श्रीराम
सामर्थ्यवान दाता राम
”मला राम भेटावा” ही कल्पना पूर्ण करण्याचे सामर्थ्य कल्पवृक्ष, कामधेनु यांच्यापाशी नाही. कुबेराचे भांडार रिकामे करून रामाची प्राप्ती होत नाही. रामाच्या कृपेनेच राम भेटतो. हे त्याचे विलक्षण सामर्थ्य आहे.
मना राम कल्पतरू कामधेनु।
निधी सार चिंतामणी काय वानु।
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।
तया साम्यता कायसी कोण आता । श्रीराम। ६०
मन कोट्यावधी कल्पना करत असते. पण जोपर्यंत ते भगवंताच्या कल्पनेत रमत नाही तोपर्यंत त्याला खरेसुख लाभत नाही. समर्थांनी ह्या श्लोकांत रामाला सर्व कल्पना-कामना पूर्ण करु शकणारा सामर्थ्यवान दाता म्हटले आहे. कल्पतरू म्हणजे इंद्र लोकातील एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ती फळतेअसे मानतात. समर्थ म्हणतात की राम असा कल्पतरु आहे.त्याच्या छायेत, त्याच्या पायाशी बसून, त्याच्यासंगतीत राहून जी जी इच्छा करावी ती ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य रामाचे आहे. कामधेनु म्हणजे आपण जेमागू ते देणारी दिव्य गाय.
रामाकडे ती दिव्य शक्ती आहे. धनाची देवता कुबेर, त्याच्या खजिन्याला ‘निधी' म्हणतात. कुबेराकडे अपार द्रव्य भांडार असते. समर्थ म्हणतात, राम स्वतःच महा द्रव्य भांडार आहेत. त्यांच्याकडे कशाचीही कमतरता म्हणून नाही. चिंतलेली वस्तु देणारा चिंतामणि नावाचा मणि असतो. राम असे चिंतामणि आहेत. त्यांना मनातले काही सांगण्याचीही आवश्यकता नाही. ज्याचे चिंतन करावे ते न बोलताही त्यांना समजते आणि त्याची पूर्णता होऊ शकते. राम हेच सार सर्वस्व आहे. त्याच्याशिवाय इतर काही नाहीच. राम सर्व सत्ताधीश आहे. त्याच्याशिवाय हे विश्व संभवत नाही. ब्रह्मांडातील चैतन्य म्हणजे राम. सृष्टीचा आदि, मध्य, अंत म्हणजे राम. सृष्टीचे वैभव, रंग, रूप, रस, गंध म्हणजे राम. तो सर्वांमध्ये व्यापून पुन्हा दशांगुळे उरलेलाच आहे. राम म्हणजेच एकमेवाद्वितीय तत्त्व. पूर्ण तत्त्व. त्याच्यासारखा केवळ तोच. सर्वांचे मूलद्रव्य तोच. सृष्टीतील चराचरात रामाचे गुण आहेत. पण संपूर्ण रामाला सामावून घेण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. कितीही महान असले तरी प्रत्येक घटकात काहीतरी अपूर्णता, कमतरता, वैगुण्य, दोष आहेत.
म्हणूनच रामाला आकाश, सागर, सूर्य यांच्या उपमा देखील अपुऱ्या पडतात. कल्पतरु, कामधेनु, चिंतामणि हे अपूर्ण सृष्टीचे घटक आहेत. म्हणून त्यांची उपमाही रामाचे यथार्थवर्णन करु शकत नाही. रामाची बरोबरी करु शकेल असे या विश्वात खरोखरच काहीही नाही. रामाचे सामर्थ्य आपल्या कल्पनेच्या पलिकडे आहे. आपल्या कल्पनेला स्थूल-दृश्य जगाची मर्यादा आहे. पण ‘राम' हे सूक्ष्म तत्त्व आहे. कल्पतरु इ. साधने नाशवंत जगातील स्थूल वस्तुंच्या कामना पूर्ण करु शकतात. पण शाश्वत समाधान देऊ शकत नाहीत. कामना पूर्णपणे शमवू शकत नाहीत. कामना-वासना निःशेष संपवून शाश्वत समाधान देण्याची सत्ता फक्त रामाची आहे. अखंड समाधान, नित्य आनंद ही स्थिती केवळ रामाच्या प्राप्तीने प्राप्त होते. त्यासाठी ”मला राम भेटावा” ही कल्पना मनात दृढ व्हावी लागते. सतत त्याचे चिंतन घडावे लागते. ही कल्पना पूर्ण करण्याचे सामर्थ्य कल्पवृक्ष, कामधेनु यांच्यापाशी नाही. कुबेराचे भांडार रिकामे करून रामाची प्राप्ती होत नाही.
रामाच्या कृपेनेच राम भेटतो.त्याची कृपा मिळवण्याची युक्ती सद्गुरु सांगतात. या श्लोकांतून समर्थांनी रामाचे अर्थात भगवंताचे विलक्षण सामर्थ्य, त्याची सार्वभौम सत्ता याचा उल्लेख केला आहे. या निमित्ताने समर्थ मनात सतत उठणाऱ्या कल्पना तरंगांकडे सावधपणे पाहण्याचा निर्देश करत आहेत. कल्पनांचा परिणाम विचारांवर, विचारांचा परिणाम वर्तनावर, वर्तनाचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो.आपले व्यक्तिमत्त्व आपले जीवन घडवते किंवा बिघडवते. म्हणूनच जीवनाचे सार्थक करायचे असेल तर कल्पनेला मुळातून वळण लावावे लागेल. तिला जगापासून दूर करून भगवंताकडे वळवावे लागेल. त्याला पर्याय नाही. जन्म-मरणाच्या चक्रातून सोडवून मोक्षाचे घबाड देऊ शकणाऱ्या रामरुपी कल्पवृक्षाकडे सर्वश्रेष्ठ रामालाच मागून घ्यावे. नाशवंत काल्पनिक सुखाच्या आड दडलेले दुःख मागण्याचा करंटेपणा करु नये. सर्व चिंता हरण करण्याचे सामर्थ्य असलेल्या रामचिंतामणिकडे चिंता उतपन्न करणारे प्रापंचिक उपभोग मागू नयेत. समर्थ स्वतः रामाकडे पूर्ण वैराग्य मागतात. ”तुझे कारणी देह माझा पडावा” हे मागणे मागतात. आपणही आपले संपूर्ण कल्याण मागून घ्यावे एवढ्यासाठीच समर्थांनी एकमेवाद्वितीय रामाचे अतुलनीय सामर्थ्य वर्णन केलेआहे.
-जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर