श्रीलंका : एक नंदनवन

 पूर्ण श्रीलंकेची लोकसंख्या फक्त दोन कोटी आहे. कोलंबो सोडून, कुठेच इमारती नाहीत. अनुराधापूर, सिगिरिया किल्ला, गाला नॅशनल पार्क अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे तसेच अनेक वालुकामय किनारे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पौराणिक स्थळे, धबधबे, सरोवरे श्रीलंकेत आहेत.

‘लंकेच्या तिरी सोन्याच्या विटा' ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आले होते. तसेच श्रीलंका एक भारताचा शेजारी आणि  श्रीलंकेचा असलेला रामायणाशी संबंध, या सर्व गोष्टींमुळे मला श्रीलंका पाहायची इच्छा होतीच.  दरवर्षीप्रमाणे लायन्स डिस्ट्रिक्टने  श्रीलंकेची इंटरनॅशनल ट्रीप १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली होती. यावर्षी मी पुन्हा एकदा आमच्या लायन्स क्लबची प्रेसिडेंट झाल्यामुळे या सहलीमध्ये सहभागी होण्याचा योग आला.  

     आम्ही १७ ऑक्टोबरला सकाळी कोलंबोकडे जाणाऱ्या विमानामध्ये बसलो. श्रीलंका ( सिंहली) जुने नाव ‘सिलोन' भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस  द्वीप देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्या दरम्यान ३१ किलोमीटर रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी आहे. विमानामध्ये बसल्यावर, रामाने सीतेला सोडवून आणण्यासाठी, त्यावेळी भारत आणि श्रीलंकेला जोडणारा वानरसेनेने तयार केलेला अद्‌भुत सेतू कसा असेल? हे श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून पुढे पसरलेल्या  हिंदी महासागराकडे पाहिल्यावर मनात मोठा प्रश्न निर्माण झाला. श्रीलंका हे उष्ण कटिबंधातील, नंदनवन आहे. जे बाराही महिने हिरवेगार पर्जन्यवन, वन्यजीव आणि  सोनेरी किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही कोलंबो विमानतळावर पोचल्यावर, तिथे आमचे स्वागत, श्रीलंकन परंपरेनुसार गळ्यात चापयाच्या फुलांच्या माळा घालून केले. तिथून आम्ही व्हिडिओ कोच बसमधून हॉटेल गुडवूडमध्ये आलो. त्यांनी आमचे स्वागत ींग्ंदैह या शब्दाने केले. याचा अर्थ नमस्कार किंवा लाँग लिव्ह. तिथे उत्तम व्हेज नॉनव्हेज घेऊन, आम्ही आमचे नियोजित हॉटेल सीनामनबेला पोहचलो. ते हॉटेल बेरूवला या ठिकाणी होते. ती श्रीलंकेतील सगळ्यात चांगली प्रॉपर्टी होती. हॉटेल समुद्र किनाऱ्यालाच लागून असल्यामुळे, फोटोसेशनसाठी खूप छान नजारे होते. फाईव्ह स्टार हॉटेल असल्यामुळे, जवळजवळ ३०० पदार्थ होते. आम्ही पाचही दिवस फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिल्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ होती.

 बाथरूममध्ये आंघोळ करताना, एका वेळेला पाच शावर्सचे पाणी अंगावर पडत होते. त्या आंघोळीची मजा लुटताना, मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली. ज्या देशात आपण आपल्याकडे पैसे असल्याने, जी मजा करतो, त्याच देशातील लोकांवर २०२२ साली, खाण्यापिण्याची पंचायत व्हावी? त्यावेळी भारताने श्रीलंकेला अन्नधान्याचा पुरवठा केला होता. आपल्या भारतातही पराकोटीची आर्थिक विषमता आहे.  क्षणभर मनात आलेले विचार झटकून टाकावे लागले.  बेनटोटा बीच  हा नैसर्गिक  जलतरण तलाव असलेला शांत समुद्र आहे.  ह्या समुद्र किनारी अनेक लोक उथळ पाण्यात, समुद्राच्या लाटांचा आनंद  घेत होते. इथली सोनेरी वाळू पायाला चिकटत नव्हती. समोर पसरलेला हिंदी महासागर डोळ्यांना सुखावत होता. इथल्या मधु नदीमध्ये आम्ही स्पीड बोट, बनाना बोट, स्कूटर बोटवर बसून वॉटर स्पोर्ट्‌स थ्रीलचा अनुभव घेतला. त्यानंतर बेनटोटा नदीवरचा बोट क्रूजचा अनुभव विलक्षण होता. नदीच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे, खाररफुटीची जंगली होती. या खारफुटीच्या जंगलातून बोट जाताना, वेली वेलींच्या गुंतवळ्यांतून जाताना अद्‌भुत वाटलं. पुढचा संपूर्ण प्रवास करताना, रस्त्याच्या दुतर्फा घनदाट हिरवी झाडी  आणि हिरव्या गवतांनी भूप्रदेश व्यापला होता. नारळ, चहा, रबर, मसाल्याचे पदार्थ ही श्रीलंकेची प्रमुख पिके आहेत. डोंगर उतारावर, चहाच्या मळ्यांचे गालीचे पसरले होते. पुढे डोंगरावर उंच उंच पाईन आणि रबराचे झाडे जणूकाही आकाशाला भिडण्याची स्पर्धा करत होती. जिकडे तिकडे हिरवा रंग डोळ्यात भरत होता. जमिनीचा इंच न इंच भाग हिरवाईने नटला होता.

नंतर पुढच्या दिवशी, आम्ही पिन्नावाला हत्ती अनाथालय पाहायला गेलो. तिथे श्रीलंकेच्या जंगलात सापडलेले ७० अनाथ हत्ती आहेत. काही हत्ती जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. सर्व हत्तींना पिंजऱ्यात न ठेवता  मोकळे सोडले आहे. त्यांना रहायला खास गोठेसुद्धा बनवले आहेत. हत्तींच्या दिनक्रमांचे नैसर्गिक वेळापत्रक होते. ते ठराविक वेळेलाच खाणार, नदीवर अंघोळीला जाणार, हे सर्व पाहताना गंमत वाटली. जशी हत्तींची काळजी घेतली जाते, तशीच  कासगोडा येथे टर्टल हॅचरीमध्ये कासवांची काळजी घेतली जाते. कोळ्यांच्या जाळ्यात जखमी झालेले विविध कासव, त्याचप्रमाणे समुद्रकिनाऱ्याला लागलेले जखमी कासव यांच्यावर योग्य ते उपचार करून पुन्हा त्यांना समुद्रात सोडले जाते. समुद्रकिनारी कासवांनी घातलेली अंडी एकत्र करून ती वाळूमध्ये एक फुट आत पुरतात. नंतर ४५ दिवसांनी अंडी फुटली की आपोआप त्यातील पिल्ले वर येतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कासवांची पैदास करून त्यांना समुद्रात सोडले जाते. पुढे आम्ही सुसांथा स्पाइस आणि हर्बल  गार्डनला भेट दिली. तिथे वेगवेगळ्या वनस्पतींपासून बनवलेली हर्बल औषधांची माहिती तिथल्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिली. श्रीलंकेमध्ये विविध औषधी वनस्पती सापडतात. साहजिकच तिथे आयुर्वेदिक औषधे मोठ्या प्रमाणात तयार केली जातात. मधुमेहासाठी, सांधेदुखी, वजन कमी करण्यासाठी, त्वचा व इतर रोगांसाठी असलेल्या औषधांची खरेदी आम्ही सर्वांनी केली. दालचिनीच्या झाडाच्या खोडापासून दालचिनी कशी काढतात याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले.

      श्रीलंका विविध रंगाच्या अनमोल खड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही कँडी शहरातील प्रसिद्ध जेम गॅलरी पाहायला गेलो. हे मौल्यवान खडे कसे बनवले जातात, याचा व्हिडिओ आम्ही पाहिला. हे मौल्यवान खडे काढण्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागतात, त्याचा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आले. प्रथम हे मौल्यवान खडे जमिनीत कोठे आहेत? ते शोधले जाते. वीस मीटर खोल जमिनीतून थोडी माती काढतात. त्यात जर मौल्यवान खडे असतील तर, मोठा दोन मीटर रुंद व दोन मीटर लांब खोल खड्डा खणून ते मौलवान दगड बाहेर काढतात. त्यानंतर ते फोडून त्यावर प्रक्रिया करून, त्यांना हवा तो आकार देऊन, त्यांचे दागिने तयार करतात. साहजिकच त्यांच्या किंमती अफाट असतात. सामान्य माणसाला परवडणाऱ्या नसतात. आमच्यापैकी फारच थोड्या लोकांनी ते मौल्यवान खडे व त्यांचे दागिने खरेदी केले.

 श्रीलंके सत्तर टक्के लोक हे बौद्ध आहेत. १५ टक्के लोक हिंदू आहेत व बाकीचे राहिलेले मुस्लिम व ख्रिश्चन आहेत. येथील हिंदू लोक सोडले तर, बाकीचे काही लोक रामायण थोतांड आहे असे भासवतात. ते रावणाला देव मानत नाहीत. परंतु रावण हा एक चांगला राजा होऊन गेला असे त्यांचे मत आहे. एवढेच रावणाबद्दल बोलले जाते. पण प्रत्यक्ष नुवरालिया येथे आल्यावर, रामायणातील प्रसंगांची सत्यता पटते. हनुमान मंदिर, अशोक वाटिकेमध्ये सीतेचे मंदिर, तिथे असलेल्या हनुमानाच्या पायाचा ठसा, तसेच श्रीलंकेत रामायणात आढळलेले अनेक अवशेष व पुरावे आहेत. यामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांनी घेतलेल्या मार्गाचे अनुसरण करणारे रामायण मार्ग, तसेच त्यांच्या प्रवासा दरम्यान त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणी अनेक राम, सीता व लक्ष्मणाची मंदिरे आहेत. त्यामध्ये मुनेश्वरम, रामबोडा मंदिर, सीता अम्मान मंदिर इत्यादी. हे सर्व पाहताना, आपण भारतातच आहोत असं वाटत होते आणि रामायणातील घटनांची सत्यता पटते. पौराणिक कथेनुसार भारतीय महाकाव्य रामायणात वर्णन केल्याप्रमाणे सिगिरिया किल्ला रावणाचा राजवाडा होता ३७० मीटर उंचीवर दाट हिरव्यागार जंगलात तो वसलेला आहे.  आम्हाला वेळेअभावी तो पाहता आला नाही.

     श्रीलंकेतील पवित्र दात अवशेष बौद्ध मंदिर पाहण्यासारखे आहे. बाहेरून हे मंदिर लाईट्‌सच्या दीपमाळांनी झळाळून  निघाले आहे. या मंदिरामध्ये भारतामधून गौतम बुद्धाचा एक दात आणून तो जपून ठेवलेला आहे आणि त्याची पूजा  केली जाते. वर्षातील एका ठराविक दिवशी तो पेटीतून बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. मंदिरामध्ये दोन ठिकाणी बुद्धाच्या सोन्याच्या मूर्ती आहेत. त्यांच्या छताचे कोरीव कामसुद्धा सोन्याच्या पत्राने बनवलेले आहे. बुद्धाला अर्पण करण्यासाठी तेथील भक्तांनी विविध रंगाची कमळे व  विविध प्रकारच्या सुगंधाची शुभ्र फुले आणली होती. संपूर्ण मंदिरात या फुलांचा सुंदर मंद सुगंध पसरला होता.  कँडीचे हे टेम्पल ऑफ टूथ मंदिर शांततेचे आणि पवित्र अध्यात्मिक आश्रयस्थान मानले जाते.

     कँंडी शहराच्या जवळच चहाची फॅक्टरी पाहिली. चहाच्या मळ्यातून पाने आणल्यावर, त्याची चहापूड बनवण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पाहिल्या.बऱ्याच जणांनी तिथे चहा विकत घे तला. बुद्धाची ८८ फूट उंचीची मूर्ती कँडी शहराचं मुख्य आकर्षण आहे. तसेच  कँंडी शहराजवळ असलेले विशाल कॅन्डी सरोवर अनेक रंगाच्या फुलांनी आपले स्वागत करते. या सरोवरच्या मध्यभागी एक बेट आहे. इथे बोटिंगची व्यवस्थाही आहे.  सरोवराचा परिसर निसर्गरम्य सौंदर्याने वेढलेला आहे आम्ही सर्वांनी इथे खूप फोटो काढले. संध्याकाळी कँडी येथे श्रीलंकेतील स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. यामध्ये  सामूहिक नृत्य आणि धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याचा  एक कार्यक्रम अंतर्भूत होता. या कार्यक्रमांमधून त्यांची संस्कृती त्यांनी टिकवून ठेवलेली आहे, याची साक्ष पटते.

   ‘नुआरा एली'  हे उंचावरचे थंड हवेचे ठिकाण आहे. जसे कर्नाटकमध्ये उटी आहे, तसेच श्रीलंकेमध्ये कँडीजवळ असलेले हे उंचावरील थंड हवेचे ठिकाण आहे.  इथल्या आजूबाजूला चहाच्या मळ्यांचा, धबधब्यांचा आणि गुढ पर्वतांच्या विस्मयकारक दृश्यांचा आनंद घेतला. येथे तापमान पंधरा अंश सेल्सिअसपेक्षा सुद्धा कमी होते. मनाला खूप प्रसन्न व शांत वाटले.

नुआरा एली येथून आम्ही दुसऱ्या दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोकडे रवाना झालो. पूर्ण रस्त्यांच्या दोन्ही बाजूस नैसर्गिक सौंदर्य खच्चून भरले होते. उंचावरून वाहणारे धबधबे, यामध्ये बंबरकोंडा हा सर्वात उंच धबधबा पाहायला मिळाला.  पूर्ण रस्त्यात रबर, पाईन, नारळाची झाडे यांच्यामध्ये चहाचे मळे निसर्गाला एक वेगळाच बाज देत होते. इथे आपल्या कोकणासारखी अतिशय विरळ छोटी छोटी कौलारू घरे, पूर्वीची नळीच्या आकाराची कौलारू घरे आहेत. पूर्ण श्रीलंकेची लोकसंख्या फक्त दोन कोटी आहे. कोलंबो सोडून, कुठेच इमारती नाहीत. कोलंबो शहरांमध्ये मात्र उंच उंच इमारती आहेत. त्यांची बरीचशी मांडणी न्यूयॉर्कसारखी आहे. आम्हाला त्या ठिकाणी हिल्टन हॉटेलमध्ये १५ व्या मजल्यावर रूम मिळाली होती. रूमच्या खिडकीतून दिसणारा नजारा काही औरच होता. दूरवर पसरलेला हिंदी महासागर, लोटसच्या आकाराचे हॉटेल मशालीसारखे दिसत होते. संध्याकाळी समुद्रात बुडणाऱ्या सूर्याचे दर्शन चित्तवेधक होते.  सिटी टूरमध्ये आम्ही श्रीलंकेची पार्लमेंट इमारत, क्रिकेट स्टेडियम आणि कोलंबो बंदर पाहिले.

  अनुराधापूर, सिगिरिया किल्ला, गाला नॅशनल पार्क अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे तसेच अनेक वालुकामय किनारे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पौराणिक स्थळे, धबधबे, सरोवरे श्रीलंकेत आहेत. परंतु वेळेच्या अभावी आम्हाला ते पाहता आली नाहीत. श्रीलंका राष्ट्र हनिमूनर्स, साहसी निसर्गप्रेमी, आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी, एक भव्य पर्यटन स्थळ आहे. - सौ. स्मिता वाजेकर, वाशी 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नेव्हर से  डाय !