खासियत गोल घुमटाची

स्थापत्यशास्त्रातील एक अदभूत चमत्कार म्हणजे कर्नाटकातील विजापूरचा गोल घुमट..महंमद आदिलशाहने हा घुमट इराणी वास्तुविशारद याकूतला बोलावून तो बांधला. याबाबत असे सांगतात की ती अनुपम कलाकृती पाहुन महंमद अदिलशहाने त्या इराणी इंजिनियरचे हातपाय तोडून टाकले. याचे कारण सांगताना तो म्हणाला होता.. ”माझी ही इमारत संपूर्ण जगात अद्वितीय राहिली पाहिजे. याचे हातपाय तोडल्यानंतर दुसऱ्या कोणासाठी तो गोलघुमटासारखी इमारत बांधणार नाही.”

कर्नाटक राज्यातील इस्लामी वास्तूशैलीसाठी ख्यातनाम असलेले इतिहासप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजेच विजापूर. विजापूर नावाविषयी इतिहासतज्ञांत एकवाक्यता नाही, तथापि कोरीव लेख, संस्कृत-कन्नड-फार्सी साहित्य यांतून विजयपूर, राय राजधानी, दक्षिण वाराणसी, बिज्जनहळ्‌ळी, बिज्जपूर, मुहम्मदपूंर इ. भिन्न नामांतरे आढळतात.येथे आढळलेल्या बहुविध अवशेषांवरून विजापूर जिल्ह्यांत इतिहासपूर्व काळात मानवी वस्ती असावी.

विजापूर जिल्हा हा हिंदू आणि इस्लामी वास्तुशिल्पकला यांचे आगर मानण्यात येतो. आठव्या शतकापासून चौदाव्या शतकाअखेर विजापूरच्या विस्तीर्ण पट्ट्यात फारसे बांधकाम झाले नाही, मात्र आदिलशाही काळात इस्लामी वा मुस्लिम वास्तुकलेत मोलाची भर पडली आणि मशिदी, दर्गे, महाल वा प्रासाद अशा तीन प्रकारच्या इमारती बांधण्यात आल्या. यांपैकी सुमारे वीस दर्गे आणि तेवढेच महाल सुस्थितीत अवशिष्ट असून मशिदींचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. येथील बहुतेक वास्तू एकवर्णी पिंगट, स्थानिक वालुकाश्मात बांधलेल्या आहेत.

गोल गुम्बाझ उर्फ गोल घुमट...
स्थापत्यशास्त्रातील एक अदभूत चमत्कार म्हणजे कर्नाटकातील विजापूरचा गोल घुमट.. विजापूरपासून आत आठ किलोमीटर्स अंतरावरुनही त्याचा भव्य चकाकणारा गोल दिसतो.

गोल गुम्बाजचे बांधकाम इसवी सन १६२६ मध्ये सुरू झाले आणि त्याची रचना पूर्ण होण्यास सुमारे ३० वर्षे लागली. महंमद आदिलशाह यांनी हा घुमट बांधला. त्यासाठी त्याकाळात त्याने इराणी वास्तुविशारद याकूतला बोलावून तो बांधून घेतला. याबाबत अशी कथा सांगतात की गोल घुमटाची ती अनुपम कला कृती पाहुन महंमद अदिलशहाने त्या इराणी इंजिनियरचे हातपाय तोडून टाकले. याचे कारण सांगताना तो म्हणाला होता. ”माझी ही इमारत संपूर्ण जगात अद्वितीय राहिली पाहिजे याचे हात पाय तोडून टाकले तर दुसऱ्या कोणासाठी तो गोलघुमटासारखी इमारत बांधणार नाही.”

अनेक वैशिष्ट्यांसाठी गोल घुमट जगात प्रसिद्ध आहे. रोममधील सेंट पीटर्स बॅसिलिका नंतर हा जगातील दुसरा सर्वात मोठा घुमट आहे. डार्क ग्रे बेसाल्टपासून बनवलेले हे स्मारक डेक्कन इंडो-इस्लामिक शैलीतील वास्तुकला अभिमानाने प्रदर्शित करते. गोल गुम्बाझचा घुमट हा इतिहासात बांधलेल्या सर्वात मोठ्या घुमटांपैकी एक आहे, ज्याचा व्यास १४४ फूट आहे. एकाही खांबाचा आधार नसलेली जगातील ही एकमेव प्रचंड इमारत आहे. या घुमटाचा खालचा हॉल अठरा हजार दोनशे पंचवीस चौरस फुट आहे. ज्या मुख्य घनाकृती भागावर हा घुमट आधारलेला आहे, त्याचा तळ १३५ फुट आहे. जमिनीपासून घुमटाच्या आतील भागाची उंची १७८ फुट व बाहेरील भागाची उंची १९८ फूट आहे आणि इतका प्रचंड विस्तार असूनही त्याला एकाही स्तंभाचा आधार नाही हे विशेष.

मुख्य घनसदृश संरचनेत अष्टकोनी क्रॉस-सेक्शन असलेले बुरुज आहेत ज्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर प्रत्येकाच्या वर एक घुमट आहे. या टॉवर्समध्ये मजल्यांसोबत आतमध्ये पायऱ्या आहेत, ज्यामुळे लोकांना स्मारकाच्या टेरेसपर्यंत पोहोचता येते. गोल गुम्बाझच्या आतील भागात चौकोनी आकाराचे व्यासपीठ आहे, ज्याच्या प्रत्येक बाजूला पायऱ्या आहेत. या रोस्ट्रमच्या मध्यभागी मोहम्मद आदिल शाह यांचे स्मारक आहे. या व्यासपीठावर एक लाकडी छतदेखील आहे, जो मोहम्मद आदिल शाहच्या कबरीच्या अचूक स्थितीचे प्रतीक आहे.

गोलधुमटाच्या अर्ध्याहून अधिक अंतरावर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथे एक गोलाकार गॅलरी आहे. ही विलक्षण व्हिस्परिंग गॅलरी स्मारकाच्या मजल्यापासून ३३.२२ मीटर उंचीवर आहे. या गॅलरीतून एक टाळी वाजवली तर त्याचे अनेकदा प्रतिध्वनी ऐकू येतात. हे क्षेत्र त्याच्या आर्कटिेक्चरचा एक मोहक बिंदू आहे. कारण ते प्रतिध्वनी आवाज दहापेक्षा जास्त वेळा प्रतिबिंबित करतात.

गोलघुमटाच्या चार बाजुंना चार उंच मनोरे आहेत. त्यांना आठ मजले आहेत. त्या षट्‌कोनी मनोऱ्यांंना नक्षीदार कमानी आहेत. गोलघुमटाच्या चारही बाजूंना चार भव्य कमानी व दरवाजे आहेत. घुमट व दरवाजे यांच्या मधल्या भागावर सुंदर नक्षी आहे. ”या ठिकाणी महंमद आदिलशाहाच्या अस्थी असून त्यांच्या निधनानंतर त्यांना स्वर्गप्राप्ती झाली व आकाशात तेजस्वी ताऱ्याच्या रुपात ते निरंतर राहिले आहेत” अशा अर्थाचे कोरीव काम घुमटाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर आहे. दक्षिणेकडील शिलालेख आणि मध्य कमानीवर सुलतानच्या मृत्यूची तारीख ४ नोव्हेंबर १६५६ असा उल्लेख आहे. मुख्य प्रवेशद्वार ‘बिजलीपथर'ने सुशोभित केलेले आहे.

गोलघुमटाचा परिसर सुंदर उद्यान व हिरवळ यांनी सुशोभित ठेवण्यात आला आहे. डेक्कन आर्कटिेक्चरनुसार बांधलेले, गोल गुम्बाझ हे कर्नाटक राज्यात स्थित भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण स्मारकांपैकी एक आहे. हे स्मारक त्याच्या आकारमानासाठी आणि अद्वितीय ध्वनिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. याला कधीकधी ”दक्षिण भारताचा ताजमहाल” असेही संबोधले जाते. मोहम्मद आदिल शाहच्या थडग्याबरोबरच गोल गुम्बाझ हे त्याच्या बायका आणि मुलींचे विश्रांतीचे ठिकाण होते.

गोल गुम्बाझ ही राष्ट्रीय महत्त्वाची भव्य रचना म्हणून ओळखली जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे त्याची देखभाल केली जाते. - सौ. संध्या यादवाडकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी