छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला विसापूर किल्ला
छत्रपती शिवरायांनी राजकीय तडजोड, सोय म्हणून त्याकाळी पुरंदरच्या तहात अनेक किल्ले मोघलांना दिले होते! पण छत्रपती शिवराय आर्ग्याहून परत येताच एक एक करीत सह्याद्री डोंगर रांगेतील सर्वच किल्ले जिंकून घेतले होते! त्यांत लोहगड, विसापूर किल्लेदेखील होते!
कित्येक शतकं गेली
कित्येक वादळं आली
शूर विरांच्या प्रतिकाराने
परचक्रं निघुनी गेली!
शत्रू मातीत गाडीले होते
भुवरी रक्त सांडीले होते
संस्कृतीचा गर्व छातीत
आम्ही किल्ले फोडीले होते!
दुश्मनांचे आव्हान ठाकिले
लढूनी प्राण त्यागला होता
उभे ताठ कातळ बनूनी
शूर मराठा जागला होता!
सह्याद्रीची ढाल करूनी
छातीवर वार झेलले होते
जखमांतूनी उठे चिरकांडी
जिंकूनी मराठे बोलले होते!
अनंत किल्ले कातळकडे अंगावर घेऊन कित्येक शतकं उभी आहेत! किल्ले बुरुज तटबंदीच्या आत सुखात उभे आहेत! अनेक राजवैभवांचा अनुभव पाठीशी आहे! नकोशा दुष्टचक्रांचें साक्षीदार आहेत! काळाशी दोन हात करीत, सामना करीत, ढासळलेले पडके अवशेष घेऊन उभे आहेत! एकांती घनदाट जंगलात वादळ वाऱ्याला सामोरे जात उभे आहेत!
किल्ल्याच्या अंगावर खांद्यावर उभ्या असलेल्या भिंती इतिहास साक्षी आहेत! कितीतरी युद्धांच्या, लढायांच्या साक्षीदार आहेत! मर्द मराठ्यांनी अनंत गनिमांना यमसदनी पाठविल्याच्या मुखसाक्षी आहेत! तोफ गोळ्याचा मारा सहन करीत तटबंदी बुरुज अजूनही काळसाक्षी उभे आहेत! ढासळलेल्या अवस्थेत उभे आहेत! इतिहास साक्षी उभे आहेत! निर्जीव दगडांच्या जीवंत तटबंदी कित्येक शतकं आक्रमकांची आक्रमणे सहन करीत आपलं अस्तित्व टिकवून आजही उभी आहेत!
काळाच्या पडद्याआड अनंत ऋतूंचा मारा सहन करीत किल्ल्यांचे बुरुज, पायऱ्या, तटबंदी निखळलेंलें आहेत, तरीही इतिहासखुणा शाबूत आहेत! आम्ही रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी अशाच एका किल्ल्यावर गेलो होतो! आमचें ग्रुप सेनापती वसंतराव बागूल सरांसोबत गेलो होतो! घनदाट जंगलांनी वेढलेला सह्याद्री! पर्वत रांगेत उंच उंच शिखरावर पडक्या बुरुज,तटबंदीची अवशेष घेऊन अजूनही उभा! पुणे जिल्ह्यात पवना डॅमच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर,एकांती उभा असलेल्या किल्ल्याचं नाव विसापूर किल्ला आहे! तेथून ०५-०६ किलोमीटर अंतरावर थंड हवेचं ठिकाण लोणावळा दिसतं!
उभट खोल खिंड पार करीत, वळणदार घाट रस्ता पार करीत, तिकोना,लोहगड किल्ला पार करीत पुढे विसापूर किल्ला समोर दिसत होता! पुण्याहून ५० किलोमीटर अंतरावर असलेला विसापूर किल्ला आहे! लोहगड शेजारीच उंच ताठ मानेने उभा ”विसापूर किल्ला” दिसतं!
लोहगडाच्या पायथ्यापासून ०२ किलोमीटर अंतरावर अजब, विस्मयकारक, निसर्गाचा अविस्मरणीय अविष्कार असलेल्या विसापूर किल्ल्याच्या जवळ जाऊन पोहचलो होतो! पायथ्याशी छोटंसं गाववजा वस्ती दिसली! सकाळचे १०-३० वाजले असतील! साधारण ०१ किलोमीटर सपाट अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पोहचलो होतो! तेथून विसापूर किल्ल्यावर जायला तीन मार्ग आहेत! पाटण दरवाज्यातून, कोकण दरवाज्यातून जाता येतं! पलीकडे जवळच मळवली अन लोणावळा रेल्वे स्टेशन आहेत! लोणावळ्याच्या घनदाट जंगलातून वाट काढीत या नितांत सुंदर किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे! विसापूर किल्ला दूर्ग-डोंगरी किल्ला आहे! वर मान करून पाहिल्यावर खूप उंचावर किल्ल्याची तटबंधी दिसतं होती! विशाल कातळकडा अंगावर आल्यासारखा दिसत होता! आम्ही पायथ्यापासून चालायला सुरुवात केली होती. घनदाट जंगलातून किल्ला चढाई करीत होतो! एकही पायरी नव्हती! फक्त दगडगोटे दिसत होते!
समोर अंगावर येणारा चढ होता! दगड गोट्यावंर, खडकांवर अलगदपणे पाय ठेवीत, स्वतःचा तोल सांभाळून किल्ला चढत होतो! घनदाट जंगलातील झाडांच्या मूळ्या पायवाटेच्या चढावरील दगडगोट्यातून बाहेर आलेल्या दिसत होत्या! कधी मुळ्यांचा आधार घेत तर कधी भल्या मोठया खडकांवर पाय ठेवून, आमची चढाई सुरू होती! लढाई सुरू होती! घाम गाळून चढाई सुरू होती! रस्ता नव्हताचं मुळी! किल्ल्यावरून निखळलेल्या छोट्या मोठ्या दगडांचा रस्ता तयार झाला होता! तोल संभाळून आम्ही चालत होतो! चढामुळे घाम येत होता! हिवाळा असूनही गरम होत होते! नैसर्गिक उंच शिखरावर किल्ला बांधलेला होता! आश्चर्य वाटत होतं! त्या काळी सैनिक कसे वर चढत असतील बरं?
काही अंतर पार केल्यावर उभट कडा दिसला! छोटया मोठया दगडांचा आधार घेत, अंगातलं साहस एकवटून आम्ही विसापूर किल्ला सर केला होता! वर भुईसपाट टेबल लँड भूमी दिसली! उभट कड्यावर तटबंदी बांधलेली दिसली! काही ठिकाणी तटबंदी ढासळलेंली दिसत होती! उंच शिखरावरून खाली पहातांना खोल खोल दरी दिसत होती! भीतीने अंगावर काटे उभे राहत होते! चढून वर पोहचलो होतो! समोर खूप मोठी गुहा दिसली! आत चिखल अन पाणी दिसत होते!
तटबंधीच्या कडेने उंचावर चालत होतो! इकडे तिकडे दूरवर नजर जात होती! सह्याद्री पर्वत रांगेत घनदाट जंगल दिसलं! अनेक उंच रांगा दिसत होत्या! खोल खाईत पवना धारणाचं पाणलोट क्षेत्र दिसत होतं! धरणाच्या बॅक वॉटरने अनेक डोंगरानां पाव-अर्धा उंचीपर्यंत बुडवलं होतं! अथांग समुद्रासारखं पाणी दिसत होतं! आम्ही विसापूर किल्ल्यावर फिरत होतो! काही दिवसांपूर्वी पाऊस पडून गेल्यानें किल्ल्यावर छोटे मोठे जीवंत झरें झूळझूळ वाहातांना दिसत होते! त्यांत चिखल मातीत अनेक खेकडे दिसत होते! आम्ही किल्ल्याच्यां उंच पठारावरं फिरत होतो! वरती देखील जंगल होतं! चालतांना महादेवाचं मंदिर दिसलं! आत जाऊन दर्शन घेतलं! आम्ही किल्ल्याच्या तटबंधीला लागून पठारी भागावर फिरत होतो! तेथे एक शिवकालीन हनुमान मंदिर दिसलं! विसापूर किल्ला समुद्रसापाटी पासून ३५५० फुट उंचावर आहे!
विसापूर किल्ल्यावर, घनदाट जंगलात पायपीट करीत चालत होतो! कातळात पाण्याचे टाके दिसत होते! पलीकडे पूर्णतः खडक फोडून पायऱ्या कोरलेल्या दिसत होत्या! पलीकडे तोफा ठेवलेल्या दिसत होत्या! पाण्याचा तलाव दिसत होता! काही ठिकाणी रांजन खडगे दिसत होते! बुरुजाला काही ठिकाणी दुहेरी तटबंधी दिसत होती! विसापूर किल्ल्यावर लोहगडासारखाच विंचूकडा आहे! आम्ही विसापूर किल्ल्यावर चढाई करून साहसी आनंद लुटीत होतो! घाम, श्रम, साहसातून आत्मिक आनंद घेतं होतं!
छत्रपती शिवरायांनी राजकीय तडजोड, सोय म्हणून त्याकाळी पुरंदरच्या तहात अनेक किल्ले मोघलांना दिले होते! पण छत्रपती शिवराय आर्ग्याहून परत येताच एक एक करीत सह्याद्री डोंगर रांगेतील सर्वच किल्ले जिंकून घेतले होते! त्यांत लोहगड, विसापूर किल्ले देखील होते! लढाईत अनेक मावळ्यांना देह ठेवावा लागला होता! प्राणार्पण करावे लागले होते ! छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विसापूर किल्ल्यावर जाऊन महादेवाचं, श्री हनुमानाचं दर्शन घेतलं! ‘जय शिवराय! जय भवानी' चा जयघोष केला होता! आमच्यातील एका मावळ्यांस शक्ती मिळाली होती! या मोहिमेत, या पवित्र भूमीसाठी एखाद्या मावळ्यांस आपला देह ठेवावा लागतो! मातीसाठी प्राणार्पण करावं लागलं होतं!
धैर्य अन शौर्याची भगवी पताका फडकत राहणार आहे! देह ठेवून स्वराज्यासाठी अर्पण करायचं असतं! जन्म सिद्ध करायचा असतो! डोळ्यात अश्रू वाहत असताना ते पुसुन संयमीत होतं पुढे वाटचाल करायची असतें! आम्ही मावळे छत्रपती शिवाजीराजांना नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करीत होतो! हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकास वंदन करीत होतो! डोळ्यात अश्रू होते! श्वास अर्पण करीत धर्य शिकत होतो! धर्म रक्षणास तन्मयतेने समर्पित झालो होतो! आम्ही विसापूर किल्ला सर केला होता! जिंकताना अंतरी वेदना देखील होती! - नानाभाऊ माळी