अशी भाषणे अशा गंमती

वक्ता दशसहस्त्रेषु दाता श्रोता़  भवती वानवा असे एक संस्कृत सुभाषित आहे सुभाषित हे संस्कृतच असते ना! तर अशा दशसहस्त्रेषु वक्त्यांचे हे दोन किस्से !

महाविद्यालयीन स्पर्धांमधील वक्ते हे एक वेगळेच रसायन असते वयानुकूल, जगातील सर्व विषयांवर अधिकाराने बोलण्याची उर्मी, तीला शेरोशायरीयुक्त, नाट्यप्रधान आणि चोख पाठांतर ह्यांची फोडणी अशी साधारण एक पाककृती असते. अशा पाककृतीने महाविद्यालयीन शोकेसेसची भूक ढाली-चषकांनी भागते. म्हणून अशा वक्त्यांना सतत उत्तेजन मिळतच असते. हल्ली हे उत्तेजन हजारो रुपयांमध्ये मिळते असेही ऐकून आहे. असो. अशाच एका महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील एक किस्सा.

विषय अनेक पिढ्यांनी चावून चावून चोथा केलेला : भ्रष्टाचाराचा भस्मासुर ! त्यावेळी महाराष्ट्रातील एका मुख्यमंत्र्यांचे एक प्रकरण खूपच गाजत होते. त्यानंतर अशांच्या मालिकाच आल्या ते सोडून द्या. आता तो महाविद्यालयीन विद्यार्थी वक्ता चोख पाठांतर करूनच आलेला. त्या भ्रष्टाचारातील सखोल आकडेवारी देऊन एक पल्लेदार वाक्य पूर्ण अभिनिवेशाने फेकता झाला। गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पवित्र महाराष्ट्रात नराधम मुख्यमंत्री जन्माला येतो हा केवळ तपशीलाचा फरक नाही तर तो शीलाचा फरक आहे! अपेक्षित टाळ्यांसाठी त्या वक्त्याने पॉज घेतलाच, श्रोत्यांच्या टाळ्यांमुळे तो पॉज लांबलाही. त्याच काळात परीक्षकांनी मनोमन त्याचे बक्षीस निश्चीतही करून टाकले असावे. वक्ता तर ते आत्ताच जिंकल्याच्या आविर्भावात उभा राहिला. ..आणि अचानक मागच्या खुर्चीतून एक मोठा आवाज आला... ही शीला कोण रे ? ह्या आगंतुक वक्त्याचा चेहरा गुप्त होता; पण आवाज खणखणीत होता आणि मुख्य म्हणजे टायमिंग अचूक होते. त्यामुळे टाळ्यांच्या कडकडाटापेक्षा हास्याच्या गडगडाट जास्त झाला.

...अर्ध्या मिनिटात वातावरण बदलले. पाठांतर करून आलेल्या वक्त्याच्या स्क्रिप्टमध्ये हे काहीच नसल्याने तो आधी पार गोंधळला आणि मग कोलमडलाच. ‘सीदन्ति मम गात्राणि' अशी त्याची अर्जुनावस्था झाली. जेमतेम १०-१५ सेकंद त्याने पुढील वाक्ये आठवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न असफल झाल्याने व्यासपीठ सोडून तो हॉलच्याच बाहेर चालता झाला. असो. नशीब त्यावेळी ‘शिलाच्या जवानी'चा जन्म झाला नव्हता अन्यथा सर्वांनी त्या गाण्यावरच ठेका धरला असता. महाविद्यालयीन वक्त्यांपेक्षा भयानक वक्ते कार्यालयीन निरोप समारंभात ऐकायला मिळतात. हे सर्व हौशी कलावंत, कार्यालयातील ‘शायनिंग ब्रिगेड'चे शिलेदार असतात. जाणाऱ्या साहेबासोबत आपले किती चांगले संबंध होते हे प्रस्थापित करणे आणि येणाऱ्या साहेबासमोर शायनिंग करणे हा त्यांच्या वक्तृत्वाचा हेतू असतो.

अशाच एका निरोप समारंभात अनेक वक्त्यांनी जाणाऱ्या साहेबाच्या आरती ओवाळल्या आणि मग नारी शक्तीचे प्रतिनिधित्व आणि प्रदर्शन करण्याकरता एक ‘त्यातल्या त्यात सुंदर' महिलेला पाचारण करण्यात आले. तिनेही २ -४ मिनटात गद्य आरती गायली आणि मग साहेबांच्या अनौपचारिक मोकळ्या विनोदी स्वभावाचे वर्णन करताना म्हणून गेली...‘ह्या साहेबांच्या सहवासात दिवस कसे गेले हे मला कळलेच नाही.' कार्यालयीन औपचारिकता, माजी -आजी साहेबांची उपस्थिती ह्याचा विसर पडून अचानक हास्याचा स्फोट होणे स्वाभाविकच ना, पण त्या महिला वक्तीला नेमके काय झाले ते कळलेच नाही आणि कळले तेंव्हा आता नेमके काय करायचे ते उमगलेच नाही. बरीचशी लज्जा, काहीशी भीती आणि बराचसा गोंधळ चेहऱ्यावर घेऊन ती कशीबशी धडपडत आपल्या जागेवर जाऊन बसली. जाणाऱ्या साहेबांची ‘दिवस घालवण्याची' ख्याती होती आणि ती महिला काही दिवसांनी खऱ्या मॅटर्निटी रजेवर गेली हे दोन्ही योगायोगच म्हणायचे.

असो. माझ्या वक्तृत्व प्रशिक्षण सत्रांमध्ये मी हे दोन्ही किस्से आवर्जून सांगतो आणि दोन धडे शिकवितो : (१) वक्तृत्व हे पाठांतराचे व्यासपीठ नाही; त्यासाठी रंगभूमी असते. वक्त्याने समयसूचक असायलाच हवे. (२) वक्त्याला काय बोलायचे ह्यापेक्षा काय बोलायचे नाही ते कळले पाहिजे. - योगेशचंद्र दत्तात्रेय लोहोकरे, जनसंवादिनी ठाणे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पोपट भुर्रकन उडून गेला