मुशाफिरी

 बालगुन्हेगारीचा विळखा आपल्या समाजाला बसत चालला आहे. यातील अनेक मुले ही आई किंवा बाप यांच्यापैकी कुणीतरी दुसरे लग्न केलेल्यांची, नव्या आई-बापाने न स्विकारलेली, बाहेरख्याली-व्यसनासक्त-कर्जबाजारी प्रवृत्ती असलेल्यांची असतात. तर अनेकदा सारी सुखे घरी हात जोडुन उभी असतानाही चांगले संस्कार करणारी ज्येष्ठ माणसेच घरात नसल्याने धनिकांची काही बाळे बिघडतात, गैरमार्गाला लागतात. हा शहरी, विभक्त कुटुंबपध्दतीचा दोष म्हणायचा...की सोशल मिडियाच्या आहारी गेल्याचे दुष्परिणाम समजायचे?

    गेली काही वर्षे दहीहंडी या सणाचे अति उदात्तीकरण, व्यापारीकरण, बाजारीकरण, इव्हेन्टीकरण झाले असून यात काही राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजून घेत स्वतःला अपग्रेड केले आहे. एकेकाळी हंड्या बांधून त्याचे प्रदर्शन मांडणारे काही बिलंदर नेते पुढे जाऊन आमदार, मंत्रीही बनले. याच दहीहंडीच्या नावावर दाखवली जाणारे बक्षिसे न वाटता तो पैसा स्वतःकडेच ठेवून थातुरमातुर रकमा गोविंदा पथकांना देणारे काही आयोजक गबर बनले. मात्र या जाळ्यात त्यांनी युवावर्गाला व्यवस्थित अडकवले. यात अनेक बालके/तरुणांचे हातपाय मोडले, डोकी फुटली; कंबर, छाती, गुडघे अशा महत्वाच्या अवयवांना कायमस्वरुपी दुखापती होऊन अनेकजण आयुष्यभराचे अपंग झाले. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय बेसहारा बनले. काहीजण तर जीवालाही मुकले.

    या सगळ्यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केल्यास तुमच्या हाती काही तथ्ये लागतील. दहीहंडीच्या थरांमध्ये हजेरी लावणारी ही मुले कोणत्या घरांतील असतात? कोणत्या समाजातून, जातिविशेषांतून आलेली असतात? त्यांचा आर्थिक उत्पन्न गट कोणता असतो? ते कोणत्या पदांवर काम करीत असतात? बऱ्याचदा ही मुले कूरियर बॉय, खलाशी, हेल्पर, प्युन, माथाडी कामगार, भाजीविके अशा प्रकारच्या कष्टाच्या कामात असतात. त्यांच्या कष्टाचा, मेहनतीचा, परिश्रमाचा पूर्ण आदर ठेवून म्हणावेसे वाटते की या मंडळींनी स्वतःला आणखी विकसित करत, वरच्या आर्थिक टप्प्यात जायला हवे. नेहमीचे काम करतानाच आणखी एखादा पार्टटाईम कोर्स पूर्ण करुन त्याहुन चांगले काम कसे मिळवता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक दिवसाच्या दहीहंडीच्या मजेखातर सगळे आयुष्य पणाला लावायचे आणि जीवनभराचे अपंगत्व पदरी पाडून घ्यायचे हा काय प्रकार आहे? तुम्ही अन्य जातिविशेष पाहा. कुणी जोशी, आपटे, चितळे, सहस्त्रबुध्दे, आगरकर, लेले, पेंडसे आडनावाचा गोविंदा सहाव्या, सातव्या थरावर चढून हंडी फोडताना दिसला आहे काय? त्यांची मुले अभ्यासात चमकतील, अन्य कला, क्रीडा, स्पर्धा यातून नैपुण्य मिळवतील आणि स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे व देशाचे नाव आणखी उज्ज्वल करायचा प्रयत्न करतील. तुमची मुले/नातवंडे काय करतात?

   नुकताच दिवाळसण संपला. फटावयांनी निर्माण केलेले प्रदूषण आणि आगी लागणे, अपघात, जखमा होणे, प्राणी-पक्षी जगताला धोके निर्माण होणे याबाबत शासकीय स्तरावर तसेच विविध प्रदूषणविरोधी जागरुकता निर्माण करणाऱ्या संस्था, मंडळे, प्रसारमाध्यमे यांनी प्रबोधन केल्यामुळे काही अंशी का होईना, फटाके कमी वाजवले गेले, आगी कमी लागल्या, कमी लोक फटाक्यांमुळे जखमी झाले. मात्र हे पुरेसे नाही. रावणाचा वध करुन प्रभू रामचंद्र अयोध्येला पोहचले या प्रसंगाचा आनंद व्यक्त करणारा सण म्हणजे दिवाळी. त्या निमित्त दिवे लावावेत, रांगोळ्या काढाव्यात, गोडधोड करावे, एकमेकांना भेटावे आणि हा प्रसंग साजरा करावा असा सामाजिक संकेत आहे. यात फटाके कुठेही येत नाहीत. या फटाक्यांचे मूळ चीनमध्ये आहे. हा देश आपल्याशी सातत्याने शत्रुप्रमाणे वागत आहे. त्या देशाने शोधलेले, तेथून आयात केलेले, त्यांच्या तंत्रज्ञानाने विकसित केलेले फटाके आपल्या दैवताच्या नावे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणाला आपण का बरे वाजवावेत? मी अनेकदा पाहतो की अनेक घरांतून आईबापच मुलांना फटाक्यांच्या गोणीच्या गोणी आणून देतात आणि या मुलांना फटाके वाजवताना पाहुन काही आईबापांच्या चेहऱ्यांवर अशी काही कृतकृत्यतेची भावना ओसंडून जात असते की या मुलांनी भारतासाठी जणू काही गोल्ड मेडलच जिंकलंय! आपले सण, आपल्या रुढी, आपल्या परंपरा, आपली व्रतवैकल्ये ही निसर्गाच्या जवळ जाणारी, त्याचे संवर्धन करायला सांगणारी, त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी आहेत. निसर्ग, पर्यावरण, मानवी व प्राणीजगताला नुकसान पोहचणाऱ्या फटाक्यांना यात कुठेही जागा नसताना आपण आपल्या मुलांच्या हातात फटाके का बरे देत आहोत? पुढे जाऊन हीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या मुलांना काय सांगतील? तुमची मुले/नातवंडे असे काही करत आहेत काय ?

    दिवाळीच्या तोंडावर, आधी किंवा नंतर अनेक सेवाभावी संस्था, समाजसेवी संस्था, मंडळे परिसरातील मोकळ्या जागा शोधून तेथे वृक्षारोपण करतात. झाडे लावण्यासोबतच त्यांची देखभाल, संरक्षण, संवर्धन याकडेही लक्ष देतात. परिसर हिरवागार करुन सोडतात. प्रसिध्द नवी मुंबईकर व्यवितमत्व असलेले श्री. विराग वानखेडे हे १५ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई ते राजस्थानमधील नाकोडा अशी १२०० कि.मी.ची पायी यात्रा करत या मार्गावर १ लाखाहुन अधिक झाडे लावण्याचा संकल्प तडीस नेत आहेत. काही स्वयंसेवी/समाजसेवी समुह जवळच्या वृध्दाश्रमांत जातात. परिवाराला जड झालेल्या, मुलगे-सूनांनी ‘अडगळीतली वस्तू' म्हणून धिवकारलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भेटतात.त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करतात; कुष्ठरोगी, महारोगी म्हणून समाजाने त्याज्य समजलेल्या घटकांसमवेत काही जण दिवाळी सणाचा आनंद त्यांना मिठाया, फळे, भेटवस्तू, फराळ वाटप करुन लुटतात. अशा संस्थांच्या कर्त्याधर्त्यांसमवेत मी अनेकदा अशा संस्थांमध्ये गेलो आहे, जात राहीन. तेथे मी पाहतो की अशा ठिकाणी जाणाऱ्यांमध्ये बव्हंशी भरणा हा पन्नाशी, साठी, सत्तरी ओलांडलेल्या नागरिकांचाच असतो. तरुण मुले-मुली तेथे (काही सन्माननीय अपवाद वगळता!) गेल्याचे पाहण्यास मिळत नाही. त्यामुळे आपल्या परिवाराच्या पलिकडे पाहण्याचे संस्कार मुलांवर होत नाहीत. अशी मुले आपल्याच विश्वात रमतात. त्यातील अनेकांना चंगळवाद आवडतो. पिकनिक, पार्टी, मॉलमधील खरेदी, हॅाटेलींग, मौजमस्ती म्हणजेच जीवन असे समीकरण त्यांच्या मनात पक्के होत जाते. संकटात, अडचणीत सापडलेल्या आपल्या देशबांधवांपैकी कुणाला आपल्या ताटातून, वाट्यातून, खिशातून काही काढून देत मदत करायची असते हे त्यामुळे त्यांच्यातील काहींना समजतच नाही. आता शहरी न्युक्लीयस फॅमिलींमध्ये दोघेही जण कमावणारे...त्यात आजी आजोबांना फारसे स्थान नाही. मुलांवर लक्ष द्यायला रक्ताचे असे कुणी नाही. अनेक कुटुंबांतून मुलाला बहीण नाही की मुलीला भाऊ नाही, अशी स्थिती! अशी तुमची मुले/नातवंडे मग करतात काय?

   आता शाळा-महाविद्यालयीन, व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करणारी अनेक मुले ‘पॅकेज'वर लक्ष ठेवून असतात. कोणत्याही एका ठिकाणी ते फार काळ टिकत नाहीत. काही जण संधी मिळताच परदेशात डॉलर, पौंड, दिनार, रुबल, येन कमवायला निघून जातात आणि त्यांच्यासाठी काडी काडी करत पैसा जमवून महागडे-व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या आईबापाला एकाकी टाकून देतात. यातले अनेकजण परस्परच, जन्मदात्यांना अजिबात न विचारता आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडून ‘दोनाचे चार' करुन घेतात. परदेशातून जन्मदात्यांना भरपूर पैसे पाठवतात. त्यांच्या नवजात मुलांची तोंडे व्हिडिओ कॉल करुन मग इकडे म्हातारा-म्हातारीला दाखवतात. याखेरीज आणखी मुला-नातवंडांची कॅटेगिरी आहे. त्यांचे आई किंवा वडील या जगात नसतात किंवा त्यांच्या आईने किंवा वडीलांनी दुसरे लग्न केलेले असते किंवा त्यांचे वडील लांबच्या शहरात आणखी भलत्याच बाईबरोबर राहात असतात.  मग त्यांना या पहिल्यांच्या मुलांच्या देखभालीची काळजी, चिंता असतेच असे नाही. याचा या मुलांच्या मानसिकतेवर कळत नकळत नकारात्मक परिणाम होत असतो. मग ही मुले आपल्याच कोशात गुरफटून जातात. अशा मुलाच्या आईने दुसरे लग्न केले असेल तर तिचा नवा नवरा ‘गायीसह वासरु' सांभाळण्याच्या मनःस्थितीत नसतो. या महिलेच्या पहिल्या नवऱ्याचे मुल जितके घराबाहेर राहील याच्या प्रयत्नात तो असतो. अशी मुले मग आपले समदुःखी सोबती शोधतात. त्यांच्याच सोबत अनेक तास घालवतात. दिवसा, रात्री कितीही वेळ घराबाहेर घालवला तरी घरुन कुणी ओरडणारे, संस्कार करणारे नसल्याने अशी मुले भटकी, स्वैर, गुन्हेगारी प्रवृत्तीची होण्याचा संभव वाढतो. ते इतर चांगल्या मुलांना बिघडवतात. मुलींची छेडछाड, मोबाईलवरुन अश्लिल दृश्ये-फोटो पाहुन एकमेकांना दाखवणे, छोट्या-मोठ्या चोऱ्या करणे, कुणाच्या तरी दारात, बंद दुकानांच्या पायऱ्यांवर, बगीच्यांमध्ये रात्री-अपरात्री अंधाऱ्या जागी बसून विकृत विचार करणे यात ही मुले गुरफटतात. कुणा सजग नागरिकाने तक्रार केली तर पोलीसही यांना उचलून नेतात व त्यानंतर तणावाच्या संभाव्य दिवसांना यांना कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ‘आत' टाकले जाते किंवा सकाळ-संध्याकाळ पोलीस स्टेशनला हजेरी लावायला सांगितले जाते. ही मुले मोठी होत गेल्यावर यांतले अनेक जण हळुहळु पूर्णवेळ गुन्हेगारीचाच मार्ग स्विकारतात. यांचे पुढचे आयुष्य जेलमध्ये सडण्यात तरी जाते, पोलीसी एन्काऊन्टरला बळी पडण्यात तरी जाते किंवा प्रतिस्पर्धी गुंड टोळ्यांच्या हल्ल्याची शिकार होण्यात तरी जाते.

   अशी अनेक मुले देशाच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या कामी येत नाहीत. तुमची मुले/नातवंडे यात मोडत तर नाही ना ? वेळीच सावध व्हा !

 -राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आठवणींची पेटी : बंब