मतदान करा..फरक पडतोय!

आपले, आपल्या कुटुंबाचे मत नोंदवणे, मतदार यादीत आपला मतदार म्हणून नाव नोंदवणे,ही प्रक्रिया सुलभ झाली आहे,ऑनलाईन पद्धतीने देखील त्यात दुरुस्ती आणि पुनर्रचना करून आपण देशासाठी एक पाऊल पुढं टाकून.. पाऊलवाट निर्माण करू शकतो.

     सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ साठी येत्या २० तारखेस संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मतदान होत आहे. भारतीय लोकशाहीने मतदारास जे बहुमोल असे मतदान कर्तव्य, हक्क दिला आहे, ते पवित्र कार्य सर्व मतदारांनी मतदान करून पार पाडले पाहिजे. ग्रामीण भागात होणारे मतदान प्रमाण हे शहर विभाग पेक्षा अधिक असल्यानं शिक्षणाने, हक्क जाणीवा..या आपल्या वागण्यातून दिसायला हव्यात; मात्र सुशिक्षित मतदार यांच्या कडून उणीवा उघड होत असल्याने आपण शिक्षित आहोत मात्र सुशिक्षित आहोत की नाही? हा प्रश्न निर्माण होतो.  

    मतदान न करता मतदार हा देशातील प्रश्नांवर नैतिकतेच्या गप्पा नाही मारू शकत. स्वतः मतदान प्रक्रिया सुरू करा, त्यांचा एक भाग व्हा आणि नंतर सोफा सेट वर बसून चर्चा ठोका, असे वाटते.

         एकतर आता सुदैवाने सर्व पक्ष आणि उमेदवार हे आपला अजेंडा जाहीर करून मतदार यांच्या समोर येत असतात, आपणास पसंद असलेला पक्ष, उमदेवार निवडणे किंवा आपले मत विकासाला, देशाला आणि काही विचार जे देश हा मजबूत करण्यासाठी आहेत, त्यावर आपण मतदान करून शिक्का मारणं हे आपले कर्तव्य आहे, ते निभावले पाहिजे. निवडणूक कामात असणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे देखील, पोस्टल मतदान करण्याचे प्रमाण खूप कमी आहे, ही चिंता करण्यापेक्षा शिस्तभंगाची कारवाई करण्याची बाब आहे, असे मला वाटते. एक तर भविष्यात सरकार आणि निवडणूक आयोगास मतदान प्रक्रिया आणि काही योजना यांची सांगड घालून ते सक्तीचे कसे होईल, हे करावे लागेल. सरकारी योजना, नोकरीच्या ठिकाणी असणारी पगारवाढ यांचा देखील सहसंबंध आणून मतदान कसे आधिक होईल, ते बघणे मजबूत विकास आणि राष्ट्र समृध्दीसाठी हिताचे आहे.

       १९५१ पासून ते आज पर्यंत निवडणूक आयोगाने जे काही मतदान प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यासाठी विविध बदल केले आहेत, त्यांचा फायदा घेणे गरजेचे आहे. वृध्द नागरिकांसाठी घरून मतदान करण्याचा पर्याय हादेखील कौतुक करण्यासारखा मुद्दा आहे. मतदान केल्याने आपल्या मनाच्या, पसंद असलेल्या लोकप्रतिनिधी यांना मतदान केल्याने एक सहसंबंध निर्माण होऊन, तो प्रतिनिधी, त्याने केलेला विकास, घेतलेले निर्णय हे आपल्या एकट्यासाठी नसतात तर सार्वत्रिक विकासासाठी असतात. मतदार प्रतिनिधी मग ते सरपंच, नगरसेवक,  आमदार, खासदार असतील तरी सर्व मतदार क्षेत्रांचे असतात. एकूण ७० % मतदान झाले,त्यात जर ३६ % मतदान प्राप्त करणारा आमदार, खासदार झाला तरी त्यास उरलेल्या ३४ % लोकांचा नव्हें तर ३० % मतदारांनी मतदान केले नाही, त्यांचादेखील विचार करून..१०० % मतदारांचे कळत न कळत तो उमेदवार प्रतिनिधित्व करत असतो, हे लक्षात घेऊन टीका टिप्पणी करावी लागते. कोणताच प्रतिनिधी हा आपल्या व्यक्तिगत धोरणासाठी नसतो, हे लक्षात ठेवले तर आपणास राजकारणाचा उबग न येता..समज मिळू शकतो.

    आपले, आपल्या कुटुंबाचे मत नोंदवणे, मतदार यादीत आपला मतदार म्हणून नाव नोंदवणे,ही प्रक्रिया सुलभ झाली आहे, ऑनलाईन पद्धतीने देखील त्यात दुरुस्ती आणि पुनर्रचना करून आपण देशासाठी एक पाऊल पुढं टाकून.. पाऊलवाट निर्माण करू शकतो. तरुण हा खूप या प्रकियेतील महत्वपूर्ण घटक आहे, नेमका या तरुणांचा राजकारण म्हटलं की ..होणारा आकस हा सकस न वाटता, भकास भासतो. तरुणास यात सहभागी होणं आवश्यक आहे, त्यांच्याविना पुढील पिढ्यांना जोडणारा दुवा निर्माण नाही करता येणार.”माझ्या एका मताने काय फरक पडतोय?”, ”मला काय त्याचे?”, ”आपण ना, राजकारणापासून लांबच लांब राहतो!,” ”कुठं राहिली नैतिकता,तर मी मतदान करू?”, ”मी दिलेले मत नाहीतरी वाया जात की राव!” असले विचार आपणास नकारात्मक भावना निर्माण करून आपले आणि आपल्या भोवतालचे वातावरण दूषित करत असतात.  

     देशाचा आजपर्यंत झालेला विकास हा मत पत्रिकेतूनच झाला आहे, ज्यांनी कुणी आपला देश प्रगतीपथावर आणला आहे, देशातील अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, समता, बंधुता आणि जी गगनभरारी घेतली गेली आहे, त्या मागे कुणीतरी मत दिले, म्हणून त्या प्रतिनिधी यांनी ते, ते धोरण अवलंबून देशासाठी कार्य केले आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. चला मतदान करू या, विकू नये.. त्यातून आपणच आपले मूल्य कमी न करता, आपले मत बहुमोल आहे, हे सिद्ध करून, मतदार राजा हा इतरांना राजा करण्यासाठी नसून, स्वतःला हवा तो जन सेवक, राष्ट्र सेवक निवडून देशाला लोकशाहीतून आदर्श शिव विचार प्रमाणे स्वराज्य, सुराज्य निर्माण साठी, मत देणे गरजेचे आहे.
- प्रा.रवींद्र ऊ.पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्रीराम