तुळशी विवाह - एक लोककल्याणकारी प्रथा !
भारतात कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत घरोघरी तुळशी विवाह लावण्याचा प्रघात आहे. या दिवशी श्री विष्णू निद्रावस्थेतून जागृत होतात आणि चातुर्मास संपतो. श्री विष्णूंच्या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. त्याचाच एक भाग म्हणून तुळशी सोबत श्री विष्णूंचा विवाह लावला जातो. तुळशी विवाहानंतर देशभरात नियोजित विवाह लागायला सुरुवात होते.
तुळशी विवाहाला श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या विवाहाचे प्रतीक मानले जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत करणाऱ्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा यासाठीही दारात तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी घरोघरी तुळशी विवाह केले जातात. यंदा हा योग १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान आहे. बहुतांश ठिकाणी द्वादशीला तुळशी विवाह केले जातात. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात.हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या दारात ती पाहायला मिळते.
भगवान शिवाचाच अंश असलेला जालंधर नावाचा राक्षस त्याच्या अमाप शक्तीने उन्मत्त झाला होता. सर्व देवांसह इंद्रालाही त्याने पराभूत केले. त्याने विष्णू लोकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; मात्र देवी महालक्ष्मीने त्याला आपण बहीण भावासारखे आहोत हे समजावल्यावर त्याने कैलासावर आक्रमण करून देवी पार्वतीला पत्नी बनवण्याची योजना आखली. ज्यामुळे देवी पार्वती क्रोधीत झाल्या आणि श्री महादेवांना जालंधरशी युद्ध करण्यासाठी सिद्ध व्हावे लागले. जालंधरची पत्नी वृंदा ही पतिव्रता असल्याने तिच्या पातिव्रत्य धर्मामुळे जालंधरला शक्ती मिळत होती. परिणामी महादेवांनाही त्याला पराभूत करता येत नव्हते, जालंधरला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग त्याच्या शक्तीचा स्त्रोत तोडणे हाच होता. अखेर भगवान श्रीविष्णूंनी जालंधरचे मायावी रूप घेतले आणि ते वृंदाच्या घरी गेले. जालंधरला पाहिल्यावर ती त्याच्याशी त्याच्या पत्नीप्रमाणे वागू लागली. जालंधरच्या रूपात त्यावेळी भगवान श्री विष्णू असल्याने वृंदाचे पातिव्रत्य भंग पावले. ज्यामुळे महादेवांना जालंधरचा वध करता आला, वृंदाच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तिने क्रोधीत होऊन श्री विष्णूंना शाप दिला, ‘ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचे छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल'. पुढे श्री राम अवतारात श्रीविष्णूंना माता सीतेच्या रूपात पत्नीवियोग सहन करावा लागला. वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे रोप उत्पन्न झाले. ही तुळस श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एका कथेनुसार वृंदाने श्री विष्णूंना श्राप देऊन शाळीग्राम बनवले. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीसोबत श्री विष्णूचे रूप म्हणून शाळिग्राम ठेऊन त्यांचे लग्न लावले जाते. तुळशीविना श्री विष्णूची किंवा शाळीग्रामची पूजा कधीच पूर्ण होत नाही.
तुळस म्हणजे आपल्या घरातील कन्याच आहे या भावाने तिचे लग्न लावले जाते. दारातील तुळशी वृंदावनाला किंवा कुंडीला गेरू आणि चुन्याच्या साहाय्याने रंगरंगोटी केली जाते. कुंडीत बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात ठेवतात. दारात आणि अंगणात रांगोळी काढली जाते. कुटुंबातील कर्ता पुरुष तुळशीची आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घातले जाते. तुळशीला आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला बाशिंग बांधले जाते. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात आणि त्यावर मांडव म्हणून उसाची अथवा धांड्याची खोपटी ठेवतात. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी घालतात. बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. घरातील स्त्री तुळशीची ओटी भरते. तुळशीची आणि श्रीकृष्णाची आरती केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून ऊस आणि चुरमुरे वाटले जातात. गोवा, दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरीत्या साजरा केला जातो. तुळशीची आणि बाळकृष्णाची वाजत गाजत सरकारी इतमामात मिरवणूक काढली जाते.
तुळस भारताच्या सर्व प्रांतात आणि सर्व वातावरणात उगवणारी वनस्पती आहे. तुळस केवळ पूजनीय आहे म्हणून ती दारासमोर लावली जात नाही, तर तिचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्मही आहेत. तुळस नेहेमी सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करत असते हे शास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध झाले आहे. ज्या घराच्या दारात तुळस असते त्या घरात आजारपण कमी येते असे म्हटले जाते. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीला पापनाशिनी असेही म्हटले जाते. तुळशीचे वन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते असा संदर्भ स्कन्दपुराणात आढळतो. तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात, असे म्हटले जाते. देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचतो तसेच तो अधिक सात्विक बनतो.
श्वासाची दुर्गंधी घालवण्यासाठी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी सकाळी आणि सायंकाळी तुळशीची एक ते दोन पाने चघळावीत. तुळशीची ताजी पाने प्रतिदिन खाल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील टॉक्सिस बाहेर काढून फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवण्याचेही कामही तुळस करते. सर्दीमुळे कफ, खोकला झाल्यास त्यावर तुळस अत्यंत गुणकारी आहे. सर्दीसाठी काढा बनवताना त्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत. मासिक पाळी अनियमित येण्याच्या समस्येमध्येही तुळस खाणे लाभकारक आहे. स्मरणशक्ती वाढीसाठी लहान मुलांना तुळशीची २-३ पाने नियमित खायला द्यावीत. तुळशीमधील विषाणूनाशक गुणधर्मामुळे जखम लवकर बरी होण्यासाठी तुळस तुरटीमध्ये मिश्र करून लावली जाते. तुळशीच्या सेवनामुळे मेंदूला ऊर्जा मिळते त्यामुळे डोकेदुखीच्या समस्येतही तुळस लाभदायक आहे. तुळशीच्या नियमित सेवनाने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते परिणामी ताण तणावांपासूनही मुक्ती मिळते. असे एकना अनेक लाभ तुळशीपासून मिळतात. दर वर्षी दारात तुळशीचे लग्न लावावे असा हिंदू धर्मात प्रघात आहे. त्यामागे कथेची जोड असली तरी लग्न लावण्यासाठी का होईना, प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारासमोर तुळशी वृंदावन करून त्यात तुळस लावावी आणि वर्षभर तिचे पोषण करावे हा यामागील हेतू असावा. कारण त्यायोगे घरात प्राणवायूसह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत येत राहावा, तुळशीच्या पानाच्या नियमित सेवनाने लहान सहान आजार दूर राहावेत, कुटुंबातील सर्वांची प्रकृती सुदृढ राहावी. कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहावे जेणेकरून कुटुंबात सुख, समाधान आणि शांती कायम टिकून राहील. आपल्या प्राचीन ऋषी मुनींचे संशोधन किती उदात्त आणि अत्युच्च पातळीचे होते हे या एका उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेल. - जगन घाणेकर