पोपट भुर्रकन उडून गेला
आज फेसबुक स्क्रोल्स करीत असतांना पोपटाचा मंजुळ आवाज कानी पडला. कोणीतरी पोपटांच्या थव्याचा बसलेला, एकमेकांशी खोड्या व मस्ती करीत असलेला व्हिडिओ शेअर केला. तो माझ्या मनाला सुखदायी वाटलेला व्हिडिओ मिनाक्षीला दाखवत मी भूतकाळातील आठवणीत रमलो.
ते शालेय जीवन किती निरागस होते. मनात जे येईल ते तडीस न्यायचे. मी पाचवी-सहावीत असेल. अण्णा (वडिल) तेव्हा फोडलेल्या चिंचा विकण्याचा किरकोळ व्यापार करीत असत. चिंचाचे झाड चिंचेच्या फळांनी पापडी पकडली की विकत घ्यायचे व चिंचा परिपक्व होईपर्यंत सांभाळायचे. साधारण फेब्रुवारी महिन्यात हे घेतलेले चिंचेचे झाड फळ पक्व होईपर्यंत मार्च किंवा एप्रिल महिन्यात साभांळावे लागे. रविवारी मला कधी-कधी हे काम करावे लागत होते. घरापासून लांब मळ्यात ती चिंच होती. एकट्याने जायचे व दिवसभर थांबून घरी यायचे हे ठरलेले काम असायचे. असंच एका रविवारी मी चिंचेचे झाड राखायला जात होतो, तेव्हा सुधाकर माझा बालमित्र रस्त्यात भेटला. त्याने कुठं जातोस म्हटले, तेव्हा चिंच राखायला जात आहे असे मी उत्तर दिले. तेव्हा तो म्हटला की चिंचेच्या झाडावर पोपटांची घरटी आहेत का? मला दिवसभर सोबती हवाच होता, त्यामुळे मी लगेच हो म्हटले. तसा तो माझ्या सोबत मळ्यात येण्यासाठी तयार झाला. दगडावर दगड मारीत, वाकड्या तिकड्या उड्या मारीत तीन चार किलोमीटरहून अधिक अंतर चालून ही मला त्या दिवशी ताजेतवाने वाटत होते. मळ्यात गेलो तेव्हा विहीरीवर मोटीतून गव्हाला पाणी देणे चालू होते.
आम्ही दोघे मोटीतून दांडात सोडलेले थंडगार पाणी प्यालो. नंतर भाकरी चिंचेच्या फांदीला बांधून चिंचेच्या फांद्यांवर जावून बसलो. हिरव्यागार गर्द फांद्यांवर छान बसायला यायचे. पाडाला आलेली एखादी चिंच तोडून ती चोखत बसलो होतो. शिवाय वर्गातील गमतीजमती एकमेकांशी बोलत दुपार झाली. बाईने (आईने) कापडाच्या फडक्यात बांधून दिलेली भाकरी व ठेचा आम्ही दोघांनी मिळून खाल्ला, पाणी प्यालो व परत मस्ती करीत वेळ घालवत होतो. मळ्याचे रान असल्याने तिथे दुपारी छान वाटत होते. शेतात काम करणारे चिंचेच्या सावलीत दुपारचे जेवण उरकून थोडी विश्रांती घेवून परत काम करायला निघून गेले होते. आम्ही मात्र गार सावलीत मस्ती करीत होतो. ज्या कामासाठी सुधाकर माझ्यासोबत आला होता तेही आमच्या लक्षात होतेच. चिंचेवर पक्षांचा किलबिलाट चालू होता. चिमण्यांची चिवचिवाट, मध्येच कोकिळेच्या मधूर आवाज, शिवाय साळुखींची मस्ती हे सारे अनुभवत असतांना दोन पोपट चिंचेच्या मोठ्या फांद्यांवर असलेल्या खोडातील बिळात जातांना आमच्या नजरेस पडले. तसे आम्ही दोघंही सुखावलो होतो. पोपट पकडायच्या उद्देशाने सुधाकर आला होता. तो उद्देश सफल होईल ही आमची आशा पल्लवित झाली होती. तसा तो चिंचेच्या झाडावर चढला. फांदी मोठी होती व बुंद्यापासून जवळच असल्याने खाली पडण्याची भीती नव्हती. तो त्या खोडातील बिळाजवळ गेला व त्याने हाताने बिळाचा अंदाज घेतला. पोपटांना कोणीतरी जवळ आले आहेत याची कल्पना आली असावी. पण उडून जाणे धोक्याचे होते म्हणून ते उडून गेले नाही. सुधाकरने त्या बिळात हात घातला तसा एक पोपट पंख झाडत त्याच्या तावडीतून सुटून निघून उडून गेला. दुसरा तिथेच बिळात पकडले जावू या भितीने आतल्या बाजूला बसलेला होता. सुधाकर त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याने पोपटाला पकडायला बिळात हात घातला पण पोपट हाती लागत नव्हता. सुधाकर दमला व तिथेच फांदीच्या खोडावर दोन पाय खाली सोडून बिळाजवळ बसून राहिला. बिळातील पोपटाला वाटले संकट टळले, तसे तो पुढे येऊन अंदाज घेत असतांना सुधाकरने त्याला पकडायचा प्रयत्न केला. यावेळी मात्र पोपटाने त्याच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला होता.
रक्तबंबाळ झालेले बोट त्याने थोडावेळ तोंडात पकडले. नंतर अंगातील शर्ट काढला व हाताला गुंडाळला. नंतर बिळात हात घालून त्या पोपटाला पाडण्यात तो यशस्वी झाला. शर्टमध्ये त्याला नीट गुडांळून तो खाली उतरला. तो फार थकला होता; कारण अर्धा तास तो फांदीवर बसून पोपट पकडण्याचा प्रयत्न करीत होता.
पोपट पकडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद मावत नव्हता. माझी तो पकडलेला पोपट पाहायची उत्सुकता वाढली होती. तो मात्र मला पोपट दाखवायला तयार होत नव्हता. अंगावरील शर्टामध्ये त्याने त्याला चांगलेच पकडून ठेवले होते. मी त्याला दाखवण्यासाठी विनवणी करीत होतो. तो एकदाचा पोपट दाखवायला तयार झाला. हळूहळू पोपट तो शर्टमधून मोकळे करीत होता. मला त्याला पाहून आनंद झाला होता. त्याला पूर्णपणे पहाता यावे म्हणून शर्ट पुर्ण हटवायला सांगत असतांना काय चुक झाली हे आठवत नाही; पण तो पोपट सर्व शक्ती एकवटून त्याच्या तावडीतून भुर्रकन उडून गेला. आम्ही आ.. वासून त्याच्याकडे बघत राहिलो. त्याचा चेहरा रडवेला झाला होता. मीही आतून खचलो होतो, चूक तर झाली होती. पुन्हा पुढील रविवारी येऊ ही खोटी अशा दाखवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. तेवढ्यात मीनाक्षीने आवाज दिला. तसा मी भानावर आलो. स्वतःशीच हसत आवाजाच्या दिशेने निघून गेलो. -डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे नागोठणे