झांझिबारी मसाला

या लेखकाचा स्वानुभव दांडगा आहे; प्रसंगाची निवड लक्षवेधक आणि मनोरंजक आहे आणि लेखनशैली तितकीच मोकळीढाकळी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे गोष्टी वाचायला खूप मजा येते. नवीन माहिती कळते. रडारड, सामाजिक संघर्ष, आजारपण-अपघात-अपमृत्यु असलं त्रासदायक काही नसल्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला ताजंतवानं करतं.

उमेश कदम ह्यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. ह्या कथांचं वैशीष्ट्य म्हणजे परदेशात प्रवास किंवा परदेशी माणसांशी आलेला संपर्क ह्यातून घडणाऱ्या प्रसंगांभोवती कथांची गुंफण आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार उमेश कदम हे शिक्षण आणि आपल्या नोकरी-व्यवसाानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहिले आहेत. परदेश म्हणजे फक्त युरोप अमेरीका नाही; तर आफ्रिकन देश आणि पौर्वात्त्य देशसुद्धा ! ह्या वास्तव्यात त्यांना आलेले स्वानुभव, त्यांना भेटलेली माणसे, त्यांच्याकडून कळलेले किस्से ह्याला थोडी काल्पनिकतेची जोड देऊन त्यांनी ह्या कथा लिहिल्या आहेत. त्यातून प्रवासवर्णन + किश्श्यांच्या गमतीजमती + लेख + मानवी संबंधाचे पैलू असा ”मसाला” तयार झाला आहे. त्याला चपखल नाव दिले आहे ”झांझिबारी मसाला” लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती वाचल्यावर त्यांच्या विद्वत्तेची आणि अनुभवसंपन्नतेची जाणीव होईल.

प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगते.. जुई जपानला जाते. लग्नाच्या वयाची मुलगी करियरसाठी जपानला जाते. पोर परदेशात जाणार म्हणून. आईवडिलांची घालमेल. तिच्यासाठी भारतात ”स्थळ”दर्शन चालू असताना तिला तिकडेच कोणी आवडला तर ? खंडेनवमी इन मॅनहॅटन ही गोष्ट मला खूप आवडली. एकेकाळच्या संस्थानिक घराण्यातला; पण आता इंजिनियर म्हणून एमएनसी कंपनीत काम करणार मालोजी आता नोकरीसाठी अमेरिकेत गेलाय. दिवस नेमके दसऱ्याचे. खंडेनवमीची शस्त्रपूजा करायची घराण्याची परंपरा. पण अमेरिकेत खरं शस्त्र कसं बाळगणार? तो तर गुन्हाच. पण आले देवाजिच्या मना.. तर ”खंडेनवमी इन मॅनहॅटन” होईल का ? समीरचं समांतर जीवन  मिडलाईफ क्रायसिकवर मात करण्यासाठी जरा ”चावटपणा” करण्याचा सल्ला समीरला मिळतोय. काय घडणार त्यात ? क्रायसिसमधून सुटका की नवा क्रायसिस. बाय बाय बिजू  कथा नायक रॉटरडॅम शहरात गेल्यावर त्याची राहायची सोय होत नाही. भाषेच्या अडचणीमुळे त्यात भरच पडते. तेव्हा त्याला योगायोगाने भेटतो भारतातून आलेला बिजू. गरीब घरातून येऊन आपलं नशीब काढण्यासाठी युरोपात कष्ट करणारा बिजू. त्याच्या वागण्यामुळे मदत झाली आणि पुढे त्याच्या वागण्यामुळे त्रासही. ”बरं झालं हा भेटला” ते ”कशाला हा भेटला” असा प्रवास करणारी ही कथा. वजन कमी करण्याची गुरुकिल्ली  वजन कमी करण्याच्यासाठी ”डाएट”च्या प्रयत्नांमध्ये येणारं यशापयश हा नेहमीचा विनोदी विषय. नायकाची जीभ त्याच्याबरोबर बोलतेय आणि चांगलं चुंगलं खायला लावतेय असं कल्पनारंजन आहे. पॅरिसची पोरगी पटवली पाटलानं  ही पण धमाल कथा आहे. पैशाने श्रीमंत पण परदेशाचा, परभाषेचा काही अनुभव नाही असे गावचे पाटील आपल्या मित्राबरोबर आलेत पॅरिस बघायला. त्यांना खास करून ”रंगीन हसीन पॅरिस” बघायचंय. पण नुसतं बघायला गेले आणि जणू काही ”बघायचा” कार्यक्रम करून आले की. पॅरिसची पोरगी पटवली. आता ही गोरी पोरगी कुठले रंग दाखवणार. नायजेरियन (अ)सत्याचे प्रयोग  नायजेरियात काम कारणाऱ्या कथानायकाचा सहकारी त्याला त्याच्या बायकोच्या तक्रारी सांगतोय तर सहकाऱ्याची बायको नवऱ्याच्या. आता काय खरं आणि काय खोटं ? कुस्कोचे पोलीस  कथा नायक दक्षिण अमेरिकेत गेला असताना त्याला विमानात चिनी ”लियांग” भेटतो. गप्पागोष्टी होतात. आपल्या प्रवासाच्या गोष्टींची देवाणघेवाण होते. ओळख वाढते. मग ते पुढचे स्थलदर्शन एकत्र करतात. पण पुढे प्रवासात दारूच्या अंमलाखाली पासपोर्ट हरवतो. आता ”कुस्को” शहरातले पोलीसांना तो सापडतो. प्रवासातल्या ”हरवले-सापडले” ची घालमेल दाखवणारा हा किस्सा. रुसलेला किलीमांजारो नि धुसफुसलेला गोराेंगोरो  ही गोष्ट नाहीये तर ”किलीमांजारो” पर्वत आणि ”गोराेंगोरो” विवराच्या भेटीबद्दलचा लेख आहे. पर्वताच्या भेटीचा योग्य पुन्हा पुन्हा हुकत होता. त्यामुळे जणू तो रुसला होता असं लेखकाला वाटलं आहे. ह्या दोन ठिकाणांचं हे प्रवास वर्णन आहे. डच पाहुणचार  दोन चिनी मित्र युरोपात फिरायला आलेत. एकाला इंग्रजी येते दुसऱ्याला फक्त चिनी भाषा. प्रवासात इंग्रजी येणारा मित्र एक दिवस लवकर परत निघतो. दुसऱ्याला फक्त एक दिवस थांबून चीनला जाणारं विमान पकडायचंय. हॉटेल मधून थेट विमानतळावर जायचंय. फार बाहेर जायचंच नाही म्हणजे भाषेची अडचण येणारच नाही. पण घालून दिलेली ”लक्ष्मणरेषा” ओलांडल्यामुळे भोगावा लागला ”विजनवास”  पोलीस कोठडीचा वास. असं काय केलं त्याने ? पुढे सुटका कशी होणार ? किमया टोकियो कराराची  हीपण गोष्ट नाही.. तर एक माहितिरंजक लेख आहे. विमान हवेत असताना घोषणा होते की ”आपण सौदी च्या हवाई हद्दीतून उडत आहोत. म्हणून पंधरा मिनिटे मद्य वितरण बंद राहील.” सौदी जमिनीवर मद्यावर बंदी आहे म्हणून आकाशात पण ? असं कसं ? विमान आकाशात असताना कोणी गडबड केली, त्रासदायक कृत्य केलं तर त्याला कुठला कायदा लागू होणार विमान कंपनीच्या देशाचा का जिथून विमान उडतंय त्या देशाचा का आणि काही ? ह्यासाठी केला गेला ”टोकियो करार” आणि तो करार होण्याआधी कसे मजेशीर खटले घडले होते. हे ह्या लेखात सांगितले आहे. जुईचा जपानचा अनुभव मिडलाईफ क्रायसिकवर मात करण्यासाठी जरा ”चावटपणा” करण्याचा सल्ला परदेशात शिरसावंद्य मानून प्रवासात पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे हे बोलणारे दोन कथानायक  ज्यातला एक नंतर पासपोर्ट हरवतो. लेखकाचा स्वानुभव दांडगा आहे; प्रसंगाची निवड लक्षवेधक आणि मनोरंजक आहे आणि लेखनशैली तितकीच मोकळीढाकळी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे गोष्टी वाचायला खूप मजा येते. नवीन माहिती कळते. रडारड, सामाजिक संघर्ष, आजारपण-अपघात-अपमृत्यु असलं त्रासदायक काही नसल्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला ताजंतवानं करतं. प्रवासवर्णन-परदेशाच्या पार्श्वभूमीवरच्या कथांचा संग्रह हा ललित साहित्यातला वेगळा प्रयोग वाचकांनी नक्की वाचावा.

झांझीबारी मसाला
लेखकः उमेश कदम प्रकाशकः मेहता पब्लिशिंग
पृष्ठे - २०२मुल्य - २२५/-
-सौ. मनिषा राजन कडव 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्रीलंका : एक नंदनवन