निवडणूक : खेळ बाजारबुणग्यांचा!
नुकतीच दिवाळी संपली आहे. फराळाचा हंगाम संपला आहे. रोषणाईचा रोषही आवरता घेण्यात आला आहे. फटावयाचे धुमधडावयाचे आवाज संपले असले, तरी आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका आल्याने, नेत्यांचे, विधानसभा इच्छुक उमेदवारांचे एकमेकांविरोधातील फटाके सुरु झाले आहेत.
आपल्या महाराष्ट्राला देशात मोठे स्थान आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटीपेक्षा जास्त आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मोठे स्थान आहे. युपी नंतर महाराष्ट्राचेच खासदार जास्त आहेत, तसे आमदारही जास्त आहेत. म्हणून राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राकडे केंद्राचे जास्त लक्ष असते. महाराष्ट्र जसा राजकीयदृष्ट्या मोठा आहे, तितकाच तो संत परंपरेच्या दृष्टीनेही देशात फार मोठा आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, संत रामदास, संत शेख मोहमद, संत गोरा कुंभार, संत रविदास, संताची ही परंपरा २० व्या शतकापर्यंत संपत आली होती, पण विसाव्या शतकात श्री नारायण गुरु व संत तुकडोजी महाराज असे अपवादात्मक संत उदयास आले व त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत लोकजागृतीचे मोठे काम केले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्याच वेळेला गाडगे महाराज यांचेही कार्य मोठे आहे. त्यांच्याच पुढाकारांने महाराष्ट्रात प्रथम स्वच्छता अभियान सुरू झाले व पुढे त्याचा विस्तार देशभरात पसरला. पुढे मोदीनी त्या मोहिमेला स्वतःच्या खिशात टाकून घेतले व त्याला नाव दिले. ‘स्वच्छ भारत' हे नाव त्यांनी गांधीजीच्या चश्म्यातून दाखवून दिले. चष्म्याच्या एका गोलावर ‘स्वच्छ' हे शब्द तर दुसऱ्या गोलावर ‘भारत' म्हणजेच जिथे स्वच्छ आहे, तिथे भारत नाही आणि जिथे भारत आहे तिथे स्वच्छता नाही. असाच काहीसा प्रकार पहायला मिळतो आहे.
ज्या ज्या संतानी गावांगावात फिरून स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी ‘ग्रामीण गीता'ची रचना केली, त्यांनी जाती व्यवस्थेविरूद्ध बिगुल फुंकले, हिंदू-मुसलमानातील भेदभावाला विरोध केला. त्यांनी लोकांना मुर्तीपुजा व कर्मकांडापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तर आपल्या मातीशी व देवाशी जोडण्याची शिकवण दिली. त्या काळात विश्वशांती परिषदेसाठी, संत तुकडोजी महाराज जपानलाही जाऊन आले. त्यांच्या या कार्याची दखल तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनीही घेतली. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना तुकडोजी महाराजांची ‘भजने' आवडली. त्यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्र संत ही उपाधी बहाल केली. पुढे १९६८ साली तुकडोजी महाराजांचे निधन झाले. त्यांच्या शिष्यवृंदानी त्यांना देवाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही.
आज देशात हजारो बोगस संत आपल्याला पहायला मिळतात, त्यापैकी अनेकजण आजही केदेत जिवन जगत आहेत. आजचे लोक भोंदू बाबाच्या मागे नुसते धावताहेत, त्यांचे काळे कारनामे उघड झाले, तरी लोक त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत आहेत, कारण आजची तथाकथित साधू-संत मंडळी लोकांना गोड-गोड बाता मारुन गुंगवून ठेवतात. याउलट तत्कालीन तुकडोजी सारखे संत आपल्या सत्य व कडव्या भाषेचा वापर करत, तरीही समजूतदार लोक त्यांना सोडून जात नसत. उलट आजचे तथाकथित व स्वयंघोषित संत लोकांमध्ये जाती-पातीचा भेदभाव वाढवत आहेत व स्वतःचे साम्राज्य उभे करत आहेत.
सध्या देशात जाती व्यवस्थेची बीमारी वाढत आहे आणि आजचे राजकारणी त्याला चालना किंवा बळकटी देण्याचे काम करत आहेत. त्यांचा डोळा फवत मिळवणाऱ्या मतांवर आहे. मते मिळवून निवडून यायचे व सत्ता हस्तगत करुन, मनमुराद पैसा लुटायचा एवढाच सध्याच्या राजकारण्यांचा मानस आहे. आजच्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही. राजकारण्यांना वाटते, मतदारांचे काय, त्यांना खरेदी करणे अवघड नाही, साम, दाम, दंड-भेद ही चारही अस्त्रे राजकारण्याच्या भात्यात आहेत. त्याचा वापर गरजेनुसार केला जातो व राजकारणी आपला फायदा करुन मोकळे होतात. तर पाखंडी व भोंदू बाबा आपले साम्राज्य वाढवत आहेत. म्हणूनच समाजाचे व देशाचे वाटोळे होताना आपल्याला पहावे लागत आहे. समाज परिवर्तनाची धार कमी होतांना दिसत आहे.
वास्तविक पाहता स्वतंत्रता आणि स्वायतता, हे लोकशाहीचे आधार राहिलेले आहेत. ते आधार आज कुठे तरी कमजोर झालेले आहेत. एन डी ए सरकारकडून लोकांना अपेक्षा होती की, मोदी सरकार कमीत कमी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दखलअंदाजी (लुडबूड) न करता बौद्धिक गतीविधीना स्वातंत्र्य देईल, पण तसे काही झाले नाही. लोकांच्या प्रती सरकारला काहीही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे.
आता फवत परस्परात ईर्षा आणि क्रोध सुरु आहे. पूर्वीच्या काळात नेते आणि समाजसुधारक म्हणायचे, ‘सहन करणे शिका, मिळून-मिसळून राहणे शिका, गांधीजीही नेहमी म्हणायचे सहनशीलता वाढवा. आता शांती-अहिंसेला लोकांना विसरायला भाग पाडले जात आहे. त्यामुळे देशातील, कायदा आणि व्यवस्था बिघडत चालली आहे. न्याय व्यवस्थाही ठप्प आहे. कायद्याची व पोलिसांची भीती लोकांना वाटत नाही. देशात एवढी मोठी पोलिस यंत्रणा आहे, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालये आहेत, पण ही सर्व यंत्रणा जाग्यावर ठप्प आहे. गुन्हेगारांचा बचाव करण्यासाठी राजकीय पक्ष व त्यांचे नेते तत्पर आहेत. गुंडाच्या या ताकदीवर राजकारणी मस्त आहेत, मनी पावर आणि मसल पावरच्या जोरावर सत्ताधारी बेफिकीर आहेत. पूर्वीच्या काळात राजकारण हे समाजकारण करण्यासाठी होत असे. आज राजकारण फवत सत्ता व पैसा मिळवण्यासाठी खेळले जात आहे. त्यासाठी राजकारणी लोक कोणत्याही थराला जायला तयार आहेत. ही मंडळी तोडा-फोडा व फायदा मिळवा असा विचार करुन वागताना दिसतात. याबाबतची गोष्ट सांगावीशी वाटते.
एका गावात दोन मांजरांनी एका घरातील लोणी चोरले, या लोण्यापैकी कोणाला किती? यावरुन वाद सुरु झाला. वाद शिगेला पोहोचला, त्यांच्यात वादावादी सुरु झाली. ही वादावादी दूरुन एक माकड पाहत होते. माकड त्यांच्याजवळ पोहोचले व म्हणाले,‘तुम्ही दोघे कशाला भांडता आहात? मांजरांनी भांडणाचे मुळ सांगितले. माकडाने युवती सांगितली, ‘तुम्ही दोघेअर्धे-अर्धे लोणी वाटून खा, पण त्यासाठी तुम्हाला एका तराजूची गरज लागेल! मांजरांनी तराजूचीही व्यवस्था केली. माकडाने लोण्याचा काही भाग एका पारड्यात टाकला, दुसरा भाग दुसऱ्या पारड्यात टाकला व तराजू उचलला, ज्या पारड्यात लोणी जास्त होते ते पारडे खाली आले, माकडाने त्यातील मोठासा गोळा तोडून आपल्या तोंडात टाकला. ज्याचा तुकडा तोडला ते पारडे हलके झाले, दुसरे जड झाले, माकडाने त्या जड पारड्यातील लोणी काढून पुन्हा आपल्या तोंडात टाकले, असे करता करता दोन्ही पारड्यातील लोणी माकडाने फस्त केले व मांजरांना काहीच उरले नाही. ते एकमेकांकडे पहात राहिले व माकड तेथून पसार झाले. यालाच म्हणतात ‘दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ.'
असाच काहीसा प्रकार या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळणार आहे. राज्यात निवडणूकीच्या संदर्भाने निर-निराळ्या आघाड्या आहेत. त्यांच्यातील तिकीट व जागा वाटपासंदर्भात एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे जवळपास सर्वच जागावर अनेक उमेदवारांत चूरस आहे. मुख्य पक्ष वगळता अनेकजण अपक्षरित्या निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला धोका निर्माण झाला आहे. बंडखोरांनी मुख्य उमेदवारांची झोप उडवली आहे.
प्रश्न असा आहे की, अशी बंडखोरी का होते? तर त्याचे उत्तर आहे, मुख्य उमेदवारांकडून माघार घेण्यासाठी पैसा उकळणे, जर पैसा मिळाला नाही तर फारसे नुकसानही नाही, याला म्हणतात, ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.'
गत काही वर्षापासून नेत्यांचा अहंकार वाढला आहे. त्याचबरोबर नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराचा विकारही वाढला आहे. या विकाराने नेत्यांकडे अमर्याद पैसा येत आहे. फुटकळ नेत्यांपासून ते मोठ्या नेत्यांच्या संपत्तीत कल्पनेबाहेर वाढ झाल्याची आकडेवारी नुकतीच प्रसिध्द झाली होती. ती पाहता ‘जनता कंगाल..नेता मालामाल' अशी स्थिती आहे. म्हणूनच ही मालदार मंडळी कोणालाही जुमानत नाहीत.
निवडणूकीत कोणीही जिंको अथवा पराभूत होवो, नेते मंडळी जनतेचे आभार मानायचे. आता ती परंपरा संपुष्टात आली आहे. हरलेली मंडळी कोणाला ना कोणाला दोष द्यायला मोकळी आहे. यालाच म्हणतात ‘नाचता येईना अंगण वाकडे'
निवडणूका आल्या की, नेत्यांचे पक्ष बदलतात, मित्र बदलतात तर कार्यकत्यार्ंची तारांबळ उडते. काम कोणाचे आणि कसे करावे? असो असेच चालत राहणार. जनता स्वतःच्या नशीबाला दोष देणार! -भिमराव गांधले