आंतरिक स्वच्छताही महत्त्वाची..!!

स्वच्छतेचे महत्त्व आपण जाणतो, पण ती केवळ बाहेर असून उपयोग नाही, आपली आंतरिक स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची! दिवाळीची आवराआवर सुरू केली असेल तर त्याबरोबरच मनाचा पसाराही आवरून घ्यायला हवा..!!

स्वच्छतेचे महत्त्व आपण जाणतो, पण ती केवळ बाहेर असून उपयोग नाही, आपली आंतरिक स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची!आपल्या रोजच्या वस्तू आपण नीटनेटक्या ठेवतो. त्यांची देखभाल करतो, आवराआवर करतो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मन, ते आवरायला नको का? ते कसे आवरायचे..? आणि मनात एक लख्‌कन वीज चमकून गेली. वाटले..खरंच की,किती महत्वाचे असते असे अधूनमधून आपणच आपल्या मनाचा कोपरा साफ करणं..खरंच हे शक्य  आहे का?

रोजच्या दैंनदिन जीवनात आपण सर्वच प्रकारच्या गोष्टी करत असतो. आपण रोज जेवतो. कोणी दोनदा, कोणी तीनदा, तर कोणी दिवसभर काहीना काही. परंतु, खाल्लेल्या अन्नाचा निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यूच ओढवेल ना? आपण रोज पाणी पितो. कोणी एक लीटर, कोणी दोन लीटर, कोणी त्याहून जास्त. परंतु, प्यायलेले पाणी शरीरातून बाहेर पडले नाही, तर काय होईल?

   आपण दर क्षणाला श्वास घेतो. किती वेळा घेतो, याची मोजदादही ठेवत नाही. योगाभ्यासात श्वास घेण्याचे विशिष्ट तंत्र शिकवले जाते. मात्र, घेतलेला श्वास सोडलाच नाही किंवा परत आपण श्वासच घेवू शकलो नाही तर काय होईल? मृत्यू होईल ना.

त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट मग दुसरी कुणी व्यक्ती देत असेल किंवा आपण स्वतः घेत असू.. घेऊन झाल्यावर ती सोडूनही देता आली पाहिजे. साचून राहिलेल्या गोष्टी खराब होतात. त्या निकामी होतात आणि शेवटी नाशवंत होतात. या भौतिक उदाहरणातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु, त्या गोष्टींचा वेळेत निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यू...तोही मनाचा. मनात कितीतरी गोष्टी अकारण साठवलेल्या असतात. मनात असंख्य विषयांची दाटी होते. मनावर नको तो भार होतो आणि मग मनही बोलायला लागते. म्हणजेच मनात अस्वस्थता निर्माण होते. मन सतत द्विधा मनस्थितीत अडकून राहते. या सगळ्या गोष्टी सर्वांच्याच, तुमच्याही बाबतीत घडत असतील, तर वेळीच मनाचा कप्पा आवरायला घ्या.

          आपण वरचेवर घरात आवराआवर करत असतो. उपयोगी गोष्टी ठेवून देतो. कमी महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि निरुपयोगी वस्तू फेकून देतो. काही ठेवतो,  ठेवलेल्या वस्तू महत्वाच्या असतात. मात्र, काही काळाने महत्त्वाच्या वस्तूदेखील अडगळीत जाऊन त्याचे रुपांतर निरुपयोगी वस्तूंमध्ये होते आणि नव्या वस्तूंसाठी जागा मोकळी होते. त्याच पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज मनाचा कप्पा आवारायचा आहे. चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद, चांगले क्षण मनात साठवायचे. अडगळीच्या गोष्टी काढून टाकायच्या आणि कमी महत्त्वाच्या गोष्टी तपासून घेत हळू हळू कमी करायच्या. हे एकाएकी जमणार नाही, परंतु सरावाने निश्चित जमेल. किंबहुना ते आपल्याला जमवावे लागेल; तरच आपले आयुष्य आपण सुंदररित्या जगू शकतो. जसे घर आवरताना आपण गोष्टी काळजीपूर्वक हाताळतो, तसेच मनाचा कोपरा आवरण्यासाठी आपल्याला काही गोष्टी विचारपूर्वक टाकून द्याव्या लागतील, काही बदल करावे लागतील, तर काही अनावश्यक गोष्टी विचार जाळूनच टाकावे लागतील. म्हणजे वाईट विचारांपासून, शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न स्वतःलाच करणे अपेक्षित असतं.

     वाईट विचार जाळायचे कसे, हा प्रश्न पडला असेल, तर एक प्रयोग करून आपल्या मनातले वाईटात वाईट विचार, भीती, द्वेष, मत्सर, राग एका कागदावर लिहून काढा. नीट वाचा. आणखी काही मुद्दे राहिले असतील, तर नोंद करा आणि सगळे काही लिहून झाल्यावर तो कागद शब्दशः जाळून टाका. असे केल्याने खरोखरच विचार जळतात का? नाही. मात्र, विचार काढून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात तर नक्कीच होते. या कृतीतून कोणालाही त्रास होणार नाही. उलट, झालाच तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून हा उपाय नक्कीच करून बघण्यासारखा आहे.

मन मोकळे करावेसे वाटते; पण अनेकांना प्रश्न पडतो, माझे दुःखं, माझ्या चिंता, माझे प्रश्न कोणाला सांगू? माझा कोणावरही विश्वास नाही. मात्र, मनातही  ठेवता येत नाही. कोणाला तरी सांगायचे, हा विचारच  स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी निःसंशयपणे आपले प्रश्न, काळजी, समस्या निसर्गाला, देवाला सांगा. घरातल्या रोपट्यांशी, पाना-फुलाशी बोला, प्राण्यांशी, बागेतल्या झाडाकडे बघून त्याच्याशी संवाद साधा. अशा कृतीने लोक तुम्हाला वेड्यात काढतील, याची भीती बाळगू नका. तुम्हाला होणारा त्रास दूर करायला त्यांच्यापैकी कोणीही येणार नाही. परंतु, कोणीतरी मूकपणे आपले म्हणणे ऐकून घेतले, हा आनंद मनाला समाधान आणि शांतता देईल आणि नकळत आपल्या मनात चांगल्या प्रतीचे विचारांचे  बियाणे पेरले जाईल.

  आपण आध्यात्मिक शक्ती वाढवली तर आपल्या वाट्याला सुख आलेले असो, नाहीतर दुःख, ते कधीच कायम टिकणारे नसते हे जाणवेल, प्रत्येकाची वेळ बदलत असते आणि वेळेनुसार परिस्थिती बदलत असते. सुखात आनंद आणि संकटात दुःखं पेलण्याची मनाची क्षमता वाढावी, म्हणून सुरुवातीपासून मनाला ध्यानधारणेची, प्राणायामाची, योगसाधनेची सवय लावून घ्यावी.नामःस्मरणातूनच उच्च प्रतीचा आत्मिक आनंद मिळतो.

  एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे ,ती म्हणजे पाण्याचा पेला किती भरलेला आणि किती रिकामा आहे, यापलीकडे तो पेला तुम्ही किती काळ पकडून ठेवता, यावर तुम्हाला होणारा त्रास अवलंबून असतो. त्याचप्रमाणे  मनाचेही तसेच आहे. कोणतीही गोष्ट मनात दीर्घकाळ साठवून ठेवली तर मनावर विनाकारण दडपण येते, वाईट विचारांना मनात थारा मिळतो आणि मग नको त्या गोष्टी जीवनात घडू शकतात. असे होऊ नये म्हणून मनावर अतिरिक्त ताण पडेल असे काही होऊ न देता आपले अनमोल असे मन सदैव ताजेतवाने कसे ठेवता येईल यालाच प्राधान्य द्यावं आणि  मन निर्मळ कसे ठेवता येईल,याकडे लक्ष द्यावे.

  ( माहिती स्त्रोतांच्या आधारे.)
   -प्रा.सौ.अलका सानप 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अशी भाषणे अशा गंमती