नेव्हर से डाय !
एका संध्याकाळी मी आणि माझा मित्र शिवाजी पार्कात फेरफटका मारत असता ”आनंद अरे आनंद” अशी जोरात हाक ऐकु आली ओळखीचा आवाज वाटला म्हणून मी वळून पाहिले. माझा तीस वर्षांपूर्वीचा कॉलेज मित्र गावडे होता. मी त्याला लांबूनच ओळखला. ”अरे साल्या आनंद आनंद म्हणून कोकलतोय”. मध्येच थांबवत त्याला म्हटले..”अरे आनंद अशी हाक मारणारा माझ्या आयुष्यात तुच एकटा मित्र आहेस आणि कॉलेज सोडून तीस पस्तीस वर्ष झाली आनंद म्हणून कुणी मला हाक मारलीच नाही.” सोबतच्या मित्राने मला विचारले, ”तुझी नावेतरी किती रे राजा, राजन देसाई. तो परवा दुसरा कॉलेजचा मित्र भेटला त्याने तर तुला मुळू म्हणून हाक मारली. आता आनंद काय प्रकरण आहे?” गावडेने माझ्या मित्राचे शंका निरसन केले. ”अरे यार हा माझा मित्र कॉलेजमध्ये असताना फेमस शंभर मित्रांमध्ये असायचा. म्हणजे त्यात अर्ध्या मैत्रीणीसुध्दा असायच्या. हसरा चेहरा पाहिला का मला आनंद वाटायचा. मग मी एक दिवस यांचे नामकरण आनंद करून टाकले. मस्त यार आनंद.” मी म्हटलं. ”अरे तो राजेश खन्नाचा आनंद नाही ना !” ”नाही यार, आनंद बस और कुछ नही. चल बऱ्याच वर्षानी भेटतोय. चल एक एक कटींग चहा मारु त्यानिमित्त मस्त गाणी मैफील जमेल.” कटींग चहा आणि कॅन्टीन परिसर यावर सारे कॉलेज जीवन व्यतीत केलेले एन्जॉय केले. पुन्हा त्या रोमॅन्टीक आठवणीत रमलो ती धमाल, ती लफडी, काही जुळलेली काही जुळवलेली, काही घडलेली, काही बिघडलेली, काही फजिती, मारामाऱ्या, खुन्नस बापरे किती गोष्टी! इनमीन चार वर्ष; पण आयुष्यातलं एक मोठे शिखर गाठल्यासारखं वाटायचं. ज्याने कॉलेज लाइफ एन्जॉय काही केल नाही तो खऱ्या आनंदाला मुकला असे म्हणावेसे वाटते. ज्याला लेखक व्हायच आहे त्याने नुसत्या बालपणीच्या शाळेतील निष्पाप आणि कॉलेज जीवनातल्या रोमॅन्टीक आठवणी लिहून काढायच्या कमीत कमी पन्नास पाने सहज भरतील. असो. गप्पा रंगल्या होत्या चहा संपला होता. अचानक माझ्या केसांकडे त्याच लक्ष गेले. ”अरे यार, कॉलेजमध्ये असताना काय तुझे केस होते. हा चंद्र कसा ठोकावला चांदीमुध्दा चमकते” मी म्हटलं..”जाऊ देरे चालायचंच.”
गावडेने माझा निरोप घेतला जाताना म्हणाला, ”आनंद लवकरच पुन्हा भेटू.” जाताना माझा मोबाइल नंबर घेतला बाइकला किक मारून सरकन निघून गेला. तो गेला; पण माझी पावले थबकली होती गतकाळच्या स्मृतींना आठवत मी तसाच रेंगाळलो होतो.
सोबतच्या मित्राने पाठीत थाप मारली आणि म्हटले, ”अहो आनंदराव, चला.” मी भानावर आलो त्याच पावली निघालो. बरेच दिवस गेले. एके दिवशी घरातील आरशात डोकावले गावडेचा चेहरा समोर आला. आता झुलपे कमी झाली होती. त्यातून काही पांढुरके डोकावत होते. वयाची साठी गाठल्याची जाणीव झाली. तसाच बाहेर पडलो जवळच्या एका केमिस्टकडे गेलो. एक चांगला हेअर डाय देण्याची सुचना केली. घरी आली पाकीटावरील सुचना वाचल्या आणि एका बशीत ते मिश्रण कालवले. थोडा वेळ सुकायची वाट पाहिली आणि मग तासाभराने धुऊन टाकले आणि आरशात न्याहाळले. केस काळेभोर दिसू लागले होते. मस्त वाटले फ्रेश! चला बाहेर फेरफटका मारुया, या उद्देशाने माझ्या नेहमीच्या मित्राला फोन केला. चला मस्त पार्कात फेरी मारून येऊ तोही माझी आज्ञा शिरसावंद्य मानुन घरी आला. पाहिल्यावर तो उडालाच. ”सा..या सोळा वर्षाच्या वाटतोस.” मन आणखी उडया मारु लागलं. पार्कात राउंड मारताना सूष्टीसौदर्य न्याहाळताना कॉलेज जीवनातल्या वासुगिरीने पुन्हा उसळी घेतली होती. मनातल्या मनात देव आनंद, शम्मीची गाणी गुणगुणाबीशी वाटली आणि फेरफटका मारताना पुन्हा हाक ऐकु आली आनंद माझा मित्र गावडे पुन्हा समोर आला माझ्या केसाकडे पाहत म्हणाला.. ”तु खरा आनंद आहेस. खरंच तु ग्रेट आहेस यार. जीवनात संकटे आली; पण बिनधास्तपणे सामोरे गेलास. खरंच हा आनंदाचा डोह हाती लागला आहे तो आटू देऊ नकोस.” खरंतर हा करिश्मा त्या ‘डाय' ने केला होता. ‘डाय' शब्द कसातरी वाटतो. मंडळी, ‘डाय' म्हणजे केसाला लावायच्या नुसता तो रंग नसुन जीवन खऱ्या अर्थाने जगण्याचं रसायनच आहे. त्या रसायनाने मला तरुण बनवलं होतं. रोमँन्टीक बनवलं होतं. मनावर आलेली अकाली वार्धक्याची, पोक्तपणाची खोटी जळमटे झटकुन एक उर्मी जगवणारे रसायन मिळाले होतं. तो शब्द जरी ‘डाय' असला तरी एकदा का केसावर चढवला की मन आपसुकच म्हणते नेव्हर से डाय. मंडळी प्रत्येक गोष्टीत काहीतरी गमंत लपलेली असते. त्यातुन प्रत्येकाने आनंद आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवन जगण्यांच हे एक मोठ गुपित त्या ‘डाय' ने उलगडुन दाखवर्ले होतं. तेव्हा अगदी शेवटपर्यंत म्हणा... नेव्हर से डाय. - राजन वसंत देसाई, दादर