्याचे काय? दारुमुळे शरीराची नासाडी होते त्याचे काय?
अजित - खरे आहे डॉक्टर, मला फार शरमिंदे वाटते, आईवडिलांची आठवण येते.
डॉक्टर - का? आई वडिलांची आठवण का येते? तुमच्या लहानपणाबद्दल सविस्तर सांगा.
अजित - डॉ, मी कोकणातला. माझे वडील शिक्षक.. मेहनती.. रोज पंधरा किलोमीटर चालत जाऊन येणारे. शिवाय घरची थोडी बागायती सांभाळणारे. आई पण खुप मेहनती. घरात गाई वासरे होती. त्त्यांचे दूध काढून विकून दोन पैसे संसारासाठी जमवणारी. मला अजून दोन भावंडे. या गरिबीत सर्वाना उत्तम शिक्षण आईबाबांनी दिले.
डॉ -खरेच भाग्यवान आहेस तू. कोकणात जन्म. कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात..तेथली माणसे गरीब असतील कदाचित पण साधी आणि कलासक्त.. अनेक मोठे कलाकार कोकण गोव्यातील दिसतील.
अजित - होय, डॉक्टर.. माझे बाबा तबला काय वाजवायचे.. त्याच्यासारखा तबला कुडाळ मालवण भागात कोणी वाजवत नसे.
डॉक्टर - आणि तू? तू काही वाद्य शिकला नाहीस?
अजित - मी पेटी वाजवायचो, हार्मोनियम.. बाबांना साथ दयायचो. तीन परीक्षा दिल्या मी.. सतत सुरांच्या कैफात असायचो मी.. पण.
डॉक्टर - पण काय? आता पेटी नाही वाजवत?
अजित - नाही.. पेटी वाजवायची बंद केली मी... कारण त्या सुरात हरवल्यामुळे अभ्यासात मागे पडू लागलो.. दहावीत सहामाही परीक्षेत गणितात कसाबसा पास झालो.. बाबा काळजीत पडले.. माझ्यामागची दोन भावंडे होती शिकणारी.. मला शिकायचं होतं.. हार्मोनियम वाजवून गोविंदराव पटवर्धन होणे सोपे नसते.. शिवाय कला ही अशाश्वत... दुसरे नवीन वाद्य आलं की हे वाद्य कालबाह्य ठरतं.. मोठे होऊन पैसे मिळवणे आवश्यक.. त्यामुळे पेटी विकून टाकली त्यावेळी... मी डोळे पुसत पुसत डॉक्टरना माझा भूतकाळ सांगत होतो.
डॉक्टर - ओके, मग.. पुढे सुरांपासून लांब गेलास.. मग शिक्षणाकडे लक्ष देऊन इंजिनीअर झालास.. मोठया कंपनीत नोकरीला लागलास... मोठा पगार मिळू लागला.. मोठया जबाबदाऱ्या.. बरोबर?
अजित - होय डॉक्टर, पगार मोठा आहे.. घर मोठं घेतलंय.. अंजलीपण बँकेत नोकरी करते.. सारं काही आहे; पण मन कमकुवत झालंय.. मनातले विचार जात नाहीत... रात्री रात्री तेच विचार.. मन घाबरतं... मग त्याकरीता झोपेची गोळी, नाहीतर तीन चार पेग. हे संपतच नाही.
डॉक्टर -बरं, मला लक्षात आलाय तुझा प्रॉब्लेम..हा प्रॉब्लेम तसा सर्वच नवीन सुशिक्षित मुलांचा आहे. नोकरीत पैसे देतात; पण सतत कामाचे दडपण ठेवतात, सर्वसाधारण माणूस किती काम करू शकतो, त्याच्या दुप्पट अपेक्षा ठेवली जाते. पण एव्हडया पैशांची सवय झाली की दुसरीकडे कमी पगारात ॲडजस्ट करू शकत नाही. अजित, तुझे बाबा तसे भाग्यवान. कमी पगार मिळत असेल त्यांना..पण ते समाधानी होते. तुझी आई कोंड्याचा मांडा करणारी होती. तुझे बाबा नशिबवान. कारण त्याना उत्तम तबला वाजवता येत होता. तू पण नशीबवान! कारण तू हार्मोनियम वाजवत होतास, नव्हे ती तुझी पहिली आवड होती, बरोबर..
अजित -बरोबर..
डॉक्टर - पण तू तुझा छंद अपुरा ठेवलास. तू पेटी विकून टाकलीस.. मी म्हणेन तू तुझं मन विकलंस, बरोबर?
अजित - तू सूर विसरलास.. राग विसरलास.. गोविंदराव पटवर्धन विसरलास बरोबर?
डॉक्टर - तुझे पेटीवादन सुरु असते तर तुला झोपेची गोळी घेऊन झोपायची गरज पडली नसती.. दारू प्यायची गरज पडली नसती. तू तूझ्या छंदापासून लांब गेलास आणि मनाने कमकुवत झालास. तू तुझी नोकरीं सोडू शकत नाहीस; कारण तू आयुष्याच्या मध्यान्हीला आला आहेस, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतांत अशा वयात... पण पुन्हा सुरांची आराधना कर. पुन्हा सा.. रे.गम. प मनात आणि घरात घुमूदे. संगीताच्या मैफिली असतात मुंबईत.. तूझ्या सुट्टीच्या दिवशी बायकोला घेऊन मैफिली ऐक.. मुद्दाम पुण्याला जा रजा घेऊन आणि सवाई मैफिलींची मजा घे.. तू तुझी टेन्शन्स केंव्हाच विसरशील.. झोपेची गोळी घ्यायची गरजच पडणार नाही तुला.
अंजली - बरं डॉक्टर, काही मेडिसिन वगैरे.
डॉक्टर -औषध एकच, जाताना दादरला थांबा आणि हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीमध्ये मस्त सुरांची हार्मोनियम खरेदी करा. सुरात भिजा, नोकरी सांभाळून गाण्याच्या मैफिली ऐका.. मोबाईलचा वापर शात्रीय गाणी ऐकण्यासाठी करा आणि मला पेटीवादन ऐकण्यासाठी बोलवा. आणि महत्वाचे म्हणजे अजित.. अंजली, मीपण उत्तम व्हायोलीन वादक आहे.. माझा हा छंद आहे म्हणून मी निरोगी आहे शरीराने आणि मनाने. - प्रदीप केळुस्कर