राज ठाकरे : वैचारिक गोेंधळाचे मानकरी
राज ठाकरे यांच्या दिसण्याचे, बोलण्याचे, वक्तृत्वाचे वलय सभेला, प्रसारमाध्यांना आकर्षित करते, कारण आव्हान देणारे प्रश्न विचारून आपल्या वाढीव टीआरपी ची तजवीज प्रसारमाध्यमे करत असतात. २०२४ ला महायुती सरकार आले तर त्यात सत्तेचे भागीदारी होण्याचा मानस असला तरी आपला शिंदे, अजित पवार होणार नाही ह्याची दक्षता घेण्याची क्षमता आहे काय ?
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, अण्णा हजारेंच्या उदात्त विचाराने भारावलेला असा अरविंद केजरीवालसारखा सनदी अधिकारी आला त्याने पाहिले आणि बघता बघता त्याने आपल्या अतुलनीय र्कायसिद्धीने, देशहिताच्या विचाराने लोकांची मने जिंंकत काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना चारीमुंड्या चितपट केले. दिल्लीवर आम आदमी पार्टीचा झेंडा डौलाने फडकावला. अल्पावधीत जर केजरीवाल करू शकतात तर ज्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर शिवसेनेचा घोडा महाराष्ट्रभर उधळत ठेवला ते राज ठाकरे वैचारिक मतभेदामुळे स्वतःचा मनसे नावाचा पक्ष काढून दशक उलटून गेले तरी स्वतःची ब्लु प्रिंट व्हिजन राबवू शकले नाही.
सभेला प्रचंड गर्दी जमते; पण त्याचे रूपांतर मतदान पेटीत दिसून येत नाही, ह्याचा कधी सखोल विचार केला असला तरी त्यात प्रगती का होत नाही? ह्याचा विचार केला तर सुपारीबाज, टोलचा झोल, नकलाकार अशी शेलकी विशेषणे लागली तरी त्यावर कधी ठामपणे खुलासा केला नाही. मातोश्रीवर जशी संधीसाधू राजकीय नेत्यांची मांदियाळी लागायची तोच प्रकार राजगडावर पाहायला मिळाला. त्याचा राजकीय फायदा राज ठाकरे यांनी किती उचलला हे गुपित असले तरी ज्या मनसैनिकांवर खोट्या केसेस, तडीपार नोटीस, मानसिक दबाव अश्या अनेक घटनाचे किती प्रश्न सोडवले हे अजूनही गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांच्या विचाराने भारलेले कट्टर नेते संधिसाधून पक्ष खिळखिळा करून सोडून का गेले ह्याचे परीक्षण केले असले तरी त्यावर तोडगा का निघत नाही? राज ठाकरे मोदी, शहांची खिल्ली उडवायचे आता पाठराखण का करतात. लोकसभा निवडणुकीत मोदींनी न मागता बिनशर्त पाठिंबा देऊन स्वतःच्या पक्षातील दिग्गज नेत्यांची राजकीय ससेहोलपट केली. मोदींचा देशाला मित्रांना मदत करत ये बेच, वो बेचो करत पार रसातळाला नेणारे निर्णय राज ठाकरे याना गुलाबजाम वाटले काय ? भर जाहीर सभेत मला एक संधी द्या, मी महाराष्ट्राचा कायापालट करतो अशी ग्वाही देऊन सत्ता स्थापनेसाठी विनवणी करायची, उमेदवार कमी उभे केले हे विसरून गेले काय ? येत्या निवडणुकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे सांगून सत्तेत आम्हालाही वाटा मिळावा म्हणून मखलाशी केली काय ?
राज ठाकरे गुजरात मॉडेल बघून आले. तोंडभरून मोदींची जाहीर प्रशंसा केली. ते दिल्लीत अमित शहाना भेटले. केजरीवाल यांनी दिल्लीचा कायापालट कसा केला ते पाहायला परदेशी पाहुणे, नेते येतात पण राज ठाकरे सदिच्छा भेट द्यायलासुद्धा गेले नाहीत. ह्याला राजकीय अपरिपक्वता म्हणायची कि राजकीय अहंकार? राज ठाकरे यांचा विस्कटलेला भक्कम मराठी मनगटाचा पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या उबवणार की, लांगुनचालन करणाऱ्या पक्षांना मोठे करत फक्त पाठिंबा देत राहणार ह्याचा विचार करत नसावा. पक्ष कितीही भक्कम वाटत असला तरी राज ठाकरे हे भरकटलेल्या दीपस्तंभासारखेच राहणार असेच दिसते. राज ठाकरे यांच्या दिसण्याचे, बोलण्याचे, वक्तृत्वाचे वलय सभेला, प्रसारमाध्यांना आकर्षित करते, कारण आव्हान देणारे प्रश्न विचारून आपल्या वाढीव टीआरपी ची तजवीज प्रसारमाध्यमे करत असतात. २०२४ ला महायुती सरकार आले तर त्यात सत्तेचे भागीदारी होण्याचा मानस असला तरी आपला शिंदे, अजित पवार होणार नाही ह्याची दक्षता घेण्याची क्षमता आहे काय ? मोठ्ठा मासा छोट्या माश्याला कधीही गिळंकृत करू शकतो तर त्यावर मात करण्याची क्षमता आहे काय? सध्या महाराष्ट्रात महायुती किवा महाआघाडीचेच सरकार येऊ शकते ह्याचा विचार करता २०२९ ला महाराष्ट्रावर मनसेचीच सत्ता येणार ही गर्जना केली. त्यासाठी प्रशांत किशोर, अरविंद केजरीवाल ह्यांचा मोलाचा सल्ला घेऊन प्रयत्न करायला हरकत नाही. मराठी मुद्दा, खळ्ळ खट्याक हीसुद्धा सामाजिक गरजेची आहे. भविष्यात राज ठाकरे यांनी कर्तृत्व सिद्ध केले नाही तर ते राजकारणात चेष्टेचा विषय होतील ती वेळ राज ठाकरे यांनी स्वतःवर आणून देऊ नये हीच सदिच्छा. - यशवंत चव्हाण